Get it on Google Play
Download on the App Store

शेतकरी जगाचा पोशिंदा

शाळेला सुटी झाली. शंभर मुलांची तयारी झाली. स्वामींनी सामान जमविले होते. घमेली, फावडी, कुदळी, टिकाव, पहारी सारे सामान मोजून गाड्यांतून कांही मुलांबरोबर पुढे गेले. ताडपत्र्या, धान्य वगैरे सारे आधीच पुढे गेले होते.

ते चार प्रचरक आले होते. चार शिक्षक आले होते. मुलांच्या हातांतून झेंडे होते. बिगूल बरोबर होते. शिस्तीने पावले टाकीत सेवादल जाणार होते! ते पहा पहाटे चारला बिगूल झाले. सारी मंडळी उठली. मैदानांत ठरल्याप्रमाणे जमली. सर्वांची गिण्णती झाली. चारचारांच्या रांगा करण्यांत आल्या. दोन प्रचारक पुढे होते, दोन मागे होते. स्वामी मुलांतच डावा उजवा करीत चालत होते!

निघाले. सेवादल निघाले. तो परम पवित्र दिवस होता. हिंदुस्थानांतील तो अपूर्व दिवस होता. खानदेशांतील ते दिव्य दृष्य होते. तरुण विद्यार्थी जगाचा पोशिंदा जो शेतकरी त्याची अल्प सेवा करावयास आनंदाने जात होते. तो अल्प आरंभ होता. ते शुभ चिन्ह होते. राष्ट्रपुरुष जीवंत होत आहे याची ती खूण होती.

‘आम्ही दोवाचे मजूर । आम्ही देवाचे मजूर’

हे गाणे म्हणत ते सेवक चालले. वाटेतील खेड्यांतील लोक पाहावयास येत. झेंडेच झेंडे पाहून मुले नाचू लागत. आयाबहिणी केडवर मुले घेऊन ही यात्रा पाहावयास येत. ‘गांधी बाप्पाचे लोक आहेत,’ असे त्या म्हणत.

वाटेत मारवडचे स्वयंसेवक मिळाले! सेवासागर उचंबळू लागला. मारवाडच्या लोकांनी जयजयकार केला. वंदेमातरम्, वंदेमातरम् गर्जना गगनाला गेली. महात्मा गांधी की जय, भारतमाता की जय असे जयजयकार दशदिशांत घुमले.

मारवडचे लोक म्हणाले, “आम्हीहि गाड्या देऊ,”
स्वामी म्हणाले, “शाबास! भारतमाता की जय.”

ते पहा देवपूरचे लोक सामोरे आले! भिका, जानकू, रघूनाथ, नामदेव- त्यांच्या बरोबर गावांतील तरुण मंडळी आहेत! ती पाहा आंधळी वेणू! मुलींचा हात धरून झेंडा घेऊन येत आहे. गाणी म्हणत, लेझिम खेळत; झेंडे मिरवीत देवपूरचे लोक आले.

गंगा युमनेला मिळाली! शहर खेड्याला मिळाली. डोके धडाला मिळाले. हृदय बुद्धीला मिळाले. जीव शिवाला भेटला. महादेवाला भेटला. जयजयकाराची एकच गर्जना झाली! सारी मंडळी देवपूरला आली. गांवांत अपूर्व उत्साह भरला. घरांतून सारी बाहेर आली. वाळवंटात सारा जमा जमला. स्वामींनी दोन शब्द सांगितले. सारी मुले मशिदीत जाऊन बसली.