Get it on Google Play
Download on the App Store

धर्म नावाचे झाडं !!

फार फार वर्षापूर्वी माणसाने एक झाड लावलं. हळूहळू ते झाड वाढू लागलं. त्या झाडाच्या वासानं माणसाला धुंदी यायची. त्यामुळं लोकांना त्याचं फार कौतुक वाटायचं. अक्षरशः झिंगायाचा माणूस त्या वासानं. काही चाणाक्ष लोकांनी या झाडापासून फळेही मिळतात, हे ओळखलं. मग त्यांनी त्या फळांचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली. त्या झिंगलेल्या लोकांना पहारेकरी बनविलं. आम्ही तुम्हाला काहीतरी निर्गुण निराकार दाखवणार आहोत, असा आव आणून देणग्या , वर्गण्या चालू केल्या. अगदी खात्री पटावी म्हणून, "वृक्ष"संस्थापणारथाय संभवामि युगे युगे .. असं सांगून तुमच्या वर कुणाचा तरी हात आहे हे निक्षून सांगितलं. वासाने झिंगणारे पहारेकरी आणि फळे चाखणारे मालक बनले.

या मालक लोकांनी झाडे वाढत रहावीत म्हणून खतपाणी घालण्याचे काम केलं. त्याचा परिणाम म्हणून मग अशी झाडे जागोजागी वाढू लागली. प्रत्येक झाडाला वेगवेगळे नाव मिळालं. झाडाच्या नावाने दुकाने सुरु झाली. प्रत्येक जण माझेच झाड श्रेष्ठ कसे, ते सांगू लागलं. झाडावरून दंगली सुरु झाल्या, मोर्चे निघू लागले. एकमेकांची झाडे तोडण्याचे प्रयत्न होवू लागले. दोन झाडांच्या पहारेकऱ्यामध्ये स्पर्धा सुरु झाली. त्या झाडाचं वास आला कि, पहारेकरी पेटून उठायचे. एकमेकांचा जीव घ्यायला धावायचे.

इकडे मालकांनी खतपाणी घालून त्या झाडाला विषारी आणि आजारी बनवलं. ते विष इतकं भयानकपणे या झिंगनाऱ्या लोकांमध्ये भिनलं, कि एक दिवस प्रलय येवून त्यात तुम्ही सगळे जगासहित नष्ट होणार आहात, हे मनामनावर बिंबवण्यात आलं. सामान्य माणूस कर्ज काढून या झाडाची पूजा करू लागला. झाडाच्या खऱ्या मालकाचा कोप झाला तर आपलं काही खरं नाही, या भीतीनं तो झाडाचे सारे उत्सव आनंदात पार पाडू लागला.

धर्म नावाची झाडं जागोजागी वाढत आहेत. आणि सारीच झाडं थोड्याबहुत प्रमाणात आजारी पडली आहेत. पण त्याची धुंदी अजून कमी होत नाही. कुणी या आजारी झाडाची चिकित्सा करण्याचा प्रयत्न केलाच तरी हे धुंदावलेले पहारेकरी त्याच्यापर्यंत पोहचूच देत नाहीत. आणि मालकांनाही कदाचित तेच हवंय.

लेखं - रवि मेमाणे(पुणे)