Get it on Google Play
Download on the App Store

सती 43

गेला! पटकन लाल गोळा खाली गेला, बंदुकांचे बार दशदिशांत घुमघुमले. तिकडे वाद्यांचा एकच गजर झाला. ताशे चौघडे झडू लागले. सनया आलापू लागल्या. शिंगे फुंकली गेली. क्षयी वृध्दाचे नवयौवनसंपन्न युवतीशी लग्न लावण्यात आले. मातीच्या गोळयाचे कस्तुरीशी, अंधाराचे ज्योतीशी, विषकंदाचे अमृत वल्लीशी, कावळयाचे हंसीशी लग्न लावण्यात आले. जा मैने, जा. विषाला अमृतमय कर. मातीला सुवास दे व तिची कस्तुरी कर. त्या वृध्दाचा उध्दार कर. त्याला माणुसकी शिकव. माकड आहे त्याला मानवता दे. तुझ्या जीवनाची मंगल गंगा त्या वृध्दाच्या जीवनाच्या डबक्यात ने व त्याला कृतार्थ कर. मैने, तू नरकाचे नंदनवन कर, अंधाराला ज्योतिर्मय कर, अपवित्राला पवित्र कर. मैने, त्या वृध्दावर रागावू नकोस. त्याची कीव कर, करुणा कर. त्याला तुझीच जरुरी आहे. तो म्हातारा आहे, क्षयी आहे. जा, त्याची सेवा शुश्रूषा कर. उद्या कदाचित तो सारे जग सोडून जाईल. त्या वेळेस त्याला धीर दे, आधार दे. त्याच्या डोळयांतून पश्चातापाचे पाणी घळघळेल. त्याचे जीवन निर्मळ होईल.

त्या वाद्यांच्या गजरावरून गोपाळाने ओळखले की, लग्न लागले. त्या शिवालयाजवळ त्याने बाग फुलविली. परंतु त्याच्या जीवनाचे स्मशान झाले. स्मशानवासी शिवशंकराजवळ राहून त्याच्या जीवनाचे स्मशानच झाले. तो उठला. रागारागाने तो त्या बगीच्यात गेला. त्याने ती सारी फुलझाडे उपटून टाकली. ही फुले दुसरा कोणी घेईल तर त्याच्याही जीवनाचे स्मशान व्हायचे. एखादे अशुभ व पापी आहेत माझे हात. आमच्या प्रेमाची फुले एकमेकांस मिळाली नाहीत. नकोत ही फुले. शंकराच्या देवळाभोवती बाग करणे वाईटच. देवा शंकराला ते आवडलेही नसेल. सारे मोह सोडून शंकर स्मशानात राहिले. तेथेही का पुन्हा मोहांच्या बागा फुलवायच्या?

नाना कल्पना गोपाळाच्या मनात उसळल्या. आता सारंगगावात कशाला रहावयाचे? ती नदी, ते शिवालय, ती बाग, ते बकुळीचे झाड, ते मुरलीधराचे मंदिर - त्या वस्तू साध्या नव्हत्या. मैनेच्या शेकडो स्मृती त्यांनी दिल्या असत्या. गोपाळाच्या हृदयाचे पाणी पाणी झाले असते. गोपाळ दूर जावयास निघाला. तो सारंगगावी सहज आला. सहजपणे त्याला मैनेचे प्रेम मिळाले. सारंगगावी येताना तो कसा होता? आज जाता कसा आहे? सारंगगावी येताना तो गीता म्हणत येत होता, उपनिषदं म्हणत येत होता. आज जाताना तो प्रेमाची शोकगीते गात जात आहे. येताना तो आनंदी होता. आज भाजलेल्या मनाने तो जात होता. येताना त्याला जीवनाचे नानाविध अनुभव नव्हते आलेले. परंतु आज अनेक अनुभव घेऊन त्यांच्या भाराने ओथंबून तो जात आहे. जीवनातील गंभीरता, खोली त्याला कळली. जीवनातील नाना रंग त्याला दिसले. जीवन हे कसे गुंतागुंतीचे आहे, ते त्याला समजले. प्रेम! त्याला प्रेम मिळाले होते. नव्हते का मिळाले? त्याला मैनेचा देह नाही मिळाला. परंतु तिचे प्रेम त्याच्याजवळ होते. एका रीतीने गोपाळाला कृतार्थही वाटत होते. मैना मजजवळ आहे. चिन्मय मैना मी जाईन तेथे मजजवळ आहे. तिला कोण विकील, कोण विकत घेईल? ती कोणाला दिसणारही नाही. माझ्या रोमरोमांत ती आहे. हो, आहे. आणि गोपाळ? तोही मैनेच्या हृदयकुंजात आहे. तेथून त्याला कोण घालवील, कोण हाकलील?

