Get it on Google Play
Download on the App Store

सती 14

असे म्हणून मैना निघाली. काळोखातून जाणा-या त्या प्रकाशाकडे तो योगी पहात होता. मैना काळोखातून दिसणा-या प्रकाशाकडे मागे वळून पहात होती. तिला तो दिसत नव्हता, त्याला ती दिसत नव्हती. प्रकाशाच्या साहाय्याशिवाय पाहू न शकणा-या दुबळया डोळयांना काही दिसत नव्हते; परंतु डोळयांत येऊन बसलेल्या कोमल व प्रेमळ भावनेला सारे दिसत होते. मन हे मोठे विचित्र आहे. त्याला हवे असेल ते कोठेही, केव्हाही दिसते. त्याला नको असेल ते जवळ असले, तरी त्याला दिसत नाही. जे त्याला हवे असेल, ते हजारो कोसांवर असले, तरी त्याला दिसते.

मैना त्या शिवालयात तिसरे प्रहरी जरा आधी जाई. त्या शिवालयाभोवती असलेल्या फुलांना पहात राही. त्या फुलांच्या पाकळयांवरून हात फिरवी. नंतर आत देवाला प्रदक्षिणा घाली. प्रवचन सुरू झाले की, प्रदक्षिणा थांबवी. त्या दिवशी प्रवचन संपल्यावर लोक निघून गेले. परंतु मैना तेथेच घुटमळत होती. ती त्या फुलझाडांजवळ गेली. त्या फुलांकडे ती पहात होती.

''तुम्हांला पाहिजेत का फुले?'' त्या तरुणाने विचारले.

''नकोत.''

''मग त्यांच्याकडे का बघता?''

''फुलांकडे कोण बघणार नाही? फुलांची पवित्र सृष्टी. तिच्याकडे पाहून दृष्टी कृतार्थ होते. पडक्या जमिनीत फुले फुलवणारा, ओसाड भूमीला फुलविणारा तो थोर आहे. ही फुले किती सुंदर दिसतात? मला फुलांचे वेड आहे. मी गावात रोज फुले गोळा करते. मुरलीधराला माळा करते; परंतु इथल्यासारखी टवटवीत फुले गावात नाही हो आढळत. ही प्रेमाने फुलविलेली फुले आहेत. जीवनचे जीवन घालून वाढविलेली ही फुले आहेत. या फुलांकडे पहात रहावेसे वाटते.''

''आणखी कशाकडे पहात रहावेसे वाटते?''

''ही फुले फुलवणा-या कुशल व प्रेमळ माळयाकडे.''

''कसा आहे माळी?''

''मी काय सांगू? दिसतो गोड, बोलतो गोड. ज्या ब्रह्माचे प्रवचनात तो वर्णन करतो. त्या ब्रह्माप्रमाणे तो आहे. 'रसानां रसतमं' असा तो आहे. ब्रह्मवादिनी मैनेच्या मनातील ब्रह्माप्रमाणे आहे.''

''तुमचे नाव का मैना?''

''हो.''

''आणि माझे आहे माहीत?''

''नाही.''

''गोपाळ आहे या माळयाचे नाव.''

''कुंजवनात राहून मुरली वाजवणारा गोपाळ! मुरलीधर गोपाळ. मी मुरलीधराला रोज फुलांची माळ घालते. मुरलीधर म्हणजे गोपाळच. माझ्या मुरलीधराला आता वनमाळ पाहिजे आहे. गावातील फुलांचा त्याला वीट आला. मी रोज सकाळी येथे येऊ का? माळेसाठी येथील गोड सुंदर फुले नेत जाऊ का? मी पहाटे येईन व परडी भरून नेईन.''

''या, परडी भरून नेत जा.''

''परंतु दुसरीही एक गोष्ट आहे.''

''कोणती?''