Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण सातवें येर्‍हवीं...

प्रकरण सातवें

येर्‍हवीं तरी अज्ञाना । जैं ज्ञानाची नसे क्षोभना ।

तैं तरी काना । खालींच दडे ॥१॥

नव्हतें चळण ज्ञाना जेव्हां अज्ञान शब्द नाइकला ।

ज्ञानाभावीं लोकीं शब्द असा केंवि जाय वापरला ॥१॥

अडसूनि अंधारीं । खद्योत दीप्तिशिं धरी ।

तैसें हें लटकें वरी । अनादि होये ॥२॥

आंधाराचा आश्रय घेउनियां काजवा जसा चमके ।

तैसी अज्ञानाची वार्ता शब्दाश्रयांत मात्र पिके ॥२॥

जैसी स्वप्ना स्वप्नीं महिमा । तमीं मान असे तमा ।

तेंवि अज्ञाना गरिमा । अज्ञानींचि ॥३॥

स्वप्ना स्वप्नीं महिमा जैसा राहे तमांत मान तमा ।

अज्ञानाचे गांवीं अज्ञानाचा तसा असे गरिमा ॥३॥

कोल्हेरीचे वारु । न येती धारकीं धरुं ।

नये लेणां शृंगारु । वोडंबरीचा ॥४॥

कृत्रिम घोडे जैसे कामा येती न फेरफटक्याला ।

कीं इंद्रजाळनिर्मित दागीने निरुपयोगि लेण्याला ॥४॥

हे जाणणेयाच्या घरीं । खोंचिलेंही आन न करी ।

कायि चांदिणां उठे लहरी । मृगजळाची ॥५॥

कांहिं न अज्ञानाचें चाले थोतांड ज्ञाननगरींत ।

मृगजललहरीं कैंची चंद्राच्या शीतल प्रकाशांत ॥५॥

आणि ज्ञानहि जें म्हणिजे । तें अज्ञानचि पां दुजें ।

एक लपऊनी दाविजे । एक नव्हे ॥६॥

ज्ञान जयाला म्हणती तेंही अज्ञानची असे दुसरें ।

एका लप‍उनि दुसरें दाखविण्या योग्य होति ते नखरे ॥६॥

असो आतां हा प्रस्तावो । आधीं अज्ञानाचा धांडोळा घेवों ।

मग तयाच्या साचीं लाहो । ज्ञानहि लटकें ॥७॥

हा विषय तूर्त राहो अज्ञानाचा करूं अधीं शोध ।

त्याचा निश्चय होतां ज्ञानाचाही मिळे सहज बोध ॥७॥

हें अज्ञान ज्ञानातें । आंगींच आहे जिथें ।

जेथें असे तयातें । नेण कां न करी ॥८॥

ज्ञानाच्या ठायीं जरि असतें अज्ञान बा सुरक्षित हें ।

तरि अज्ञान जिच्यामधिं राहे ती वस्तु अज्ञ कां नोहे ॥८॥

अज्ञानें जेथ असावें । तेणें सर्व नेण व्हावें ।

ऐसी जाती स्वभावें । अज्ञानाची ॥९॥

हें ज्याला आलिंगन देई ती वस्तु नेणती व्हावी ।

अज्ञानजाति ऐशी असुनी ती कां स्वरूपिं न दिसावी ॥९॥

तरि शास्त्रमत ऐसें । जे आत्माचि अज्ञान असे ।

तेणेंचि तो गिवसे । आश्रो जरी ॥१०॥

शास्त्राचें मत ऐसें कीं आत्मा विषय होय अज्ञाना ।

आश्रयही तोचि असे यावरि आक्षेप आणिती नाना ॥१०॥

तरि अनुठितां दुजें । अज्ञान आहे बीजें ।

तैं तेंचि आथी हें बुझे । कोण येथ ॥११॥

जेथें दुसरें नाहीं अज्ञानावीण तेथ अज्ञान ।

आहे ऐशी ख्याति ज्ञानाविण जाणणार मग कोण ॥११॥

अज्ञान तंव आपणयातें । जडपणें नेणे निरुतें ।

आणि प्रमाण प्रमाणातें । होत आहे ॥१२॥

अज्ञान तरी जड हें त्या अर्थीं जाणण्या न तें शक्त ।

अवशिष्ट नुरे कोणी तरि तें आहे न उक्ति ही युक्त ॥१२॥

यालागीं जरि अज्ञान । करील आपुलें ज्ञान ।

हे म्हणतखेवों घेववी मौन । विरोधचि ॥१३॥

यास्तव अज्ञानातें अज्ञानचि जरि स्वतांचि जाणेल ।

ऐशा विरोधवचनें वाणी मौना धरूनि बैसेल ॥१३॥

आणि जाणति वस्तु येक । तेणें अज्ञानें कीजे मूर्ख ।

तैं अज्ञान हें लेख । कवण धरी ॥१४॥

जरि या अज्ञानानें मोहविलें बोधरूप आत्म्यातें ।

तरि ही अज्ञानकृती बोधावांचुनि कळेल कवणातें ॥१४॥

अहो आपणयाहि पुरता । नेण न करवे जाणता ।

तया अज्ञान म्हणतां । लाजिजे कीं ॥१५॥

ज्या बोधरूप आत्म्या व्यापीलें जरि न अज्ञ करि त्यास ।

लाज कसी न मनाला वाटे अज्ञान त्या म्हणायास ॥१५॥

आभाळें भानु ग्रासे । तैं आभाळ कोणें प्रकाशे ।

सुषुप्ति सुषुप्तया रुसे । तैं तेंचि कोणा ॥१६॥

अभ्रें सत्यचि गिळिला रवि जरि अभ्रासि कवण भासवितो ।

सुप्तिंत कोण नसे जरि निद्रासुख सांग कोण अनुभवितो ॥१६॥

तैसें अज्ञान असे जेथें । तेंचि जरि अज्ञान आतें ।

तरी अज्ञान अज्ञानातें । नेणतां गेलें ॥१७॥

अज्ञान वसे जेथें कल्पूं जरि तीच वस्तु अज्ञान ।

कोणिं कुणा जाणावें होतां दोघेहि सारखे नेण ॥१७॥

नातरी अज्ञान एक घडे । हें जयास्तव निवडे ।

तें अज्ञान नव्हे फुडें । कोणे काळीं ॥१८॥

अज्ञान एक आहे ज्यास्तव ही गोष्ट जाणतां येते ।

अज्ञान तीचि वस्तू ऐसें घडणें अशक्यची दिसतें ॥१८॥

पडळही आथी डोळां । आणि डोळा नव्हे आंधळा ।

तरी आथी या पोकळा । बोलिया कीं ॥१९॥

पडदा नेत्रा आला असुनी अंधत्व नाहीं नेत्राला ।

ऐसें म्हणतां ' पडदा आला ' हा बोल व्यर्थची झाला ॥१९॥

इंधनाचे आंगीं । खवळलेनि आगी ।

तें न जळे तैं वाउगी । शक्तिचि ते ॥२०॥

शुष्केंधनसंयोगीं जरि अग्नीनें जळे न इंधन तें ।

व्यर्थचि त्याची शक्ति नच शोभे अग्नि नांव हें त्यातें ॥२०॥

आंधार कोंडोनि घरीं । घरा पड्‍साद न करी ।

तैं आधार इहीं अक्षरीं । न म्हणावा कीं ॥२१॥

अंधार कोंडिला घरिं तरि तेथें जरि पडे न काळोख ।

अंधार नांव त्याचें ठेवा काढूनि दूसरें एक ॥२१॥

वो जावों नेदी जागणें । तये निदेतें नीद कोण म्हणे ।

दिवसा नाणी उणें । तैं रात्रि कैंची ॥२२॥

जी जागृती न लोपवि त्या निद्रेला म्हणे कवण झोंप ।

दिवसां उणें न आणी रात्र तिला नांव साच हें जल्प ॥२२॥

तैसा आत्मा अज्ञान असिकें । असतां तो न मुके ।

तैं अज्ञान शब्दा लटिकें । आलेंच कीं ॥२३॥

आत्मा ठायीं असुनी जरि हें अज्ञान किंचितहि उणिव ।

नाणी आत्मज्ञाना तरि त्या अज्ञान व्यर्थ हें नांव ॥२३॥

एर्‍हवीं तरी आत्मया । माजी अज्ञान असावया ।

कारण म्हणतां न्याया । चुकी येईल कीं ॥२४॥

अज्ञान एरवीं तरि आत्म्यामाजी वसे असें वदणें ।

क्षणमात्रहि न टिकेचि न्यायाच्या हें कसा अशक्यपणें ॥२४॥

अज्ञान तममेळणी । आत्मा प्रकाशाची खाणी ।

आतां दोहीं मिळणीं । एकी कैसी ॥२५॥

अज्ञान तमोराशी आत्मा हा स्वपकश चैतन्य ।

एकत्र संगतीनें वसति कसे जे विरुद्ध अन्योन्य ॥२५॥

स्वप्न आणि जागर । आठव आणि विसर ।

इयें युग्मे येका हार । चालती जरी ॥२६॥

बा स्वप्न आणि जागर किंवा स्मृति आणि विस्मृती दोन्ही ।

एकत्र वास करिती कधिं होइल सत्य जरि असी वाणी ॥२६॥

शीतातूप एकवट । वाहे वस्तीची वाट ।

कां तमें बांधिजे मोट । सूर्यरश्मींची ॥२७॥

एका घरिं नांदति जरि प्रीतीनें शीत उष्ण हें उभय ।

जरि अंधारें रविच्या रश्मींची मोट बांधिली जाय ॥२७॥

नाना राती आणि दिवो । येती एके ठाई राहों ।

तैं आत्मा जिवें जीवो । अज्ञानाचेनि ॥२८॥

दिन आणि रात्रिं किंवा एक स्थळिं एक कालिंही मिळुनी ।

वसती तरीच आत्मा अज्ञानावरि असूं शके जगुनी ॥२८॥

हें असो मृत्यु आणि जिणें । इयें शोभती काय मेहुणे ।

तरी आत्मेनि असणें । अज्ञानेंसिं ॥२९॥

मृत्यू आणी जीवन राहे एकत्र हें मिथुन ।

आत्मा खुशाल बसुं दे अज्ञाना नित्य अंकिं घेवोन ॥२९॥

अहो आत्मेनि जें बाधे । तेंचि आत्मेनसिं नांदे ।

ऐसीं कायसीं विरुद्धें । बोलणीं येथें ॥३०॥

जें आत्मविरोधीं तें नांदे । आत्म्याबरोबर सुखानें ।

वाटे नवल विलक्षण कानीं पडतां विरुद्ध हीं वचनें ॥३०॥

अहो अंधारपणींची पैज । सांडूनि अंधार तेज ।

जाला तैं सहज । सूर्य निभ्रांतचि ॥३१॥

अंधारपणाचें जें ब्रीद तया त्यजुनि तेज जैं झाला ।

अंधार नांव काढुनि पदवी द्यावीच सूर्य ही त्याला ॥३१॥

लांकूडपण सांडिलें । आणि आगीपणें मांडिलें ।

तैंचि आगी जालें । इंधन कीं ॥३२॥

सांडुनि काष्ठपणातें शिरुनी अग्नींत होइ जें दग्ध ।

अवघें इंधन तेव्हां अग्निच होईल तें असंदिद्ध ॥३२॥

कां गंगा पावतखेवों । आनपणाचा ठावो ।

सांडी तैं गंगा हो । लाहे पाणी ॥३३॥

किंवा गंगासंगम होतां भिन्न प्रवाह सांडोनी ।

साधारण पाणीही राहे भागीरथीच होवोनी ॥३३॥

तैसें अज्ञान हें नोहे । तरी आत्मा असिकें असों लाहे ।

एर्‍हवीं अज्ञान होये । लागलेंचि ॥३४॥

यापरि अज्ञान जरी नोहे हें तरि म्हणाचि त्या आत्मा ।

नाहीं तर आत्माची हो‍उनि अज्ञान जाय तन्महिमा ॥३४॥

आत्मेनसीं विरोधी । म्हणोनि नुरेचि इये संबंधीं ।

वेगळें तरी सिद्धी । जायीच ना ॥३५॥

आत्म्याशिं तें विरोधी म्हणुनी अज्ञान त्यांत न टिकेची ।

जरि वेगळें करावें आत्म्याहुनि सिद्धि होइना त्याची ॥३५॥

लवणाची मासोळी । जरी होय जिवाळी ।

तरी जळीं ना वेगळी । न जिये जेवीं ॥३६॥

जैसा सजीव मासा लवणाचा टाकितां जळीं विरतो ।

कीं काढिला जळांतुनि तरि तो उपजीवनाविणें मरतो ॥३६॥

जैं अज्ञान येथ नसे । तरीच आत्मा आभासे ।

म्हणोनि बोलणीं वायसें । नायकावीं कीं ॥३७॥

अज्ञान नष्ट होतां आत्मा तत्काळ बुद्धिला भासे ।

ऐसीं पोकळ वचनें सुज्ञांनीं ऐकणेंचि योग्य नसे ॥३७॥

दोरीं सर्पाभास होये । तो तेणें दोरें बांधों नये ।

मा दवडणें न साहे । जयापरी ॥३८॥

ज्या दोरीवरि भासे सर्प तया बांधणें असाध्य असे ।

तैसें त्या दोरींने त्या सर्पा दवडणेंहि शक्य नसे ॥३८॥

त्यापरी उभयतां । अज्ञान शब्द गेला वृथा ।

हा तर्कावांचूनि हाता । स्वरूपें नये ॥३९॥

दोहीं अंगीं बघतां अज्ञान वृथाचि शब्द हा लेकीं ।

त्याचें स्वरूप नोहे शब्दावांचूनि सिद्ध अवलोकीं ॥३९॥

नाना पुनिवेचे अंधारें । दिहा भेणें रातीं मोहरें ।

कीं येतांचि सुधाकरें । गिळिजे जेंवी ॥४०॥

