Get it on Google Play
Download on the App Store

आत्मवाद 1

प्रकरण सातवें
आत्मवाद
आत्मवादी श्रमण

निवापसुत्तांत बुध्दसमकालीन श्रमणब्राह्मणांचे स्थूल मानाने चार वर्ग करण्यांत आले आहेत. त्यांत पहिला वर्ग यज्ञयाग करुन सोम पिणार्‍या ब्राह्मणांचा. अशा चैनीनेंच मोक्ष मिळतो, ही त्यांची मति. यज्ञयागाला आणि सोमपानाला कंटाळून जे अरण्यांत शिरले, आणि खडतर तपश्चर्या करूं लागले, ते ऋषिमुनि दुसर्‍या वर्गांत येतात. ते चिरकाल अरण्यांत टिकूं शकले नाहीत. पुन्हा प्रपञ्चांत आले, आणि चैनींत सुख मानूं लागले. पराशर, ऋष्यशृड्ग वगैरे ऋषीचीं उदाहरणें आहेतच. तिसरे श्रमणब्राह्मण म्हटले म्हणजे गावाच्या आसपास राहून मित भोजन करणारे श्रमण. पण ते आत्मवादांत शिरले. कोणी आत्मा शाश्वत, तर कोणी आत्मा अशाश्वत, अशा वादांत पडल्यामुळे ते देखील माराच्या जाळयांत सापडले. बुध्द भगवन्ताने हा आत्मवाद सोडून दिला आणि आपलें तत्तवज्ञान सत्याच्या पायावर उभारलें. त्यामुळे त्याचे श्रावक माराच्या जाळयांत सापडले नाहीत. म्हणून त्यांचा समावेश चौथ्या श्रमणब्राह्मणांत केला आहे.

बुध्द भगवंताने हा आत्मवाद का सोडून दिला याचा विचार करण्यापूर्वी तत्समकालीन श्रमणब्राह्मणांचे आत्मवाद कशा प्रकारचे होते हें पाहिलें पाहिजे. त्या काळीं एकंदरींत ६२ श्रमणपंथ होते, हे तिसर्‍या प्रकरणांत सांगितलेंच आहे. त्यांतला कोणताही पंथ आत्मवादापासून मुक्त नव्हता. पण त्या सर्वांचें तत्त्वज्ञान आज उपलब्ध नाही. त्यांपैकी जे सहा मोठे संघ होते त्यांच्या तत्त्वज्ञानाचा बराच अंश पालि वाङमयांत शिल्लक राहिला आहे; आणि त्यावरून इतर श्रमणब्राह्मणांच्या आत्मवादाचें अनुमान करतां येणें शक्य आहे. यास्तव प्रथमत: त्यांच्या तत्तवज्ञानाचा विचार करणें योग्य वाटतें.

अक्रियवाद

या सहांपैकी पहिला पूरण कस्सप अक्रियवादाचा पुरस्कर्ता होता. तो म्हणे '' एखाद्यानेs कांही केलें किंवा करविलें, कापलें किंवा कापविलें, कष्ट दिले किंवा देवविले, शोक केला किंवा करविला, एखाद्यास त्रास झाला अथवा दिला, भय वाटलें किंवा त्याने दुसर्‍यास भय दाखविलें, प्राण्यांस ठार मारलें, चोरी केली, घरफोडी केली, दरवडा घातला, एकाच घरावर घाला घातला, वाटमारी केली, परदारागमन केलें, किंवा असत्य भाषण केलें, तरी त्यास पाप लागत नाही. तीक्ष्ण धारेच्या चक्राने एखाद्याने जरी या पृथ्वीवरील प्राण्यांच्या मांसाची एक रास केली, एक ढीग केला, तरी त्यांत मुळीच पाप नाही. त्यापासून कांहीही दोष नाही. गंगा नदीच्या दक्षिण तीरावर जाऊन जरी एखाद्याने हाणमार केली, कापलें, कापविलें, त्रास दिला अथवा देवविला, तरी त्यांत मुळीच पाप नाही. गंगा नदीच्या उत्तर तीरावर जाऊन जरी एखाद्याने दानें दिली व देवविली, यज्ञ केले अथवा करविले, तरी त्यापासून मुळीच पुण्य लागत नाही. दान, धर्म, संयम, सत्यभाषण यांच्यामुळे पुण्य प्राप्त होत नाही.''

