Get it on Google Play
Download on the App Store

प्रस्तावना ** 1

पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना

बुद्ध व बौद्धधर्म यांकडे पाश्चात्य पंडितांचे लक्ष्य अलिकडे बरेच लागलेले आहे. पालि व संस्कृत भाषांत बौद्ध धर्माचे जे वाङ्मय आहे त्याचे अध्ययन ते अत्यंत परिश्रमाने करीत आहेत; व या विषयावर सर्व पाश्चात्य भाषांत पुष्कळ ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. भगवान बुद्धांनी केलेल्या उदात्त उपदेशाचे ज्ञान तिकडे पसरत आहे व त्याविषयी त्या लोकांचा आदरही सारखा वाढत आहे. बुद्ध आमच्या देशात अवतीर्ण झाले, त्यांचे शिक्षण आमच्या लोकांतच झाल्याने त्यांनी पुढे शिकवलेल्या धर्माचा पाया आमच्याच पूर्वजांच्या विचारांवर रचिलेला आहे, त्यांनी व त्यांच्या शिष्यांनी आपल्या धर्माचा प्रसार ज्या भाषेत केला, व अजूनही बौद्धांचे धर्मग्रंथ ज्या भाषेत आहेत ती आमच्याच देशांतील भाषा, असे असून बुद्धासंबंधी माहिती मिळविण्यास आम्हास पाश्चात्यांच्या तोंडाकडे पहावे लागते! आमच्या देशातील परिस्थिती, आमची प्राचीन विचारसरणी व पालि व संस्कृत ग्रंथांचे हद्भत पाश्चात्य लोकांना पूर्णपणे समजणे अत्यंत कठीण. शिवाय बौद्ध धर्मग्रंथांचा विस्तार फार मोठा व त्यामुळे त्यांचे अध्ययनही त्यांच्या हातूने अजून पूर्णपणे झालेले नाही. यामुळे त्यांच्या ग्रंथांत बरेच दोष आढळून येतात हे साहजिकच आहे. हे ग्रंथ वाचून इकडच्या चार गोष्टी, तिकडच्या चार गोष्टी व त्यांत स्वत:च्या कल्पनांची भर घालून निर्माण झालेले आमच्या देशी भाषांतील या विषयावरील ग्रंथ.

प्राचीन धर्मसंस्थापक व धर्म यासंबंधी विश्वसनीय ग्रंथ लिहावयाचा असेल तर पुढील गुणांची आवश्यकता आहे. प्रथमत: त्या धर्माच्या वाङ्मयाचे मूळ भाषेत चांगले ज्ञान करून घेतले पाहिजे. ज्या देशात त्या धर्माचा उदय व वाढ झाली. त्यांतील चालीरिती, साधारण परिस्थिती, लोकसमजुती, विचारसरणी वगैरेंचा चांगला परिचय पाहिजे. ज्या धर्माविषयी लिहावयाचे त्याविषयी मन:पूर्वक आदर व श्रद्धा पाहिजे. नाही तर त्या धर्माचे रहस्य कदापि लक्षात येणार नाही. परंतु सध्याच्या काळी या श्रद्धेबरोबरच स्वतंत्रपणे विचार करून सार काय, असार काय, अंधश्रद्धेने रचलेला भाग कोणता व धर्माचा सनातन अंश कोणता, अतिशयोक्ति, अज्ञान व धर्मभोळेपणा कोणता व शुद्ध सत्य कोणते हे निवडून स्पष्टपणे सांगण्याचे सामर्थ्य अंगी असले पाहिजे. या सर्व गुणांची बिनमोल मेळवण प्रस्तुत पुस्तककर्त्याच्या अंगी विशेषे करून झालेली आहे. आमच्याच देशात ब्राह्मणकुली जन्म, कुशाग्रबुद्धी, धार्मिक स्वभाव, संस्कृताचे उत्तम ज्ञान, नंतर बौद्धधर्म प्रचलित असलेल्या सिलोन, ब्रह्मदेश वगैरे देशांत जाऊन तेथील विहारांत बौद्ध भिक्षूच्या वृत्तीने राहून नाणावलेल्या बौद्ध गुरूंच्या हाताखाली मूळ पालिभाषेत बौद्ध धर्मग्रंथांचे यथासांग अध्ययन; व हे अध्ययन कीर्तीच्या आशेने किंवा केवळ जिज्ञासाबुद्धीने केलेले नसून बौद्धधर्मावर जिवापाड श्रद्धा म्हणून अनेक दु:सह संकटे सोसून केलेले; व इतके सर्व असून या विसाव्या शतकातील कोणत्याही पंडितास शोभेल अशी सारासार पाहून (critical) व ऐतिहासिक दृष्ट्या विचार करण्याची पद्धती. या सर्व गुणांमुळे प्रो. धर्मानंद कोसंबी बौद्ध धर्मासंबंधी जे जे लिहितील ते सर्व विचारी विद्वानांच्या आदरास पात्र होईल व त्यांपासून आम्हा हिंदुस्तानवासियांनाच नव्हे, परंतु पाश्चात्य देशात बौद्ध धर्माच्या ज्ञानात निष्णात म्हणून गाजलेल्या पंडितांनाही पुष्कळ बोध होईल यात मला संशय नाही.