अंधार पूर्णिमेला दिवसा सूर्यास भीउनी पळतो ।

रात्रीं मिरवायाला जाई तंव त्यासि चंद्रमा गिळतो ॥४०॥

तरी अज्ञानस्वरूप कैसें । काय कार्यानुमेय असे ।

कीं प्रत्यक्षचि दिसे । धांडोळूं आतां ॥४१॥

कार्यानुमेय आहे कीं हें प्रत्यक्ष दृश्य अज्ञान ।

याचें स्वरूप कैसें पाहुं अतां प्रश्न हा विचारून ॥४१॥

अहो प्रत्यक्षादि प्रमाणीं । कीजे जयाची घेणी ।

ते अज्ञानाची करणी । अज्ञान नव्हे ॥४२॥

प्रत्यक्षादिक मानें ज्याचे बुद्धीस होतसे ग्रहण ।

अज्ञानकार्य ते त्या म्हणतां येईल केविं अज्ञान ॥४२॥

जैसी अंकुरेंसी सरळ । वेलीं दिसे वेल्हाळ ।

तें बीज नव्हे केवळ । बीजकार्य होय ॥४३॥

अंकुर घेउनि वाढे सरळ लता जी नव्हेचि तो बीज ।

बीजाचें कार्यचि ती कवणालाही कळेल हें सहज ॥४३॥

कां शुभाशुभ रूपें । स्वप्नदृष्टीं आरोपे ।

तें नीद नव्हे जाउपें । निदेचें कीं ॥४४॥

किंवा स्वप्न शुभाशुभ पडतें ते सर्वथा नव्हे झोंप ।

कार्यचि तें निद्रेचें मुढाही हें कळे अपोआप ॥४४॥

नाना चांद एक असे । तो व्योमीं दुजा दिसे ।

तें तिमिरकार्य जैसें । तिमिर नव्हे पैं ॥४५॥

चक्षूसि दोन दिसती चंद्र खरा एक असुनि आकशीं ।

तिमिराचें कार्याचि तें अवगत ही गोष्ट सर्व लोकांसी ॥४५॥

तैसें प्रमाता प्रमेय । प्रमाण जें त्रय ।

तें अज्ञानाचें कार्य । अज्ञान नव्हे ॥४६॥

तैसींच तीं प्रमाता प्रमाण आणी प्रमेय हीं तीनीं ।

कार्याचि अज्ञानाचें अज्ञान न ठेविं नीट हें ध्यानीं ॥४६॥

म्हणोनि प्रत्यक्षादिकीं । अज्ञानकार्य विशेखीं ।

न घेपे ये विखीं । आन नाहीं ॥४७॥

म्हणुनी प्रत्यक्षादिक अज्ञानाचींच होत हीं कार्यैं ।

अज्ञान नव्हत ठरलीं सहजचि ही गोष्ट न्यायचातुर्यैं ॥४७॥

अज्ञान कार्यपणे । घेइजे तें अज्ञान म्हणणें ।

तरी घेतांही करणें । तयातेंचि ॥४८॥

अज्ञानकार्यची जें तेंही अज्ञान जरि अशी शंका ।

तरि तत्कार्य म्हणोनी अज्ञानचि तो नव्हे प्रमाता कां ॥४८॥

स्वप्नीं दिसें तें स्वप्न । मा देखतां काय आन ।

तैसें कार्यचि अज्ञान । केवळ जरी ॥४९॥

स्वप्निं दिसें तें स्वप्नचि जरि तद्‍द्रष्टाहि स्वप्नची ठरतो ।

तैसें अज्ञानाचें कार्यहि अज्ञान देखणा होतो ॥४९॥

तरी चाखिला गूळ गुळें । माखिलें काजळ काजळें ।

कां घेपे देपे शुळें । हालया शूळ ॥५०॥

मग ऐसें होइल कीं स्वतः गुळाला गुर्ळेचि चाखावें ।

सूळा सूळीं द्यावें काजळिनें काजळासि माखावें ॥५०॥

तैसें कारणीं अभिन्नपणें । कार्यही अज्ञान होणें ।

ते अज्ञानचि मा कोणें । काय घेणें ॥५१॥

तैसेंचि कारणाशीं अभिन्न म्हणुनीच कार्य अज्ञान ।

होई जैं ते वेळीं होय कुणाचें कुणासि हो ज्ञान ॥५१॥

आतां घेतें घेइजेतें ऐसा । विचार न ये मानसा ।

तरी प्रमाण जाला मासा । मृगजळींचा ना ॥५२॥

ग्राह्य ग्राहक दोनी जड म्हणतांची विचार धरी मौन ।

तेव्हां प्रमाण झाला कां न म्हणावा मृगांबुचा मीन ॥५२॥

जें प्रमाणाचिया मापा । न संपडेचि जैं बापा ।

तया आणि खपुष्पा । विशेष काई ॥५३॥

ग्राह्यचि नाहीं किमपी प्रत्यक्षादीक जें प्रमाणाला ।

अंतर काय असे हो सांगा त्याला अणी खपुष्पाला ॥५३॥

मा हें प्रमाणचि नुरवी । आतां आथी हें कोण प्रस्तावी ।

येणेंही बोलें जाणावी । अज्ञान‍उखी ॥५४॥

शोधुनि नीट पहातां नुरवी अवकाश जें प्रमाणाला ।

आहे असें म्हणावें कैसें अज्ञान तें अतां बोला ॥५४॥

एवं प्रत्यक्ष अनुमान । यया प्रमाणा भाजन ।

नहोनि जालें अज्ञान । अप्रमाणचि ॥५५॥

अनुमानप्रत्यक्षा केव्हांही होत नाहिं भाजन तें ।

अज्ञान निश्चयानें याकरितां अप्रमाण तें ठरतें ॥५५॥

ना स्वकार्यातें विये । जें कारणपणातें न ये ।

मी अज्ञान ऐसें बिहे । मानूं साचें ॥५६॥

प्रसवेना कर्यातें जें कारणही न योग्य होण्याला ।

भय वाटे मजला बहु त्याला अज्ञान नांव देण्याला ॥५६॥

आत्मया स्वप्न दाऊं । न शके कीर बहु ।

परि ठायें ठाऊ । निदेजों नेणे ॥५७॥

आत्म्यातें निजवीना स्वप्नातेंही न दाखवी कधिंही ।

जी निद्रा मग ऐसें कां न म्हणावें मुळींच ती नाहीं ॥५७॥

हें असो जिये वेळे । आत्मपणेंचि निखळें ।

आत्मा अज्ञानमेळें । असे तेणें ॥५८॥

आतां दुसरी शंका ऐसी कीं शुद्ध तो असे जेव्हां ।

आत्मा अपुल्या ठायीं होता अज्ञानसंग त्या तेव्हां ॥५८॥

न करितां मथन । काष्ठीं अवस्थान ।

जैसे कां हुताशन । सामर्थ्याचें ॥५९॥

मंथन करण्यापुर्वीं जैशी काष्ठांत अग्निची शक्ति ।

गूढत्वें वास करी तैसें अज्ञान काय ही उक्ति ॥५९॥

तैसें आत्मा ऐसें नांव । न साहे आत्मयाची बरव ।

तैं कांहीं अज्ञान हांव । बांधितें कां ॥६०॥

आत्मा ऐसें नांवहि ज्या वस्तूमाजि सहन होईना ।

सांगा त्या वस्तुमधीं राहे अवकाश काय अज्ञाना ॥६०॥

काय दीप न लाविजे । तैंचि काजळ फेडिजे ।

कीं नुगवतां वाळिजे । रुखाचि छाया ॥६१॥

काजळि कसी दिव्याची फेडावी जों न लाविला अजुनी ।

छाया कसि वारावी त्या तरुची जों न येचि उगवोनी ॥६१॥

नाना नुठितां देहदशा । कालऊनि लाविजे चिकसा ।

न घडितांचि आरिसा । उटिजे काई ॥६२॥

आकारासि न ये जो त्या देहा केंवि लाविजे लेप ।

घडिला न आरसा जो केंवि करावा धुवोनि तो साफ ॥६२॥

कां वोहाच्या दुधीं । सायिचि असावी आधीं ।

मग फेडूं यया बुद्धी । पवाडु कीजे ॥६३॥

कासेआंतिल दुग्धा जरि येतां देखिली कुणीं साय ।

तरि ती फेडायाला करितां सिद्धीस जाइल उपाय ॥६३॥

तैसा आत्मयाचा ठाई । जैं आत्मपणा ठाव नाहीं ।

तैं अज्ञान कांहीं । सारिखें कैसें ॥६४॥

त्यापरि आत्म्यामाजी आत्मत्वालागिं नाहीं जरि अवधी ।

तेथें अज्ञान कसें कोठुनि येईल तें वदोत सुधी ॥६४॥

म्हणोनि तेव्हांहि अज्ञान नसे । हें जालेंचि आहे आपैसें ।

आतां रिकामेंचि कायिसें । नाहीं म्हणों ॥६५॥

यालागीं तेव्हांही नाहीं अज्ञान सिद्ध हें सहज ।

आतां नाहीं नाहीं कितिक वदूं त्वरित तेंचि सांग मज ॥६५॥

ऐसाही आत्मा जेव्हां । जैं नातळे भावभावा ।

अज्ञान असे तेव्हां । तरी तें ऐसें ॥६६॥

ऐसाही आत्मा जैं भावाभावसि नातळे जेव्हां ।

अज्ञान कल्पिलें जरि तरि तें ऐका कसें असे तेव्हां ॥६६॥

जैसें घटाचें नाहींपण । फुटोनि होय शतचूर्ण ।

किंवा सर्वापरी मरण । मालवलें कीं ॥६७॥

जेंवि अभाव घटावा व्हावा अगदीं फुटोनि शतचूर्ण ।

कीं मरण मृति यावी तैसें आत्मत्विं होय अज्ञान ॥६७॥

नाना निदे नीद आली । कीं मूर्च्छा मूर्च्छे गेली ।

कीं अंधारी पडली । अंधकूपीं ॥६८॥

झोंपेसि झोंप आली मूर्च्छा मूर्च्छेसि प्राप्त जणुं झाली ।

कीं अंधकारकूपीं निबिडांधार स्वयें उडी घाली ॥६८॥

कां अभाव अवघडला । कां केळीचा गाभा मोडला ।

चोखळा असुडला । आकाशाचा ॥६९॥

संकटिं अभाव पडला केळीचा गर्भ मोडला साचा ।

किंवा गगनांतुनियां पडला तुटुनीहि खंड गगनाचा ॥६९॥

कां निवटलिया सुदलें विख । मुकियाचें बांधलें मुख ।

नाना तुटितां लेख । पुसिलें जैसें ॥७०॥

विष घातलें मढ्याला तोंड मुक्याचेंचि बांधिलें अथवा ।

लिहिला नाही ऐसा लेख जसा तो पुसोनि टाकावा ॥७०॥

तैसें अज्ञान आपुली वेळ । भोगी हेंचि टवाळ ।

आतां तरी केवळ । वस्तु हो‍उनी असे ॥७१॥

तैसें स्वकीय कालीं राहे अज्ञान जीव धरूनी हें ।

वांयाचि बोलणें हें म्हणुनी वस्तू़चि शुद्ध ती आहे ॥७१॥

देखा वांज कैसी विये । विरूढती भाजलीं बियें ।

किं सूर्य कोणा लाहे । अंधारातें ॥७२॥

प्रसवें वंध्या कैसी भर्जित बीजासि केंवि अंकुर ये ।

निबिडांधारामाजी लभ्य कुणातें रवी शतोपायें ॥७२॥

तैसा चिन्मात्रीं चोखडा । भलतैसा अज्ञानाचा झाडा ।

घेतला तर्‍ही पवाडा । येईल काई ॥७३॥

तैसा सर्व परीनें अज्ञानाचा तपास जरि केला ।

शोध कसा लागावा त्याचा अस्तित्व नाहिं मुळिं ज्याला ॥७३॥

जैं सायेचिये चाडे । डहुळिजे दुधाचें भांडें ।

तैं दिसे कीं विघडे । तैसें हें पां ॥७४॥

साय मिळावी म्हणुनी चुलिवरिंचें दूध डहुळलें असतां ।

आली साय दुधावरि बिघडुनि जैसी न येचि ती हाता ॥७४॥

नाना नीद धराया हातीं । चेऊनि उठिला झडती ।

ते लाभे कीं थिती । नासिली होय ॥७५॥

किंवा झोंप धराया जागा हो‍उनि उठे तदा त्याला ।

ती सांपडे हताला कीं जाइल नष्ट हो‍उनी बोला ॥७५॥

तेंवि पहावया अज्ञान ऐसें । हें अंगीं पिसें कायिसें ।

ना पहातां आपैसें । न पाहणेंचि कीं ॥७६॥

तैसें अज्ञानातें शोधावें हें नव्हे पिसें काय ।

जें न दिसेचि पहातां न पाहतां दृश्य केविं तें होय ॥७६॥

एवं कोणेहि परी । अज्ञानभावाची उजरी ।

न पडेचि नगरीं । विचाराचे ॥७७॥

एवं विचारनगरीं अज्ञानातें अनेक युक्तींही ।

शोधूं जातां नलगे थांग तयाचा मुळींच कोठेंही ॥७७॥

अहो कोण्हेही वेळे । आत्मा अथवा वेगळें ।

विचाराचे डोळे । देखते कां ॥७८॥

कवण्याही वेळीं हें आत्म्याठायींच वेगळें अथवा ।

दिसलें विचारनेत्रा असें वदे तो पिसाचि समजावा ॥७८॥

ना निर्धाराचें तोंड न माखे । प्रमाण स्वप्नींही नायके ।

कीं निरुती हन मुके । अनसाइपणा ॥७९॥

निर्धार तोंड काळें करुनी गेला प्रमाण स्वप्नींही ।

या अज्ञानाविषयीं न ऐकिलें कोणिं देखिलें नाहीं ॥७९॥

