Get it on Google Play
Download on the App Store

साधना 1

व्यक्ती आणि विश्व

ग्रीक संस्कृती नागरिक जीवनातून विकास पावती झाली. आजकालच्या बहुतेक सर्व संस्कृती नागरिक जीवनातूनच फुलल्या. नागरिक जीवनाच्या मुळाशी स्पर्धेने मिळवणे व मिळवलेले टिकवणे ही वृत्ती असते. या वृत्तीमुळे भेदभाव उत्पन्न होतो. दुसर्‍याच्या मालमत्तेपासून आपली मालमत्ता अलग करून तिचे रक्षण करणे ही वृत्ती येथे असते. शहराभोवती असणार्‍या भिंती हेच दर्शवतात. या भिंती जगापासून पृथक् राहण्याची भावना निर्माण करतात. आपल्या मनाभोवती आपण तटबंदी करतो मनात संशय वागू लागतो. नवीन विचाराला आपल्या मनात येण्यासाठी झगडावे लागते.

परंतु प्राचीन आर्य भारतात आले त्या वेळची परिस्थिती याहून वेगळी होती. ही भरतभूमी म्हणजे वनाकाननांनी आच्छादित असा देश. सूर्याचा प्रखर ताप आणि उन्हाळी वारे नि वादळे यापासून रक्षण व्हावे म्हणून आपल्या पूर्वजांनी या वनांचा आश्रय केला. गायी चरायला भरपूर गायराने होती. झोपडया बांधायला साधनांची वाण नव्हती. जेथे नैसर्गिक रक्षण मिळे, पाणी भरपूर असे, खाण्यापिण्याची वाण नसे, तेथे ते बहुधा वस्ती करत. भारतातील संस्कृती तपोवनात जन्मली. सभोवतालच्या विशाल निसर्गाने भारतीय संस्कृतीस रंगरूप दिले. जीवनाच्या आवश्यक वस्तू मिळाल्यामुळे एक प्रकारची निश्चिंतता असे. कोणी म्हणतात की, जीवनाच्या निश्चिंतीमुळे बुध्दीचा विकास नीट होणे, प्रगतीला पोषक वृत्ती निर्माण होणे तितके सुलभ नसते. परंतु आर्यावर्तातील आर्यांची बुध्दी क्षीण झाली नाही; त्यांच्या उत्साहशक्तीचा झरा कधी सुकला नाही. एवढेच नव्हे तर त्यांच्या बुध्दीशक्तीची विशिष्ट रीतीने वाढ होण्यास मदतच झाली. सभोवती सदैव वर्धमान असे सृष्टीचे जीवन असल्यामुळे आपल्या मालमत्तेचे किल्लेकोट बांधून संरक्षण करण्याची वृत्तीच त्यांच्यात झाली नाही. अधिकाधिक मिळवावे, असे त्यांच्या मनात येत नसे. आसपासच्या विशाल सृष्टीच्या सान्निध्यात राहून तिच्याशी स्वतःचे अद्वैत अनुभवावे, स्वतःच्या इच्छाशक्तीचा विकास करून घ्यावा, असे त्यांना वाटे. सर्वसंग्राहक सत्याप्रमाणे आपण व्यापक व्हावे, अशी त्यांची असोशी असे. विशाल जीवनात संकुचित वृत्ती करून राहणे शक्य नाही, ही गोष्ट त्यांनी ओळखली; आणि वस्तुमात्राशी अनुभवूनच आपण ज्ञान मिळवू शकू, असे त्यांना वाटे. विश्वजीवन आणि जीवन यांच्यातील ऐक्यसंगीताचा साक्षात्कार करून घ्यावा, हे भारतीय जीवनाचे ध्येय असे.

हळूहळू ऋषींच्या तपोवनाशेजारी शेतेभाते झाली. समृध्द नगरे उभी राहिली. पृथ्वीवरील इतर सत्तांशी संबंध ठेवणारी साम्राज्ये जन्मली. परंतु ऐहिक वैभवाच्या शिखरावर चढूनही येथील जनतेचे हृदय आत्मसाक्षात्कारासाठी अखंड धडधडणार्‍या तपोवनातील जीवनालाच प्रणाम करी. वैभवशाली भारताचे हृदय वनातील आश्रमाचे ते सरलसुंदर, मधुरगंभीर जीवन बघून रोमांचित होई. जीवनाला या आश्रमीय ज्ञानभांडारातून उत्सव नि प्रेरणा मिळे.

आम्ही निसर्गाला जिंकणारे अशी युरोपियन लोक शेखी मिरवतात. जणू कधी हातातूनच सारे हिसकावूनच घ्यावयाचे आहे असे त्यांना वाटे. नागर ___ तो परिणाम आहे. भिंती बांधून शहरे करणार्‍या संस्कृतीचा तो ____. तेथे मनुष्य निसर्गात व स्वतःमध्ये भेद मानायला शिकतो. परंतु विराट पृथ्वीच्या पोटातच निसर्ग व मानव राहात असल्यामुळे असा भेद करणे कृत्रिम एव असत्य आहे. दोहोमिळून एक महान् सत्य होते, असे येथील ऋषी म्हणतात. मी आणि मदितर यांच्यात द्वैत नसून अद्वैत आहे, यावर येथे भर दिला जाई. सृष्टी व आपण अजीबात विसदृश आणि निराळे  असू तर सृष्टीशी कोणत्याही प्रकारचा संबंध जडणेच अशक्य होईल, असे ऋषी म्हणत. स्वतःच्या साठी राबावे लागते ही गोष्ट खरी. शेतीसाठी नांगरावे लागते. परंतु याचा अर्थ सृष्टी विरोधी आहे असा नव्हे. तुम्ही नांगरता तर दाण्याचे शंभर ___ भूमाता तुम्हाला भेटायला येते. मानव आणि निसर्ग यांच्यात जिव्हाळयाचा संबंध हवा.