Get it on Google Play
Download on the App Store

साधना 45

सौंदर्यरूपाने साक्षात्कार

ज्या वस्तूपासून आपल्याला आनंद घेता येत नाही, त्या आपणास भाररूप वाटतात. त्यांना फेकून मोकळे व्हावे असे वाटते. काही वस्तू उपयुक्त असतात. त्यांच्याशी आपला उपयोगापुरता, कामापुरता नैमित्तिक संबंध असतो. त्या वस्तूंचीही उपयुक्तता संपताच त्या भाररूप वाटतात. काही वस्तू आपल्या जीवनाच्या अंगणात भटक्याप्रमाणे क्षणभर येतात. आपण त्यांचा फारसा विचारही करत नाही. त्या आल्या तशा जातात. परंतु जी वस्तू आपणास आनंद देणारी आहे, तीच संपूर्णपणे आपली अशी होते.

या जगाचा बराचसा भाग आपणास असून नसल्यासारखाच असतो. परंतु असे करून चालणार नाही. कारण, अशाने आत्मा संकुचित होतो, लहान होतो. हे सारे विश्व परमेश्वराने आपणास दिलेले आहे. त्याने आपणास जी शक्ती दिली आहे, तिच्या द्वारा या जगाचा वारसा आपण मिळवू, अशी श्रध्दा आपणाजवळ असण्यातच त्या शक्तीची कृतार्थता आहे. आपल्याजवळ सौंदर्यदृष्टी असते. या दृष्टीचा आत्म्याच्या विकासात कसा उपयोग करून घ्यायचा? ही दृष्टी आपणास काय म्हणून दिलेली आहे? सत्याचे पृथक्करण करावे, त्यातील छाया-प्रकाश बघावे, सौंदर्य व कुरूपता वेगवेगळी करून दाखवावी,-यासाठी का ही सौंदर्यदृष्टी आपणास दिलेली आहे? तसे असेल तर या सौंदर्यदृष्टीमुळे भेद जन्मतील, विरोधी भाव संभवतील. संगीताचा विरस होईल. एका वस्तूचा दुसर्‍या वस्तूशी सन्निकर्ष येणार्‍या मार्गात मोठीच अडचण येऊन पडेल.

म्हणून सौंदर्यदृष्टी यासाठी नाही असे म्हणावे लागते. जोपर्यंत साक्षात्कार अपूर्ण आहे, तोपर्यंत परिचित व अपरिचित, प्रिय व अप्रिय, ज्ञात व अज्ञात असा विभक्तभाव राहणारच. आपणास या जगाचे ज्ञान करून घ्यावयाचे आहे. या गोष्टीला आपण लहरीने मर्यादा घालू शकत नाही. पूर्वी ज्ञात असलेले प्रान्त आज नकाशात दाखवलेले असतात, त्याचप्रमाणे आपली सौंदर्यदृष्टीही रोज नवीन नवीन सुंदरता पाहात असते; नवीन विजय मिळवत, विश्व जिंकीत ती चालली आहे. सत्य सर्वत्र असल्यामुळे प्रत्येक वस्तू ज्ञानाचा विषय आहे. त्याचप्रमाणे सौंदर्यही विश्वव्यापक आहे. प्रत्येक वस्तू आपणास सुंदर दिसण्याची शक्यता आहे, व तिच्यापासून आनंद मिळण्याची शक्यता आहे. प्रत्येक वस्तू आपणास आनंद-दर्शन घडवील यात शंका नाही.

मानवी इतिहासाच्या आरंभी मनुष्य प्रत्येक वस्तूकडे तिच्यात जीव आहे की नाही हे पाही. सजीव आणि निर्जीव असे दोन भाग स्पष्टपणे निदर्शनास आले. यातून जीवनाच्या शास्त्राला आरंभ झाला. परंतु जीवनशास्त्र जसजसे वाढत आहे, तसतसे सजीव-निर्जीव यातील अंतरही कमी होत आहे. मानवजातीच्या बाल्यावस्थेत सजीवन-निर्जीव भेदाने जरी मदत केली असली, तरी जसजशी मानवाची जाणीव स्वच्छ नि सूक्ष्मग्राही होते तसतसा हा सजीव-निर्जीव भेदही गळून पडतो.

उपनिषदे सांगतात की, आनंदातून सर्व चराचर जन्मले, आनंदानेच त्याचे धारणही होते. ही गोष्ट समजून घेण्यासाठी आपणास प्रथम सुंदर व कुरूप असे दोन स्पष्ट भेद करूनच आरंभ करावा लागतो. परंतु हळूहळू हे भेद कमी होतात व सर्वत्रच सौंदर्याचे दर्शन होऊ लागते. सौंदर्याची नि आपली पहिली ओळख अनंत रंगांच्यामुळे होते. काही चांगले, काही वाईट असे भासते. परंतु विरोध मावळतो. हे वरवरचे सुरूप-कुरूप भेद जाऊन एक सुंदर तालबध्दता प्रतीत होते. सर्वत्रच सुंदरता दिसू लागल्यामुळे हे येथे सौंदर्य आहे असे ताशे-नगारे वाजवून मग सांगावे लागत नाही.