इतुलियाहि भागु । अज्ञानाचा तरि तो मागु ।

निगे ऐसा बागु । पडता कां देवा ॥८०॥

यापरि अज्ञानाचा युक्तिनें लागता तरी शोध ।

तरि त्याच्या अस्तित्वीं ठाव न करितांहि हा असा वाद ॥८०॥

अवसेचेनि चंद्रबिंबे । निवळिलिये शोभे ।

कां मांडिले जैसे खांबे । शशविषाणाचे ॥८१॥

चंद्र अमावस्येला शोभवि आकश आपुल्या बिंबें ।

किंवा शोभा जरि त्या आली शशशृंगनिर्मितस्तंबें ॥८१॥

नाना गगनौलाचिया माळा । वांझेच्या जालया गळां ।

घापती तो सोहळा । पाविजतसे ॥८२॥

गगनाच्या पुष्पांचा वंध्यापुत्रासि घालितां माळा ।

माता कौतुक करि जरि निजशिशुचा तो बघूनि सोहळा ॥८२॥

आणूनि कासवीचें तूप । भरूं ये आकाशाचें माप ।

तरी साचा येति संकल्प । ऐसे ऐसे ॥८३॥

कीं कोणि कासवीच्या घृतें नभाचें भरे जरी माप ।

तरि सत्यत्वा येती अज्ञानाविषयिं सर्व संकल्प ॥८३॥

आम्हीं येऊन जाऊन पुढती । अज्ञान आणावें निरुती ।

तें नाहीं तरी किती । वटवटूं पां ॥८४॥

जरि अज्ञान मुळांतचि नाहीं तरि निश्चया कसें येई ।

आतां किती शिणावें नाहीं नाहीं म्हणोनि याविषयीं ॥८४॥

म्हणौनि अज्ञान अक्षरें । नुमसूं आतां निदसुरें ।

परी आन येकु स्फुरे । इयेविषीं ॥८५॥

अज्ञान अक्षरें हीं नुच्चारीं मी कदापि याकरितां ।

झोंपेंतहि यानंतर परि सुचली एक गोष्ट मज आतां ॥८५॥

आपणया ना आणिकांतें । देखोनि होय देखतें ।

वस्तु ऐसिया पुरतें । नव्हें आंगें ॥८६॥

आत्मा ऐसा नोहे कीं तो अपणासि दूसर्‍या किंवा ।

पाहुनि द्रष्टा होई तद्रष्ट्टत्वा नकोचि देखावा ॥८६॥

तरी तें आपणयापुढें । दृश्य पवळे येवढें ।

आपण करी फुडें । द्रष्टेपणें ॥८७॥

अपणांपुढे तथापी जें बहुविध दृश्य एवढें पसरे ।

दृश्यत्वें जें भासे तेंचि द्रष्टा असेचि अंति ठरे ॥८७॥

जेथ आत्मत्वाचें सांकडें । तेथ उठे हें येवढें ।

आणि उठलें तरी फुडें । देखत असों ॥८८॥

नेत्रें अभाव आहे आत्मत्वाचा तिथें कसी त्रिपुटी ।

होणें शक्य परंतू पाहों नेत्रीं अफाट ही सृष्टी ॥८८॥

न दिसे जरी अज्ञान । तरी आहे हें नव्हे आन ।

यया दृश्य अनुमान । प्रमाण झालें ॥८९॥

अज्ञान न दिसलें जरि आहे तें यांत कांहिं संशय न ।

दृश्यावरुनि तयाच्या सत्तेचें सहज होय अनुमान ॥८९॥

नातरे चंद्र एक असे । तो व्योमीं दुणावला दिसे ।

तरी डोळां तिमिर असें । मानूं ये कीं ॥९०॥

एक असुनि आकाशीं डोळ्याला दोन चंद्र जरि दिसले ।

खास असें समजावें कीं नेत्रीं निश्चयें वडस आलें ॥९०॥

भूमिवेगळीं झाडें । पाणी घेती कवणीकडे ।

न दिसती आणि अपाडें । साजीं असती ॥९१॥

झाडें पाणी पीती कवण्या तोंडे कळे न हें कांहीं ।

परि तीं दिसती फुल्लित त्यावरूनी निश्चयें कळुनि येई ॥९१॥

तरी भरंवसोनि मुळें । पाणी घेती हें न टळे ।

तैसें अज्ञान कळे । दृश्यास्तव ॥९२॥

पाणी मुळेंचि घेती ऐसें होतें खचीत अनुमान ।

तैसें दृश्यावरुनी आहे ऐसें कळेचि अज्ञान ॥९२॥

चेयिलिया नीद जाये । निद्रिस्था ठाउवी नोहे ।

परी स्वप्न दाउनि आहे । म्हणों ये कीं ॥९३॥

जाग्यासि नीज नाहीं सुप्ता तीचा मुळीं नसे भास ।

स्वप्नावरुनि परंतु झोंपीं गेलों असें कळे खास ॥९३॥

म्हणोनि वस्तुमात्रें चोखें । दृश्य जरी येवढें फांके ।

तेव्हां अज्ञान आथी सुखें । म्हणों ये कीं ॥९४॥

यापरि निर्मळ वस्तूमाजी जरि दृश्य एवढें विकसे ।

अज्ञान नाहिं ऐसें म्हणतां येईल सांग मग कैसें ॥९४॥

अगा ऐसिया ज्ञानातें । अज्ञान म्हणणें को‍उतें ।

काय दिवो करी तयातें । अंधार म्हणिपे ॥९५॥

या दृश्य कारणाला अज्ञान असें कसें म्हणों येई ।

दिवस करी जो त्याला ध्वांत म्हणायासि लाज कसि नाहीं ॥९५॥

अगा चंद्रापासोनि उजळ । जेणें राबिली वस्तु धवळ ।

तयातें काजळ । म्हणिजतसे ॥९६॥

उज्ज्वळ सुधाकराहुनि जेणें वस्तू करूनि दाखविली ।

काजळ असें तयाला म्हणणाराची खचीत धी भ्रमली ॥९६॥

आगीचें काज पाणी । निफजा जरी आणी ।

अज्ञान इया वाहणी । मानूं तरी तें ॥९७॥

पाण्याच्यानें होई जरि केव्हां अग्निचें दहनकार्य ।

अज्ञान करिल दृश्या ऐसें अनुमान होय अनिवार्य ॥९७॥

पूर्णकळीं चंद्रमा । आण‍ऊनी मेळवी अमा ।

तरी ज्ञानें अज्ञान नामा । पात्र होइजे ॥९८॥

पूर्णकलांनी षोडश चंद्र असा जैं दिसे अमातिथिला ।

तें ज्ञान पात्र होइल अज्ञान अशा विरुद्ध नामाला ॥९८॥

वोरसोनि लोभें । विष काय अमृतें दुभे ।

न दुभे तरी न लाभे । विषचि म्हणणें ॥९९॥

पीयूष विषापासुनि स्त्रवलें ही गोष्ट संभवे कैसी ।

जरि संभवे कदाचित् शोभे संज्ञा तया न विष ऐसी ॥९९॥

तैसा जाणणयाचा वेर्‍हारु । जेथ माखला समोरु ।

तेथें आणिजे पुरु । अज्ञानाचा तो ॥१००॥

ज्ञानाचाचि जिथें हा सर्व व्यवहार फांकला दिसतो ।

अज्ञानमृगजळाचा पूर तिथें ये मधेंचि कोठें तो ॥१००॥

तया नांव अज्ञान ऐसें । तरी ज्ञान होआवें तें कैसें ।

येर्‍हवीं कांहीं तें असे । आत्मा काई ॥१०१॥

याला अज्ञान असें बोलावें तरि कसें असें ज्ञान ।

हें वास्तवीक सर्वहि चिन्मात्रचि हें अवेद्य सुज्ञान ॥१०१॥

कांहींच जया न होणें । होय तें स्वतः नेणे ।

शून्याचीं देवांगणें । प्रमाणासी ॥१०२॥

ऐसा तैसा नोहे जें आहे तें स्वरूप तो नेणे ।

नोहे प्रमाण गोचर होई आत्मा अगम्य शून्यपणें ॥१०२॥

असें म्हणावयाजोगें । नाचरे कीर आंगें ।

परी नाहीं लागे । जोडावेंची ॥१०३॥

आहे म्हणण्याजोगी करणी न दिसे मुळींच या ठायीं ।

नाहीं म्हणावा तरि ' मी नाहिं ' असें मूढही वदत नाहीं ॥१०३॥

कोणाचे असणेंनवीन असे । कांहीं न देखतांचि दिसे ।

हें आथी तरी कायिसें । हरतलेंपण ॥१०४॥

निरपेक्ष जया असणें दिसतो प्रत्यक्ष पाहिल्यावीण ।

प्रत्यक्ष सिद्ध ऐशा आत्म्या नाहीं असें म्हणे कवण ॥१०४॥

मिथ्या वादाची कुटी आली । ते निवांतचि साहिली ।

विशेषा दिधली । पाठी जेणें ॥१०५॥

मिथ्यावदारोपा यानें बहु शांतिनें सहन केलें ।

सामान्य विशेषाला आधारत्वेंचि पाठबळ दिधलें ॥१०५॥

जो निमालीही नीद देखे । तो सर्वज्ञ येवढें काय चुके ।

परि दृश्याचिये न टेके । सोयरीक जो ॥१०६॥

देखे निवांत निद्रा ऐसा सर्वज्ञ देखणा कधिंही ।

दृश्यातें देखाया न चुके परि दृश्यवगिं नच येई ॥१०६॥

वेद काय काय न बोले । परी नांवचि नाहीं घेतलें ।

ऐसें कांहीं जोडिलें । नाहीं जेणें ॥१०७॥

काय न वेदपुरुष हा बोले परि नाव घेतलें नाहीं ।

यानें या आत्म्याचें वाणीचा जो नव्हे विषय कधिंही ॥१०७॥

सूर्य कोणा न पाहे । परी आत्मा दाविला आहे ।

गगन व्यापितां ठाये । ऐसी वस्तु आहे ॥१०८॥

वस्तु असी नाहीं जी व्याप्त नमें तेंवि सूर्यभास्य नसे ।

परि आत्मा रवितेजा व्योमव्याप्तीसही न कधिं गिंवसे ॥१०८॥

देह हाडांची मोळी । मी म्हणोनि पोटाळी ।

तो अहंकार गाळी । पदार्थ हा ॥१०९॥

देह हडांची मोळी जी तिजला मी म्हणोनि कंवटाळी ।

तो न अहंकार परी चाले निजशक्ति म्हणुनि त्या टाळी ॥१०९॥

बुद्धि बोद्धया सोके । ते येवढी वस्तु चुके ।

मना संकल्प निके । याहीहूनि ॥११०॥

बुद्धी बोध्यचि जाणे परि आत्म्यावरि तिची मती कुंठे ।

आत्म्याहुनि इतरांच्या संकल्पीं चित्त हें प्रविण मोठें ॥११०॥

विषयांचिया बरडी । अखंड घासती तोंडीं ।

तिये इंद्रियें गोडी । न घेती हे ॥१११॥

विषयाच्या खडकावरि घांसति हीं इंद्रियें स्वकिय तोंडें ।

तीं आत्मानंदाचे चाखायाला न शक्त मृदु भांडें ॥१११॥

परी नाहींपणासगट । खाऊनि भरिलें पोट ।

तें कोणाही सगट । कां फावेल ॥११२॥

नाहींपणासहीतचि जो आहे पण गिळूनि पोटभरी ।

ऐशा अवेद्य आत्म्या प्रमाण वेदादि केंवि विषय करी ॥११२॥

जो आपणासी नव्हे विखो । तो कोणा लाहे देखो ।

जेवीं वाणी न शके चाखों । आपणापें ॥११३॥

नोहे विषय स्वताला त्याला देखूं शकेल अन्य कसा ।

रसना जैसी नोहे चाखायाला समर्थ आत्मरसा ॥११३॥

हें असो नांवें रूपें । पुढां सूनि अमूपें ।

जेथ आली वासिपें । अविद्या हे ॥११४॥

अस्तु अविद्या आली नामें रूपें पुढें करुनि बहुत ।

भेटाया आत्म्याला तंव ती विरली भयस्वरूपांत ॥११४॥

म्हणौनि आपुलेंचि मुख । पहावयाची भूक ।

न बाणे मा आणिक । कें रिघेल ॥११५॥

म्हणुनि स्वरूप अपुलें बघण्याची कल्पना जिथें नुठली ।

तेथें प्रवेश होण्या दुसर्‍याची काय माय हो व्याली ॥११५॥

नाडिलें जें वादीकडे । आंतबाहीर सवडे ।

तैसा निर्णयो सुनाट पडे । केला येथ ॥११६॥

घालूं जातां काडी वादीच्या आंत येचि बाहेर ।

तैसा कितिही केला तरि होईना स्वरूपनिर्धार ॥११६॥

कां मस्तकांत निर्धारिली । छाया उडों पाहे आपुली ।

तयाची फांकावली । बुद्धिः जैसी ॥११७॥

ओलांडूं पाहे जो छाया पडली शिखांत जी अपुली ।

अक्कल किती तयाची वर्णावी खास तन्माति भ्रमली ॥११७॥

तैसें टणकोनी सर्वथा । हें तें ऐसी व्यवस्था ।

करी तो चुकला हाता । वस्तूचा जिये ॥११८॥

त्यापरि जो करि निर्णय वस्तूविषयीं असी जसी ऐसा ।

व्यर्थचि शीण तदा तो छायोल्लंघनिं प्रवृत्त नर जैसा ॥११८॥

आतां सांगिजें तें को‍उतें । शब्दाचा संसार नाहीं जेथें ।
दर्शना बीजें तेथें । जाणीव आणी ॥११९॥

