Get it on Google Play
Download on the App Store

साधना 8

भारतातील निरभ्र आणि विशाल गगनमंडपाखाली बसून प्राचीन ऋषी विश्वैक्याचा संदेश देत आहेत, असे ते दृश्य मनासमोर येऊन मानवजातीच्या उज्ज्वल भवितव्याविषयी माझे मन आशेने नि आनंदाने फुलते. ‘विश्वैक्य अनुभवा’ असे सांगणारे ऋषी व्यर्थ बडबड नव्हते करत. आपण माकडाचे वंशज, पशूतूनच उत्क्रान्त होत आलो, अशी ती बहिर्दृष्टी. बडबड नव्हती. कल्पनेने आपले प्रतिबिंब सर्वत्र पाहण्याची ती अतिशयोक्ती नव्हती. सृष्टीच्या रंगभूमीवरील छाया-प्रकाशांत क्षणभर बघायचे ते नाटक नव्हते; तर क्षुद्र बंधने तोडून ते विश्वात्म्याशी प्रत्यक्षतः एकरूप होणे होते. तो कल्पनेचा विलास नव्हता, बुध्दीची कसरत नव्हती. स्वतःच्या स्वार्थापासून विचाराची ती स्वतंत्रता होती. जी शक्ती बाहेर निसर्गात हजारो रुपांनी कर्म करत आहे, तीच जाणीवरूपाने आपणामध्येही आहे, याचा तो गंभीर अनुभव होता. सृष्टीत सर्वत्र भरून राहिलेल्या ऐक्याची ती प्रचीती होती. त्यांना खंड कोठे दिसत ना. अखंड आत्मतत्त्व सर्वत्र भरलेले. सत्याच्या प्रान्तात मृत्यूमुळे खंड पडत नव्हते. कारण ते मृत्यूसही मानीत नव्हते. मृत्यू म्हणजे तरी काय?

जीवन म्हणजे मृत्यू, आणि मृत्यू म्हणजे जीवन. जीवन व मरण जणू समानार्थक शब्द. दृश्य जीवन व अदृश्य जीवन; दोहोचा सारख्याच आनंदाने ऋषींनी स्वीकार केला. “नमोऽस्तु आयते, नमोऽस्तु परायते”- जवळ असल्यास नमस्कार, दूर गेलेल्यास नमस्कार. जन्ममरणाच्या वर लाटा उसळतात. खाली अथांग जीवन आहे. अतूट जीवन. “यदिदं किं च प्राण एजति निःसृतम्”- सारे काही जे आहे ते त्या अमर जीवनातूनच उसळत बाहेर आले आहे. जीवन विशाल आहे-  “प्राणो विराट् ।”

असा हा आपला थोर वारसा आहे. ही संपत्ती, हा वारसा आपली वाट पाहात आहे. चला, ही ठेव आपण आपलीशी करू. आपला विचार विश्वव्यापी करणे हे ध्येय ऋषींनी दिले आहे; ते आपलेसे करा. हे ध्येय म्हणजे बुध्दिवाद नव्हे. कल्पनेचे केवळ हे तारे नव्हते. याला नैतिक पाया आहे. हे ध्येय कृतीत आणायचे आहे. उपनिषद् म्हणते : ‘सर्वव्यापी स भगवान् तस्मात् सर्वगतशिवः ।’-तो परमात्मा सर्वव्यापी आहे. सर्व वस्तूंतील चांगुलपणा म्हणजे तो. सर्व प्राणिमात्रांशी मनाने, बुध्दीने, प्रत्यक्ष सेवाकर्माने एकरूप होणे, सर्वांवर प्रेम करणे, परमात्म्यात स्वतःला मिसळणे, त्याच्यामध्ये आपण आहोत याचा अनुभव घेणे म्हणजे खरे मंगल, म्हणजे परम कल्याण, हे उपनिषदाचे सार. “प्राणी विराट्”- जीवन विशाल आहे, अनंत आहे, याचा अनुभव घ्या.