Get it on Google Play
Download on the App Store

*संघ 9

हें ऐकून देवदत्ताला फार संतोष झाला. ही गोष्ट त्यानें राजगृहांत जिकडे तिकडे प्रसिद्ध केली, व तिजमुळें कांही भिक्षूंनां आणि उपासकांना आपल्या नादास लाविलें. काहीं भिक्षुसंघ सोडून देवदत्ताच्या शिष्यशाखेंत जाऊन मिळाले आहेत, हें वर्तमान जेव्हां सारिपुत्त आणि मोग्गल्लान या बुद्धाच्या मुख्य शिष्यांना समजलें, तेव्हां ते बुद्धाच्या परवानगीनें देवदत्ताजवळ गेले, आणि संघ सोडून गेलेल्या भिक्षूंस त्यांनी पुन: संघांत आणिले. देवदत्ताला आपल्या पापकर्माचा पुढें पश्र्चाताप झाला. परंतु तो बुद्धापाशी प्रकट करण्यापूर्वीच त्याचें देहावसान झालें.

कौशांबी नगरीमध्यें बुद्धाच्या ह्यातींत भिक्षुसंघांत आणखी एक भांडण उपस्थित झालें होतें. बुद्ध भगवंताला हें वर्तमान समजल्यावर तो तेथें गेला. त्यानें अनेक प्रकारें उभय पक्षांचें समाधान करण्याचा प्रयत्न केला. तेव्हां त्यांपैकीं एक तरुण भिक्षू त्याला म्हणाला, “भगवन् आपण आतां वृद्ध झालां आहां, आतां आपण या भानगडींत कशास पडतां? आमचे आम्ही काय होईल तें पाहून घेऊं.”

हें त्या तरुणाचें भाषण ऐकून बुद्ध भगवान् तेथून चालता झाला. त्या चातुर्मास्यांत तो एका अरण्यांत जाऊन राहिला. इकडे या भिक्षूंनी बुद्ध भगवंताच्या सामोपचाराच्या गोष्टी ऐकल्या नाहींत, आणि हे भांडत राहिले, हें पाहून सगळ्या उपासक मंडळीस त्यांचा राग आला, व त्यांनी, आजपासून या भिक्षूंस भिक्षा देऊं नये असा नियम केला, तेव्हां ते ताळ्यावर आले, व बुद्ध भगवंताजवळ जाऊन त्यांनीं कृतापराधांची माफी मागितली.

याप्रमाणें बुद्धाच्या ह्यातींत संघांत फाटाफूट होण्याचा दोनदा प्रसंग आला. तथापि त्यामुळें संघाला दुर्बळता न येतां उलट बळकटीच आली. या दोन्ही प्रसंगीं बुद्धाची निरपेक्षता व उपासकांची त्याच्या ठायीं असलेली दृढ श्रद्धा, हीं जनांच्या चांगल्या प्रत्ययास आली.

बुद्ध भगवंताला जातिभेद मुळींच माहित नव्हता. सारिपुत्तमोग्गल्लानादि ब्राह्मण जसे भिक्षुसंघांत होते, तसाच सोपाक नांवाचा चांडाळहि त्यामध्यें होता.

न जच्चा वसलो होति न जच्चा होति ब्राह्मणो।
कम्मना वसलो होति कम्मना होति ब्राह्मणो।।


जातीमुळें कोणी चांडाळ होत नाहीं, किंवा कोणी ब्राह्मण होत नाहीं. कर्मानें चांडाळ होतो; आणि कर्मानेंच ब्राह्मण होतो.

हें तत्त्व बुद्धानें भिक्षुसंघांस पूर्णपणें लागू केलें होतें. कांही काळपर्यंत भिक्षुणींचा संघ त्यानें स्थापिला  नव्हता. परंतु पुढें त्याचीहि त्यानें स्थापना केली. भिक्षुणीसंघाला त्या काळच्या परिस्थित्यनुरूप कांही कडक नियम बुद्धानें घालून दिले होते. एवढ्यावरून बुद्धानें स्त्रीस्वातंत्र्याला विरोध केला, असें रा. ब. शरच्चंद्र दास, सी. आय. इ. या तिबेटी भाषाभिज्ञ बंगाली गृहस्थाचें म्हणणें आहे. बौद्ध धर्मावर कित्येक निराधार आरोप करण्यांत येतात, त्यापैकीं हाहि एक आहे, असें मी समजतों.

हिंदूधर्मांमध्ये स्त्रियांनां आणि शुद्रांनां वेदाधिकार नाहीं. त्यांनीं पुराणांवरच आपली तहान भागविली पाहिजे. असा प्रकार कांही बौद्ध धर्मामध्यें नाही. बौद्ध स्त्रियांनां सर्व धर्मग्रंथ वाचण्याची मोकळीक आहे. आजला ब्रह्मदेशांत त्रिपिटक ग्रंथांचें अध्ययन केलेल्या आणि करणा-या पुष्कळ स्त्रिया आहेत. इंग्रज सरकारच्या तर्फेने ब्रह्मी राजांच्या पद्धतीस अनुसरून पालिभाषेंतील बौद्ध वाङमयाची परीक्षा घेऊन कांहीं बक्षिसें वाटण्यांत येतात. या परीक्षेंत उत्तीर्ण होऊन ब-याच स्त्रियांनी बक्षिसें मिळविल्याचें मला माहित आहे.