Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण ११

 ‘‘ओके सर...’’ एवढं बोलून अल्बर्ट मोहम्मदजवळ जातो आणि अभिजीत पाणबुडीच्या खालच्या कक्षामध्ये, तिथे दोन ठिकाणी काचा असतात. या काचा इतक्या मजबूत असतात की, पाणबुडी एखाद्या दगडावर जरी आपटली तरी त्या काचांना जरादेखील तडा जाणार नाही. अभिजीत त्या काचेमधून बाहेर पाण्यामधील वास्तव जीवन पाहतो.

 

अगदी संथपणे मासे संचार करीत असतात. जेलीफीश, लहान मासे, बेडूक, समुद्री साप, छोटे शार्क मासे अगदी संथपणे पाण्यातून संचार करत होते, हळूच एक जेलीफीश अभिजीत उभा असलेल्या काचेजवळ येते. अभिजीत तिच्याजवळ जातो तोच ती घाबरुन तिथून निघून जाते. नंतर अभिजीतला तिथे कासव दिसतात. एक मोठा मासा आपल्या पिलांना कुशीत घेतल्याप्रमाणे पाणबुडीच्या विरुध्द दिशेने जातो. जरा खाली पाहिल्यावर अभिजीतला तिथे अॅंकर फिश दिसतो, एखाद्या राक्षसासारखा दिसणा-या त्या अॅंकर फिशच्या डोक्यावरुन एक पेशी डोळ्यासमोर आलेली होती, त्यातून प्रकाश निर्माण व्हायचा आणि त्या प्रकाशाच्या सहाय्याने अंधारातून वाट काढत अॅंकर फिश पुढे जात होता. ज्याप्रमाणे पक्ष्यांचा थवा आकाशात मुक्तपणे संचार करत असतो, त्याचप्रमाणे लहान मासे पाण्याखालून एकत्र इकडून तिकडे फिरत होते. इतक्यात त्याला खाली असलेल्या प्रवाळांमधून एक खेकडा वेगाने जाताना दिसतो. समुद्राखालचं ते नयनरम्य वातावरण बघत तो मोहीम, श्रेया, आईवडील, जॉर्डन सर सर्वांना विसरतो.

 

दुसरीकडे चीन आणि रशिया यांच्या संशोधकांना सॅटेलाईटद्वारे अभिजीतची पाणबुडी अंटार्क्टिकाच्या दिशेने जाताना दिसते. अमेरिकी नौसेना आणिइंटरनॅशनल काउन्सिल फॉर द एक्स्प्लोरेशन ऑफ द सीयांनी मिळून संपूर्ण जगाचा विश्वासघात करत अंटार्क्टिकाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला म्हणून इतर देशांचे वैज्ञानिक, संशोधक आणि सैन्यदल त्यांच्यावर कडाडून टिका करतात.अभिजीतच्या टीमला लगेचच मागे फिरायला सांगा नाहीतर आमच्या क्रोधाला सामोरे जा...असे रोखठोक बोल रशियाचे सैन्यप्रमुख करतात. अमेरिकेने नियमांचा भंग केला असल्याने अमेरिकी नौसेनेच्या अधिका-यांनायुनेस्कोमध्ये उपस्थित रहायला सांगतात.

 

परिस्थिती आणखी गंभीर होते, ऑस्ट्रेलिया आणि न्युझिलंड देशाचे सर्व जहाज पाण्यामध्ये बुडतात, जपानमध्ये त्सुनामीचा मोठा तडाखा बसतो. जगातील वेगवेगळ्या देशांमधील जहाजं पाण्याखाली बुडण्याच्या घटना घडू लागतात. समुद्रातील पाण्याचे प्रवाह अचानक बदलू लागतात, कुणालाही काही अंदाज यायला मार्ग नव्हता. काही धार्मिक लोकांचं असं म्हणणं असतं की, आपण देवाला त्रास दिला आहे आणि आता देवाचा कोप झाला म्हणून तो आपल्याला शिक्षा देत आहे. मात्र जगभरातील वैज्ञानिक, सैन्यदल आणि संशोधक त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका असं जाहीरपणे सुचित करतात. संपूर्ण जगभर हा बदल लगेच झालेला नसतो, गेल्या कित्येक वर्षांपासून पाऊस अनियमितपणे पडत असतो. हिवाळ्यामध्ये थंडी वाढलेली आणि उन्हाळ्यात कडाक्याचं न असतं. काही ठिकाणी चमत्कारिकपणे नद्या गोठल्या गेल्याचं दिसून येत होतं. मात्र ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड, फिलिपाईन्स आणि काही बेटांवरील जीवसृष्टी धोक्यात आल्याचं स्पष्टपणे दिसत होतं.

