Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण १

दूर अंतरावर दिसणा-या जपानी फ्राईटर्स पाहून टँगचा कमांडर रिचर्ड 'डिक' ओ'केन समाधानाने हसला.

शिकार !

ओ'केनने आपल्यासमोरचा लाऊडस्पीकर ऑन केला. पाणबुडीत सर्वत्र पसरलेल्या त्याच्या सैनीकांना त्याच्या सूचना स्पष्टपणे ऐकू जाणार होत्या.

ओ'केन पासून काही अंतरावरच एकवीस वर्षांचा फ्लॉईड 'फ्रायर ट्रक' कॅव्हर्ली कानाला हेडसेट लावून जहाजांचे येणारे आवाज टिपत होता.

आपल्या इतर अधिका-यांसह ओ'केन कोनींग टॉवरच्या छोट्याशा जागेत उभा होता.

" वेगात कोणताही बदल नाही कॅप्टन !" कॅव्हर्लीने ओ'केनला सांगीतलं.
" पुढच्या बाजूची बाहेरील दारे उघडा. स्टँड बाय् फॉर फायनल बेअरींग. अप् स्कोप !"

कॅव्हर्ली वेगात होणारा कोणताही बदल टिपण्यासाठी हेडसेटमधून येणारे आवाज ऐकण्यात गुंग होता. आपल्या कॅप्टनवर त्याचा पूर्ण विश्वास होता. डिक ओ'केन हा चालताबोलता टॉर्पेडो कॉम्प्यूटर आहे असं कॅव्हर्लीचं ठाम मत होतं. अर्थात यात आश्च्यर्य काहीच नव्हतं. वाहू चा कमांडर मश मॉर्टनच्या हाताखाली ओ'केन तयार झाला होता.

" फास्ट स्क्रू बेअरींग ! थ्री फोर झीरो !" कॅव्हर्लीचा आवाज घुमला.

ओ'केनने पेरीस्कोपला डोळा लावला. जहाजांना एस्कॉर्ट करणा-या एका गनबोटीला त्यांचा पत्ता लागला होता. ती भरवेगाने त्यांच्या दिशेने येत होती. काही मिनीटांतच ती त्यांच्यापर्यंत पोहोचली असती. अर्थात ओ'केनला त्याची पर्वा नव्हती.

" कॉन्स्टंट बेअरींग - मार्क ! कॅव्हर्ली, आवाजाचं बेअरींग येत राहूदे !"
" सेट !"
" फायर !"

तीन लहानसे धक्के बसले. सरसर पाणी कापत तीन टॉर्पेडो एका फ्राईटरच्या दिशेने सुटले. काही सेकंदांतच आणखीन तीन टॉर्पेडो दुस-या फ्राईटरच्या दिशेने निघाले होते !

ओ'केनने पेरीस्कोपमधून बाहेर नजर टाकली. पहिल्या तीन टॉर्पेडोनी आपली कामगीरी अचूक बजावली होती. फ्राईटरची होळी झाली होती. परंतु त्याचवेळी भरवेगात जवळ येत असलेल्या गनबोटीकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हतं.

" डाईव्ह ! डाईव्ह !" ओ'केनचा आवाज घुमला, " रिग फॉर डेप्थ चार्जेस !"

बॅलास्ट टँकमध्ये चौदा हजार पौंड पाणी भरलं गेलं. सुमारे १८० फूट खाली गेल्यावर सागरतळाजवळ टँग विसावली. सर्वजण आपापल्या नेमून दिलेल्या जागी पांगले होते. पाणबुडी डेप्थ चार्जेसचा सामना करण्यास सिध्द झाली.

" खाली जात रहा लॅरी !" ओ'केनने लेफ्टनंट लॉरेन्स सॅव्ह्डकीनला आज्ञा दिली.

कॅव्हर्ली वरुन येणारे आवाज टिपत होता. गनबोट पाणबुडीच्या वर स्थिरावली होती.

पिंग SS पिंग SS पिंग SS

गनबोटीच्या सोनारचा आवाज पाणबुडीत स्पष्ट ऐकू येत होता !

" पहिला डेप्थ चार्ज !"

ओ'केनच्या खालोखाल असलेला एक्झीक्युटीव्ह ऑफीसर मरे फ्रेजी टँगवर येण्यापूर्वी डिस्ट्रॉयरवर काम करत होता. अनेक जपानी पाणबुड्यांवर त्याने डेप्थ चार्जेसचा हल्ला केला होता. टँग एव्हाना पाण्याच्या पातळीपासून दोनशे फूट खोल होती.

