Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

आनापानस्मृतिभावना 5

अनापानस्मृतिभावनेचा सर्वात मोठा फायदा हा की, तिचा अल्पाभ्यासहि हितकारक होत असतो; तिच्यामुळे हानी होण्याचा मुळीच संभव नसतो.  पहिल्या चौकडीचा तेवढा अभ्यास पुरा झाला असे जरी धरले, तरी त्याचा व्यवहारात वारंवार चांगला उपयोग होतो.  ज्या ज्या वेळी आपले मन कामक्रोधादिक मनोवृत्तींनी बहकले जाते, भयाने किंवा कुशंकेने व्यग्र होते, त्या त्या वेळी प्राणापानाचे आलंबन मिळाल्यामुळे ते एकदम ताळ्यावर येते.  अंधार्‍या रात्री खाचखळग्यांतून जात असता जसा काठीचा आपणास उपयोग होतो, तसा प्रपंचात चित्ताला या आलंबनाचा उपयोग होत असतो.  मेसिडोनियाच्या फिलिप बादशाहाने आपण बहकून जाऊ नये म्हणून आपणाला स्मरण देण्यासाठी एक मनुष्य ठेवला होता; व तो 'फिलिप, तू मनुष्य आहेस, तू मनुष्य आहे, असे वारंवार म्हणत असे.  परंतु प्रत्येक माणसाला अशा रीतीने आपणाला स्मरण देण्यासाठी दुसरा मनुष्य ठेवता येणे शक्य नाही; आणि आनापानस्मृतीची भावना केली असता त्याची गरजही नाही.  उच्छृंखल मनाला आवरण्याचे काम आनापानस्मृति आपोआपच करीत असते.

या स्मृतीचा दुसरा गुण हा की, ती सर्व कर्मस्थानात उपयोगी पडते.  थोडी बहुत आनापानस्मृतीची भावना केल्यावाचून कायगतास्मृति, मैत्री, करुणा इत्यादिक कर्मस्थानांचा मार्ग आक्रमण करणे कठीण जाते.  कायगतास्मृति तर आनापानस्मृतीवाचून अपायकारक होण्याचा संभव असतो.  हे कसे ते पुढल्या प्रकरणात दाखविण्यात येईलच.  तिसरा गुण हा की, आनापानस्मृति ज्याला साध्य झाली असेल, तो मरणकाल आसन्न आला तरी मुग्ध होत नाही; त्याचे श्वासोच्छवास तो जागृत असताच निरोध पावतात.  या संबंधाने मज्झिमनिकायातील महाराहुलोबाद सुत्तांत (नं. ६२) भगवंताने म्हटले आहे की,- एवंभाविताय खो राहुल आनापानसतिया एवंबहुलीकताय ये पि ते चरिमका अस्सासपस्सासा ते पि विदिता व निरुज्झन्ति नो अविदिता ति ।  (हे, राहुल, याप्रमाणे आनापानस्मृतीची भावना केली असता व ती प्रगुणित केली असता मरणासन्न आश्वासप्रश्वासहि सावध असताच निरोध पावतात, बेसावध असता निरोध पावत नाहीत.)  या वाक्याच्या स्पष्टीकरणार्थ विशुद्धिमार्गात गोष्ट दिली आहे ती अशी ः-

सिंहलद्वीपांत चित्रल (चित्तल) पर्वतावर दोन सहोदर भिक्षु रहात होते.  त्यांपैकी एक जण पौर्णिमेच्या दिवशी भिक्षुसंघासह आपल्या निवासस्थानी बसला असता, आपले मरण आसन्न आहे, असे जाणून भिक्षुसंघाला म्हणाला, 'तुम्ही अरहंतांचे परिनिर्वाण कशा प्रकारचे पाहिले आहे ?'  कोणी म्हणाले, 'आसनावर बसून समाधिस्थ झालेल्या अरहंताला आम्ही पाहिले आहे.'  दुसरे म्हणाले, आसनमांडी ठोकून परिनिर्वाण पावलेल्याला आम्ही पाहिले आहे' त्यावर तो स्थविर म्हणाला, 'आता तुम्हाला मी चक्रमण करीत असताच कसे परिनिर्वाण पावता येते हे दाखवितो.'  त्यानंतर चंक्रमावर एक आडवी रेघ मारुन तो म्हणाला, 'येथून चंक्रमाच्या दुसर्‍या टोकाला जाऊन तेथून या रेघेवर परत आल्याबरोबर माझे परिनिर्वाण होणार आहे' त्याने म्हटल्याप्रमाणेच त्या रेघेवर पोचल्याबरोबर तो परिनिर्वाण पावला.

समाधिमार्ग

धर्मानंद कोसंबी
Chapters
समाधिमार्ग 1
समाधिमार्ग 2
समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 1
समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 2
समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 3
समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 4
समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 5
समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 6
समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 7
समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 8
समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 9
आनापानस्मृतिभावना 1
आनापानस्मृतिभावना 2
आनापानस्मृतिभावना 3
आनापानस्मृतिभावना 4
आनापानस्मृतिभावना 5
कायगतास्मृति आणि अशुभे 1
कायगतास्मृति आणि अशुभे 2
कायगतास्मृति आणि अशुभे 3
कायगतास्मृति आणि अशुभे 4
कायगतास्मृति आणि अशुभे 5
ब्रम्हविहार 1
ब्रम्हविहार 2
ब्रम्हविहार 3
ब्रम्हविहार 4
ब्रम्हविहार 5
अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 1
अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 2
अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 3
अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 4
अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 5
अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 6
कसिणे 1
कसिणे 2
कसिणे 3
कसिणे 4
कसिणे 5
अरुपावचर आयतने 1
अरुपावचर आयतने 2
विपश्यनाभावना 1
विपश्यनाभावना 2
विपश्यनाभावना 3
विपश्यनाभावना 4
विपश्यनाभावना 5