Get it on Google Play
Download on the App Store

सती 6

मैनेला भित्रे म्हटलेले आवडत नसे. तिला प्रथम पोहाता येत नसे. परंतु पित्याच्या पाठीस लागून ती पोहावयास शिकली. ती महापुरातही उडी घेई. नदीला पूर आला म्हणजे मैनेच्या हृदयासही पूर येई. नदीचे सहस्र तरंग पाहून मैनेच्या हृदयातही सहस्र तरंग उठत. नदीत उडी मारावी व अनंत समुद्रास जाऊन मिळावे, असे तिला वाटे.

''मैने तुझी चिंता वाटते. परवा पुरात कशाला घेतलीस उडी?'' आई म्हणाली.

''आई, हजारो हातांनी नदी मला नाचवीत होती. लहानपणी तू नसत नाचवित? नदीच्या पुरात नाचणे म्हणजे अपार प्रेमात नाचणे, भावनांच्या कल्लोळात नाचणे. मी त्या वेळेस जणू देवाच्या हातातील मूल होते, देवाच्या हातांतील फूल होते, आई दोन गोष्टी मला आवडतात. नदीत डुंबणे व झोल्यावर झोके घेणे. प्रथम झोल्यावर झोके घेण्याची मला भीती वाटे. परंतु त्या दिवशी नागपंचमीला मी किती उंच नेला झोला? तितका उंच कोणीही नेला नाही. उंच जावे व आकाशाला हात लावावा, असे मला वाटते. झोक्यावर बसले म्हणजे जीवनाचे स्वरूप कळते. क्षणात आकाश तर क्षणात पाताळ. वर-खाली. माणसांचे मन असे आहे नाही आई? नदीच्या तरंगांवर नाचतानाही मला हेच स्मरण होते. खाली-वर, वर-खाली. परंतु आई, खालीवर झोके घेता घेता मधून मधून तरी अनंताचा स्पर्श होतो. सारे शरीर जणू नाचू लागते. शरीरातील अणुरेणू नाचू लागतो. शरीराचा रोम न् रोम डोलू लागतो. खरेच आई.''

''मैने, तुझे बोलणे मला समजत नाही. तुझी आई साधी भोळी आहे. तुझी आई काही ब्रह्मवादिनी नाही. माणसाने जपून असावे, बेताने वागावे, एवढे मला ठाऊक.''

''आई, माझे नावच मैना, उडावे, गावे हाच माझा धर्म. मैनेला मोकळेपणा आवडतो. स्वातंत्र्य आवडते.''

''स्वच्छंदी वागणे म्हणजे का स्वातंत्र्य? मर्यादा हवी. सीतेने लक्ष्मणाने घालून दिलेली मर्यादा ओलांडली व ती रावणाच्या बंदीशाळेत जाऊन पडली. मैने, मर्यादा पाळ, माझे वेडीचे ऐक. ब्रह्मवादिनी, ब्रह्मवादिनी, असे म्हणून त्यांनी तुला बिघडविले आहे. तू का ब्रह्मवादिनी होणार?''

''आई, ब्रह्मवादिनी म्हणजे काय?''

''ब्रह्मवादिनी म्हणजे षड्रिपूंस जिंकणे, सारे विकार दूर करणे. आहे का तुझी ती शक्ती? तुला दागिने आवडत नसतील, परंतु फुले आवडतात. सुंदर सुगंधी फुले तू हृदयाशी धरतेस. ती केसांत घालतेस, अंथरुणात उशाशी ठेवतेस. मैने, तुला कळत नसेल, परंतु याचा अर्थ मला कळतो. तुझे केव्हाच लग्न झाले पाहिजे होते. परंतु यांचा हट्ट. जे व्हायचे असेल ते होईल. परंतु जपून वाग. जिवाला जप. दुसरे काय सांगू मी?''

आईच्या शब्दांचा मैनेवर विलक्षण परिणाम झाला. ती घरातून बाहेर पडेशानी झाली. ती का अंतर्मुख झाली? ती घरातील सारे काम करी. काम संपले म्हणजे देवाजवळ गीता म्हणत बसे. ती ना जाई शिवालयात, ना जाई मुरलीधराच्या मंदिरात.

''मैने बाहेर का जात नाहीस? अशी का दिसतेस?'' पित्याने विचारले.