 

अभिजीतची टीम तब्बल एक आठवडा पाण्याखाली असते. पाण्याचा तो प्रचंड प्रवाह त्यांच्यापर्यंत येतो.

 

अभिजीत, ‘‘ताबडतोब पाणबुडीची दिशा बदला. पाणबुडीला उत्तरेकडे न्या...’’

 

मोहम्मद, ‘‘त्याचा काही उपयोग नाही सर, प्रवाह अत्यंत वेगाने आपल्या दिशेने येत आहे...’’

 

अभिजीत, ‘‘ठिक आहे, पाणबुडी सेफ मोडवर ठेवा आणि प्रत्येकाने प्रोटेक्शन मास्क घालून ठेवा...’’

 

पाणबुडीमध्ये प्रोटेक्शन मास्क ठेवले होते. एखाद्या वेळी परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचा अंदाज येत असेल तर ताबडतोब सर्वांना ते मास्क घालावं लागतं. त्यामुळे पाणबुडीला जोरात धडक बसली किंवा पाणबुडीचा अपघात जरी झाला, तरी आतमध्ये असलेल्या वैज्ञानिक आणि सैनिकांना जास्त इजा होत नाही.

 

मोहम्मद, ‘‘सर, लवकर इकडे या...’’ अभिजीतसोबतच जेन, बार्बरा आणि स्टिफन मोहम्मदजवळ जातात. रडारवर त्यांना ध्रुवीय मासे त्यांच्या दिशेने येताना दिसतात. सगळे एकमेकांकडे बघू लागतात. मृत्यूला आता पर्याय नव्हता. अभिजीत पुन्हा एकदा सर्वांना प्रोटेक्शन मास्क घालायला सांगतो. ब्रुस आणि मेजर रॉजर्ड पाणबुडीला पाण्याच्या वर नेण्याचा प्रयत्न करतात. पाणबुडी हळूहळू वर जाऊ लागते, तोच पाणबुडीला जोराचा तडाखा बसतो. स्वॉन फिशचा जोरदार धक्का पाणबुडीला बसलेला असतो. पाणबुडी गोल फिरु लागते. असे एकामागोमाग 60-70 स्वॉन फिश त्यांच्या दिशेने येतात. ब्रुस सर्व इंजिन बंद करतो. स्वॉन फिश गेल्यानंतर पाणबुडीला एका ठिकाणी भेग पडून पाण्याचा जोरदार प्रवाह त्यातून आतमध्ये येतो. पाणबुडी आणखी खाली जाऊ लागते, इतक्यात पाण्याची जोरदार लाट त्यांच्या दिशेने येते. प्रवाहाबरोबर ते दूर फेकले जातात. आतमध्ये प्रत्येकाने प्रोटेक्शन मास्क घातल्याने कुणालाही दुखापत होत नाही. मात्र पाणी आतमध्ये आल्याने पाणबुडीचं नुकसान होतं, पाण्याचा मोठा प्रवाह आतमध्ये येतो आणि बचाव करण्यासाठी कसलाही आधार घेता न आल्याने त्यात जेन वाहून जाऊ लागते. तिला वाचवण्यासाठी अभिजीत आणि त्सेन्ग चू पुढे होतात. दोघेही पाण्याच्या प्रवाहामध्ये उडी मारुन पोहतच दरवाजाजवळ जातात. एका बाजूने त्सेन्ग चु आणि दुस-या बाजूनं अभिजीत आधारासाठी एक साखळी पकडून ठेवतात. जेन पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहत त्यांच्यापर्यंत येते. दरवाजाजवळ दोघेही तिला घट्ट पकडून ठेवतात. बार्बरा लगेचच इंजिन सुरु करते आणि सगळे सुटकेचा निःश्वास सोडतात.

