Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण तिसरे ययांचेनि...

प्रकरण तिसरे

ययांचेनि बोभाटें । आत्मयाची झोंप लोट ।

पूर्ण तरी ऋण न फिटे । जें चेणेंचि निंद कीं ॥१॥

यांच्या बोभाट्याने जाई अज्ञानरात्र संपूर्ण ।

जागृति सुप्तिच केवल म्हणुनि तथापी फिटे न वाणिऋण ॥१॥

येर्‍हवीं परादिका चौघी । जीवमोक्षाच्या उपेगीं ।

अविद्येसवें आंगीं । वेंचती कीर ॥२॥

मोक्षाच्या उपयोगीं येती सत्याचि परादिक वाणी ।

घेऊनि अविद्येप्रति चारहि जाती लयासि निर्वाणीं ॥२॥

देहासवें हातपाये । जाती मनासवें इंद्रियें ।

कां सूर्यासवें जाये । किरणजाळ ॥३॥

देहासवें करचरण मनासवें इंद्रियें लया जाती ।

किंवा अस्ता जातां रविकिरणें लुप्त त्यासवें होती ॥३॥

नातरि निद्रेचिये अवधी । स्वप्नें मरती आधीं ।

तेंवि अविद्येचे संबंधी । आटती इया ॥४॥

किंवा सुप्तिबरोबर स्वप्नेंही तिजसवें लया जाती ।

तैशा चारी वाणी नष्ट अविद्येसवेंचि त्या होती ॥४॥

मृतें लोहें होती । ते रसरूपें जिती ।

जळोनी इंधनें येती । वन्हिदशे ॥५॥

लोहदि दग्ध होतां रसरूपें धातु राहती मागें ।

लांकूड जळुनि जातां पावे तें अग्निची दशा अवघें ॥५॥

लवण अंगें विरे । परि स्वादें जळीं उरे ।

नीद मरोनि जागरें । जीइजे नीद ॥६॥

मीठ जळमधिं विरलें तथापि खारटपणा न सोडी तें ।

निद्रा सरली तरिही जागृतिचा वेष धरुनि ती उरते ॥६॥

तेविं अविद्येसवें । चौघी वेचती जीवें ।

तत्वज्ञानाचेनि नांवें । उठतीच या ॥७॥

तैशा वाणी चारी देति अविद्येसवेंचि जिव अपुला ।

परि तत्त्वज्ञानाच्या रूपें येताति त्याचि उदयाला ॥७॥

हा तत्त्वज्ञानाचा दिवा । मरोनि इहीं लावावा ।

तरि हाही सीण ल्यावा । बोधरूपेंचि ॥८॥

स्वप्राण अर्पुनीयां यांनीं ज्ञानप्रदीप लावियला ।

त्याचा परिणाम असा बोधरूपानें तयासि शिण झाला ॥८॥

येउनी स्वप्न मेळवी । गेलिया आपणपां दावी ।

दोन्ही दिठी नांदवी । नीद जैसी ॥९॥

येउनि स्वप्ना घडवी जाउनि दावी स्वकीय रूपाला ।

यापरि दोहीं रूपें निद्रा दावी जनानुभूतीला ॥९॥

जिती अविद्या ऐसी । अन्यथा बोधातें गिवसी ।

तेचि यथाबाधेंसी । निमाली उठी ॥१०॥

तेवीं जिवंत असतां देई जीवासि अन्यथा ज्ञान ।

देई यथार्थ बोधा हीच अविद्या स्वजीव देऊन ॥१०॥

परि जीती ना मेली । अविद्या हे जाकली ।

बंधमोक्षीं घाली । बांधोनियां ॥११॥

यापरि जिवंत अथवा मेलि असो ती जिवास बंध करी ।

अज्ञानबोधपाशीं बांधुनि जीवा न सोडी ही मकरी ॥११॥