आतां ज्याचे ठायीं नोहे शब्दप्रवेश त्याविषयीं ।

काय वदावें तेथें अवधीही दर्शनासि मुळिं नाहीं ॥११९॥

जयाचेनि बळें । अचक्षुपण आंधळें ।

फिटोनि वस्तु मिळे । देखणी दशा ॥१२०॥

ज्याच्या तेजें अनयन अंधाही देखणी दशा येई ।

ऐशा वस्तूमाजी अज्ञाना ठाव केउता पाहीं ॥१२०॥

आपुलेंचि दृश्यपण । उमसों न लाहे आपण ।

द्रष्ट्टत्वा कीर आण । पडली असतां ॥१२१॥

दृश्यत्व स्वरुपाचें अनुभविण्याला मिळे न द्रष्ट्याला ।

द्रष्टटत्वाची घेउनि आण न देई रिघाव अन्याला ॥१२१॥

कोणा कोण भेटे । दिठी कैंची फुटे ।

ऐक्यासगट पोटें । आटोनि गेलें ॥१२२॥

कोण कुणाला भेटे ऐशा स्थितिमाजि दृष्टि केंवि फुटे ।

ऐक्यासहित सहोदरिं निपटूनी दृश्य सर्वही आटे ॥१२२॥

येवढेंही सांकडें । जेणें सारुनि एकीकडे ।

उघडिलीं कवाडें । प्रकाशाचीं ॥१२३॥

इतुक्यांहि संकटांतें सारुनि एकीकडेस हा उघडी ।

अपुलीं किरणकवाडें द्रष्ट्टत्वा सांडितां न अर्धघडी ॥१२३॥

दृश्याचिया सृष्टी । दिठीवरी दिठी ।

उठिलिया तळवटीं । चिन्मात्रचि ॥१२४॥

द्रष्ट्याची जी दृष्टी तिजवांचुनि भिन्न नाहिं दुजि सृष्टी ।

चिन्मात्र वसे भीतरि भासे बाहेरि दृष्टिवरि दृष्टी ॥१२४॥

दर्शनरिद्धि बहुवसा । चिच्छेष मातला ऐसा ।

जें शिळा न पाहे आरिसा । वेद्यरत्‍नाचा ॥१२५॥

दर्शनसंपत्तीनें केवल चिन्मात्र जाहलें पुष्ट ।

रत्‍नशिळेला अपुलें तेज न कधिं रत्‍नदर्पणीम दृष्ट ॥१२५॥

क्षणक्षणीं नीच नवीं । दृश्‍याची चोख मदवी ।

दिठीकरवीं वेढही । उदार जो ॥१२६॥

दृष्टीला हा नेसवि नवीं नवीं विविध लुगडिं दृश्याचीं ।

औदार्य असे याचें तरि द्रष्दृत्वा तें हानि केसाची ॥१२६॥

मागिलिये क्षणींचीं आंगें । पारुसीं म्हणोनि वेगें ।

सांडूनि दृष्टि रिगे । नवीया रूपा ॥१२७॥

प्रथम क्षणि जो स्वीकृत दुसर्‍या क्षणिं वेष तो शिळा झाला ।

म्हणुनी दृष्टी पांघरि शीघ्र मनोहर नव्याचि वस्त्राला ॥१२७॥

तैसीच प्रतिक्षणीं । जाणिवेचीं लेणीं ।

लेवऊनि आणी । जाणतेपण ॥१२८॥

तेंवीचि हा प्रतिक्षणिं ज्ञप्तीचीं विविध घडवुनी लेणीं ।

त्यांतें लेवुनि आपुल्या अंगीं हा जाणतेपणा आणी ॥१२८॥

तया परमात्मपदींचें शेष । ना कांहीं तया सुखास ।

आणि होय येवढी कास । कासिली जेणें ॥१२९॥

जें केवळ चिन्मात्रचि केंवि तेथें शेष शेषिभाव उरे ।

कंबर बांधि तथापी होण्याला दृश्य जें असें पसरे ॥१२९॥

सर्वज्ञतेचि परी । चिन्मात्राचे तोंडावरी ।

परी तें आन घरीं । जाणिजेना ॥१३०॥

सर्वज्ञता असा कीं चिन्मात्रत्वासि ती न उल्लंघी ।

स्वरुपाहुनि अन्यगृहा नेणे अपणांत सांठली अवघी ॥१३०॥

एवं ज्ञानाज्ञानमिठी । तेही फांकतसे दिठी ।

दृश्यपणें ये भेटी । आपुलिया ॥१३१॥

ज्ञानाज्ञान उभयही लय पावुनि एथ फांकली दृष्टी ।

द्रष्टा दृश्यमिषानें आपण अपुल्याचि येतसे भेटी ॥१३१॥

तें दृश्य मोटकें देखें । आपण स्वयें दृष्ट्टत्वें तोखे ।

तेंचि दिठीचेनि मुखें । माजि दाटे ॥१३२॥

आधीं द्रष्टा देखे दृश्या तेणेंचि तुष्ट तो होई ।

देखे दृश्या तंव तो आपण दाटेचि आपुल्या ठायीं ॥१३२॥

तेव्हां घेणें देणें घटे । परी ऐक्याचें सूत न तुटे ।

जेंवी मुखीं मुख वाटे । दर्पणें केलें ॥१३३॥

तेव्हां देणें घेणें घडतें परि ऐक्यसूत्र न तुटेची ।

दर्पणिं मुख दिसलें तरि जेंवि न मोडेचि एकता त्याची ॥१३३॥

आंगें आंगावरी पहुडे । चेइला वेगळा न पडे ।

तया वारुवाचेनि पाडें । घेणें देणें ॥१३४॥

जैसा तैसाचि उभा राहुनि होई सुषुप्त अणि जागा ।

अश्व जसा तैसा तद्वयवहारहि देवघेविचा अवघा ॥१३४॥

पाणी कल्लोळाचे मिसें । आपणपैं हेलावे जैसें ।

वस्तु वस्तुवरी खेळे तैसें । सुखें लाहे ॥१३५॥

पाणी तरंगरूपें क्रीडे आपणचि आपुल्या ठायीं ।

तैसें त्रिपुटीव्याजें वस्तुचि वस्तूमधें रमे पाहीं ॥१३५॥

गुंफीवा ज्वाळांचिया माळा । लेयिलियाही अनळा ।

भेदाचिया आहाळां । काय पडणें आहे ॥१३६॥

ज्वालागुंफित माला घाली कंठामधें जरी अनळ ।

तेणें लागेना त्या भेदाचा अग्निला जराहि मळ ॥१३६॥

किं रश्मींचेनि परिवारें । वेढुन घेतला थोरें ।

तरी सूर्यास दुसरें । बोलों येईल ॥१३७॥

पांघरिलेंसें दिसतें जरि सूर्यें वस्त्र किरणजाळाचें ।

कानिं न पडे तथापी नांवहि रविकिरण उभय भेदाचें ॥१३७॥

चांदणियाचा गिवसु । चांदावरी पडलिया बहुवसु ।

काय केवळपणीं त्रासु । देखिजेल ॥१३८॥

तेवींच चांदण्याचें शशि करितो शुभ्र वस्त्र परिधान ।

तरि एकत्व तयाचें बिघडेना जो न रश्मिहुनि भिन्न ॥१३८॥

दळाचिया सहस्त्रवरी । फांको आपुलिया परी ।

परी नाहीं दुसरी । भास कमळीं ॥१३९॥

जेंवि सहस्त्र दळांना पोटीं घेवोनि फांकतें कमळ ।

तरि अन्य स्पर्श नसे तैसें चिन्मात्र एकची विमळ ॥१३९॥

सहस्त्रवरी बाहिया । आहाति सहस्त्रार्जुना राया ।

तरी तो काय तिया । येकोत्तरावा ॥१४०॥

जेंवि सहस्त्रार्जुन तो झाला यद्यपि सहस्त्रभुजयुक्त ।

तरि न सहस्त्र भुजांहुनि भिन्न तया लेखणें दिसे युक्त ॥१४०॥

सौकटाचिया वोजा । पसरो कां बहु पुंजा ।

परी तांथुवीण दुजा । भावो आहे ॥१४१॥

मागावरति सुताचे दिसती जरि लाविले विविध पुंज ।

तंतू हुनि अन्य तिथें दिसतो सांगा पदार्थ काय मज ॥१४१॥

कोटिवरी शब्दांचा । मेळावा घरीं वाचेचा ।

मिनला तर्‍ही वाचा । मात्र कीं ते ॥१४२॥

कोट्यवधी शब्दांचा जमला समुदाय वाणिच्य पोटीं ।

वाणिच एक असे ती नाहीं तिजवांचुनी दुजी गोठी ॥१४२॥

तैसे दृश्याचे डाखळे । नाना दृष्टीचे उमाळे ।

उठती लेखावेगळे । दृष्ट्रत्वेंचि ॥१४३॥

पुष्कळ तरंग उठती दृश्याचे आणि दृष्टिचे नाना ।

द्रष्टाचि ते सकळही त्याहुनि त्या भिन्नपण नसे जाणा ॥१४३॥

गुळाचा बांधा । मोडलिया भोडीचा धांदा ।

जाला तरी नुसधा । गुळची कीं तो ॥१४४॥

ढेप गुळाची फुटतां त्याचे होती सहस्त्रशा तुकडे ।

त्यांही गूळचि म्हणती ढेप फुटे तरि न गूळ तो बिघडे ॥१४४॥

तैसें हें दृश्य देखो । कीं बहु होऊनि फांको ।

परी भेदाचा नव्हे विखो । तेंचि म्हणोनि ॥१४५॥

तैशापरि हा दृष्टा देखो दृश्यासि हो‍उं दे विविध ।

तरि त्याच्या एक अशा चिन्मात्रत्वासि कधिं नये बाध ॥१४५॥

तया आत्मयाच्या भाखा । न पडेचि दुसरी रेखा ।

जरी विश्वा अशेखा । भरला आहे ॥१४६॥

आत्मा जरि बहिरंतरिं जगता सर्वत्र व्यापुनी भरला ।

त्याच्या चिन्मात्रत्वा भेदाचा स्पर्श नाहिं कधिं झाला ॥१४६॥

दुबंधा क्षीरोदकीं । वाणे परी अनेकीं ।

दिसती तरी तितुकीं । सुतें आथी ॥१४७॥

क्षीरोदकिं लुगड्यामधिं दिसती नाना प्रकार रंगाचे ।

परि नीट पाहिं तितुके असती काय प्रकार रंगाचे ॥१४७॥

पातयाचि मिठी । नुकलितां दिठी ।

अवघियाचि सृष्टी । पाविजे जरी ॥१४८॥

मिटलेल्या डोळ्याचें पातें उघडोनि पाहिल्यावीण ।

या सृष्टीचें कोणा पुरुषा होऊं शके जरी मान ॥१४८॥

न फुटतां बीजकणिका । माजि विस्तारे वटु आसिका ।

तरी अद्वैत फांका । उपमा आथी ॥१४९॥

किंवा विस्तारे जरि फुटल्यावांचूनि वटतरूबीज ।

उपमा देतां येइल अद्वैतोद्‍भूत सृष्टिला सहज ॥१४९॥

मग मातें म्यां न देखावें । ऐसेंही भरे हावें ।

तरी आंगाचिये विसवे । सेजेवरी ॥१५०॥

ना देखतां स्वतःला उगें बसावें असे जरी वाटे ।

तरि घेई विश्रांती स्वांगावरि दृश्य जैं सकल आटे ॥१५०॥

पातयाची मिठी । पडिलिया कीजे दिठी ।

आपुलियेचि पोटीं । रिगोनि असे ॥१५१॥

जरि उघड्या डोळ्याची एखादे वेळिं पापणी मिटली ।

तरि अंतरिंची दृष्टी राहे तैसीच अंतरीं नटली ॥१५१॥

कां नुदेलिया सुधाकर । आपणपें भरे सागर ।

ना कूर्मी गिळी विस्तार । आपेंआप ॥१५२॥

अब्धीं चंद्र नुगवतां जेंवि वसे स्वस्थ आपुल्या ठायीं ।

कीं कूर्म हस्तपादां संकोची तरि उणें न त्या येई ॥१५२॥

आंवसेचिये दिवसीं । सतराविये अंशीं ।

स्वयें जैसें शशी । रिगणें होय ॥१५३॥

जेंवि अमावस्येला सतरावी जी स्वकीय चंद्राकला ।

स्वीकारुनि चंद्र जसा राहे चुकवूनि लिकदृष्टीला ॥१५३॥

तैसें दृश्य जिणतां द्रष्टे । पडिले जैताचिये कुटे ।

तया नांव वावटे । आपणपयां ॥१५४॥

दृश्यासि न देखावें ऐसी द्रष्टा जरी धरी हांव ।

दृश्यासि तेंचि कारण हो‍उनि त्याचा तदा फसे डाव ॥१५४॥

