Get it on Google Play
Download on the App Store

सती 27

असे विचार धोंडभटजींच्या मनात चालले होते. त्यांच्या मनातील सर्व जागा जयंताने व्यापली होती. तेथे दुस-या कोणाला अवसर नव्हता. इतक्यात जयंत जागा झाला. तो रडू लागला. का रडू लागला? पित्याचे विचार त्याला आवडले नाहीत का? आपल्यासाठी आपल्या बहिणीचा विक्री होणार, ही गोष्ट त्या बालपरब्रह्माला सहन नाही का झाली?

'मैने, अग मैने!' धोंडभटजींनी हाक मारिली.
'काय बाबा?'
'याला घे बरं जरा.'
मैनेने त्याला घेताच तो रडायचा थांबला.

'तुझ्याजवळ लबाड तत्काळ थांबतो.'
'का बरे?'
'तू दोन दिवसांनी जाणार म्हणून. बहीण आहे तोपर्यंत तिच्याजवळ रडू नये, असे त्याला वाटते.'

'कोठे जाणार मी दोन दिशी?'
'अग सासरी जाशील!'
'लग्न होण्याचे आधीच?'
'लग्नाला काय उशीर? तुझ्या लग्नाला उशीर नको. तुझ्यासारखी मुलगी आसपास शंभर कोसांत नाही. मैने, तू आज ना उद्या सासरी जाशील; परंतु या पोराला कोण? आम्ही दोघं म्हातारी.'

'बाबा, मी नाही का? मी का माझ्या भावास अंतर देईन?'
'या जगात कोणी कोणाचा नाही. भिकारी भावाला कोण विचारील?'

'बाबा असे का म्हणता? आणि देव आहेच सर्वांसाठी.'
'होय. हेच तू पुढे म्हणशील. देव सर्वांसाठी आहे, म्हणून माणूस कोणासाठी नाही.'

'बाबा, असे नाही ही माझ्या मनात. देवाला काळजी असल्यामुळे माझ्या आईबापांचे सुख भरपूर मिळेल.'
अशी बोलणी चालली होती, ती कोणी मंडळी अंगणात आली. धोंडभटजी मैनेला म्हणाले, 'याला घेऊन आत जा.' जयंतला घेऊन ती आत गेली. ती पाठीमागच्या पडवीत जाऊन बसली.

खाली बैठकीवर आलेली सर्व मंडळी बसली. मोरशास्त्री, श्रीधरभट, विष्णुपंत असे तिघेजण आले होते. मोरशास्त्री परगावाहून मुलीला मागणी घालण्यासाठी एका जहागिरदाराकडून आले होते. श्रीधरभट व विष्णुपंत हे सारंग गावचेच मोरशास्त्रांबरोबर म्हणून ते आले होते. बोलणे कोणीच सुरू करीना. शेवटी विष्णुपंतांनी आरंभ केला.

विष्णुपंत : मोरशास्त्री, असे जरा नीट बसा. तुम्ही आमच्या गावाला आलेले पाहुणे. आम्ही काय येथलेच. बसा चांगले मोकळे.

धोंडभटजी : पान घ्या. अरे, सुपारी नाही वाटते यात ? मैने, अग मैने!
मैना बाहेर आली.
'काय बाबा?'
'बेटा, सुपारी आण बरं चांगलीशी.'
मैना आत निघून गेली.