Get it on Google Play
Download on the App Store

*धर्म 7

अधिशीलशिक्षा संपादिल्यावर अधिचित्तशिक्षा किंवा समाधि संपादण्याचा प्रयत्न केला पाहिजे, शीलसंपत्ति संपादन केल्यावांचून समाधिलाभ व्हावयाचा नाहीं. भगवान बुद्धानें म्हटलें आहे:-

आकंखेय्य चे भिक्खवे भिक्खु चतुन्नं ज्ञानानं आभिचेतसिकानं दिठ्ठधम्मसुखविहारान निकामलाभी अस्सं अकिच्छलाभी अकसिरलाभी ति। सीलस्वेवस्स परिपूरकारी ।। (आकंखेय्यसुच मज्झिमनिकाय.)

भिक्षु हो, जर एखाद्या भिक्षूची प्रत्यक्ष सुख प्राप्त करून देणार्या चारीहि ध्यानांचा यथेच्छ लाभ व्हावा, सहज लाभ व्हावा, वाटेल तेव्हां लाभ व्हावा, अशी इच्छा असेल तर त्यानें शीलाचें उत्तम रीतीनें पालन केलं पाहिजे.

समाधि म्हणजे चित्ताची एकाग्रता. तिचे अकुशल समाधि आणि कुशल समाधि असे दोन भेद आहेत. एखाद्या नाटकगृहांत नाटक चाललें असतां तेथील कांही श्रोते शृंगारपरिप्लुत पद्य ऐकून तल्लीन होऊन जातात. त्या प्रसंगीं त्याच्या चित्ताची जी एकाग्रता ती अकुशल समाधि होय. त्याचप्रमाणें दुसर्याच्या घातपातात एखादा मनुष्य गढून गेला असतां त्याच्या चित्ताची तात्कालिक एकाग्रता अकुशल समाधींत गणिली जाते. या अकुशल समाधीचा अर्थातच अधिचित्तशिक्षेंत समावेश होत नाहीं. केवळ कुशल समाधिलाच अधिचित्तशिक्षा म्हणतात.

कुशल समाधीचे उपचार समाधि आणि अर्पणा समाधि असे दोन भेद आहेत. उपचार समाधि अल्पकाळ टिकणारी असते. लहान मूल उभें राहण्यास शिकत असतां फार वेळ उभे राहूं शकत नाहीं, त्याप्रमाणें योग्याला आरंभीच साध्य होणारी उपचार समाधि फार वेळ टिकत नाहीं. अर्पणा समाधि उपचार समाधि साधल्यावर प्राप्त होते. ती अभ्यासानें पाहिजे तितकी टिकू शकते. तिचे ध्यानभेदानें चार भेद होतात. वितर्क, विचार, प्रीति, सुख आणि एकाग्रता हीं प्रथम ध्यानाचीं पाच अंगें. व्दितीय ध्यानांत वितर्क आणि विचार राहत नाहीं, बाकी तीन अंगे राहतात. तृतीय ध्यानांत प्रीति राहत नाही. सुख आणि एकाग्रता ही दोन अंगें राहतात. चतुर्थ ध्यानांत एकाग्रता आणि उपेक्षा अशीं दोनच अंगें असतात.कुशल समाधि चाळीस पदार्थांचें चिंतन करून साधितां येते. त्यां पदार्थांस कर्मस्थानें असे म्हणतात. त्या सगळ्यांचें सविस्तर वर्णन करूं लागलों तर एक मोठा थोरला ग्रंथच होणार आहे. म्हणून यांपैकीं उदाहरणादाखल चारांचेंच दिग्दर्शन करितों.

१ कायगता स्मृति


विशुद्धिमार्ग ग्रंथामध्यें सर्वसाधारणपणें मनुष्यांचे सहा भेद सांगितले आहेत. त्यांत रागचरित, व्देषचरित आणि मोहचरित हे तीन मुख्य आहेत. ज्याची कामवासना इतर मनोवृत्तींहून बळकट तो रागचरित, ज्याचा द्वेष बळकट तो द्वेषचरित, व ज्याचा मोह म्हणजे आळस बळकट तो मोहचरित असें समजावें.

रागचरिताला कायगतास्मृति हें कर्मस्थान योगारंभी विहित आहे. कायगतास्मृति म्हणजे विवेकानें आपल्या शरीराचें अवलोकन करणें. ज्याला कायगतास्मृतीचा अभ्यास करावयाचा असेल त्यानें शरीरांतील निरनिराळ्या पदार्थांकडे वैराग्यपूर्ण दृष्टीनें पाहण्याची सवय करून घ्यावी. केश, नख, चर्म इत्यादि बाह्य पदार्थ पाहून जर वैराग्य उत्पन्न होत नसेल तर मांस आंतडे, अस्थि इत्यादि आभ्यंतर पदार्थांकडे ज्ञानदृष्टीनें पहावें. जेथें फाडलेले प्रेत पाहाण्यास सांपडेल तेथें जाऊन तें अवश्य पहावें, व त्यांतील ज्या भागाकडे पाहून विशेष वैराग्य उत्पन्न होईल, त्या भागाची आपल्या शरीराच्या भागाशी तुलना करावी. किंबहुना तोच आपल्या शरीराचा भाग आहे अशी कल्पना करावी यासंबंधी शातिदेवाचार्य म्हणतात :-