Get it on Google Play
Download on the App Store

साधना 15

ब्रह्मांडाधिपतीने मानवी हृदय मोकळे ठेवले आहे. तुम्ही बोलावल्याशिवाय तो तेथे जाणार नाही. मासिक व शारीरिक यंत्राच्या बाबतीत नियम पाळावे लागतात. कारण तेथे सृष्टीशी आपण जोडलेले असतो. परंतु अंतरंगात तुम्ही स्वतंत्र आहात. तेथे ईश्वराला तुम्ही मज्जाव करू शकाल. प्रभू तेथे राजाधिराज म्हणून हुकूमशाहा येणार नाही. तुम्ही बोलावीपर्यंत हृदयाच्या दाराजवळ तो युगानुयुगे वाट पाहात उभा असतो. मानवाच्या अंतरंगात ईश्वराच्या सत्ता नाही. तेथे प्रेम मिळवण्यासाठी तर यायचे. ते सत्तेने कसे जमेल? प्रेमाचा दूत जो सौंदर्य, त्यालाच हृदयाच्या आवारात प्रवेश मिळतो. परमेश्वराने मनुष्याच्या इच्छास्वातंत्र्याच्या प्रान्तातच बेबदंशाहीला वाव ठेवला आहे. गोष्टी इतक्या थराला येतात की, आपण म्हणतो, ‘तो परमेश्वर असता तर माझ्या अंतःकरणात असा धुमाकूळ त्याने चालू दिला नसता !’ खरोखरच तो करुणासागर शान्तपणे वाट पाहात दूर उभा असतो. त्याच्या धीमेपणाला सीमा नाही. बंद दारे तो जबरदस्तीने उघडीत नाही. क्षुद्र जीवन ओळखून विशाल जीवनाकडे जावयाचे ते स्वेच्छेने व्हावे. स्वतःचे स्वरूप ओळखून घ्यायचे ते मारूनमुटकून थोडेच का हो? प्रेमानेच ते शक्य होते. आपली स्वतंत्रता शेवटी अनंततेला शरण जाते आणि तो प्रेममय प्रेमाने आपण मिळवतो.

जो परमात्म्याशी समरस झाला, तो मानवजातीचे परम विकसित स्वरूप होय !! मानवजातीच्या वेलीवरील ते रमणीय फूल. मनुष्य आपले खरे स्वरूप अशांच्या ठायी पाहतो. मानवी आत्म्याच्या ठिकाणी तेथे परमात्मा प्रकटलेला दिसतो. सान्त जीवनात अनंतता फुललेली दिसते. अशा महात्म्याच्या ठिकाणी परमेश्वराचा पूर्ण साक्षात्कार आपणास होतो. मानवी इच्छा आणि परमेश्वरी इच्छा यांचा तेथे अविरोध दिसतो. मानवी प्रेम अविनाशी प्रेमात मिळून गेलेली दिसते.

म्हणून या भारतभूमीत परमेश्वरावर प्रेम करणार्‍याला लोक डोक्यावर घेतात. कोणाला मिळणार नाही, अशी मानसन्मानपूजा त्याला मिळते. पाश्चिमात्यांना याचे हसू येते. मानवाचा असा सत्कार करणे त्याना कसे तरी वाटते. परतुं पौरस्य दृष्टीला अशा व्यक्तीच्या ठिकाणी ईश्वरी इच्छा फलद्रूप झालेली दिसते. ईश्वरी आनंद तेथे फुललेला दिसतो. त्या व्यक्तीच्या द्वारा सारी मानवजात जणू देवाजवळ जाते. मानवजातीचे देवाशी सख्य जोडले जाते. ईश्वरी आनंद तेथे फुललेला दिसतो. त्या व्यक्तीच्या द्वारा सारी मानवजात जणू देवाजवळ जाते.  मानवजातीचे देवाशी सख्य जोडले जाते. ईश्वरी प्रेमाने जळणारे संतांचे जीवन आपल्या सर्वांच्या प्रेमाला उजळा देते. दैवी प्रेमाचा हा जो अपूर्व नि अपार सोहळा महात्मांच्या ठायी दिसतो, त्याच्याभोवती आपण आपल्या जीवनातील मोलवान् स्मृती रचतो. तेथे आपण आपले सुखदुःखाचे अनुभव ओततो. त्याच्या ठिकाणी जे दृश्य दिसते, त्याचे आपण नाटक बनवतो. परिचित व क्षुद्र अशा वस्तुजातातून अनंत गूढ शक्तीचा प्रवाह वाहात आहे असे दिसते. एक संगीत सर्वत्र आहे असे भासते. हे तरू, हे तारे, या निळया निळया टेकडया, हे आकाश - या सर्वांना अर्थ प्राप्त होतो. शब्दांनी ज्यांचे विवेचन करता येणार नाही, अशा खुणा या वस्तू दाखवतात. मनुष्य जेव्हा क्षुद्र जीवनाचा पडदा फाडून आपल्या आत्म्याला-त्या चिर प्रियकराला समोर बघतो त्या वेळेस नवीन सृष्टी निर्माण करणार्‍या परमेश्वरालाच आपण पाहात आहोत असे वाटते. ही धन्य स्थिती, ही परमदशा म्हणजे काय? ही दशा वासंतिक प्रभातकालासारखी असते. विविध प्रकारच्या सौंदर्यात पूर्णता व एकता दिसते. चंचलता जाऊन मनुष्य आत्म्याशी एकरूप होतो, तेव्हा अनंताची त्याला अनुभूती सहज होते. जीवनातील सारे विरोध मावळतात. सारे संघर्ष शान्त होतात. प्रेम, ज्ञान आणि कर्म यांचे सामरस्य होते. सुखदुःख एकरूप होऊन दिव्य सौंदर्य प्रकट होते. त्याग व भोग एकरूप होऊन मांगल्य जन्मते. सान्त आणि अनन्त यातील अंतर प्रेमपूर येऊन दूर होते. क्षणाक्षणाला अमरत्वाचा संदेश मिळतो. तो निराकार परमात्मा फळाच्या रूपाने, फुलाच्या रूपाने प्रतीत होतो. तो अपार व महान् विभू आईप्रमाणे आपणास जवळ घेत आहे, मित्राप्रमाणे आपणाजवळ बोलत आहे असे वाटते. मनुष्यातील आत्मा सर्व व्याधी तोडून हे महान ऐक्य अनुभवू शकतो. जोपर्यंत ही आन्तरिक एकता आपणास लाभत नाही, जोपर्यंत हे जीवन म्हणजे नाना सवयींचे एक गाठोडे एवढाच त्याला अर्थ, तोपर्यंत हे जीवन जड यंत्रवत् वाटेल. जेथे उपभोग घेता येईल, उपयोग असेल तेथे जगाचा कब्जा घ्यावा, जेथे धोका वाटेल तेथे रक्षणार्थ उभे राहावे, असे हे जग तुम्हाला वाटेल. परंतु हे जग आपलेच आहे, आपण त्याच्याशी एकरूप आहोत, हा अनुभव येणार नाही; आणि हा अनुभव नाही तोवर जीवन शुष्क व नीरसच वाटेल.