सहजें अवघेंचि आहे । तरी कवण कवणा पाहे ।

तें न देखणेंचि आहे । स्वरूपनिद्रा ॥१५५॥

अवघेंचि सहज आहे तेथें कोणासि पाहतो कोण ।

ऐसें न पाहणें जें स्वरूपनिद्राचि ती खचित जाण ॥१५५॥

नाना न देखणें नको । म्हणे मीचि मातें देखों ।

तरी आपेंआप विखो । आपैसें असे ॥१५६॥

सांडुनि न पाहण्याला मीचि मला पाहणें जरी घडलें ।

तरि आपण अपणाला होण्याला विषय काय हो नडलें ॥१५६॥

जें अनादि दृश्यपणें । अनादीचि देखणें ।

हें आतां काय कोणें । रचूं जावें ॥१५७॥

द्रष्टें जसें अनादी तैसेंचि दृश्यही झालें ।

सर्वहि सिद्धचि आहे कोणी नाहीं नवेंचि हें रचिलें ॥१५७॥

अवकाशेशिं गगना । स्पर्शेसीं पवना ।

कीं दीप्तीसीं तपना । संबंधु कीजे ॥१५८॥

अवकाश आणि अंबर गति आणि वायू प्रकाश आणि सूर्य ।

संबंध कोण घडवी यांचा सांगा तुम्हीच ह आर्य ॥१५८॥

विश्वपणें उजिवडे । तरी विश्व देखे पुढें ।

ना तें नाहीं तरी तेवढें । नाहींच देखे ॥१५९॥

द्रष्टा जरी प्रकाशे विश्वपणें विश्वरूप हा पाहें ।

नाहीं तरि तें नाहीं ऐसें जाणोनि स्वस्थ तो राहे ॥१५९॥

विश्वाचें असें नाहीं । विपायें बुडलिया हेंही ।

तरी दशा ऐसी ही । देखतचि ॥१६०॥

आहेपण नाहींपण विश्वाचें उभय होय जरि नष्ट ।

आत्मा त्याहि दशेचा द्रष्टा हो‍उनि बसेचि अवशिष्ट ॥१६०॥

कापुराही आथी चांदणें । कीं तोचि न माखे तेणें ।

तैसें केवळ देखणें । ठायें ठावो ॥१६१॥

स्वांगींच्या शीतपणें कर्पूराचें कधीं न आंग निवे ।

दृश्याच्या योगानें द्रष्ट्या तैसें मिळे न कांहिं नवें ॥१६१॥

किंबहुना ऐसें । वस्तु भलतिये दशे ।

देखतची असे । आपणपयातें ॥१६२॥

किंबहुना वस्तु असो कवणाही भलतिये अवस्थेंत ।

अपुल्यावांचुनि कवणा देखे इतरां न हाचि सिद्धांत ॥१६२॥

मनोरथांची देशांतरें । मनीं कल्पूनि बरें ।

मग तेथें आदरें । हिंडे जैसा ॥१६३॥

कोणी पुरुष जसा कीं चित्तीं कल्पुनि हवा तसा देश ।

मग मोठ्या हौशीनें तेथें अटण्यांत मानि संतोष ॥१६३॥

कां दाटला डोळा डोळियां । डोळाचि तारा हो‍उनीयां ।

स्फुरे चोख म्हणोनियां । विस्मयो नाहीं ॥१६४॥

कीं नेत्र दाबितां त्या चक्रें दिसती विचित्र जीं नाना ।

ती स्फुरणचि नयनाचें त्यापासुनि भिन्नता नसे त्यांना ॥१६४॥

यालागीं एकें चिद्रूपें । देखिजे कीं आरोपे ।

आपणया आपणपें । काय काज ॥१६५॥

यालागिं एक केवळ चिन्मात्रचि एथ होय मग त्याला ।

देखे दुसर्‍या ऐसा कारण आरोप काय करण्याला ॥१६५॥

किळेचें पांघुरण । रत्‍ना उपजवी कोण ।

कीं सोनें ले सोनेंपण । जोड जोडूं ॥१६६॥

रत्‍नाच्या अंगावरि वेष्टी प्रावर्ण कवण तेजाचें ।

मिरवी कैसें अंगीं लेणें लेऊनि हेम हेमाचें ॥१६६॥

चंदन सौरभ वेढी । कीं सुधा आपणया वाढी ।

कीं गूळ चाखे गोडी । ऐसें आथी हें ॥१६७॥

स्वांगा चंदन लावी चंदन किंवा सुधा स्वतां वाढी ।

अमृत स्वतांसि कैसें चाखे किंवा स्वकीय गुळ गोडी ॥१६७॥

कीं उजाळाचे किळे । कापुरा पुटीं दिधलें ।

कीं ताउनी ऊन केलें । आगीतें काई ॥१६८॥

किंवा स्वशुभ्रवर्णें देतां ये काषुरासि पुट काय ।

कीं तापवूनि जैसें करितां ये उष्ण अग्निचें कार्य ॥१६८॥

नाना ते लता । आपुले वेली गुंडाळतां

घर करी न करितां । जयापरी ॥१६९॥

किंवा लता जयापरि गुंडाळित जाय आपुल्या गतिनें ।

तेणें सहज मनोहर केल्यावांचूनि जेंवि कुंजबनें ॥१६९॥

कां प्रभेचा उभला । दीपप्रकाश संचला ।

तैसा चैतन्यें गिंवसिला । चिद्रूप स्फुरे ॥१७०॥

दीपप्रकाश अवघा जैसा आहे प्रमामयचि सारा ।

तैसें जग हें जाणा दृग्वस्तूचाचि चिन्मयपसारा ॥१७०॥

ऐसें आपणयां आपण । आपुलें निरीक्षण ।

करावें येणेंवीण । करीतचि असे ॥१७१॥

मातें म्यां देखावें ऐसें चिंतन नकोचि द्रष्ट्याला ।

या चिंतनाहिवांचुनि आत्मनिरीक्षण अशक्य न तयाला ॥१७१॥

ऐसें हें देखणें न देखणें । हें आंधारें चांदिणें ।

मा चंद्रासि उणें । स्फुरतें कां ॥१७२॥

हें चांदणें किं हें तम चंद्रीं स्फुरती कधीं न हे भाव ।

तेंवि न देखे उण्यापुर्‍याला इथें नसे ठाव ॥१७२॥

म्हणौनि हें न व्हावें । ऐसेंही करूं पावे ।

तरी तैसाचि स्वभावें । आयिता असे ॥१७३॥

कीं हें दृश्य नसावें ऐसी इच्छा जरी तया होई ।

तरि तैसाचि असे तो सिद्धचि त्याचा स्वभाव हा पाहीं ॥१७३॥

द्रष्टा दृश्य ऐसे । दोनी अळुमाळु दिसे ।

तेंहीं परस्परानुप्रवेशें । कांहीं ना कीं ॥१७४॥

द्रष्टा दृश्य अशा या द्वंद्वाचा भास अल्पसा होई ।

तोही परस्परानुप्रवेश होतां उरे न किंचितही ॥१७४॥

तेथ दृश्य द्रष्टा भरे । द्रष्टेपण दृश्यीं सरे ।

माजि दोन्ही न होनि उरे । दोन्हींचें साच ॥१७५॥

दृश्य द्रष्ट्यामाजी द्रष्टा दृश्यांत जैं प्रवेश करी ।

दोनी हरपुनि जातां राहे सद्रूप वस्तु एक खरी ॥१७५॥

मग भलतेथ भलतेव्हां । माझारिले दृश्यदृष्ट्टत्वभावा ।

आटणी करीत खेवा । येती दोन्ही ॥१७६॥

मग केव्हांही कोठें दृश्या द्रष्टेपणाचिया भावा ।

सहजचि अटणी होई परस्परानुप्रविष्ट ते जेव्हां ॥१७६॥

कापुरीं आगीप्रवेश । कीं अग्नी घातला पोतास ।

तैसा नव्हे सौरस । वेंच जाला ॥१७७॥

कापुरिं अग्नीचा कीं कर्पूराचा प्रवेश अग्नींत ।

ऐसें नव्हेचि दृश्य द्रष्टा द्वय होति एकदम शांत ॥१७७॥

येका येक वेंचला । शून्यबिंदू शून्यें पूसिला ।

द्रष्टा दृश्याचा निमाला । तैसें होय ॥१७८॥

एकांतुनि एक वजा जातां बाकी उरे जसें शून्य ।

द्रष्टत्व शून्य होई दृश्यत्वाभाविं जेथ नच अन्य ॥१७८॥

किंबहुना आपुलिया । प्रतिबिंबा झोंबिनलिया ।

झोंबीसगट आटोनियां । जाइजे जेंवी ॥१७९॥

प्रतिबिंबाशीं झोंबी करावया धांवला जरी कोणी ।

झोंबीं प्रतिबिंबहि तें हरपुनि कांहीं नुरेचि निर्वाणीं ॥१७९॥

तैसें रुसतां दृष्टी । द्रष्टादृश्यभेटी ।

येती तेथ मिठी । दोहींची पडे ॥१८०॥

त्यापरि द्रष्टा जाई दृश्याला भेट द्यावया जेव्हां ।

दर्शन लयासि जाउनि दोघे एकत्व पावती तेव्हां ॥१८०॥

सिंधू पूर्वापर । न मिळती तंवचि सागर ।

मग येकवट नीर । जैसें होय ॥१८१॥

पूर्वापर सिंधूची नोहे अन्योन्य जोंवरी मिळणी ।

शोभे समुद्र ऐसें नांव दिसे मग चहूंकडे पाणी ॥१८१॥

बहुये हे त्रिपुटी । सहज होतया राहाटी ।

प्रतिक्षणीं काय ठी । करीतसे ॥१८२॥

वारंवार अशी ही त्रिपुटी होवोनि सहज मावळती ।

काय करावी त्याची मीमांस प्रतिपदीं न कोमजती ॥१८२॥

दोन्ही विशेष गिळी । ना निर्विशेषातें उगळी ।

उघडझांपी येक डोळीं । वस्तुचि हे ॥१८३॥

दृश्य द्रष्टा ऐसे पोटीं घालुनि विशेष हे दोन्ही ।

मग निर्विशेष ऐसा भाव धरावा तिथें वदा कोणी ॥१८३॥

पातया पातें मिळे । कीं द्रष्ट्टत्व सैंघ पघळे ।

तिये उन्माळितां मावळे । नवलावो ॥१८४॥

डोळा मिटला असतां द्रष्टेपण ते चहूंकडे पसरे ।

उन्मीलन होतांची अपुल्याठायींच तें स्वतांचि मुरे ॥१८४॥

दृष्टादृश्यांचिया ग्रासीं । मध्यें उल्लेख विकासी ।

योगभूमिका ऐसी । अंगी वाजें ॥१८५॥

द्रश्य द्रष्टा यांच्या आलिंगनि उभय भाग हारपले ।

बा योगभूमिकेचें जेव्हां केवल स्वरूपची उरलें ॥१८५॥

उठिला तरंग बैसे । पुढें आनुहि नुमसे ।

ऐसा ठाई जैसें । पाणी होये ॥१८६॥

लाट उठोनी विरतां जंव नाहीं दूसरी पुन्हां उठली ।

ऐशा संधीमाजी मध्यास्थिति वारिची जसी ठेली ॥१८६॥

कां नीद सरोनी गेली । जागृति नाहीं चेइली ।

तेव्हां होय आपुली । स्थिति जैसी ॥१८७॥

अथवा निद्रा संपुनि जंव नाहीं जागृती दिशा आली ।

ऐशा संधीमाजी असते मध्यस्थिती जसी अपुली ॥१८७॥

नाना एका ठाऊनि उठी । अन्यत्र नव्हे पैठी ।

हे गमे तैसिया दृष्टीं । दिठी सुतां ॥१८८॥

किंवा एक पदार्था सोडुनि दुसर्‍यावरी जंव न गेली ।

स्थिति ऐशा संधींतिल दृष्टीची जेंवि जाय अनुभविली ॥१८८॥

कां मावळों सरला दिवो । रात्रीचा न करी प्रसवो ।

तेणें गगनें हा भावो । वाखाणिला ॥१८९॥

किंवा दिन मावळला आणि न अद्यापि रात्रही झाली ।

तै स्थिती संध्येची जसि गगनचि साक्षी असे जया काळीं ॥१८९॥

घेतला श्वास बुडाला । घांपता नाहीं उठिला ।

तैसा दोहींसी सिंवतला नव्हे जो अर्थ ॥१९०॥

एक श्वास बुडाल्यानंतर जंव नाहिं दूसरा उठला ।

दोहींचाही स्पर्श न ऐसा जो अर्थ आठवा त्याला ॥१९०॥

