Get it on Google Play
Download on the App Store

श्री अरुणेश्वर महादेव


प्रजापिता ब्रम्हदेवाच्या दोन कन्या होत्या, कद्रू आणि विनता. दोघींचाही विवाह कश्यप मुनींशी करण्यात आला. कश्यप मुनी देखील दोन पत्नी मिळाल्यामुळे प्रसन्न होते. एकदा दोघींनी कश्यप मुनींकडून वरदान प्राप्त केले. कद्रूने १०० नागपुत्रांची माता होण्याचा आणि विनता ने दोन पुत्र जे नाग पुत्रांपेक्षा अधिक बलवान असतील असे वर प्राप्त केले. ठराविक काळानंतर दोघी गर्भवती झाल्या. या दरम्यान कश्यप मुनी तपश्चर्येसाठी वनात निघून गेले. कद्रूने १०० नाग पुत्रांना जन्म दिला. दुसरीकडे विनताला २ अंडी झाली, जी तिने एका भांड्यात ठेवली. ५०० वर्ष झाल्यानंतर देखील पुत्र प्राप्ती झाली नाही तेव्हा विनताने त्यातील एक अंडे फोडले. तिने पहिले कि त्यात एक बालक आहे, ज्याला धड आणि मस्तक आहे परंतु पाय नाहीत. क्रोधीत होऊन त्या बालकाने अरुणने आपल्या मातेला शाप दिला कि लोभात येऊन तू माझी वाढ पूर्ण होण्यापूर्वी अंडे उघडलेस, त्यामुळे मी शाप देतो कि तू दासी होशील आणि दुसरे बालक ५०० वर्षांनी तुझी दासी जीवनातून मुक्तता करेल. शाप दिल्यावर बालक अरुण रडू लागला कारण त्याने आपल्या मातेला शाप दिला होता. त्याचे रडणे ऐकून नारद मुनी तिथे आले आणि त्याला सांगितले कि जे काही होते आहे ते परमात्म्याच्या इच्छेनेच होते आहे. तू महाकाल वनात जा आणि उत्तर दिशेला असलेल्या शिवलिंगाचे दर्शन - पूजन कर. अरुण महाकाल वनात आला. शिवलिंगाचे पूजन केले. शंकराने त्याच्या पूजेने प्रसन्न होऊन त्याला सूर्याचा सारथी बनण्याचे वरदान दिले. कश्यप मुनींचा पुत्र अरुणाच्या पूजनामुळे हे शिवलिंग अरुणेश्वर महादेव या नावाने प्रसिद्ध झाले. असे मानले जाते कि जो कोणी मनुष्य इथे दर्शन घेतो त्याच्या पितरांना मोक्ष प्राप्ती होते. हे मंदिर रामघाट मध्ये पिशाच्च मुक्तेश्वर जवळ राम शिडी च्या समोर आहे.