Get it on Google Play
Download on the App Store

सती 37

धोंडभटजी :  माझ्या मुलीची नशीब थोर, म्हणून हे भाग्य मिळत आहे. तिची पूर्वपुण्याई.

दिवाणजी : होय. पूर्वपुण्याई लागते. मलाही चार मुली आहेत, परंतु अशी स्थळे त्यांना कोठली मिळायला?

धोंडभटजी : बरे तर, हे दागिने आत घेऊन जातो. सारे एकदा घालून पाहतो. मग परत करतो.

दिवाणजी : नाही परत केलेत नि मुलीच्या अंगावरच राहिले, म्हणून काय झाले ? केव्हा तरी तिच्याच अंगावर पडायचे.

धोंडभटजी : परंतु सारे रीतीने झाले पाहिजे.

असे म्हणून ते घरात गेले. ''काय म्हातारा आहे तरी. म्हणे पोरीचे नशीब, पोरीची पूर्वपुण्याई! मनुष्य एकदा स्वार्थाने अंध झाला म्हणजे त्याला काही दिसत नाही. ना दया ना माया, ना धर्म ना नीती, मीही तशापैकीच. सारे जगच एकंदरीत असे.'' वैगरे पुटपुटत दिवाणजी निघून गेले.

मैना ज्याप्रमाणे अत्यंत दु:खी झाली होती, त्याप्रमाणेच गोपाळही. त्याच्या कानावर सर्व गोष्टी जातच होत्या. विचारांचे काहूर त्याच्या मनात उठे. काय करावे त्याला कळेना. नेहमी शांत, गंभीर राहणारा गोपाळ मूर्तिमंत अशांती झाला होता. देव करतो ते ब-यासाठी म्हणणारा गोपाळ आज देवाला शिव्यांची लाखोली वहात होता. भयंकर विचार त्याच्या मनात एकदम येत, विजेप्रमाणे चमकत, परंतु पुन्हा नाहीसे होत. राधेगोविंदासारख्यांचा नरडीचा घोट घ्यावा, असे त्याला वाटे. मैनेला पळवावे, असेही मनात येई. श्रीकृष्णाने रुक्मिणी पळविली, मी का नये पळवू मैना? परंतु श्रीकृष्ण बलशाही होता. माझ्याजवळ कोणते बळ? मला पकडतील, फाशी देतील. आपण दुबळे आहोत, असे त्याला वाटे व तो स्वत:वरच दातओठ खाई. मैनेच्या जीवनाची माती होणार, मी हे कसे पाहू, कसे साहू, येथे मंदिरात कसा राहू? त्या लग्नमंडपांना आग लावू का? त्या थेरडयाला गाठून त्याचा गळा दाबू का? गोपाळाचा निश्चय होईना. त्याला त्या सर्व गोष्टींची चीड आली. लोक हे कसे सहन करतात, असे त्याला वाटले. संतांच्या गादीवर बसणा-यांनी वास्तविक सत्पंथ दाखवायचा, परंतु उलट हेच पापाचा मार्ग दाखवीत आहेत. कसला धर्म नि कसले काय? पुन्हा अशा या पाप्यांचेच पाय लोक धरतात! राधेगोविंद महाराज व त्यांचे शिष्य यांना रोज मेजवान्या चालल्या होत्या. समाजाला लागलेला हा भुंगा आहे, ही कीड आहे, हिंदुस्थानला लागलेले हे ग्रहण आहे. हिंदुस्थानचा खरा शत्रू म्हणजे हे बुवा, हे धर्माच्या नावावर गप्पा मारणारे. या बांडगुळांना कापून फेकून द्यावे, असे त्यांच्या मनात येई. तो आपल्या मुठी उगारी, दातओठ खाई. तो सारखा येरझा-या घालीत होता. त्याच्याने स्वस्थ राहवेना. जणू त्याचे प्राण कोणी ओढून नेत होता. त्याचे सर्वस्व लुबाडले जात होते. मैना आपल्या जीवनात इतकी खोल जाऊन बसली असेल, अशी त्याला कल्पनाही नव्हती.

आज त्याला तो अनुभव आला. पाणी हळूहळू झिरपत पाताळापर्यंत जाते. आस्ते आस्ते मैना त्याच्या हृदयमंदिरात कायमची येऊन बसली होती. त्याच्या जीवनातील आशा, प्रकाश, हवा, आनंद सारे जणू मैना होती. मैना त्याची स्फूर्ती, ती त्याचा उल्हास. तिच्यामुळे त्याला उत्साह होता, तिच्यामुळे उमेद होती. पाण्याशी मासा इतका एकरूप झालेला असतो की, जणू त्याला त्याचे भान नसते. परंतु ते पाणी दूर होताच तो तडफडतो. मैनेच्या प्रेमसरोवरात पोहणारा गोपाळ हा मासा होता, परंतु त्याला ते इतके दिवस समजून आले नाही. न कळत ती त्याला प्रेमजीवन देत होती, ओलावा देत होती. त्यामुळेच त्याला सारी सृष्टी सुंदर दिसे, तो फुलाजवळ जाई व त्यांना कुरवाळीत बसे, तो पाखरे पाहून शीळ घाली, तो सूर्यास्ताचे सुंदर रंग पाहून नाचे. नदीचे तरंग पाहून उचंबळे. सृष्टीतील हे सौंदर्य पाहण्याचे डोळे त्याला कोणी दिले? मैनेच्या प्रेमाने. फूल कुरवाळताना त्याला जणू मैनेचे मुखमंडल न कळत वाटत असावे. पाखरांच्या गोड किलबिलीत मैनेची मंजुळ वाणी वाटावी. सूर्यास्ताच्या सुदर रंगात मैनेच्या मुखमंडळावरच्या क्षणोक्षणी बदलणा-या मनोहर रंगछटा दिसाव्या, नदीच्या तरंगात मैनेचे गोड हावभाव दिसावे, मैनेच्या मनातील भावनांचे कल्लोळ दिसावे, होय त्याला सर्वत्र मैनेचे दर्शन जणू होत असे, म्हणून तो मस्त असे. म्हणून त्याला फार भूक नसे लागत. मधुकरी तशीच राही व मैनेकडील ताकाचा एक घोटच पुरेसा होत असे. त्याने त्याचे पोट भरे.