Get it on Google Play
Download on the App Store

ज्योतिषांच्या भाकीताच्या जाळ्यात...

ज्योतिषांच्या भाकीताच्या जाळ्यात सापडुन, कृतीशून्य , प्रयत्नशुन्य बसण्यापेक्षा जिद्दीने प्रयत्नांची कसोशी करीत रहाण्यात पुरुषार्थाची सिध्दी असते - प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे

आज रविवार. साप्ताहिक राशिभविष्य हातात पडताच कोणता ग्रह किती दिवस आडवा आलाय, ते पाहण्याची घाई.. आणि उभा असेलच तर किती दिवसांनी आडवा येणार आहे याची चिंता.. भविष्याचे कुतूहल उलगडणारा कोणीतरी भेटल्याच्या आनंदात आपण पानं उलगडतो. पुढे दिवसभरात चुकून कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक वेळ होते, आणि या भविष्य नावाच्या कावळ्याचं वजन खूपच असतं, असा समज होवून बसतो. साडेसाती चालूय, म्हणून असं होतंय, हे वाक्य बरेच जन पाठ करून बसतात.

मुळात भूतकाळ आणि वर्तमानकाळाच्या ज्ञात विश्वापलीकडे अज्ञात असणारा भविष्यकाळ आणि त्याविषयी कुतूहल असणे नैसर्गिक आहे, पण तो जाणणे कुणासाठीही कठीणच आहे, हे उमजणसुद्धा आवश्यक आहे. लाखो किलोमीटर अंतरावर असलेले मंगळ, शनी तुमच्या पत्रिकेत कसे येऊन बसतील, याचा विचार कुणीच करत नाही. वास्तव असं आहे कि, दूरवरच्या मंगळाला किंवा चंद्राला कितीजण येऊन त्यांना पायदळी तुडवून गेले हेही माहित नसणार. मग त्यांनी तुम्हाला पायदळी तुडवणं कसं शक्य आहे??

पंचांगाच्या मागे। लागतो अडाणी,
पाहे क्षणोक्षणी। शुभाशुभ ॥१॥

मूर्ख भट म्हणे। त्याज्य दिन आज,
दक्षिणेची लाज। बाळगेना ॥ २॥

कामचुकारांना। धार्जिणे पंचांग,
सडलेले अंग। संस्कृतीचे ॥३॥

मुहूर्ताचे वेड। मूर्खांना शोभते,
आयुष्य नासते। पंचांगाने ॥४॥

चांगल्या कामाला। लागावे कधीही,
गोड फळ येई। कष्ट घेता ॥५॥

दुष्ट कामे केली। शुभ वेळेवरी,
माफी नाही तरी। शिक्षेतुनी ॥६॥

वेळ, हवा पाणी। आकाश बाधेना,
भटांच्या कल्पना। शुभाशुभ ॥७॥

विवेकाने वागा। होऊनी निर्भय,
अशुभाचे भय। निर्बुद्धीना ॥८॥

सत्य सांगा लोका। जरी कडू लागे,
चाला, नाही मागे। आला कोण ॥९॥

पण तरीसुद्धा या ग्रहांच्या भीतीनं पावलं अगदी जपून टाकली जातात. पत्रिका जुळल्याशिवाय लग्न होत नाही. ग्रहांना शांत करणारी अशांत माणसं तयार होतात. शनी महाराजांचा कोप होवू नये, म्हणून तेला-तुपाचे अभिषेक घातले जातात. आपलं सगळं अस्तित्व हे ग्रह-तारे गिळंकृत करून टाकतात. पत्रिकेच्या बारा घरात यांना काय आनंद सापडतो, तेच जाणोत. . मंणगटातला जोर संपला की... माणूस ...अंगठ्यामध्ये भाग्य शोधतो ..!!

यामध्ये तरुण पिढीही सहभागी आहे, हि सर्वात खेदाची बाब. नाइलाजानंच हे मान्य करावं लागतंय. पत्रिका जुळत नाही, म्हणून हि पोरं लग्न मोडायला तयार होतात. साध्या साध्या गोष्टींसाठी मुहूर्त पाहिल्याशिवाय आमचे पाऊल पुढे जात नाही. फेसबुकवर तर सकाळपासून रात्रीपर्यंत अनेक तरुण तरुणींचे हॉरोस्कोप दिसत असतात.आपली सर्व शक्ती ग्रह ताऱ्यांच्या स्वाधीन करून बसलेल्या लोकांना आपल्याकडे मेंदू आणि मनगट आहे, याचा विसर कसा पडतो, हासुद्धा चिंतनीय विषय आहे.

आजची माध्यमेही सकाळी सकाळी कुठल्या तरी महाराजाला दिवस कसा जाईल, हे सांगायला बसवतात. आणि रिमोट आपल्या हातात असूनसुद्धा आपल्याला ते बंद करावं वाटत नाही. हाताच्या रेषा पाहत बसणारे लोक, हात नसणाऱ्यांनाहि भविष्य असतं, हे कसं विसरतात. यापूर्वीही या विषयावर अनेकांनी सांगून झालंय. पण तरीही विचारातून कृतीशीलतेकडे आपण कधी वळणार, हा प्रश्नच आहे..

भारत महासत्ता होणार आणि या महासत्तेचे शिलेदार पत्रिका जुळवत बसणार, हे चित्र बरं नव्हे ना..

लेखं - रवि मेमाणे(पुणे)