Get it on Google Play
Download on the App Store

सती 34

गणेशपंत : अहो, खोकला तान्हया मुलासही होतो. खोकल्याचा व वयाचा काय आहे संबंध?

वासुदेवराव : आम्हांला त्यातले काय कळते म्हणा! आणि माझ्या छातीतही दुखते हो!

गणेशपंत : दुखायचेच. खोकला येतो तेव्हाच दुखते ना?

वासुदेवराव : श्वास घेतानांही दुखते हो.

गणेशपंत : तुम्हाला भ्रम झाला आहे, काही तरी मनात आणता झाले. अहो, भावना करावी की, दुखत नाही, दुखत नाही. नुसते औषध निरुपयोगी आहे. भावना हवी. तुम्ही मी सांगतो तसा जप करीत जा. 'मी तरुण आहे, मी बलवान आहे, मी वीस वर्षीचा आहे, 'असा संकल्प करीत जा. 'यज्ञानां जपयज्ञोऽस्मि' असे गीतेत म्हटले आहे, ते का उगीच? तसेच 'श्रध्दामयोऽयं पुरुषः', 'यादृशी भावनां कुर्वात् सिद्धिर्भवति तादृशी' वगैरे अनेक श्रुतिवचने आहेत. जसे मनात आणाल, तसे होईल. करीत जा तारुण्याचा जप बळाचा जप.

वासुदेवराव : किती वेळा करू? 'मी तरुण आहे, तरुण आहे' असे किती वेळा म्हणू?

गणेशपंत : 'युवाऽहं, साधु युवा, आशिष्ठो द्रढिष्ठो वरिष्ठः' एवढा मंत्र म्हणत जा. संस्कृत मंत्र म्हणावा. श्रुतिमंत्रांत तेज असते. येता जाता जप करा.

वासुदेवराव : मंत्राचा जप करीनच, परंतु औषधही असू दे.

गणेशपंत : औषधही हवेच. बाह्य व आंतर दोन्ही उपाय हवेत. मनात जप व बाहेर औषध; परंतु खरे सांगू का, वासुदेवराव, या आणखी चौथ्या लग्नाच्या फंदात उगीच पडलेत.

वासुदेवराव : सारे आप्तेष्ट, स्नेही, करा असे सांगू लागले. ते राधेगोविंद महाराजही आग्रह करू लागले. लग्न न करीन तर अब्रू जाते.

गणेशपंत : परंतु त्या गरीब मुलीच्या जन्माची माती नाही का होणार? तुमचा होईल खेळ, परंतु तिचा जाईल जीव.

वासुदेवराव : मी तिला काहीही उणे रडू देणार नाही. समजा, मी उद्या मेलो, तरी तिच्या पोटापाण्याला कमी पडणार नाही, अशी व्यवस्था करून ठेवीन. दागिनेच तिच्या अंगावर दहा हजारांचे घालणार आहे. ते तिचेच होतील. स्त्रीधन ना ते!

गणेशपंत : केवळ पैसे काय करायचे? केवळ खाणेपिणे याच्यापलीकडे दुस-या भुका नसतात का? आपल्या मांडीवर मूल खेळावे, असे स्त्रियांना वाटते. तुम्हांला तर या जन्मी मूलबाळ होणे शक्य नाही.

वासुदेवराव : राधेगोविंद महाराज होईल म्हणतात.

गणेशपंत : परंतु तुम्हांला काय वाटते?

वासुदेवराव : गणेशपंत, अब्रूसाठी सारे करावे लागते. झाकली मूठ सव्वा लाखाची!

गणेशपंत : तुम्ही केवळ पुनःपुन्हा लग्ने केलीत, एवढयावरून तुमच्या ठिकाणी पौरुष आहे, असे कोण म्हणेल? सा-याच तुमच्या स्त्रिया का वांझ निघाल्या? सारी दुनिया तुमचे खरे स्वरूप जाणते. मूठ झाकलेली नाही. आता उघडी झाली आहे. स्त्रियांना काही मन आहे, भावना आहे, असे तुम्ही मानता की नाही?

वासुदेवराव : राधेगोविंद महाराज म्हणतात, 'स्त्रिया भोग्य वस्तू. त्यांना आत्मा नाही.'

गणेशपंत : परंतु भोग तरी तुम्ही घेऊ शकता का? कोण म्हणती स्त्रियांना आत्मा नाही? सीतासावित्री यांना का आत्मा नव्हता? एक वेळ पुरुषास नाही म्हणा; परंतु स्त्रिया फार थोर आहेत. त्या प्रेमदेवता आहेत. संसारांतील त्या तपस्विनी आहेत.