Get it on Google Play
Download on the App Store

सती 51

तिचे दिवस कसे जात होते? तिचे महिने, तिची वर्षे कशी जात होती? मैना सासरी गेली, ती मनाचा निश्चय करून गेली. सासरी श्रीमंत होती. केवढा थोरला वाडा, किती महाल, किती माडया, किती नोकरचाकर, त्या वाडयात सारे होते, परंतु शांती नव्हती, समाधान नव्हते. तेथे रोज उठून कटकटी भांडाभांडी.

मैना तेथे आली, त्याच दिवशी केवढा कडकडाट. पहिल्या तीन ? घरात होत्या. त्या जशा वाघिणीप्रमाणे मैनेवर चवताळून आल्या, परंतु हळूहळू  त्यांचा राग ओसरला. त्या वाघिणीस विवेक आला. त्या मैनेच्या वाटेस जात नसत. एखादे वेळेस काही आपसांत बोलत. त्या मैनेची कीव करीत.

'आपण कशाला तिच्यावर रागवा? आपल्यासारखीच ती एक अभागिनी' एक सवत म्हणाली.
'आपण रडतो, झुरतो, तशी ती रडेल, झुरेल.' दुसरी म्हणाली.

'पिंज-यातील तीही कैदी. धर्माने केलेला कैदखाना. आईबापांनी दिलेला कैदखाना. देवाब्राह्मणांनी दिलेला कैदखाना.' तिसरी म्हणाली.

'ही का आपल्यावर सत्ता चालवील?' एकीने विचारले.

'ती आधीच दु:खी दिसते आहे. ती नाही होणार राणी. ती दिसते दीनवाणी, दिसते गाईवाणी.' दुसरी बोलली.
'वरून दिसते, तसे नसते.' तिसरी म्हणाली.

'आपण वाटेल ती चैन करतो, तशी तीही करील. घरात बसल्याबसल्या चैन, वाटेल ते खावे, प्यावे. वाटेल तो दागिना, वाटेल ते वस्त्र. माहेरी पाठवावे, भावाबहिणीस द्यावे.' एकजण म्हणाली.

'पतीचे सुख नाही, बाकीची काय चाटायची? काही तरी वेडया मनाचे समाधान आपण करतो; परंतु आत मन जळते. काय करायचे हे दागिने! मेला नवीन नवीन दागिने आणून देतो. त्यामुळे का आमचे समाधान होणार आहे? त्याच्या डोंबलावर घालावे हे दागिने, असे मनात येते. मेल्याचे दर्शन नको, असे वाटते.' दुसरी म्हणाली.

'आपले कर्म खोटे, दुसरे काय? आपल्या आईबापांना का या गोष्टी कळल्या नसतील? परंतु दिले त्यांनी लोटून. ज्यांनी जन्म दिला, ज्यांनी लहानाचे मोठे केले, त्यांनीही विचार केला नाही. त्यांनाही का सबुध्दी सुचू नये? म्हणूनच म्हणते की, कर्मच खोटे-' तिसरी म्हणाली.

मैना काही बोलत नसे, तिला एक स्वतंत्र महाल देण्यात आला होता. शृंगारलेला महाल. मैना त्या जागी असे. तेथे ती बसे. तिला सारे शून्य होते. तिला आता रडूही येत नसे. एके दिवशी वृध्द वासुदेवराव तेथे आला. दार लावून घेऊन तो आत आला. समोर खिडकी उघडी होती. गार वारा येत होता. खिडकीतून सुंदर अशोकाचे झाड दिसत होते. त्यावर गुलाबी फुलांचे गुच्छ फुललेले होते. ते अशोकाचे झाड सारखे मैनेला सांगे, 'मैने शोक विसर!'

'मैने, तू माझ्या सर्वस्वाची मालकीण आहेस.' तो म्हातारा म्हणाला.

'तुमच्याजवळ काय आहे?' तिने विचारले.

'माझ्याजवळ काय नाही?' त्याने उत्तर दिले.

'तुमच्याजवळ काही नाही. मला सारे माहीत आहे. दुनियेला माहीत आहे.' ती म्हणाली.

'माझ्याजवळ अलोट पैसा आहे.' तो म्हणाला.