कीं अवघांचि करणीं । विषयांचीं घेणीं ।

करितांचि येके क्षणीं । जें कीं आहें ॥१९१॥

किंवा एकचि वेळीं पांचांहीं इंद्रियीं विषय पांच ।

करितां ग्रहण जसा ये अनुभव आत्मानुभूति तैसीच ॥१९१॥

तयासारिखा ठावो । हा निकराचा आत्मभावो ।

येणें कां पाहों । न पाहों लाभे ॥१९२॥

या दृष्टांतावरुनी ध्यानीं येईल आत्मभावाची ।

खूण स्ववेद्य जेथ न सोय न बघण्याचि आणि बघण्याची ॥१९२॥

कायी आपुलिये भूमिके । आरसा आपुले निकें ।

पाहों न पाहों शके । हें कें आहे ॥१९३॥

अपुल्या अंगामाजी अरिसा आपण बधूं शके न शके ।

वांयाचि बोलणें हें पक्षद्वय युक्तिच्या कसा न टिके ॥१९३॥

समोर पाठिमोरिया । मुखें होऊं ये आरिसिया ।

वांचुनि तयाप्रति तया । होआवें कां ॥१९४॥

अरशामुळेंचि सन्मुख अथवा विन्मूख बोलती लोक ।

एकीकडेसि सारुनि अरसा सन्मूख नाहिं ना विमुख ॥१९४॥

सर्वांगें देखणा रवी । परी ऐसें घडे केवी ।

जो उदो अस्तुची चवी । स्वयें घेपे ॥१९५॥

सर्वांगिं देखणा खग खरा परंतू असे घडे केंवी ।

कीं उदयास्ता अपुल्या पाही कधिं तरि सहस्त्रकिरण रवी ॥१९५॥

कीं रस आपणिया पिये । कीं तोंड लप‍उनि ठाये ।

हें रसपणें नव्हे । तया जैसें ॥१९६॥

आहेचि जो स्वतां रस चाखे कैसा स्वतांसि तो बोला ।

किंवा मुख नुघडे जरि काय तरि रसपणासि तो मुकला ॥१९६॥

तैसें पाहणें न पाहणें । पाहणेंपणेंचि हों नेणे ।

आणि दोन्हीही येणें । स्वयेंचि असिजे ॥१९७॥

दर्शन आणि अदर्शन न कळे त्या दर्शनस्वरूपाला ।

कारण दोनीं रूपें स्वयेंचि तो हो‍उनी असे ठेला ॥१९७॥

जें पाहाणेंचि म्हणौनियां । पाहणें नव्हे आपणयां ।

तैं न पाहणें आपसया । हाचि आहे ॥१९८॥

आतां याचें स्वरूपचि दर्शन म्हणुनीच पाहणें नाहीं ।

तरि मग न पाहणेंची आहे तो स्पष्ट हें दिसे पाहीं ॥१९८॥

आणि न पाहणें मा कैसें । आपणपें पाहों बैसे ।

तरी पाहणें आपैसें । हाचि पुढती ॥१९९॥

आपण अपणा पाही हें कैसें संभवे तरी सांगा ।

म्हणुनी न पाहणें जें तेंचि पहाणें न यांत संशय गा ॥१९९॥

हीं दोन्ही परस्परें । नांदती येका हारें ।

बांधूनि येरयेरें । नाहीं केलीं ॥२००॥

दोनी भाव परस्पर विरुद्ध म्हणुनी परस्परांला ते ।

बाधित करिती जरि ते बसले आहेत एकपंक्तीतें ॥२००॥

पाहणेंया पाहणें आहे । तरी न पाहणें हेंचि नव्हे ।

म्हणौनि याची सोये । नेणती दोन्ही ॥२०१॥

दर्शनरूपा दर्शन आहे म्हणुनी न पाहणें नाहीं ।

यास्तव त्यासि पहाणें न पाहणें शिवति त्यासि नच दोन्ही ॥२०१॥

एवं पाहणें न पाहणें । चोरुनियां असणें ।

ना पाहे तरी कोणें । काय पाहिलें ॥२०२॥

एवं चोरुनि राहे आदर्श नदर्श नाहिं आत्मा गा ।

पाहे म्हणाल जरि तुम्हि कोणीं कोणासि पाहिलें सांगा ॥२०२॥

दिसतेनि दृश्याभासें । म्हणावें ना देखिलें ऐसें ।

तरी दृश्यास्तव दिसे । ऐसें नाहीं ॥२०३॥

रचिलें आधीं दृश्यचि द्रष्ट्या द्रष्ट्टत्व आणिलें तेणें ।

ऐसें नव्हे परंतू भासे द्रष्ट्टत्व मात्र दृश्यपणें ॥२०३॥

दृश्य दृष्टीसी दिसे । तरी साच कीं द्रष्टा असे ।

आतां नाहीं तें कैसें । देखिलें होय ॥२०४॥

दृश्य दिसे दृष्टीला परि तें द्रष्ट्यासि सोडुनी नाहीं ।

नाहीं तें केंवि दिसे मृगजळ तें जेंवि सूर्यकरिं पाहीं ॥२०४॥

मुख दिसो कां दर्पणीं । परी असणें कीं तये मुखपणीं ।

तरी जाली ते वायाणी । प्रतीति कीं ॥२०५॥

मुख दिसलें जरि दर्पणिं आहे तें वास्तवीक स्वस्थानीं ।

दृश्यत्वें जी झाली मिथ्या वदनप्रतीति ती म्हणुनी ॥२०५॥

देखतांचि आपणियातें । आलिये निदेचेनि हातें ।

तया स्वप्नाऐसें येथें । निहाळितां ॥२०६॥

निजला असतां स्पप्नीं पुरुष जसा आप आपणां देखे ।

तैशाचि परी द्रष्टा पाहे दृश्यासि तें जणूं परकें ॥२०६॥

निद्रिस्थ सुखासनीं । वाहिजे आन वाहाणीं ।

तो साच काय ते सणी । दशा पावे ॥२०७॥

जी वहिली भुयांनीं ऐशा शिबिकेंत बैसला सुप्त ।

आपणचि सर्व हो‍उनि काय दशा ही खरीच त्या प्राप्त ॥२०७॥

कीं शिसेंवीण येक येकें । दाविलीं राज्य करिती रंकें ।

तैसींच तियें सतुकें । आथी काई ॥२०८॥

मज शिर नाहीं ऐसें कीं झाला राज्यलाभ मज रंका ।

ऐसें देखे स्वप्नीं तरि तें कोणी म्हणेल सत्यचि का ॥२०८॥

ते निद्रा जेव्हां नाहीं । तेव्हां जो जैसा जिये ठाईं ।

तैसाचि स्वप्नीं कांहीं । न दाविजेचि कीं ॥२०९॥

निद्रा नसते वेळीं तो नर जैसा जया ठिकाणिं असे ।

तैसाचि स्वप्नकाळी अंतर दोही स्थितींत कांहिं नसे ॥२०९॥

तान्हेलया मृगतृष्णा । न भेटल्या सीण जे सणा ।

मा भेटलया कोणा । काय भेटलें ॥२१०॥

भेट न होतां मृगजळ नदिची फारचि तृषार्त जो शिणला ।

येतां तिच्या तटाकीं लाभ न एकाहि बिंदुचा त्याला ॥२१०॥

कीं साउलिचेनि व्याजें । मेळवीलें जेणें दुजें ।

तयाचें कारणें वांझें । जालें जैसें ॥२११॥

छाया पाहुनि अपुली मानुनी तिजला दुजा पुरुष कोणी ।

खेळे तिच्या बरोबर तरि त्याचें ज्ञान कवण वाखाणी ॥२११॥

तैसें दृश्येंकरुनियां । तें द्रष्ट्यातें द्रष्टया ।

दाउनि धाडिलें वायां । दाविलेंपणही ॥२१२॥

देवोनि द्रष्ट्याला दृश्याचें रूप दावितें त्याला ।

मग दाविलेपणाही दृश्याभावेंचि व्यर्थ तो गेला ॥२१२॥

तें दृश्य द्रष्टाचि आहे । मा दावर्णे कां साहे ।

न दाविजे तरी नोहे । तया तो कांहीं ॥२१३॥

कारण दृश्यचि द्रष्टा आहे तरि त्यासि दाविणें वांया ।

जरि दाविलें न त्याला नाहीं असें कवण शक्त बोलाया ॥२१३॥

आरिसा पाहतां राहे । तरी मुखचि वांया जाये ।

ना तेणेंवीण आहे । आपणपेंचि ॥२१४॥

दर्पणिं बघणें त्यजिलें तरि वांया वदन काय तें गेलें ।

अरसा नसतांनाही स्वस्थळिं आहे तसेंचि तें ठेलें ॥२१४॥

तैसें आत्मयातें आत्मया । न दावीचि पैं माया ।

तरी आत्मा वावो कीं वायां । तेचि ना कीं ॥२१५॥

यापरि आत्म्यालाही आत्मा दावूं शके न ही माया ।

तरि मिथ्या आत्मा कीं माया द्याया जबाब प्रश्नाला ॥२१५॥

आपणपें द्रष्टा । न करितां असे पैठा ।

आतां जालाचि दिठा । कां करावा ॥२१६॥

याला कोणि न करिता द्रष्टा आहे स्वतांचि हा सिद्ध ।

याला द्रष्टा करणें परसंबधें दिसे असंबद्ध ॥२१६॥

नाना मागुतें दाविलें । तरी पुनरुक्त तेंचि जालें ।

येणेंही बोलें गेलें । दावणें वृथा ॥२१७॥

अथवा सिद्धचि वस्तू दाखविली तरि विशेष फल काय ।

यालागिं दाविलेंपण एथें वायांचि दवडिलें जाय ॥२१७॥

दोरा सर्पाभासा । साचपणें दोर कां जैसा ।

द्रष्टा दृश्य तैसा । द्रष्टा साचु ॥२१८॥

बा जेविं रज्जुसर्पाभासीं रज्जूचि सत्य अहि खोटा ।

त्यापरि दृश्य द्रष्टा उभयांमाजी खरा असे द्रष्टा ॥२१८॥

दर्पणें आणि मुखें । मुख दिसे हें चुके ।

परी मुखीं मुख सतुकें । दर्पणीं नाहीं ॥२१९॥

दर्पणमिषें मुखाला दुसरें जणुं वदन भासतें जैसें ।

बघणार्‍याचें केवळ वदन खरें दर्पणस्थ नच असे ॥२१९॥

तैसा द्रष्टा दृश्या दोहों । साच कीं देखतां ठावो ।

म्हणौनि दृश्य तैं बावो । देखिलें जर्‍ही ॥२२०॥

तैसा दृश्यद्रष्टयांमाजी द्रष्टाचि होय तो साच ।

दिसलें दृश्य जरी तो भ्रममात्रचि जें मुळांत नाहींच ॥२२०॥

वावो कीर होये । तर्‍ही दिसतें तंव आहे ।

येणें बोलें होये । आथी ऐसें ॥२२१॥

भ्रममात्र कां असेना परि दिसतें तें असत्य नोहे कीं ।

जें जें नसोनि दिसतें कारण अज्ञान त्या म्हणति लोकीं ॥२२१॥

तरी आन आनातें । देखोनि होय देखतें ।

तरी मानूं ये तें । देखिलें ऐसें ॥२२२॥

एकानें दुसर्‍याला देखुनि द्रष्टेपणा जरी येई ।

तरि देखिलें असे त्या मानूं येईल नियम हा पाहीं ॥२२२॥

येथें देखोनि कां न देखोनि । ऐक्य का नाना होऊनि ।

परि हा येणेंवाचूनि । देखणें असे ॥२२३॥

देखो कीं नच देखो किंवा नाना किं एक होवो हा ।

द्रष्टाचि सर्व झाला देखे अपणाविना न कांहि पहा ॥२२३॥

आरिशानें हो कां दाविलें । तरी मुखचि मुखें देखिलें ।

तो न दावी तरी संपलें । मुखचि मुखीं ॥२२४॥

अरिसा जरि दावितसे वदन तरी मुखचि पाहतें वदन ।

जरि तो न दावि त्याला राहे तें मुख मुखींच संचून ॥२२४॥

तैसें दावितें नाहीं । तरी हाचि ययाचा ठायीं ।

ना दाविला तरीही । हाचि यया ॥२२५॥

दर्शविता जैं नाहीं द्रष्टा राहेचि आपुल्या ठायीं ।

