Get it on Google Play
Download on the App Store

सती 45

मैना कोठे गेली, कोठे गेली! - अशी तिकडे हाकाहाक झाली. मैनेच्या अंगावर दागिने असतील, कोणा दरोडेखोरांनी तर तिला नाही ना दगा दिला, अशी शंका आली. परंतु सारे दागिने डब्यात होते. मैनेच्या अंगावर दागिने नव्हते. मग कोठे गेली ती? जहागिरदारांकडील नोकरचाकर शोधार्थ निघाले. मैनेची आईही शोधीत निघाली. सावित्रीबाईंना त्या शिवालयाचीच शंका आली होती. मैनेचे आता लग्न लागले होते. ती गोपाळाकडे या मोठया रात्री अंधारातून निघून गेली? ती गोपाळाबरोबर पळून तर नाही ना जाणार? मैना आईबापांच्या तोंडाला काळे फासणार की काय? आईबापांचे नाव कलंकित करणार की काय? माहेरच्या कुलाचे नाव कायमचे बद्दू करणार की काय? उगीच वाढवली पोर, लहानपणीच लग्न केले असते तर हे प्रकार झाले नसते. एक का दोन, सावित्रीबाईंच्या मनात शेकडो विचार येत होते. त्या लगबगा निघाल्या. नदीतून पलीकडे गेल्या. त्या शिवालयाभोवती त्यांनी पाहिले. तेथील फुलझाडे केविलवाणी पडलेली हाती. शिवालयात कोणीही नव्हते. सावित्रीबाई इकडे तिकडे हिंडू लागल्या. साळुंक्यांना माणसाची चाहूल लागली. त्या हाका मारू लागल्या. माता तिकडे गेली. तो तेथे मैना पडलेली हाती. धरित्रीमातेच्या अंगावर पडलेली होती. सावित्रीबाईंनी नदीचे पाणी आणले. मैनेच्या मस्तकावर शिंपडले. तिच्या रडून रडून कोरडया झालेल्या डोळयांना बाहेरचे पाणी लावण्यात आले. माता वारा घालीत होती. 'मैने, मैने' अशी कोमल व प्रेमळ हाका मारीत होती.

''आला, माझा गोपाळ आला,'' असे म्हणत मैनेने डोळे उघडले. तो जवळ आई होती. मैनेने आईच्या गळयाला मिठी मारली. लहान मुलीप्रमाणे ती रडू लागली. आई काही एक न बोलता मैनेच्या डोक्यावरून हात फिरवीत होती. काय बोलणार ती माता?

''आई, कोठे ग गेला गोपाळ? कोठे तो असेल? त्याने जीव तर नसेल दिला? येथील सारी फुलझाडे त्याने उपटून टाकली आहेत. आपल्या जीवनात राम राहिला नाही असे का त्याला वाटले असेल? गोपाळ जर जिवंत नसेल तर मैना कशी जिवंत राहील?''

मैना दीनवाणी दिसत होती. तिचे केस विखुरले होते. तोंड सुकून गेल्याप्रमाणे दिसत होते. आईने तिचे केस नीट केले. तिचे तोंड स्वत:च्या पदराने पुसले. मायलेकी तेथे बसल्या होत्या. शेवटी माता बोलू लागली, मुलीला समजवू लागली.

सावित्रीबाई म्हणाल्या, ''मैने, गोपाळाला आता विसर. पूर्वीचे सारे विसरून जा. गोपाळ, गोपाळ म्हणशील तर आमची मान खाली होईल. तू एकटी इकडे आलीस हे जर कोणाला कळले तर काय म्हणतील? मैने, तुझी आई तुझ्याजवळ भीक मागत आहे. मी नऊ महिने तुला पोटात वाढविले. लहानपणी तुझे कोडकौतुक केले. तुला कडेवरून खांद्यावरून खेळविले, मैने, आईबापांची अब्रू सांभाळ. जे झाले ते झाले. प्राक्तनात असते तसे होते. मनुष्याच्या सा-याच आशा सफळ होत नसतात. शेवटी सारे देवाच्याहाती असते. देवाला करायचेच असते तर त्याने निराळे काही केले असते. आता धीराने वाग. सासरी जायचे आहे. तेथे नीट रहा. मुख्य म्हणजे आईबापांच्या नावाला कमीपणा येईल असे काही करू नकोस. ऊठ बेटा, चल. मुरलीधराच्या मूर्तीला माळ घालण्यासाठी फुले आणायला आली होतीस, शेवटची फुले आणायला आली होतीस, असे आपण सांगू. मैने, माझ्यासाठी जरा हास. तुझ्या आईसाठी हास. गोपाळ म्हणजे तुझा प्राण. आम्ही का कोणी? गोपाळासाठी तू सर्वस्व देशील. आमच्यासाठी का नाही त्याग करीत? गोपाळाची इच्छा ती तुझी इच्छा. आमची इच्छा ती का नाही तुझी करीत? गोपाळ काल आला. तुला गोड झाला. आणि आम्ही इतके वर्षे तुझ्यासाठी झिजलो, आम्ही का कडू? मैने, गोपाळ कुठला कोण? त्याच्या घरादाराचा पत्ता नाही. एकदम त्या भिका-याच्या गळयात कसे ग तुला बांधायचे? जाऊ दे. देव सारे बरे करील. लौकरच येशील. माहेरी येशील. मी नातवंडं पाहीन. सारे चांगले होईल. ऊठ बाळ. उगीच वेडेविद्रे नको आणू मनात.''

मैना काही बोलेना. तिला बोलावेसे वाटत होते. परंतु तिने ओठांना कुलूप लावले. कडू वाणी आईला कशाला ऐकवा? ती गंभीर दिसू लागली. एक प्रकारचा निश्चय तिच्या तोंडावर दिसू लागला.


''आई, चल. त्या उपटलेल्या फुलझाडांवरी आपण सारी फुले तोडू. कधी केली नव्हती अशी सुंदर माळ आज मुरलीधरासाठी मी करीन. आई, मैना खरेच हो वेडी. आता मी शहाणी होईन. मी सुखी आहे. खरेची सुखी. असे म्हणून ती उठली. सावित्रीबाईही उठल्या. दोघींनी फुले तोडली. पूर्वी मैना व गोपाळ फुले तोडीत. मैनेला त्या स्मृती, प्रेममधुर स्मृती येत होत्या. परंतु ती त्या स्मृती जीवनास खोल खोल दडवीत होती.