 'सेकंदाला दहा फूट या हिशोबाने साधारण वीस सेकंदात पहिला स्फोट होईल !' फ्रेजीच्या मनात आलं.

" सहा ! त्याने सहा डेप्थ चार्जेस टाकले आहेत !" कॅव्हर्ली.
" आणखीन दहा सेकंद कॅप्टन !" फ्रेजी शांतपणे म्हणाला.

दहा सेकंदानी टँगच्या पृष्ठभागावर लाखो हातोड्यांनी घाव घालावेत असा हादरा बसला. संपूर्ण पाणबुडी या टोकापासून त्या टोकापर्यंत हादरली.

रेडीओमन एडविन बर्गमन आपल्या हेडसेटचा आवाज कमी करण्यास विसरला होता. पाणबुडीला बसलेल्या हाद-याने त्याच्या कानठळ्या बसल्या होत्या !

ओ'केनने पेरीस्कोप वर-खाली करण्याची केबल पकडून आपला तोल सावरला. वरुन डेप्थ चार्जेसचा मारा सुरूच होता. आतापर्यंतच्या दहा मोहीमांत अनेकदा ओ'केनने डेप्थ चार्जेसचा सामना केला होता. परंतु यावेळेप्रमाणे अचूक आणि लागोपाठ पडणारे डेप्थ चार्जेस त्यानेही पूर्वी अनुभवले नव्हते.

पाणबुडीतील सुटी असलेली प्रत्येक गोष्ट इतस्ततः फेकली जात होती. अ‍ॅशट्रे, इलेक्ट्रीक बल्बच्या काचांचा खच पडला होता.

चोवीस वर्षांचा मोटर मेकॅनिक असलेल्या क्लेटन डेक्करनेही ओ'केनप्रमाणे अनेकदा डेप्थ चार्जेसचा सामना केला होता, परंतु यावेळच्या डेप्थ चार्जेसच्या मा-याने डेक्करही अस्वस्थ झालेला होता.

वर असलेली जपानी गनबोट अद्यापही डेप्थ चार्जेस टाकतच होती. आणखीन बल्ब फुटत होते.

पाणबुडी कितीही खोलवर असली तरीही जपानी गनबोटीच्या सोनारवर पाणबुडीतला किंचीतसा आवाजही ऐकू जाणार होता. सुरक्षीततेचा उपाय म्हणून एअरकंडीशनही बंद करण्यात आला. इंजीन आणि मोटरमुळे निर्माण होणा-या उष्णतेमुळे सर्वांना घामाच्या धारा लागल्या होत्या !

कोनींग टॉवरमध्ये ओ'केन आणि फ्रेजी एकमेकांकडे कटाक्षं टाकत डेप्थ चार्जेसचा अंदाज घेत होते. टॅंग अत्यंत जाड पोलादापासून बनलेली होती, परंतु तिच्याही सहनशक्तीला मर्यादा होत्याच !

एडविन बर्गमन आपल्या जागेवर परतला होता. जपानी गनबोट पाणबुडीच्या पुढच्या डाव्या बाजूवर ( पोर्ट बो ) असल्याचं त्याच्या ध्यानात आलं. डेप्थ चार्जेसच्या मा-याचा परिणाम पाहण्यास आणि आणखीन डेप्थ चार्जेस टाकण्यास जपानी सज्ज होते !

" सर्व कंपार्टमेंट्स तपासा !" ओ'केनने आज्ञा दिली.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे डेप्थ चार्जेसचा वर्षाव होऊनही टँगचं फारसं नुकसान झालेलं नव्हतं !

" गनबोट पुन्हा वळली आहे !" बर्गमनचा आवाज उमटला.

याचा अर्थ उघड होता. पुन्हा डेप्थ चार्जेसचा हल्ला होणार होता !

" त्याने आपला अँगल बदलला ! तो जोरात जवळ येतो आहे !" बर्गमन
" राईट फुल रडार !" ओ'केन गरजला, " ऑल अहेड फुल !"

आतापर्यंत टँग कमीतकमी आवाज करत शत्रूला हुलकावण्या देण्याच्या हेतूने मार्ग कापत होती. मात्रं पूर्ण वेगात जाण्याच्या ओ'केनच्या आदेशाने पाणबुडीचा आवाज गनबोटीच्या सोनारवर नक्कीच ऐकू जाणार होता.

काही क्षणांतच पाणबुडी त्या गनबोटीच्या बरोबर खाली आली. गन बोटीच्या कॅप्टनने ओ'केनची चाल ओळखली होती. त्याने पुन्हा डेप्थ चार्जेसचा मारा करण्याची ऑर्डर दिली !

सोळा डेप्थ चार्जेस !