जारि दाविला तरीही जैसा तैसाचि तो असे पाहीं ॥२२५॥

जागृतीं दाविला । कां निद्रा हारविला ।

परी जैसा येकला । पुरुष पुरुषीं ॥२२६॥

कोणासि नीज येतां आहे जैसा तसाचि तो असतो ।

किंवा जागा झाला तरि तो त्याहुनि दुजा पुरुष नसतो ॥२२६॥

कां रायतें तूं रावो । ऐसा दाविजे प्रत्ययो ।

तर्‍ही ठायें ठावो । राजाचि असे ॥२२७॥

नृप आहेसि असा कीं प्रत्यय राजासि कोण जरि दावी ।

त्या प्रत्ययें नृपाला काय मिळाली नवीन नृपपदवी ॥२२७॥

ना तरी रायपण राया । नाणिजे कीं प्रत्यया ।

तरी कांहीं उणें तया । माजि असे ॥२२८॥

किंवा राजत्वाचा प्रत्यय कोणीं न दाविला त्याला ।

तरि येत नाहिं तेणें लेशहि त्याच्या उणीव पदवीला ॥२२८॥

तैसें दावितां न दावितां । हा ययापरौता ।

चढे ना तुटे आयिता । असतचि असे ॥२२९॥

त्यापरि दृश्य द्रष्ट्या दाखवि अथवा न दाखवी तरि हा ।

द्रष्टा जसा तसाची राहे वृद्धिक्षयाविणेंचि पहा ॥२२९॥

तरी कां निमित्तमिसें । हा ययातें दाऊं बैसे ।

देखतें नाहीं तैं आरिसें । देखावें कोणें ॥२३०॥

दावायासि स्वतांला द्र्ष्ट्याला कासया निमित्तमिसें ।

द्रष्टाचि नाहिं तरि मग दावावें काय सांग आदर्शें ॥२३०॥

दीप दावी तयातें रची । कीं तेणें सिद्धि दीपाची ।

सत्ता निमित्ताची । येणें साच ॥२३१॥

जो दीप पुरुष लावी त्या दीपानें तया प्रकट केलें ।

तैसेंचि हें बरळणें कीं दृश्यें देखण्यासि दाखविलें ॥२३१॥

वन्हीतें वन्हिशिखा । प्रकाशी कीर देखा ।

परी वन्ही न होनि लेखा । येईल काई ॥२३२॥

अग्नीतें प्रकट करी अग्निज्वाला असें जरी भासे ।

अग्नी मुळींच नसतां ज्वालेचें जन्म संभवे कैसें ॥२३२॥

आणि निमित्त जें बोलावें । तें येणें दिसोनी दावावें ।

देखिलें तर्‍ही स्वभावें । दृश्यहि हा ॥२३३॥

एथें निमित्त कथिलें जें त्यातें दाविणार द्रष्टाची ।

दावी स्वयेंचि दिसुनी पांघरि द्रष्टाचि शाल दृश्याची ॥२३३॥

म्हणौनि स्वयंप्रकाशा यया । आपणपें देखावया ।

निमित्त हा वांचुनीयां । नाहींच मा ॥२३४॥

म्हणुनी दृश्यमात्र अशा आत्म्याला आपणासि देखाया ॥

नलगे निमित्त दुसरें स्वतांवीण कीं स्वयं प्रकाशाया ॥२३४॥

भलतेन विन्यासें । दिसत तेणेंचि दिसे ।

हा वांचूनि नसे । येथें कांहीं ॥२३५॥

दृश्यपणें विस्तारो किंवा देखो स्वतांचि हा पाहीं ।

द्रष्ट्यावांचुनि नाहीं निमित्त दुसरें दिसावया कांहीं ॥२३५॥

लेणें आणि भांगारें । भांगारचि येक स्फुरे ।

कां जे येथ दुसरें । नाहींच म्हणौनि ॥२३६॥

भूषण आणी सोनें उभयांमाजी सुवर्णची स्फुरतें ।

कारण इथें पहातां दुसरें कांहीं नसे तयापरतें ॥२३६॥

जळ तरंगीं दोहीं । जळावांचूनि नाहीं ।

म्हणौनि आन कांहीं । नाहीं ना नोहे ॥२३७॥

पाणी तरंग उभयांमाजी पाण्याविणें नसे कांहीं ।

तैसें द्रष्ट्यावांचुनि वस्तू नाहीं दुजी इथें पाहीं ॥२३७॥

हो कां घ्राणानुमेयो । येवो कां हातीं घेवो ।

लाभो कां दिठीं पाहो । भलतैसें ॥२३८॥

दृष्टीस दिसो किंवा अनुमेय असो हि परिमळें नाका ।

हातीं घेतां येवो तज्ज्ञान दुज्या पथें मिळेना कां ॥२३८॥

परी कापुराचा ठाईं । कापुरावांचूनि नाहीं ।

तैशा रितीं भलतयाही । हाचि यया ॥२३९॥

कर्पूरांत परंतू कर्पूरत्वाविणें नसे कांहीं ।

तैसे आत्म्यामाजी द्रष्ट्टत्वाविण दुजें नसे पाहीं ॥२३९॥

आतां दृश्यपणें दिसो । कां द्रष्टा हो‍उनि असो ।

परी हा वांचूनि अतिसो । नाहीं येथ ॥२४०॥

दृश्यपणें हा भासो द्रष्टा होवोनि हा असो अथवा ।

कवणहि रूप धरो हा सोडी न कधींच आपुल्या भावा ॥२४०॥

गंगा गंगापणें वाहो । कां सिधु होऊनि राहो ।

पाणीपणा नवलावो । न देखों कीं ॥२४१॥

गंगा गंगारूपें वाहो राहो समुद्र होवोनी ।

रूपें जरी निराळीं वस्तू उभयांत एकची पाणी ॥२४१॥

थिजावें की विघरावें । हें अप्रयोजक आघवें ।

घृतपण नव्हे । अनारिसें ॥२४२॥

थिजलें किंवा पातळ कवण अवस्थेंतही असो तूप ।

जरि भिन्न अवस्था कीं या बदलेना कधी स्वकीय घृतरूप ॥२४२॥

ज्वाला आणि वन्हि । न लेखिजेति दोन्ही ।

वन्हिमात्र म्हणौनि । आन नव्हेचि ॥२४३॥

ज्वाला वन्ही यांची भिन्नत्वें कवणही न करि गणना ।

कारण अग्निच दोनीं नावें जरि भिन्न ठेविलीं त्यांना ॥२४३॥

तैसें दृश्य कां द्रष्टा । या दोन्ही दशा वांझटा ।

पाहतां एकी काष्ठा । स्फूर्तिमात्र तो ॥२४४॥

त्यापरि द्रष्टा आणी दृश्य असा भेद सर्वथा काया ।

आत्मा स्फूर्तिच केवल हें तत्त्वज्ञचि समर्थ समजाया ॥२४४॥

इये स्फूर्तिकडूनि । नाहीं स्फूर्तिमात्रवांचूनि ।

तरी काय देखोनि । देखत असे ॥२४५॥

स्फूर्तीकडूनि बघतां स्फूर्तीविण नाहिं लेशही दुसरें ।

दुसरें देखायाला आत्म्याला एथ सांग काय उरे ॥२४५॥

पुढें फरकेना दिसतें । ना मागें डोकावी देखतें ।

पाहतां येणें ययातें । स्फुरद्रूपचि ॥२४६॥

दृश्‍य पुढें पसरे अणि मागुनि द्रष्टा बघे असें नाहीं ।

हा स्फूर्तिमात्र केवल आत्माचि दृश्य तोचि द्रष्टाही ॥२४६॥

कल्लोळें जळीं घातलें । सोनेंनी सोनें पांघुरलें ।

दिठीचे पाय गुंतले । दिठीसीचि ॥२४७॥

लाट जळांत बुडाली पांघरिलें हेमवस्त्र हेमानें ।

अपुल्या पायांची गति रोधिलि दृष्टीमधेंचि दृष्टीनें ॥२४७॥

श्रुतीसि मेळविली श्रुती । दृतीसी मेळविली दृती ।

कां तृप्तीसि तृप्ती । वोगरिली ॥२४८॥

नादचि ऐके नादा वासातें हुंगिलें जणूं वासें ।

तृप्तिपुढे वाढीलें जें वायां ताट पूर्ण तृप्तिरसें ॥२४८॥

गुळें गुळ परवडिला । मेरु सुवर्णें मढिला ।

कां ज्वाळीं गुंडाळला । अनळ जैसा ॥२४९॥

गुळ गुळें पाकविला सोन्यानें मेरु अद्रि मढवीला ।

किंवा ज्वालावसनें जेविं हुताशन समग्र वेष्टियला ॥२४९॥

हें बहु काय बोलिजे । किं नभ नभाचिये रिघे सेजे ।

मग कोणें निदिजे । कीं जागें कोण ॥२५०॥

काय बहुत सांगावें गगनाची शेज करुनि गगन निजे ।

जागें कुणीं असावें झोंपावें कुणिं नभांत एकचि जें ॥२५०॥

हा येणें पाहिला ऐसा । कांहीं न पाहिला जैसा ।

आणि न पाहतांही आपैसा । पाहणेंचि हा ॥२५१॥

म्हणुनी वस्तू वस्तुसि पाहे तरि पाहिलें असें नोहे ।

अथवा न पाहणेंही नोहे जरि वस्तु वस्तुसि न पाहे ॥२५१॥

येथें बोलणें न साहे । जाणणें न समाये ।

अनुभव न लाहे । आंग मिरऊं ॥२५२॥

वाणी असह्य झाली एथ नुरे जाणिवेसि अवकाश ।

अनुभाव्य नसे म्हणुनी अनुभवही थोर होतचि हताश ॥२५२॥

म्हणौनि ययातें येणें । ये परीचें पाहणें ।

पाहतां कांहीं कोणें । पाहिलें नाहीं ॥२५३॥

म्हणुनी याणें यातें पहण्याचा जो प्रकार तो ऐसा ।

कोणीं न देखिलें जगुं ऐशापरि पाहणें निराभासा ॥२५३॥

किंबहुना ऐसें । आत्मेन आत्मा प्रकाशे ।

न चेतूचि चेऊं बैसे । जयासि तो ॥२५४॥

किंबहुना आत्म्यानें आत्मा झाला इथें प्रकाशित गा ।

निद्रेंत ना निजे जो होई तो केंवि जागृतिंत जागा ॥२५४॥

स्वयें दर्शनाचिया सवा । अवाघियाची जाती फवा ।

परी निजात्मभावा । न मोडतांही ॥२५५॥

व्हावें स्वकीय दर्शन म्हणुनी सर्व प्रकार बघण्याचे ।

भोगुनि मोडूं नेदी किंचितही ऐक्य आत्मवस्तूचें ॥२५५॥

न पाहतां आरिसा असों पाहे । तरी तेंचि पाहणें होये ।

आणि पाहणेंन तरी जाय । न पाहणें पाहणें ॥२५६॥

अरिसा न पाहतां जरि उगा बसे तरिहि पाहणें होई ।

जरि पाहिला तरीही दर्शन किंवा अदर्शनहि नाहीं ॥२५६॥

भलतैसा फांके । परि एकपणा न मुके ।

नाना संकोचे तरी असकें । हाचि आथी ॥२५७॥

कितिही जरी पसरला भंग न त्याच्या कदापि ऐक्याला ।

अथवा संकोचातें पावे जरि तोचि सर्व हें झाला ॥२५७॥

सूर्याचिया हाता । अंधकार न ये सर्वथा ।

मा प्रकाशाची कथा । ऐकता का ॥२५८॥

जरि अंधार कदापी सूर्याच्या सर्वथा न ये हाता ।

तरि सांग उजेडाची त्याच्या कानीं कसी पडे वार्ता ॥२५८॥

अंधकार कां उजिवडु । हा एकला एकवडु ।

जैसा कां मार्तंडु । भलतेथें ॥२५९॥

दोन्ही प्रकश अणि तम गांवीं नाहींत जेविं सूर्याच्या ।

तो एकलाचि तळपे राहो कवण्याहि देशिं गगनाच्या ॥२५९॥

तैसा आवडतिये भूमिके । आरूढलियाहि कौतुकें ।

परी ययातें हा न चुके । हाचि ऐसा ॥२६०॥

त्यापरि आत्मा हो का कवण्याही भूमिकेवरी ठेला ।

बोधस्वरूप म्हणुनी क्षणही न चुके निजानुभूतीला ॥२६०॥

