Get it on Google Play
Download on the App Store

वर्गीकरण

सूर्याभोवती फिरणार्‍या खगोलीय वस्तूंचे तीन मुख्य वर्गात वर्गीकरण केले जाते: ग्रह, लघुग्रह व सूर्यमालेतील छोट्या वस्तू. जिला इतके वस्तुमान आहे की ती स्वत:च एका गोलात रूपांतरित होऊ शकते अशा वस्तूला ग्रह हे नाव दिले जाते. ग्रहाच्या जवळील अवकाशात सूर्याभोवती फिरणार्‍या इतर छोट्या वस्तू नसतात. या व्याख्येप्रमाणे सूर्यमालेत एकूण आठ ग्रह आहेत - बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस व नेपच्यून. ऑगस्ट २४ २००६ रोजी आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटनेने (International Astronomical Union) ग्रहांची नवीन व्याख्या बनविली व त्यानुसार प्लूटोचे वर्गीकरण ग्रहांमधून बटुघुग्रहामध्ये करण्यात आले. त्याच वेळी सेरेस व एरिस यांनाही बटुग्रहांचा दर्जा दिला गेला. एका बटुग्रहाजवळील अवकाशात इतर खगोलीय वस्तूंचे अस्तित्व असू शकते. लघुग्रहांमध्ये गणना होणार्‍या इतर खगोलीय वस्तू म्हणजे सेडना, ऑर्कस व क्वाओर. प्लूटो हा त्याच्या शोधापासून (म्हणजेच १९३० पासून) सूर्यमालेतील नववा ग्रह मानला जात होता. पण २० व्या शतकाच्या शेवटी सूर्यमालेतील बाहेरच्या भागात प्लूटो सारख्या अनेक वस्तू शोधण्यात आल्या.

यापैकी मुख्य म्हणजे प्लूटोपेक्षा आकाराने मोठा असणारा एरिस. सूर्याभोवती फिरणार्‍या इतर खगोलीय वस्तूंना एकजात छोट्या वस्तू असे म्हणतात. सूर्यमालेतील ज्या खगोलीय वस्तू सूर्याभोवती न फिरता ग्रह, लघुग्रह अथवा छोट्या वस्तूंभोवती फिरतात, त्यांना नैसर्गिक उपग्रह किंवा चंद्र म्हणतात. प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती फिरताना लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो. त्यामुळे ग्रहाच्या एका प्रदक्षिणेदरम्यान त्याचे सूर्यापासूनचे अंतर बदलत राहते. सूर्यमालेतील अंतरे मोजताना खगोलशास्त्रज्ञ साधारणपणे खगोलीय एकक (Astronomical Unit or AU) हे एकक वापरतात. एक खगोलीय एकक म्हणजे सूर्य व पृथ्वी यांच्यातील सरासरी अंतर. हे अंतर जवळ जवळ १४,९५,९८,००० कि.मी. (९,३०,००,००० मैल) इतके आहे. याप्रमाणे गुरु ग्रहाचे सूर्यापासून अंतर सुमारे ५.२ AU आहे तर प्लुटोचे सुमारे ३८ AU इतके आहे. अंतरे मोजण्याचे दुसरे परिमाण म्हणजे प्रकाशवर्ष. एक प्रकाशवर्ष म्हणजे सुमारे ६३,२४० खगोलीय एकके इतके अंतर.