Get it on Google Play
Download on the App Store

बुद्ध 6

यापुढील बोधिसत्त्वावर गुदरलेला मोठा आणीबाणीचा प्रसंग म्हटला म्हणजे माराबरोबर झालेल्या त्याच्या युद्धाचा होय. बुद्धचरितकाव्यादि ग्रंथांतून या प्रसंगांचे अद्भतूरसपरिप्लुत वर्णन आढळते. तें काव्याच्या दृष्टीनें अत्यंत मनोरम आहे. परंतु सुत्तनिपातांतील पथानसुत्तांत१ (१ या सुत्ताचें संस्कृत रुपांतर ललितविस्तराच्या १८ व्या अध्यायांत सांपडतें.) केलेलें मारयुद्धाचें वर्णन त्याहून भिन्न आहे. पधानसुत्तांत २५ गाथा आहेत, त्यापैकीं कांहीं येथें देणें अप्रश्नसंगिक होणार नाही.
बुद्ध भगवान म्हणतो:-

तं मं पधानपहितत्तं नदिं नेरंजरं पति।
विपरक्कम्म झायन्तं योगक्खेमस्स पत्तिया ।।१।।
नमुचि करुणं वाचं भासमानो उपागमि।
किसो त्वमसि दुब्बण्णो सन्तिके मरणं तव।।२।।
सहस्सभागो मरणस्स एकंसो तब जीवितं।
जीवं भो जीवितं सेय्यो जीवं पुञ्ञानि काहसि ।।३।।
चरतो च ते ब्रह्मचरियं अग्गिहुत्तं च जूहतो।
पहूतं चीयते पुञ्ञं किं पधानेन काहसि।।४।।


(१) मी नेरंजरा नदीच्या कांठी निर्वाणप्रश्नप्तीसाठीं मोठय़ा उत्साहानें ध्यान करीत होतों. माझें सर्व चित्त निर्वाणाकडे लागलें होतें. (२) (असें असतां) मार माझ्याजवळ आला आणि करुणामय वाणीनें मला म्हणाला, ‘तूं कृश झाला आहेस, तुझी अंगकांति फिकट झाली आहे, मरण तुझ्याजवळ आहे. (३) हजार हिश्शांनीं तूं मरणार, एका हिश्शानें काय तें तुझें जीवित बाकी राहिलें आहे. भो (गोतम), जिवंत रहा, जगलास तर पुण्यकर्मे करूं शकशील. (४) (गृहस्थधर्माला विहित) कर्माचे आचरण करून, अग्निहोत्र ठेवून, होम केला असतां, पुष्कळ पुण्य संपादितां येतें, तर मग निर्वाणासाठीं प्रयत्न कशाला करतोस?

मारानें बोधिसत्त्वाला असा उपदेश केल्यावर बोधिसत्त्व त्याला म्हणाला:-

अणुमत्तेन पि पुम्ञ्ञेन अत्थो मय्हं न विज्जति।
येसं च अत्थो पुम्ञ्ञानं ते मारो वत्तुमरहति।।१।।
अत्थि सद्धा ततों विरियं पञ्ञा च मम विज्जति।
एवं मं पहितत्तं पि किं जीवितमनुपुच्छसि ।।२।।

(१) अशा प्रकारचें (लौकिक) पुण्य अणुमात्रहि मला नको आहे. ज्यांनां अशा पुण्याची आवश्यकता वाटत असेल त्यांनां पाहिजे तर मारानें हा उपदेश करावा.  (२) माझ्या अंगीं श्रद्धा आहे, उत्साह आहे आणि प्रज्ञाहि आहे. याप्रमाणें माझा अंतरात्मा निर्वाणपरायण झाला असतां मरणाची भीति कशाला घालतोस? आणखी बोधिसत्त्व म्हणाला :-

कामा ते पठमा सेना दुतिया अरति वुच्चति।
ततिया खुप्पिपासा ते चतुत्थी तण्हा पवुज्जति।।१।।
पंचमी थीनमिद्धं ते छठ्ठा भीरूपवुच्चति।
सत्तमी विचिकिच्छा ते मक्खो थंभो ते अट्ठमो।।२।।
लाभो सिलोको सक्कारो मिच्छा लद्धो च यो यसो।
यो चत्तानं समुक्कंसे परे च अवजानति।।३।।
एसा नमुचि ते सेना कण्हस्साभिप्पहारणी।
न तं असूरो जिनाति जेत्वा च लभते सुखं।।४।।

(१-२) (हे मार) इंद्रियांनां सुखिवणारे चैनीचे पदार्थ ही तुझी पहिली सेना होय, अरति (कंटाळा) ही तुझी दुसरी सेना, तिसरी भूक आणि तहान, चवथी विषयवासना, पांचवी आळस, सहावी भीति, सातवी कुंशका आणि आठवी गर्व ही तुझी सेना होय. (३) (याशिवाय) लाभ, सत्कार, पूजा ही तुझी (नववी) सेना आहे, आणि खोट्या मार्गानें मिळालेली कीर्ति (ही दहावी); या कीर्तीच्या योगानें मनुष्य आत्मस्तुति आणि परनिंदा करीत असतो. (४) हे काळ्याकुट्ट नमुचि (मार), (साधुसंतांवर) प्रहार करणारी ही तुझी सेना आहे. तिला भ्याड मनुष्य जिंकूं शकत नाहीं. परंतु जो शूर मनुष्य तिला जिंकतो तोच सुख लाभतो.