मोक्षचि बंध होये । तरि मोक्ष शब्द कां साहे ।

अज्ञानाघरिं त्राये । वाउगी याची ॥१२॥

बंध म्हणावा मोक्षहि तरि त्याला मोक्ष नांव हें फोल ।

अज्ञानाचे गांवीं बंधन दोघेहि होति समतोल ॥१२॥

बागुलाचेनि मरणें । तोषावें कीं बाळपणें ।

येरां तों नाहीं मा कोणें । मृत्यु मानावा ॥१३॥

बागुलबावा मेला हें ऐकुनि हर्ष होय बाळाला ।

प्रौढा नाहिंच तो मग कवण पुसे तो जिवंत कीं मेला ॥१३॥

घटाचें नाहींपण । फुटलियाची नागवण ।

मानितसे तो जाण । म्हणों ये काई ॥१४॥

हानी वाटे ज्याला ऐकुनि फुटला असे घटाभाव ।

शोभेल काय सांगा ऐशा पुरुषासि सुज्ञ हें नांव ॥१४॥

म्हणोनि बंधचि तंव वावो । मा मोक्षा के प्रस्तावो ।

मरोनि केला ठावो । अविद्या तया ॥१५॥

यास्तव बंधचि मिथ्या असतां वदे केविं ठाव मोक्षाला ।

मरुनि स्वयें अविद्यादेवींनें ठाव दीधला त्याला ॥१५॥

आणि ज्ञान बंध ऐसें । शिवसूत्राचेनि मिसें ।

म्हणितलें असे । सदाशिवें ॥१६॥

ज्ञानचि बंध असे या पाशानें जीव बांधिला जातो ।

या अमुच्या म्हणण्याला शिवसूत्रीं साक्ष देतसे शिव तो ॥१६॥

आणि वैकुंठिंचेहि सुजाणें । ज्ञानपाशीं सत्त्वगुणें ।

बांधिजे हें बोलणें । बहु केलें ॥१७॥

तैसा वैकुंठींचा राणाही अर्जुनासि उपदेशी ।

ज्ञानचि बंध म्हणोनी सांपडतो जीव सत्त्वगुणपाशीं ॥१७॥

परि शिवें कां श्रीवल्लभें । बोलिलें येणेंचि लोभें ।

मानूं तें नोहे हें लाभे । न बोलतांही ॥१८॥

परि या मतासि अमुच्या श्रीहरिहरसाक्षिची गरज नाहीं ।

ही गोष्ट सिद्ध करिती केवळ अमुची विचारदृष्टीही ॥१८॥

जें आत्मज्ञान निखळ । तेंहि घे ज्ञानाचें बळ ।

तैं सूर्य चिंती सबळ । तैसें नव्हे ॥१९॥

ज्ञानस्वरूप आत्मा जाणाया ज्ञान साह्य जरि मागे ।

तरि स्वप्रकाशचिंता नित्य करावी रवीसही लागे ॥१९॥

ज्ञानें श्लाघत आहे । तै ज्ञानपण घाडिलें वायए ।

दीप वांचूनि दिवा लाहे । तै आंग भुललाचि कीं ॥२०॥

ज्ञानें विशेषता जरि आत्म्या तज्ज्ञान होय तें वांया ।

भूलचि ती जरि वांछी अन्य दिवा एक दीप पाहाया ॥२०॥

आपणपें आपणापासीं । नेणता देशोदेशीं ।

आपणपें गिंवसी । हें कीर होय ॥२१॥

नेणुनि अपणा जाई देशोदेशीं स्वतांसि हुडकाया ।

तरि सांपडे कसा तो कोण न हांसे बघूनि मूढा या ॥२१॥

परि बहुतां कां दिया । आपणापें आठवलिया ।

म्हणे मी यया । कैसा रिझों ॥२२॥

परि बहुतां दिवसांनी अपुला आठवा स्वतांसि जैं होतो ।

तेव्हां हा मी म्हणुनी अपुल्या मनिं हर्ष जेविं पावे तो ॥२२॥

