Get it on Google Play
Download on the App Store

सती 2

परंतु मोक्षार्थी दिगंबर, त्याचे या गोष्टीकडे लक्ष नसे. त्याचा निराळाच पंथ होता. त्याला निराळे जग हाक मारीत होते. त्याला दुसरी ध्येये हाका मारीत होती. जग म्हणे, ''दिगंबर वेडा आहे.'' दिगंबर म्हणे, ''जग वेडे आहे.'' वेडे कोणीच नाही. जो तो आपल्या वृत्तीप्रमाणे जात असतो, प्रत्येकाच्या विकासाचे विभिन्न मार्ग. प्रत्येकाच्या जीवन-पुष्पाचा निराळा सुगंध, निराळा रंग, ज्याने त्याने स्वता:शी सत्यरूप रहावे. स्वत:ची वंचना करणारा जगाचीही वंचना करी. दिगंबर स्वत:चा सूर ओळखून वागत होता. जगापासून अलिप्त राहून एका विशिष्ट रीतीने तो आपले जीवन फुलवू पहात होता. फुलव, दिगंबर, तुझे फूल तू फुलव. पवित्र जीवन कोठेही वाढो फुलो. त्याचा मंगल सुवास जगाला मिळेलच. जगाच्या वातावरणात तो वास मिसळेल व जगाचे वातावरण थोडे अधिक निर्मळ झाल्याशिवाय राहणार नाही. या जगात जर काहीच फुकट जात नसते, तर प्रयत्नांची पराकाष्ठा करून फुलवलेले निर्मळ जीवन का फुकट जाईल?

हिंदुस्थानातील अणूरेणू दिगंबराला बोलवीत होते. या भरतखंडातील भूमीवरून प्रभू रामचंद्र हिंडले, सीतादेवी हिंडली, विरक्त लक्ष्मण हिंडला. या भूमीवरून पवित्र पांडव हिंडत फिरले. या भूमीवरून हरिश्चंद्र-तारामती, नल दमयंत हिंडत फिरली, या भूमीवरून भगवान बुध्द प्रेमधर्माचा, सेवाधर्माचा संदेश सांगत हिंडत आले. अद्वैताची गर्जना करीत भगवान शंकराचार्य संचार करिते झाले. या भूमीवर मीराबाई नाचली. दिगंबरच्या डोळयांसमोर हा सारा इतिहास उभा राही. ती सारी स्थळे बघावी, असे त्याला वाटे. कोठे आहे ती नर्मदा, जिच्या तीरावर गुरुचरणांशी बसून शंकराचार्यांनी अद्वैताचे अध्ययन केले? कोठे आहे तो बोधिवृक्ष, ती बुध्दगया जेथे भगवान बुध्दांना ज्ञानप्रकाश मिळाला? कोठे आहे ते कालीमातेचे मंदिर, जेथे श्रीरामकृष्ण परमहंस आईपाशी बोलत, देवाशी बोलत? कोठे तुलसीदास बसले, कोठे सूरदार नाचले? कोठे आहे रामतीर्थांचा आश्रम? दिगंबराला हे सारे पाहण्याची उत्कंठा होती. त्या त्या ठिकाणी जाऊन त्या त्या थोर अनुभवांशी त्याला एकरूप होण्याची इच्छा होती. त्या पवित्र गंगेत डुंबण्याची त्याला तळमळ होती.

दिगंबर बुध्दिप्रधान होता. परंतु भावनाही त्याच्याजवळ भरपूर प्रमाणात होती. आपली भावना तो लपवीत असे. दुस-यांच्या भावनेची कधी कधी तो टर उडवी. परंतु काही विशिष्ट प्रसंगी त्याच्या स्वत:च्या लपविलेल्याभावना एकाएकी उचंबळून बाहेर पडत. भावना म्हणजे किमया आहे. भावना म्हणजे जादू. भावना बुध्दीला ऊब देते. विचारांना रंग देते. मनुष्य केवळ निर्मळ घवघवीत विचारांकडे बघू शकत नाही. भावनेच्या साहाय्याने तो विचारांकडे पाहू शकतो. भावनेमुळे ज्ञानाला जवळ घेता येते, हृदयाशी धरता येते.

हा आमचा दिगंबर, हा बुध्दीचा स्थिर हिमालय, हा ज्ञानाचा अभिमानी मुमुक्षू, त्या त्या पवित्र स्थळी जाताच सद्गदित होऊन थरथरे. त्याचे ते विशाल डोळे भरून येत, जणू महान हिमालय भक्तीच्या उबेने पाझरू लागे. विचारांवर भावना स्वार होई, ज्ञान खाली मान घालून जरा विनम्र होई. ज्ञानाचा अभिमान अश्रुंतून गळून जाई. असे प्रसंग मधून मधून येत. दिगंबराचे ज्ञान सात्त्विक होते. त्याच्या ज्ञानांतील सूक्ष्म अहंता झडून जात होती.

दिगंबराला कोठे अज्ञात इतिहास कळे. हिंदुस्थानचा हजारो वर्षांचा इतिहास. महान देशाचा महान इतिहास. ठायीठायी किती खुणा, किती समिक्षा. कोठे चबुतरे आहेत. कोठे समाधी आहेत, कोठे वृंदावने आहेत! त्याच्या पाठीमागे इतिहास आहे. हा इतिहास इतिहासाच्या ग्रंथांतून लिहिलेला नाही तो त्या त्या गावच्या दंतकथांतून, परंपरेने आलेल्या गाण्यांतून कळून येतो. हिंदुस्थानात किती तरी ठिकाणी असे मुके दगड आहेत, ज्यांच्या खाली जीवनातील शृंगार-वीर-करुणादि नव रसांनी भरलेली जीवने दडवलेली आहेत. त्या दगडाखाली अनंत त्याग आहे, अपार पवित्रता आहे.