नियतिवाद

मक्खलि गोसाल संसारशुध्दिवादी किंवा नियतिवादी होता. तो म्हणे,'' प्राण्याच्या अपवित्रतेस कांही हेतु नाही, कांही कारण नाही. हेतूशिवाय, कारणाशिवाय प्राणी अपवित्र होतात. प्राण्याच्या शुध्दीला कांही हेतु नाही, कांही कारण नाही. हेतूवाचून, कारणावाचून प्राणी शुध्द होतात. स्वत:च्या सामर्थ्याने कांही होत नाही. दुसर्‍याच्या सामर्थ्याने कांही होत नाही. पुरूषाच्या सामर्थ्याने काही होत नाही. बल नाही, वीर्य नाही, पुरूषशक्ति नाही, पुरूषपराक्रम नाही. सर्व सत्त्व, सर्व प्राणी, सर्व भूतें, सर्व जीव अवश, दुर्बल व निर्वीर्य आहेत. ते नियति ( नशीब), संगति व स्वभाव यांच्या योगाने परिणत होतात, आणि सहांपैकी कोणत्या तरी एका जातींत (वर्गात) राहून सुखदु:खाचा उपभोग घेतात ........ शहाणे व मूर्ख दोघेही चौर्‍यांशी लक्ष महाकल्पांच्या फेर्‍यांतून गेल्यावर त्यांच्या दु:खांचा नाश होतो. या शीलाने, व्रताने, तपाने अथवा ब्रह्मचर्याने मी अपरिपक्व कर्म पक्व करीन, किंवा परिपक्व झालेल्या कर्माचीं फळें भोगून तें नष्ट करून टाकीन, असें जर एखादा म्हणाला, तर तें त्याच्याकडून व्हावयाचें नाही. या संसारांत सुखदु:खें परिमित द्रोणांनी (मापांनी) मोजतां येण्यासारखी ठरावीक आहेत. तीं कमी जास्ती किंवा अधिक उणीं करतां येणार नाहीत. ज्याप्रमाणें सुताची गुंडी फेकली असता ती समग्र उलगडेपर्यंत जाईल, त्याप्रमाणें शहाणे व मूर्ख ( संसाराच्या) समग्र फेर्‍यांतून गेल्यावरच त्यांच्या दु:खांचा नाश होईल.''

उच्छेदवाद

अजित केसकम्बल उच्छेदवादी होता. तो म्हणे,'' दान, यज्ञ, होम यांत कांही नाही; चांगल्या वाईट कर्माचें फळ व परिणाम नाही; इहलोक, परलोक, मातापिता अथवा औपपातिक (देव किंवा नरकवासी) प्राणी नाहीत; इहलोक आणि परलोक जाणून नीट ओळखून दुसर्‍यास शिकवणारे तत्त्वज्ञ व योग्य मार्गाने जाणारे श्रमण- ब्राम्हण या जगांत नाहीत. मनुष्य चार भूतांचा बनलेला आहे. तो मरतो तेव्हा त्यांच्यांतील पृथ्वीधातू पृथ्वीतं, आपोधातु जलांत, तोजोधातु तेजांत व वायुधातु वायुंत जाऊन मिळतो, आणि इंद्रियें आकाशाप्रत जातात. मेलेल्या माणसाला तिरडीवर घालून चार पुरूष स्मशानांत नेतात. त्याच्या गुणावगुणांची चर्चा होते, पण अस्थि पांढर्‍या होऊन आहुति भस्मरूप होतात दानांचें खूळ मूर्ख माणसांनी माजविलें आहे. जे कोणी अस्तिकवाद सांगतात, त्यांचें तें बोलणें निवळ खोटें आणि वृथा बडबड आहे. शरीरभेदानंतर शहाण्यांचा आणि मूर्खांचा उच्छेद होतो; ते विनाश पावतात. मरणानंतर त्यांचे कांहीही उरत नाही.''

अन्योन्यवाद

पकुध कच्चायन अन्योन्यवादी होता. तो म्हणे, '' सात पदार्थ कोणी केलेले, करविलेले, निर्मिलेले किंवा निर्माण करविलेले नसून, वन्ध्य, कूटस्थ व नगरद्वारावरील स्तंभाप्रामाणें* अचल आहेत. ते हालत नाहीत, बदलत नाहीत, परस्परांना बाधत नाहीत, परस्परांचे सुखदु:ख उत्पन्ना करण्यास असमर्थ आहेंत. ते कोणते? तर पृथ्वी, आप, तेज, वायु, सुख, दु:ख व जीव हे होत. यांना मारणारा, मारविणारा, ऐकणारा, सांगणारा, जाणणारा अथवा यांचे वर्णन करणारा कोणीही नाही. जो तीक्ष्ण शस्त्राने एखाद्याचें डोकें कापतो, तो त्याचा जीव घेत नाही. या सात पदार्थांच्या मधल्या अवकाशांत शस्त्र शिरलें, एवढेंच काय तें समजावें.''
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* नगरद्वारावर हत्तीला सरळ हल्ला करतां येऊं नये, म्हणून त्याच्या समोर एक बळकट खांब बांधीत. त्याला पालि भाषेंत एसिका किंवा इन्दखील म्हणतात.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भगवान बुद्ध (उत्तरार्ध)

धर्मानंद कोसंबी
Chapters
आत्मवाद 1 आत्मवाद 2 आत्मवाद 3 आत्मवाद 4 आत्मवाद 5 आत्मवाद 6 आत्मवाद 7 आत्मवाद 8 आत्मवाद 9 आत्मवाद 10 आत्मवाद 11 आत्मवाद 12 कर्मयोग 1 कर्मयोग 2 कर्मयोग 3 कर्मयोग 4 कर्मयोग 5 कर्मयोग 6 कर्मयोग 7 कर्मयोग 8 कर्मयोग 9 कर्मयोग 10 कर्मयोग 11 यज्ञयाग 1 यज्ञयाग 2 यज्ञयाग 3 यज्ञयाग 4 यज्ञयाग 5 यज्ञयाग 6 यज्ञयाग 7 यज्ञयाग 8 यज्ञयाग 9 यज्ञयाग 10 यज्ञयाग 11 यज्ञयाग 12 यज्ञयाग 13 जातिभेद 1 जातिभेद 2 जातिभेद 3 जातिभेद 4 जातिभेद 5 जातिभेद 6 जातिभेद 7 जातिभेद 8 जातिभेद 9 जातिभेद 10 जातिभेद 11 जातिभेद 12 जातिभेद 13 जातिभेद 14 जातिभेद 15 मांसाहार 1 मांसाहार 2 मांसाहार 3 मांसाहार 4 मांसाहार 5 मांसाहार 6 मांसाहार 7 मांसाहार 8 मांसाहार 9 मांसाहार 10 दिनचर्या 1 दिनचर्या 2 दिनचर्या 3 दिनचर्या 4 दिनचर्या 5 दिनचर्या 6 दिनचर्या 7 दिनचर्या 8 दिनचर्या 9 दिनचर्या 10 दिनचर्या 11 दिनचर्या 12 *परिशिष्ट 1 *परिशिष्ट 2 *परिशिष्ट 3 *परिशिष्ट 4 *परिशिष्ट 5 *परिशिष्ट 6 *परिशिष्ट 7 *परिशिष्ट 8 *परिशिष्ट 9 *परिशिष्ट 10 *परिशिष्ट 11 *परिशिष्ट 12 *परिशिष्ट 13 *परिशिष्ट 14 *परिशिष्ट 15 *परिशिष्ट 16 *परिशिष्ट 17 *परिशिष्ट 18 *परिशिष्ट 19 *परिशिष्ट 20 *परिशिष्ट 21 *परिशिष्ट 22 *परिशिष्ट 23