सिंधुची सीव न मोडे । पाणीपणा सळु न पडे ।

मोडले जरि गाडे । तरंगांचे ॥२६१॥

शतशा तरंग यद्यपि उठुनि निमाले तरीहि निजसीमा ।

नुल्लंघी रत्‍नाकर भेद न जळीं तरि उणी पडे उपमा ॥२६१॥

रश्मी सूर्यांचि आथी । परि बिंबाबाहेर जाती ।

म्हणौनि बोधसंपत्ती । उपमा नोहे ॥२६२॥

सूर्यों किरण असति परि बिंबाबाहेर पसरती दुर ।

यालागीं ही उपमा न जुळे बोधात्मयासि भरपूर ॥२६२॥

आणि पळ्हेचा दोडा । न पडतां तडा ।

जग तंव कापडा । न भरेचि कीं ॥२६३॥

कार्पासाचीं बोंडें फुटुनी कापूस जंव नये हाता ।

त्याचें कापड बनुनी उपयोगा येइनाचि तो जगता ॥२६३॥

सोनयाचा रवा । रवेपणाचिया ठेवा ।

अवघियाचि अवयवा । लेणें नव्हे ॥२६४॥

सोन्याच्या कांडीतें आटविल्याविण मुशींत सोनार ।

कैसा समर्थ होई त्यापासुनि बनविण्या अलंकार ॥२६४॥

न फेडितां आडवावो । दिगंतौनि दिगंता जावो ।

न ये मा पावो । उपमा काई ॥२६५॥

प्रतिबंध काढल्याविण मधल्या वायूसि अन्य देशाला ।

जाणें अशक्य म्हणुनी उपमा याची न योग्य आत्म्याला ॥२६५॥

म्हणौनि इये आत्मलीले । नाहीं आन कांटाळें ।

आतां ययाचिये तुळे । हाचि पैं ॥२६६॥

यापरि शोधूं जातां न मिळे उपमाचि आत्मलीलेला ।

यावरुनी हें ठरलें उपमा याचीच शोभते याला ॥२६६॥

स्वप्रकाशाच्या घांसीं । जेवतां बहु वेगेंसीं ।

वेचे ना परि कुसी । वाखही न पडे ॥२६७॥

जेवित असतां वेगें ग्रास बहु स्वप्रकाश अन्नाचे ।

अन्नाचा व्यय नोहे तरि भरले कोपरेहि पोटाचे ॥२६७॥

ऐसा निरुपमा परी । आपुलिये विलास वरी ।

आत्मा राणीव करी । करविली जेणें ॥२६८॥

ऐसा निरुपम आत्मा अपुल्यांतचि आपुल्या विलासानें ।

करि राज्य चक्रवर्तीं एथ शिरावें कुठोनि अज्ञानें ॥२६८॥

तयातें म्हणिपे अज्ञान । तैं न्याया भरलें रान ।

आतां म्हणे तयाचें वचन । उपसाहों आम्ही ॥२६९॥

याला कोणि म्हणे जरि अज्ञान तरि शिरे वनीं न्याय ।

साहूं तद्वचनाला योग्य इथें मौन सर्वथा होय ॥२६९॥

आत्मा प्रकाशीं तें अज्ञान । ऐसें म्हणणें हन ।

तरि निधी दावी तें अंजन । न म्हणिजे कायी ॥२७०॥

सर्वप्रकाशकात्मा जो त्या अज्ञान ही दिली पदवी ।

अंजन कां न म्हणावें तरि त्या वस्तूसि जी निधी दावी ॥२७०॥

सुवर्ण गौर अंबिका । न म्हणिजे तसें काय कालिका ।

तैसा आत्मप्रकाशका । अज्ञानवाद ॥२७१॥

जन म्हणति कालिका तिज जी केली अंबिका सुवर्णाची ।

संज्ञा अज्ञान तसी स्वयंप्रकाशाविरुद्ध अर्थाची ॥२७१॥

येर्‍हवीं शिवौनि पृथ्वीवरी । तत्वाचिया वाणेपरी ।

जयाचा रश्मिकरीं । उजाळ येती ॥२७२॥

ईशापासुनि पृथ्वीपावेतों सर्व तत्त्वविस्तार ।

ज्याच्या तेजें भासित होती त्याचा प्रकाश किति थोर ॥२७२॥

जेणें ज्ञान सज्ञान होये । दृङ्मात्र दृष्टीतें विये ।

प्रकाशाचा दिवो पाहे । प्रकाशासि ॥२७३॥

ज्याच्या स्वयंप्रकशें भासित सूर्यादि सर्वही झालें ।

ज्ञाना ज्ञानपणा ये जेणें दृङ्मात्र दृष्टितें व्यालें ॥२७३॥

तें कोणें निकृष्टें । दाविलें अज्ञानाचेनि बोटें ।

ना तमें सूर्य मोटें । बांधितां निके ॥२७४॥

ऐसा प्रकाश घन जो त्याला अज्ञान नांव जो ठेवी ।

तो मूढ मोट बांधी गुंडाळुनि अंधकारवस्त्रिं रवी ॥२७४॥

अपूर्वा ज्ञानाक्षरीं । वसतां ज्ञानाची थोरी ।

शब्दार्थाची उजरी । अपूर्व नव्हे कीं ॥२७५॥

अज्ञान अक्षरत्रय यांतचि दिसतें महत्व ज्ञानाचें ।

अस्वर पूर्वीं ज्याच्या अपूर्व तें ज्ञान दाविलें साचें ॥२७५॥

लाखेचे मांदुसे । आगीचें ठेवणें कायिसें ।

आंतबाहेरी सरिसें । करुनि घाली ॥२७६॥

लाखेच्या पेटीमधिं अग्नी घालूनि ठेविला जरि तो ।

त्या पेटीला जाळुनि सर्वहि अग्नीच हो‍उनी जातो ॥२७६॥

म्हणौनि जग ज्ञानें स्फुरतें । बोलतां अज्ञानवादातें ।

विखुरलीं होतीं आंतें । वाचेचिये ॥२७७॥

म्हणुनी जग हें स्फुरणचि असतां अज्ञानवाद जो बोले ।

त्याची जीभ अवगली त्याचें वाग्जाळ फार शेफरलें ॥२७७॥

आखुरीं तव गोवधु । पुढारा अनृतबाधु ।

मा कैसा अज्ञानवादु । कीजे ज्ञानीं ॥२७८॥

गोवध या उच्चारें गाय न मरतांहि येइ वाग्दोष ।

तेविं ज्ञाना म्हणतां अज्ञान व्यर्थ दोष वाणीस ॥२७८॥

आणि अज्ञान म्हणणें । स्फुरतसे अर्थपणें ।

आतां हेंचि ज्ञान कोणें । मानिजे ना ॥२७९॥

अज्ञानस्फूर्ती जी ज्ञानचि तें अर्थदृष्टिनें आहे ।

आतां तरि हें ज्ञानचि ठरलें मग मान्य नाहिं कवणा हें ॥२७९॥

असो हें आत्मराजें । आपणापें जेणें तेजें ।

आपणचि देखिजे । बहुये परी ॥२८०॥

हा आत्मराज तस्मात् अपणाला आपुल्या प्रकाशानें ।

पाहतस बहुरूपें त्या कीजे काय एथ अज्ञानें ॥२८०॥

निर्वचितां जें झांवळे । तेंचि कीं लाहे डोळे ।

डोळ्यापुढें मिळे । तेंचि तया ॥२८१॥

तर्कासि कांहिं भासे डोळ्यालाही पुढें तसेंचि दिसे ।

तेंचि तया प्राप्त असे म्हणुनी अज्ञानरूप येइ पिसें ॥२८१॥

ऐसें जगज्ञान जें आहे । तें अज्ञान म्हणे मी वियें ।

येणें अनुमानें हों पाहे । आथी ऐसें ॥२८२॥

ज्ञानचि जें जगताचें त्याचें कारण म्हणाल अज्ञान ।

तरि त्याच्या अस्तित्वाविषयीं होईल सहज अनुमान ॥२८२॥

तंव अज्ञान त्रिशुद्धीं नाहीं । हें जगेंचि ठेविलें ठाई ।

जे धर्मधर्मित्व कहीं । ज्ञानाज्ञाना असे ॥२८३॥

परि मी त्रिवार सांगें कीं हें अज्ञान निश्चयें नाहीं ।

अज्ञानगुण नव्हे तत्कार्यहि न ज्ञान सिद्ध हें पाहीं ॥२८३॥

कां जळ मोतीं विये । राखोंडिया दीप जिये ।

तरी ज्ञानधर्म होय । अज्ञानाचा ॥२८४॥

मोत्यापोटीं पाणी राखुंडीपोटिं जन्म घेईल ।

दीप जरी तेव्हांची ज्ञानहि अज्ञानधर्म होईल ॥२८४॥

चंद्रम्या निघती ज्वाळा । आकाश आते शिळा ।

तरि अज्ञान उजळा । ज्ञानातें वमी ॥२८५॥

चंद्रीं ज्वाला निघती किंवा नभिं खाण होय दगडांची ।

तरी अज्ञानापासुनि उत्पत्ती शक्य होय ज्ञानाची ॥२८५॥

क्षीराब्धीं काळकूट । हें येकि परीचें बिकट ।

परी काळकूटीं चोखट । सुधा कैंची ॥२८६॥

अघटित हेंचि दिसे कीं व्याला तो क्षीरसिंधु कृष्णविष ।

मग हें घडेल कैसें कीं त्या विषिं जन्म घेइ पीयूष ॥२८६॥

ना ज्ञानीं अज्ञान जालें । ते होतांचि अज्ञान गेलें ।

पुढतीं ज्ञान एकलें । अज्ञान नाहीं ॥२८७॥

ज्ञानीं अज्ञान जरी उपजे ऐसें कदाचित घडेल ।

तरि अज्ञाननिवृत्ती हो‍उनियां ज्ञान मात्रचि उरेल ॥२८७॥

म्हणौनि सूर्य सूर्याचियेवढा । चंद्र चंद्राचि सांगडा ।

ना दीपाचिया पडिपाडा । ऐसा दीप ॥२८८॥

यास्तव रवी रवीसम उपमा चंद्रासि होय चंद्राची ।

दीपाला दीपाची त्यापरि बोधासि होय बोधाची ॥२८८॥

प्रकाश तो प्रकाश कीं । यासी न वचे घेईं चुकी ।

म्हणोनि जग असकी । वस्तुप्रभा ॥२८९॥

आहे प्रकाश केवळ त्याचा तोचि प्रकाशक न अन्य ।

भासवि सर्वा विश्वा निरुपाधिक तेंचि आत्मचैतन्य ॥२८९॥

आणि विभाति यस्य भासा । सर्वमिदं हा ऐसा ।

श्रुति काय वायसा । ढेंकर देती ॥२९०॥

सर्वं विभाति यस्याभासा ऐसी प्रसिद्ध जी वाणी ।

स्वानुभवें श्रुति बोले व्यर्थ असे काय निखिल काहाणी ॥२९०॥

यालागिं वस्तुप्रभा । वस्तुचि पावे शोभा ।

जातसे लाभा । वस्तुसीचि ॥२९१॥

यास्तव या आत्म्याला केवल आत्मप्रभाव शोभवितो ।

देउनि आत्मसुखाचा लाभहि त्याला चितींचि तोषवितो ॥२९१॥

वांचुनि वस्तु यया । आपणपें प्रकशावया ।

अज्ञान हेतु वांया । अवघेंचि ॥२९२॥

म्हणुनी नसेचि हेतू दुसरा आत्मप्रकाश होण्याला ।

अज्ञान हेतु म्हणणें कवण्याही जुळत नाहिं युक्तीला ॥२९२॥

म्हणौनि अज्ञान सद्भावो । कोणे परी न लाहों ।

अज्ञान कीर वावो । पाहों ठेलें ॥२९३॥

यास्तव अज्ञानाची कुण्या परिहि सिद्ध होइना सत्ता ।

घेतां शोध कितीही त्याचा लागे न किंचितहि पत्ता ॥२९३॥

परी तमाचा विखुरा । न जोडोचि दिनकरा ।

रात्रीचिय घरा । गेलियाही ॥२९४॥

माग तमाचा दिवसा लागेना शोधितांहि सूर्याला ।

म्हणूनी रात्रीं धुंडी तरि सांगा काय हो मिळे त्याला ॥२९४॥

कां निंद खोळे भरितां । जागणेंहि न ये हाता ।

येकलिया टळटळितां । टाकिजे जेंवि ॥२९५॥

प्रदरीम भरुनी घेण्या निद्रेला कितिहि यत्‍न जरि केला ।

निद्रा जागृति दोनी न लाभतां पुरुषमात्र तो उरला ॥२९५॥

॥ इत्यज्ञानखंडणे सप्तमप्रकरणं समाप्तम् ॥

॥ प्रकरण ७ वें समाप्त ॥