Get it on Google Play
Download on the App Store

समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 2

महावास म्हणजे ज्या ठिकाणी समानकार्मिकांची मोठी वस्ती असेल तो.  आपण एखाद्या मोठ्या आश्रमात किंवा कालेजच्या बोर्डिंगसारख्या ठिकाणी राहू लागलो, तर तेथे नानाप्रकारची माणसं एकत्र झाल्यामुळे त्यापासून आपल्या समाधीला उपसर्ग पोचतो.  आपल्या खोलीच्या दरवाज्यात कोणी घाण केली, तर ती जागा आपणास साफ करावी लागते.  दुसरे लोक जवळपास मोठमोठ्याने बोलू लागले किंवा गाऊ लागले, तर आपले मन विक्षिप्‍त होते.  आपण समाधिस्थ होऊन बसलो, आणि इतक्यात जेवणाची घंटा झाली, तर ती आपणास ऐकू येत नाही; व पुढे जेवणगृहात जाऊन पाहतो, तो सर्व मंडळी जेवून गेलेली आढळते, व उरलेले सुरलेले अन्न खाण्याची पाळी येते.  अशा अनेक अडचणीमुळे महावास समाधीला प्रतिबंधक होत असतो.

नवावास म्हणजे जे नवीन काम चालू असते.  तेथे सुतार, गवंडी वगैरे लोकांकडून उपसर्ग होत असतो.  खालच्या मजल्यावर आपण रहात असलो आणि वरच्या मजल्यावर जर काम चालू असले तर दगड, विटा इत्यादिक पदार्थ खाली पडून त्यांच्या आवाजाने समाधीचा क्षणोक्षणी भंग होतो.  आजूबाजूला इमारतीचे सामान पसरले असल्याकारणाने शांतपणे इकडून तिकडे चंक्रमण करण्यासही अवकाश रहात नाही.  अशा अनेक कारणांनी नवावास समाधीला प्रतिबंधक होत असतो.

जरावास म्हणजे जीर्णशाला.  आपण एखाद्या पडक्या ठिकाणी राहू लागलो म्हणजे तेथे अनेक अडचणी उपस्थित होतात.  वरचे छत बरोबर नसल्यामुळे पावसाळ्यात पाणी आत शिरते; भिंतीचा गिलावा फाटून खाली पडतो; जमिनीतून वाळवी निघते; उंदिराला बिळे करण्यास अवकाश मिळतो.  अशा घराची डागदुगी करता करता पुरेवाट होऊन जाते.  मग समाधीला अवकाश कोठून सापडणार ?

पन्थनी म्हणजे मोठ्या सडकेच्या जवळची जागा.  अश ठिकाणी गाडीवाले गाड्या उभ्या करून पाणी मागण्यासाठी येतात; पांथस्थ विश्रांतीसाठी येऊन बसतात, व गप्पागोष्टी करतात.  अलीकडे तर इकडून तिकडून जाणार्‍या मोटारीचाहि त्रास होण्याचा बराच संभव आहे.  अर्थात समाधीला अशी जागा योग्य नव्हे.

सोण्डी म्हणजे हौद.  जेथे हौद किंवा दुसरा अशाच प्रकारचा जलाशय असतो तेथे पाणी पिण्यासाठी आणि स्नान करण्यासाठी अनेक लोक येतात, व अशा स्थानी योगाभ्यास करण्यास कठीण जाते.

पण्ण किंवा पर्ण म्हणजे शाकभाजीत उपयोगात येणारी पाने.  अशा ठिकाणी बायकामुले पाने गोळा करण्यासाठी येतात, गोष्टी करतात, गातात, व त्यामुळे समाधीला प्रतिबंध होतो.

पुष्फ किंवा पुष्प म्हणजे फुलांचा मळा.  येथे ही फुले एकत्र करण्यासाठी बायकामुले येत असतात व त्यामुळे योगाभ्यासाला उपसर्ग पोचतो.

फल म्हणजे फळांचा बाग.  तेथेही वरच्याप्रमाणेच उपद्रव होतो.

पत्थित किंवा प्रार्थित म्हणजे प्रार्थनेची जागा.  कार्लीच्या गुहा किंवा आबूचा पहाड, ही स्थाने अत्यंत रम्य आहेत खरी; परंतु तेथे प्रार्थनेसाठी यात्रेकरू येत असल्यामुळे ती योगाभ्यासाला योग्य नाहीत.  हा कोणीतरी सत्पुरुष असावा, अशा समजुतीने यात्रेकरू योगाभ्यास करणार्‍या माणसापाशी येऊन त्याला अनेक प्रश्न विचारतील, किंवा आदरसत्कार करून त्याचे स्तोम माजवतील आणि तेणेकरून त्याच्या समाधीत मोठे विघ्न उपस्थित करतील.

नगर म्हणजे नगराच्या जवळ असलेली जागा.  येथे गाडी घोड्यांचा आणि मनुष्यांचा वारंवार त्रास पोचल्यावाचून रहात नाही.

दारु म्हणजे इमारतीला उपयोगी पडणार्‍या लाकडांचे जंगल.  अशा ठिकाणी लाकुडतोडे येऊन उपद्रव करतात.

समाधिमार्ग

धर्मानंद कोसंबी
Chapters
समाधिमार्ग 1 समाधिमार्ग 2 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 1 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 2 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 3 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 4 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 5 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 6 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 7 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 8 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 9 आनापानस्मृतिभावना 1 आनापानस्मृतिभावना 2 आनापानस्मृतिभावना 3 आनापानस्मृतिभावना 4 आनापानस्मृतिभावना 5 कायगतास्मृति आणि अशुभे 1 कायगतास्मृति आणि अशुभे 2 कायगतास्मृति आणि अशुभे 3 कायगतास्मृति आणि अशुभे 4 कायगतास्मृति आणि अशुभे 5 ब्रम्हविहार 1 ब्रम्हविहार 2 ब्रम्हविहार 3 ब्रम्हविहार 4 ब्रम्हविहार 5 अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 1 अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 2 अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 3 अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 4 अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 5 अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 6 कसिणे 1 कसिणे 2 कसिणे 3 कसिणे 4 कसिणे 5 अरुपावचर आयतने 1 अरुपावचर आयतने 2 विपश्यनाभावना 1 विपश्यनाभावना 2 विपश्यनाभावना 3 विपश्यनाभावना 4 विपश्यनाभावना 5