Get it on Google Play
Download on the App Store

स्वदेशी समाज 26

हे असे सारे का ? कारण मुळालाच कीड लागली. वृक्षाच्या मुळांना पोसणारा सारा ओलावा सुकून गेला. राष्ट्राची खरी जननी म्हणजे खेड्यांतील सुव्यवस्था. ही जननी, ही आई आज मेली आहे. खेड्यांतील सुंदर संस्था छिन्नभिन्न होऊन पडल्या आहेत. जीवनरस देणा-या या संस्था उखडल्या गेल्या. काळाच्या ओघांत वाळलेल्या ओंडक्याप्रमाणे त्या वाहून जात आहेत. खेडी उध्वस्त झाली तर राष्ट्र कसे टिकणार ? ही ७ लाख खेडी राष्ट्रपुरुषांच्या शरीरांतील ह्या रक्तवाहिन्य आहेत. ह्या आज रक्तहीन आहेत. महान् आपत्ति आली आहे. तर मग आपण काय करणार ? नवीन काही निर्मिणार नाही का ? ओलावा देण्यासाठी, खेड्यांना पोसण्यासाठी काही हालचाल करणार नाही का ? राष्ट्रवृक्षाची जी ही ७ लाख मुळे, त्यांना जाऊन पाणी घालणार नाही का ? मिसर, बाबिलोन वगैरे राष्ट्रे मेली, त्यांच्या प्रमाणे आपण मरणाची वाट पहात बसलो आहोत का ? नाही. ह्या गोष्टी म्हणजे नशिबाचा खेळ नाही. ग्रहदशेवर दुर्दशा अवलंबून नसते. आपल्या अवनतीला कार्यकारणभाव आहे. ती कारणे आपण दूर केली पाहिजेत. म्हणजे परिस्थिति बदलेल. त्या कारणांचा नाश करू तर भाग्य परत येईल. परन्तु हातपाय जोडून स्वस्थ बसू तर उद्याचे मरण आज येईल.

ज्याच्या नाकाशी सूत धरून बसले आहेत, असा आसन्नमरण रोगीहि बरा होतो. त्याची काळरात्र निभावते. तो मरणाचा क्षण जाऊन गुण पडू लागतो. खिडकीतून नवजीनवाचे किरण येतात. रोग्याच्या डोळ्यांत पुन्हा तेज चमकू लागते. पूर्वी वरचे वर्ग, पांढरपेशे प्रतिष्ठित समजले जाणारे वर्ग आपल्या बंधूचे संरक्षक असत. परन्तु आजचे प्रतिष्ठित व सुशिक्षित लोक आपल्या भावाबहिणींपासून दूर जाऊ लागले. ते स्वतःचे कर्तव्य विसरले, स्वतःची जबाबदारी विसरले. इंग्रजी अमदानीत भाऊ भावापासून दूरदूर चालला.

परन्तु आता चूक कळू लागली आहे. जी कर्तव्ये चुकवली ती करण्यास पुन्हा आपण उत्सुक होत आहोत. कृत्रिम भेद दूर करून सामान्य जनतेशी एकरूप होऊ पहात आहोत. रामराज्याचा आरंभ करित आहोत. होय, चला या सारे व झटून कामाला लागा. वेळ आली आहे. ती आपल्या कामाची वाट पहात आहे. काळ कोणाची वाट बघत नाही. तुम्ही काम केले नाही तर काळ झरकन निघून जाईल. मग आणखी रडत बसावे लागेल. आपल्या दुबळेपणाचे मुख्य कारण म्हणजे आपण भाऊभाऊच परस्परांस पारखे झालो आहोत. या प्रेमशून्यतेमुळे जीवनसर कमी होत चालला होता. जर भाऊभाऊ सारे एकत्र याल, प्रेमाने नांदाल, तर एका क्षणांत उत्साह वाढेल, बळ चढेल. आपण दीनदुबळे आहोत असे मग कधीही वाटणार नाही. सारे जवळ आलो म्हणजे सर्वांच्या दुःखदैन्याची जाणीव होईल. आणि सर्वांचे दुःख एक होऊ दे की ते दूर झालेच समजा.

जमीनदार व सावकार यांना माझी प्रार्थना आहे. खेड्यांतील लोकांना जीवन देण्याच्या कामांत तुम्ही जोपर्यंत उदारपणे लक्ष घालणार नाही, तोपर्यंत खरे काम होणार नाही. शेतकरी सुखी झाला, जर श्रमणारा बहुजनसमाज सुखी झाला, तर त्यामुळे आपल्या हितसंबंधांस बाधा येईल असे वाटावयास नको. प्रजा जर सामर्थसंपन्न झाली तर त्यांत तुमचे नुकसान नाही. पाया मजबूत केला तर वरील कळसाला वाईट वाटण्याचे काय कारण? किसानकामगारांवर आपली अनियत्रित सत्ता राखू पाहणे व त्यासाठी उपाययोजना करू पाहणे म्हणजे स्वतःचे मरण स्वतःच्या खिशांत घेऊन राहणे होय. गोरगरीब जनता जर बलशाली झाली तर त्यांच्यावर जुलूम करण्याचा मोह होणार नाही. ते काम मग करावेसे वाटणार नाही. जमीनदार सावकार म्हणजे काही दुकानदार नव्हते. पैनपैचा हिशेब पहाण्याची त्यांची दृष्टी नसावी. देत रहाण्याची, हृदये जोडण्याची आपली पूर्वापार परंपरा आहे. ही परंपरा जमीनदार जर पुन्हा चालणार नाहीत तर उरलीलसुरली त्यांची सत्ताहि अस्तास जाईल. जे थोडे फार वैभव अद्याप आहे, तेहि जाऊन त्यांना दीनांहून दीन व्हावे लागेल.

स्वदेशी समाज

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
स्वदेशी समाज 1 स्वदेशी समाज 2 स्वदेशी समाज 3 स्वदेशी समाज 4 स्वदेशी समाज 5 स्वदेशी समाज 6 स्वदेशी समाज 7 स्वदेशी समाज 8 स्वदेशी समाज 9 स्वदेशी समाज 10 स्वदेशी समाज 11 स्वदेशी समाज 12 स्वदेशी समाज 13 स्वदेशी समाज 14 स्वदेशी समाज 15 स्वदेशी समाज 16 स्वदेशी समाज 17 स्वदेशी समाज 18 स्वदेशी समाज 19 स्वदेशी समाज 20 स्वदेशी समाज 21 स्वदेशी समाज 22 स्वदेशी समाज 23 स्वदेशी समाज 24 स्वदेशी समाज 25 स्वदेशी समाज 26 स्वदेशी समाज 27 स्वदेशी समाज 28 स्वदेशी समाज 29 स्वदेशी समाज 30 स्वदेशी समाज 31 स्वदेशी समाज 32 स्वदेशी समाज 33 स्वदेशी समाज 34 स्वदेशी समाज 35 स्वदेशी समाज 36 स्वदेशी समाज 37 स्वदेशी समाज 38 स्वदेशी समाज 39