Get it on Google Play
Download on the App Store

बाळासाहेब - व्यंगचित्रकार

मुळातच प्रबोधनाचे बाळकडू घेतलेले बाळासाहेब उत्तम कलाकार होते. सर्वप्रथम एक कलाकार म्हणून -एक व्यंगचित्रकार म्हणून- त्यांनी सामाजिक प्रश्र्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. इ.स. १९५० मध्ये ते 'फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच बाळासाहेब विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे-व्यंगचित्रे-जाहिरातीचे डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत असत.

'मार्मिक’ व्यंगचित्र साप्ताहिक
पुढे बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वत:चे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट, इ.स. १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना प्रबोधनकारांनीच सुचविले. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. ‘मार्मिक’ च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. या समारंभास प्रा. अनंत काणेकरही उपस्थित होते. महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमान जागृतीसाठीच बाळासाहेबांनी मार्मिकची सुरुवात केली. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता, पण प्रामुख्याने मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतच होता. या प्रश्र्नाला मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणाऱ्यांना बाळासाहेबांनी प्रथम व्यंगचित्रांच्या माध्यमातून वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला. इ.स. १९६० पासून ते आजतागायत राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत, तसेच इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी जनांना मार्गदर्शन करत ‘मार्मिक ’ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे.