Get it on Google Play
Download on the App Store

*परिशिष्ट 1

परिशिष्ट पाहिलें
गोतम बुध्दाच्या चरित्रांत शिरलेले महापदानसुत्ताचे खंड


अपदान (सं. अवदान) म्हणजे सच्चरित्र. अर्थात् महापदान म्हणजे थोरांचीं सच्चरित्रें. महापदान सुत्तांत गोतम बुध्दांपूर्वी झालेल्या सहा व गोतमबुध्द यांचीं चरित्रें आरंभीं संक्षेपाने दिलीं आहेत. गोतम बुध्दापूर्वी विपस्सी, सिखी, वेस्सभू, कूकसंघ, कोणागमन आणि कस्सप असे सहा बुध्द झाले. पैकी पहिले तीन क्षत्रिय व बाकीचे ब्राह्मण होते त्यांचीं गोत्रें, आयुमर्यादा, ते ज्या वृक्षांखाली बुध्द झाले त्या वृक्षांचीं नांवें, त्यांचे दोन मुख्य शिष्य, त्यांच्या संघात भिक्षुसंख्या किती होती, त्यांचे उपस्थायक (सेवकभिक्षु), मातापिता, त्या काळचा राजा व राजधानी, यांचीं नावें या सुत्तांच्या आरंभी दिलीं आहेत; आणि नंतर विपस्सी बुध्दाचें चरित्र विस्तारपूर्वक वर्णिलें आहे. त्या पौराणिक चरित्राचे जे खण्ड गोतम बुध्दाच्या चरित्राला जोडण्यांत आले, त्यांचा गोषवारा येथे देतो.*

भगवान म्हणाला,'' भिक्षुहो, यापूर्वीच्या एक्याण्णवाव्या कल्पांत अर्हत् सम्यक् संबुध्द विपस्सी भगवान या लोकीं जन्मला. तो जातीने क्षत्रिय व गोत्राने कौण्डिन्य होता. त्याची आयुमर्यादा ऐंशी हजार वर्षें होती. तो पाटली वृक्षाखाली अभिसंबुध्द झाला. त्याचे खंड व तिस्स असे दोन अग्रश्रावक होते. त्याच्या शिष्यांचे तीन समुदाय, पहिल्यांत अडुसष्ट लक्ष, दुसर्‍यांत एक लक्ष व तिसर्‍यात ऐंशी लक्ष भिक्षु असुन ते सर्व क्षीणाश्रव होते. अशोक नावाचा भिक्षु त्याचा अग्रउपस्थायक, बंधुमा नांवाचा राजा पिता, बंधुमती नांवाची राणी माता आणि बंधुमा राजाची बंधुमती नांवाची राजधानी होती.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* ह्या सर्व सुत्तांचें भाषांतर चिं.वै.राजवाडेकृत दीघनिकाय, भाग २ (ग्रंथसंपादक व ग्रंथप्रकाशक मंडळी नं. ३८०, ठाकुरद्वार रोड, मुंबई २) यांत दिलें आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

(१) आणि भिक्षुहो, विपस्सी बोधिसत्व तुषित देवलोकांतून च्युत होऊन स्मृतिमान् जागृत होत्साता मातेच्या उदरांत प्रवेश करता झाला. हा येथे स्वभावनियम आहे.
(२) भिक्षुहो, जेव्हा बोधिसत्व तुषित देवलोकांतून च्युत होऊन मातेच्या उदरांत प्रवेश करतो, तेव्हा देव, मार, ब्रह्मा, श्रमण, ब्राह्मण आणि मनुष्य यांनी भरलेल्या या जगांत देवांच्या प्रभावास मागे टाकणारा असा अप्रमाण आणि विपुल आलोक प्रादुर्भूत होतो. निरनिराळया जगतांच्या मधले प्रदेश जे सदोदित अंधकारमय व काळेकुट्ट असतात. जेथे एवढया प्रतापी आणि महानुभाव चंद्रसूर्याचा प्रभाव पडत नाही, तेथे देखील देवांच्या प्रभावास मागे टाकणारा अप्रमाण व विपुल प्रकाश प्रार्दूभूत होतो. त्या प्रदेशांत उत्पन्न झालेले प्राणी त्या प्रकाशाने परस्परांस पाहून आपणाशिवाय दुसरेही प्राणी तेथे आहेत असें जाणतात. हा दशसहस्र जगतींचा समुदाय हलूं लागतो व त्या सर्व जगतींत देवांच्या प्रभावास मागे टाकणारा अप्रमाण आणि विपुल प्रकाश प्रादुर्भूत होतो. असा हा स्वभावनियम आहे.

भगवान बुद्ध (उत्तरार्ध)

धर्मानंद कोसंबी
Chapters
आत्मवाद 1 आत्मवाद 2 आत्मवाद 3 आत्मवाद 4 आत्मवाद 5 आत्मवाद 6 आत्मवाद 7 आत्मवाद 8 आत्मवाद 9 आत्मवाद 10 आत्मवाद 11 आत्मवाद 12 कर्मयोग 1 कर्मयोग 2 कर्मयोग 3 कर्मयोग 4 कर्मयोग 5 कर्मयोग 6 कर्मयोग 7 कर्मयोग 8 कर्मयोग 9 कर्मयोग 10 कर्मयोग 11 यज्ञयाग 1 यज्ञयाग 2 यज्ञयाग 3 यज्ञयाग 4 यज्ञयाग 5 यज्ञयाग 6 यज्ञयाग 7 यज्ञयाग 8 यज्ञयाग 9 यज्ञयाग 10 यज्ञयाग 11 यज्ञयाग 12 यज्ञयाग 13 जातिभेद 1 जातिभेद 2 जातिभेद 3 जातिभेद 4 जातिभेद 5 जातिभेद 6 जातिभेद 7 जातिभेद 8 जातिभेद 9 जातिभेद 10 जातिभेद 11 जातिभेद 12 जातिभेद 13 जातिभेद 14 जातिभेद 15 मांसाहार 1 मांसाहार 2 मांसाहार 3 मांसाहार 4 मांसाहार 5 मांसाहार 6 मांसाहार 7 मांसाहार 8 मांसाहार 9 मांसाहार 10 दिनचर्या 1 दिनचर्या 2 दिनचर्या 3 दिनचर्या 4 दिनचर्या 5 दिनचर्या 6 दिनचर्या 7 दिनचर्या 8 दिनचर्या 9 दिनचर्या 10 दिनचर्या 11 दिनचर्या 12 *परिशिष्ट 1 *परिशिष्ट 2 *परिशिष्ट 3 *परिशिष्ट 4 *परिशिष्ट 5 *परिशिष्ट 6 *परिशिष्ट 7 *परिशिष्ट 8 *परिशिष्ट 9 *परिशिष्ट 10 *परिशिष्ट 11 *परिशिष्ट 12 *परिशिष्ट 13 *परिशिष्ट 14 *परिशिष्ट 15 *परिशिष्ट 16 *परिशिष्ट 17 *परिशिष्ट 18 *परिशिष्ट 19 *परिशिष्ट 20 *परिशिष्ट 21 *परिशिष्ट 22 *परिशिष्ट 23