गोपाळ! शिवालयातील तपश्चर्येने मैनेला तू चिरंतन रीतीने मिळविले आहेस. उगीच उपटलास तो बगीचा. जन्मोजन्मी पुरून उरतील अशी प्रेमाची फुले तुला त्या बगीचाने दिली आहेत. त्या बगीचाशी कृतघ्न नको होऊस. त्या बगीचातच तुझ्या जीवनाच्या बागेला बहर आला होता. जीवनातील गोड असे अनुभव आले होते. तू आता कोठेही गेलास तरी मैनेची स्मृती येताच ती फुले तुला आठवतील, त्या फुलांवर तुमच्या हातांची बोटे कशी घुटमळत ते आठवेल, पाणी घालता घालता थकलेल्या मैनेच्या मुखमंडलावर चमकणारे धर्मबिंदू तू कसे पहात असत, ते तुला आठवेल. ती बाग तू उपटून टाकलीस. परंतु ती बाग तुझ्या जीवनात अमर आहे, मैनेच्या जीवनातही अमर आहे. ती तेथून तुला उपटता येणार नाही.

गोपाळ! कोठेही जा, परंतु मैनेच्या प्रेमाचा प्रकाश तुजजवळ आहे. मैना तुझ्याजवळ बसेल, बोलेल; हसेल, डोलेल; खेळेल, खिदळेल; गाईल, पाहील; ती तुला रिझवील, खिजवील; तुजवर रुसेल, रागावेल; परंतु क्षणात पुन्हा गोड स्मित करील. तुमची ताटातूट कोण करणार आहे? चैतन्याची ताटातूट करता येत नसते. बाह्य आकारांची ताटातूट आहे, फाटाफूट आहे. हृदयांची चिरफाड कोण करणार?

त्या रात्री गोपाळ सारंगगाव सोडून निघाला. बाहेर अंधार पडला होता. जरी त्याच्या हृदयात खोल मैनेच्या प्रेमाचा पूर्ण चंद्र चमकत होता, तरी वरवर दु:खनिराशेचे ढग आले होते. जीवनात अंधार पडल्यासारखे त्याला वाटत होते. शून्य दृष्टीने तो जात होता. कोठे जायचे ते ठरलेले नव्हते. पाय कोठे तरी जात होते. पायाखाली काय आहे इकडेही त्याचे भान नव्हते. मैनेच्या प्रेमाने पागल बनलेल्या गोपाळाला त्याचे पाय तारीत होते. पायांना गोपाळाची कीव आली होती. ते त्याला खड्डयात पाडीत नव्हते. जणू त्याच्या पायांना प्रेमाचे डोळे फुटले होते.

सारंगगावातून गोपाळ गेला. आणि मैना? तिची काय स्थिती होती? वराच्या गळयात माळ घालताना मैना एकदम पडली! धडकन पडली! ती माळ जमिनीवर पडली! का वराच्या चरणांवर पडली? मैना मुर्च्छित झाली. तिच्या डोळयांसमोर अंधारी आली. भविष्यकाळातील अनंत अंधाराने जणू तिला घेरले. मंडपात सहस्त्र दिवे लागले होते. परंतु मैनेच्या हृदयात केवळ अमावास्या होती. मैनेला उचलून नेण्यात आले. मंडपात पानसुपारी वाटली जात होती. अत्तर-गुलाब होत होते. तांबूलांचे भक्षण चालले होते. सनया सुरेल वाजत होत्या. चौघडा धिमीधिमी वाजत होता. परंतु मैना? ती बेशुध्द होती.

आणि नवरदेव? त्यांनाही जो खोकला उसळला तो विचारू नका. कसेबसे ते टाळी वाजेपर्यंत तेथे होते. परंतु मैना मुर्च्छित झाली व तेही गादीवर जाऊन पडले. काही केल्या त्यांचा खोकला राहीना. ब-याच वेळाने त्यांचा खोकला थांबला. मैनाही सावध झाली. उरलेले विधी झाले.

वरातीचा अपूर्व थाट झाला. हजारो चंद्रज्योती लावण्यात आल्या. दारूकाम उडवण्यात आले. हत्तीवरील अंबारीतून वरात निघाली. मैनेच्या डोळयांतून पाणी गळत होते. तिकडे निळे आकाशात उडत होते. आकाशातील नक्षत्रासारखे दागिने तिच्या अंगावर झळकत होते. परंतु मैनेला ते निखारे वाटत होते.