 

पाणबुडीच्या भोवताली अचानक एक वेगळं आवरण तयार होतं आणि आत आलेलं पाणी वेगाने बाहेर जाऊ लागतं. आतमध्ये असलेली संशोधनाची मोठी पेटी प्रवाहाबरोबर बाहेर जाऊ लागते. अल्बर्टचं लक्ष लगेच तिथे जातं. ती पेटी अभिजीत, त्सेन्ग आणि जेनच्या दिशेने येत असते. अल्बर्ट आपली जागा सोडून धावत त्या पेटीवर उडी मारतो आणि त्या पेटीची दिशा बदलतो. तरीही ती पेटी अभिजीतच्या दिशेने येतेच. अल्बर्ट पूर्ण जोर लावून तिला थांबवायचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला समोरच्या टेबलापासून पुढे प्रतिबंधक दांडा दिसतो. अल्बर्ट लगेच त्या दांड्याला पकडतो. पाण्याच्या प्रवाहाबरोबर पेटी पाणबुडीबाहेर फेकली जाते. अल्बर्ट बचावला म्हणून अभिजीत सुटकेचा श्वास सोडतो. गोंधळाच्या परिस्थितीमध्ये देखील सर्वांच्या चेह-यावर समाधान येतं. अचानक आतमधून एक मोठा टेबल पाण्याच्या प्रवाहाबरोबर बाहेर येतो, तो अल्बर्टच्या पोटालाच लागतो. जोराचा मार बसल्याने अल्बर्ट आपले हात सोडतो. टेबलासह अल्बर्ट पाणबुडीबाहेर फेकला जातो. अभिजीत मोठ्यानेअल्बर्ट..!!’’ म्हणून ओरडतो. पण, त्याचा काही उपयोग होत नाही. अल्बर्ट वाहून गेलेला असतो. अभिजीतच्या डोळ्याची पापणी देखील हलत नाही, श्वास एकदम बंद, बाहेरचं काही ऐकू येत नाही इतक्यात जेन त्याला जोरजोरात हलवते...

 

‘‘अभिजीत, बाजूला हो... पाठीमागून दुसरा टेबल तुझ्या दिशेने येतोय...’’

 

अभिजीत लगेचच बाजूला होतो. दुसरा टेबलदेखील बाहेर गेल्यानंतर पाणबुडीची सर्व दारं बंद होतात.

 

कोण होता हा अल्बर्ट? अभिजीतसाठी एक लहान मुलगा होता तो. आपलं शिक्षण पुर्ण करुन नुकताच त्याच्या हाताखाली काम करु लागला होता तो. थोडासा पुस्तकी किडा होता, पण अभिजीत खूप जीव लावायचा त्याला. नाही म्हटलं तरी लहान भावासारखी वागणूक द्यायचा तो अल्बर्टला. त्याची इच्छा असायची की अभिजीतने आपल्या प्रत्येक मोहिमेमध्ये त्याला सोबत ठेवावं, आणि निरागस मनाच्या त्या मुलाची ही इच्छा अभिजीत नेहमी पुर्ण करत असे. आता अभिजीतलादेखील अल्बर्टची सवय झाली होती. हेच एक कारण होतं की, अशा जीवघेण्या मोहिमेमध्ये देखील अल्बर्ट अभिजीतसोबत होता. पण अगदी अभिजीतच्या डोळ्यांसमक्ष अल्बर्टने प्राण सोडावा? आणि त्यात अभिजीतची इच्छा असून देखील त्याला काहीही करता न यावं? अभिजीतसाठी यापेक्षा मोठी शोकांतिका काहीच नव्हती.

