Get it on Google Play
Download on the App Store

बुद्ध 1

बुद्ध

पौराणिक पंथामध्यें ब्रह्मा, विष्णु आणि शिव ही तीन मुख्य दैवतें गणिलीं आहेत. ख्रिस्ती धर्मात पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या तिहींना प्राधान्य दिलें आहे. त्याचप्रमाणे बौद्ध धर्मात बुद्ध, धर्म आणि संघ या त्रयीला श्रेष्ठत्व मिळाले आहे. बौद्ध धर्म पौराणिक धर्मापेक्षां किंवा ख्रिस्ती धर्मापेक्षां प्राचीन असल्यामुळें त्याचें अनुकरण पौराणिकांनी आणि ख्रिस्त्यांनी केलें असावें असें कित्येकांचे अनुमान आहे. या अनुमानाला संख्येचे साम्प यापलीकडे कांही आधार असेल असें मला वाटत नाही. पुराणांतील त्रिमूर्तीची किंवा बायबलांतील त्रयीची बहुतेक सर्व श्रोत्यांस माहिती असेलच. परंतु बौद्ध धर्मातील त्रिरत्नांची १ (१बुद्ध, धर्म आणि संघ यांनां बौद्ध वाङ्मयात त्रिरत्न किंवा रत्नत्रय अशी संज्ञा आहे.) पारख अद्यापि आमच्या बांधवांपैकी बर्याच जणांस झाल्याचें दिसून येत नाहीं. तेव्हा आजच्या या पहिल्या व्याख्यानांत या त्रिरत्नांपैकी पहिलें रत्न बुद्ध त्याची, बौद्धांचा मूळग्रंथ जो त्रिपिटक त्यास अनुसरून, थोडीशी माहिती आपणांसमोर मांडण्याचा मी प्रयत्न करितों.

बुद्धाची माहिती देणारे ललितविस्तर आणि अश्वघोषकृत बुद्धचरितकाव्य हे दोन ग्रंथ संस्कृत भाषेंत प्रसिद्ध आहेत. पालिभाषेंत जातकाच्या प्रस्तावनेत बुद्धचरित्र कथन केलें आहे. अलीकडे जे इंग्रजी भाषेंत बुद्धचरित्रावर ग्रंथ झाले आहेत, ते बहुतेक वरील ग्रंथांच्या आधारें लिहिले आहेत. या ग्रंथांतून बुद्धाच्या बालपणींच्या कित्येक चमत्कारिक आणि असंभवनीय गोष्टी सांगितल्या आहेत. आरंभी जेव्हां युरोपियन पंडितांनी या गोष्टी वाचल्या तेव्हां त्यांतील कित्येकांनी बुद्ध ही ऐतिहासिक व्यक्ति नसून पौराणिक देवता असावी असे अनुमान केलें. प्रश्ने. सेनार या फ्रेंच पंडिताने सूर्योपासनेपासून बुद्ध दैवताची कल्पना निघाली असें सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. हा त्याचा सिद्धांत चिरायु झाला नाहीं.

कांही वर्षामार्गे आक्र्यालॉजिकल खात्यानें नेपाळी तराईतील लुंबिनिदेवी ह्य़ा गांवी नेपाळी सरकारच्या परवानगींने जमिनींत गाडून गेलेल्या कांही मोडक्या इमारती खणून काढिल्या. त्यांत एक अशोकराजाचा शिलास्तंभ सांपडला. या स्तंभावर अशोकानें पालिभाषेंत लिहविलेला लेख आहे तो येणेंप्रमाणे:-

देवान पियेन पियदासिन वीसति वसाभिसितेन अतन आगाच महीयिते हिध बुद्धे जाते सक्यमुनीति सिला विगडाभिचा कालापितसिलाथंबेचा उसपापिते हिध भगवं जातेति लुंमिनिगामे उबालिके कते अथभागियेच ।

"देवांचा प्रिय प्रियदर्शी (ह्म. अशोक) राजानें आपल्या अभिषेकास वीस वर्षे झाल्यावर येथें शाक्यमुनि बुद्ध जन्मला होता ह्मणून स्वत: येऊन पूजा केली. चारी बाजूंस शिलास्तंभांची भिंत बांधिली, आणि (हा) शिलास्तंभ उभारिला. या ठिकाणीं भगवान् जन्मला होता म्हणून या लुंबिनी गांवाचा कर माफ करण्यांत आला, आणि (विहाराला?) कांही नेमणूक करून देण्यांत आली."

या शिलालेखानें बुद्ध ही पौराणिक देवता नसून ऐतिहासिक व्यक्ति होती अशी पाश्चात्य पंडितांची खात्री झाली, व प्रो. सेनारच्या वर सांगितलेल्या कल्पनेची इमारत आपोआप ढासळून पडली! तथापि या पंडितांनी वर सांगितलेल्या चरित्रविषयक तीन ग्रंथांच्या पलीकडे जाऊन अति प्राचीन पालिग्रंथांत बुद्धचरित्रासंबंधी काय माहिती मिळते, ललितविस्तरदि ग्रंथांतून सांगितलेल्या चमत्कारिक कथांस मूळ ग्रंथांत आधार आहे कीं काय, इत्यादि गोष्टींचा विचार केल्याचें दिसून येत नाहीं, व हें तर फार महत्त्वाचे आहे. तेव्हां केवळ मूळ पालिग्रंथ त्रिपिटक याच्या आधारें बुद्धचरित्राची माहिती देण्याचें येथें मीं योजिलें आहे.