Get it on Google Play
Download on the App Store

सत्यकथा: भाकड म्हैस!!

साल १९६८...
भंडारा...
कृत्रीम रेतन केंद्र (कृत्रीम रेतनाद्वारे गायी व म्हशीला गर्भधारणा करण्याचे केंद्र)

दुपारची वेळ.
पोष्टमन टपाल देणास आत आला.
ते रजिस्टर टपाल होते.
नवीनच रुजू झालेल्या साहेबाने ते तपाल घेतले.
साहेबाने टपाल फोडले व ते वाचू लागले.
तसे त्यांच्या चेहेर्‍यावरचे हाव भाव बदलू लागले.
जवळ उभा असलेला शिपाई व बाजूला बसलेला डॉक्टर, साहेबांचा चेहेरा न्याहाळत होते.
साहेबांनी दोघांना जवळ बोलावले व त्यांना एका कागदावर सह्या करायला सांगितले.
दोघांनी त्या कागदावर सह्या केल्या. साहेबांनी प्रत्येकाला एकेक बंद पाकिट दिले.
ते पाकिट दोघांनी फोडले आणि दोघांचेही चेहेरे पार उतरले. कारण दोघांनाही वरिष्ठ कार्यालयाने निलंबीत केले होते. निलंबनाचे कारण होते: केंद्रावरील भाकड म्हैस विकण्याबद्दल.
कृत्रीम रेतन केंद्रावर एक भाकड गाय, एक भाकड म्हैस, एक जातिवंत व़ळू व रेडा ठेवलेला असतो. एक दिवसा आड डमी (भाकड) गाय व म्हैस कठड्यात ठेवून वळूचे व रेड्याचे वीर्य काढण्यात येते व त्यावर प्रक्रीया करून इतर उपकेंद्रावर पाठवण्यात येते.
भाकड (डमी) म्हशीमुळे जे निलंबीत करणात आले त्याचा किस्सा खालील प्रमाणे:
केंद्रावर डॉक्टर व शिपाई हे दोघेचजण काम पाहात असत. त्यावेळेला, वरिष्ठ अधिकारी कोणी नव्हते. दोघांच्याच हातात केंद्राचे काम होते. शिपायाचे काम वळू व रेडा यांना व्यायाम देणे, पाणी पाजणे, ढेप, चारा देणे व खराटा करणे, तसेच भाकड य व म्हैस यांची काळजी घेणे ही कामे होती.
"भाकड म्हशीला कुटी (बारीक केलेला चारा) दिली काय?"
"होय साहेब!"
"तीला कठड्यात घे! रेतन (वीर्य) गोळा करावयाचे आहे."
"होय साहेब!"
शिपाई म्हशीला कठड्यात घेतो व रेडा सोडून म्हशीच्या मागे उभा करतो. म्हशीला बघताच रेडा म्हशीला एक सर लावतो.
"अरे, म्हशीला सर लावू देवू नकोस. ती गाभण राहील."
पण एक सर लागलेलाच असतो.
त्यानंतर, रेडा पुन्हा म्हशीवर उडतो व डॉक्टर रेतन एका ट्युब मध्ये धरतात.
असा कार्यक्रम एक दिवसा आड केंद्रावर करण्यात येतो.
दोन-तीन महिन्यानंतर ती भाकड म्हैस अंगानी चांगली दिसू लागते. तीची कातडी मऊ लागते. तसेच तीच्या कासामध्ये (आचळ) फरक दिसतो. ही त्या भाकड म्हशीची चिन्हे पाहून डॉक्टर शिपायाला म्हणतो,"ही म्हैस तर गाभण दिसते. हीला आता आपण तपासून पाहू!"
शिपाई तीला कठड्यात घेतो.
डॉक्टर म्हैस तपासतात्.ती चक्क, पाच महिन्याची गाभण असते. डॉक्टर व शिपाई दोघेही विचार करतात की म्हैस तर गाभण आहे, आता काय करायचे? वरिष्ठांना कळवायचे का?
दिवस भराभर निघून जातात.
म्हशीला दहावा महिना लागतो.
दहा पंधरा दिवसात ती नक्कीच व्यायेल असे वाटत होते....
डॉक्टर शिपायाला घरी बोलावतात. शिपाई घरी आल्यावर डॉक्टर शिपायाला सांगतात की,
"या भाकड गाभण म्हशीला बाजारात विकून दुसरी भाकड म्हैस घेवून येवू व अर्धे अर्धे पैसे वाटून घेवू!"
शिपाई तयार होतो व दुसरे दिवशी बाजारात त्या म्हशीला सात हजार रुपयाला विकण्यात आली व दुसरी भाकड म्हैस दोन हजार रुपया घेण्यात आली.
उरलेले पाच हजार वाटून घेण्याचे ठरलेले असते. पण व्यापारी आठ दिवसांनी पैसे देणार होता.
आठ दिवसांनंतर त्याने डॉक्टरला पाच हजार रुपये आणून दिले.
डॉक्टरचा विचार बदलतो. शिपायाला अडीच हजार ऐवजी एक हजार रुपयेच देतो.
शिपाई दिड हजारा करता डॉक्टरकडे तगादा लावतो.
डॉक्टर पैसे देत नाहीत. त्यानंतर शिपायाने वरिष्ठाकडे सविस्तर तक्रार केली.
एक दिवस सकाळीच वरिष्ठ साहेब केंद्राला भेट देण्यास येतात. डॉक्टर सगळे रजिस्टर्स साहेबापुढे ठेवतात. साहेब तपासता तपासता जनावरांची हिस्ट्री शीट बघतात. ...
हिस्ट्री शीट प्रमाणे गाय, वळू, रेडा यांचे वर्णन जुळते. पण, भाकड म्हशीचे वर्णन जुळत नाही. ते खालीलप्रमाणे होते-
१.कपाळावर पांढरा डाग
२.रंग भुरकट
३.शिंगे मागे वळून पुढे आलेले
४.एका डोळ्यात टिक पडलेली
५. शेपूट आखूड

व आता जी भाकड म्हैस केंद्रावर बांधलेली होती ती खालील प्रमाणे-
१.रंग काळा
२. शिंगे मागे गेलेली
३.दोन्ही डोळे चांगले.
४. शेपूट लांब
५. कपाळावर डाग नाही

"शीट प्रमाण म्हशीचे वर्णन जुळत नाही. खरे काय ते सांगा डॉक्टर!"
डॉक्टर गुन्हा कबूल करतात व साहेबाची क्षमा मागतात व केसचा निकाल सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे लागतो व दोघांचेही निलंबन रद्द करून बदली करण्यात येते.
दोघांनाही सात हजार रुपयाचा भरणा करण्यास सांगण्यात येतो....