 

थोडया वेळाने पाणबुडी पूर्वस्थितीमध्ये येते, मात्र त्या सर्वांचा कुणाशीही संपर्क होत नव्हता. अभिजीत पाणबुडी वर घेण्याचे आदेश देतो.

 

पाणबुडी काठावर पोहोचते. त्सेन्ग लगेचच अमेरिकी नौसेनेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांना अंटार्क्टिकावरील चिनी संशोधकांचं मोडलेलं जहाज दिसतं, पाणबुडी जहाजाच्या दिशेने वळवण्यात येते. अभिजीतबरोबर जेन आणि स्टिफन पाणबुडीचं झाकण उघडून बाहेर येतात. जहाजाचं खूप नुकसान झालं असतं. तिघेही थंड पाण्यातून पोहत, स्वान माशांना चुकवत त्या जहाजामध्ये जातात. अगोदर अभिजीत त्या जहाजामध्ये शिरतो आणि मग तो जेन आणि स्टिफनला आतमध्ये घेतो.

 

आत गेल्यानंतर त्यांना सर्व वैज्ञानिक आणि संशोधक मृतावस्थेत दिसतात. जहाजावर सील मासा आणि पेंग्विन यांचे देखील मृतदेह असतात. कुजलेल्या मांसाप्रमाणे त्या सर्वांना घाण वास येत होता. आपल्या बोटांनी नाक दाबत अभिजीत जहाजाच्या वरच्या दिशेने जातो तेव्हा त्याला तिथे चीनमधील संशोधक डॉ. वेन जिन्तो जखमी अवस्थेत दिसतात. अभिजीत स्टिफनला वर बोलावतो. दोघेही त्यांना तपासतात तेव्हा त्यांच्या हृदयाचे ठोके चालू असल्याचं त्यांना समजतं.दोघेही त्यांना उचलतात आणि जेनला जहाजामध्ये असलेली छोटी बोट पाण्यात उतरवायला सांगतात. त्या बोटीमध्ये डॉ. वेन जिन्तो यांना अलगदपणे ठेवून तिघेही त्यांना आपल्या पाणबुडीमध्ये घेऊन जातात. तत्पुर्वी जेनने त्या जहाजामधील संशोधन केलेली माहिती घेतलेली असते.

 

चौघेही त्या जहाजामधून निघाल्यानंतर लगेचच एक देवमासा जोरात त्या जहाजाला धडक देतो. ती धडक इतकी मोठी असते की काही अंतरावर असलेले ते चौघेही पाण्यामध्ये फेकले जातात. जेव्हा पाण्याखालून अभिजीत त्या देवमाशाकडे बघतो तेव्हा तो देवमासा त्यांच्या दिशेने येताना त्याला दिसतो. परिस्थितीचं गांभिर्य ओळखून ब्रुस पाणबुडीमधून लहरींचा एक मोठा आवाज करतो. हा आवाज फक्त पाण्याखालीच येतो. याची तिव्रता इतकी असते की तो देवमासा प्रचंड चिडतो आणि पाणबुडीच्या दिशेने जातो. आता आपलं काही खरं नाही हे सगळे मनाशी पक्क ठरवतात तेच एक मोठा स्फोट त्या ठिकाणी होतो. स्फोटाने घाबरुन तो देवमासा पुन्हा पाण्यामध्ये जातो. पाणबुडीच्या आतमध्ये असलेले सगळे बाहेर येतात आणि पाहतात तर अमेरिकी सैन्यदलाच्या सहा हेलिकॉप्टर्स तेथे आलेले असतात. पाणबुडी दिसताच वीस-पंचवीस सैनिक पाण्यामध्ये दोरखंड टाकून पाण्यात उतरतात. काही सैनिक अभिजीत, स्टिफन, जेन आणि डॉ. वेन जिन्तो यांना हेलिकॉप्टरमध्ये नेतात. इतर हेलिकॉप्टर्स आपले दोरखंड पाणबुडीला बांधतात आणि ती पाणबुडी घेऊन अर्जेंटिनाच्या दिशेने निघतात.