तैसा ज्ञानरूप आत्मा । ज्ञानेंचि आपुली प्रभा ।

करितसे सोहं मा । ऐसा बंध ॥२३॥

ज्ञानस्वरूप आत्मा तैसा ज्ञानेंचि भासवी अपणा ।

हा मी नव्हेचि तो मी म्हणतो जीवासि हाचि बद्धपणा ॥२३॥

जें ज्ञान स्वयें बुडे । म्हणौनि भारी नावडे ।

ज्ञानें मोक्ष घडे । तें निमालेनि ॥२४॥

मुळच्या ज्ञानावरती ओझें पडतां विशेष ज्ञानाचें ।

तो भार नावडे त्या मोक्ष घडे काढितां पटल त्याचें ॥२४॥

म्हणौनि परादिका वाचा । तो श्रृंगार चौं आंगांचा ।

एवं अविद्या जीवाचा । जीवात्व त्यागी ॥२५॥

म्हणुनि परादिक वाचा चतुरंगी दागिना अविद्येचा ।

एक अविद्यामूलक जीवत्वग्रहण त्यागही त्याचा ॥२५॥

आंगाचेनि इंधनें उदासु । उठोनि ज्ञानग्निप्रवेशु ।

करी तेथें भस्मलेशु । बोधाचा उरे ॥२६॥

हो‍उनि उदास देहेंधनिं करि बोधानलीं प्रवेशातें ।

जाणिव दग्धपणाची दहनोत्तर जी उरेल भस्मचि तें ॥२६॥

जळीं जळावेगळ । कपूर न दिसे आडळ ।

परि हो‍उनि परिमळ । उरे जेंवि ॥२७॥

कापुर जळीं विराला यद्यपि नयना नसे न गोचर तो ।

तरि तत्सुगंधरूपें जैसा उदकामधेंचि तो उरतो ॥२७॥

आंगी लाविलिया विभूती । ते परमाणू झडती ।

परि पांडुरत्वें कांती । राहे जैसी ॥२८॥

अंगासि लाविल्यावरि परमाणू भस्मंचे जरी झडती ।

परि पांडुर रंगाची मागें उरली जसी दिसे कान्ती ॥२८॥

ना वोहळा आंगी जैसें । पाणी पाणीपणें नसे ।

तर्‍ही वोल्हासाचेनि मिसें । आथीच तें ॥२९॥

पाणी वाहुनि गेल्यानंतर ओढ्यामध्यें जरी न दिसे ।

पाण्याच्या रूपानें ओलाव्याचे मिषें तिथेंचि असे ॥२९॥

नातरी माध्यान्हकाळीं । छाया न दिसे वेगळी ।

परि असे पायातळीं । रिगोनियां ॥३०॥

अथवा ऐन दुपारीं छाया नयना जरी दिसत नाहीं ।

तरिही पुरुषाच्या ती पायातळिं पडुनि राहते पाहीं ॥३०॥

तैसें ग्रासूनि दुसरें । स्वरूपीं स्वरूपाकारें ।

आपुलेपणें उरे । बोध जो कां ॥३१॥

तैसें ग्रासुनि दुसरें साहे जो उर्वरीत अवशिष्ट ।

त्या बोधा वाणीचें ऋण म्हणती ब्रह्मावादि जे शिष्ट ॥३१॥

तें ऋणशेष वाचा इया । न फेडवेचि मरोनियां ।

तें पायां पडोनि मियां । सोडविलें ॥३२॥

ऐसें वाणीचें ऋण मेल्यानेंही अशक्यची फिटणें ।

तें गुरुपदकमलाला फेडीलें मी नमूनि पूर्णपणें ॥३२॥

म्हणोनि परा पश्यंती । मध्यमा हन भारती ।

या निस्तरलिया लागती । ज्ञानी अज्ञानीचि ॥३३॥

ज्ञानी वा अज्ञानी निस्तरण्या लागती परादिक या ।

चारी वाणी तोंवरि जोंवरि गुरुच्या न वोळगे पाया ॥३३॥

॥ प्रकरण तिसरे समाप्त ॥