Get it on Google Play
Download on the App Store

संघ भाग २ रा 2

बुद्ध भगवंतांच्या परिनिर्वाणसमयीं त्यांचे सारिपुत्त मोग्गल्लानादि प्रमुख शिष्यांपैकीं महाकाश्यप हेच कायते हयात राहिले होते. यांच्या पूर्वाश्रमांतील चरित्रापासून बराच बोध घेण्यासारखा आहे, ह्मणून त्याचें येथें दिग्दर्शन करणें अप्रशस्त होणार नाहीं. यांचें पूर्वाश्रमांतील नांव पिप्फलि. त्यांना गोत्रावरून काश्यप असें ह्मणत. बुद्धांच्या शिष्यांपैकीं हे एक प्रमुख शिष्य होते, ह्मणून त्यांस महाकाश्यप असें ह्मणत. मगध देशांतील महातीर्थ नांवाच्या ब्राह्मणग्रामंत एका श्रीमंत ब्राह्मण कुलांत त्यंचा जन्म झाला. ते वीस वर्षांचे झाल्यावर त्यांच्या आईबापांनीं त्यांचें लग्न करण्याचा बेत केला. परंतु पिप्फलीच्या मनांतून विवाहपाशांत बद्ध व्हावयाचें नव्हतें. आपल्या आईला त्यांनीं जेव्हां हा आपला विचार कळविला, तेव्हां तिला अत्यंत खेद झाला. शेवटीं आईच्या आग्रहास्तव ते लग्नाला कबूल झाले.

त्या वेळी मद्रदेशांत शागल नगरींत एका कौशिक गोत्री श्रीमंत ब्राह्मणाला भद्रा कपिलानी नांवाची सोळा वर्षांची सुंदर कन्या होती. पिप्फलीच्या आईबापांनी तिच्याशीं पिप्फलीचा विवाह करावा, असें ठरविलें. हें वर्तमान पिप्फलीला समजल्या बरोबर त्यानें तिला लिहिलें कीं:-“भद्रे, तूं आपल्या जाति गोत्र संपत्ति यांस अनुरूप असा दुसरा कोणी तरी पति वर. मी कधीं ना कधीं गृहत्याग करून संन्यासी होईन. मागाहून तुझ्यावर पश्चात्ताप करण्याची पाळी येऊं नये, ह्मणून हें लिहिलें आहे.”

भद्रेच्याहि मनांत भिक्षुणी व्हावयाचें होतें ह्मणून तिनें वरील अर्थाचेंच पत्र पिप्फालीला लिहिलें. हीं दोन्ही पत्रें त्यांच्या आप्तांनीं त्यांस मिळूं न देतां फाडून टाकिलीं, व दुसरीं बनावट पत्रें करून त्यांस दिली. अर्थांत लग्नाचा विचार नसतांच त्या दोघांवर लग्र करण्याची पाळी आली. परंतु लग्र झाल्यावरही ह्या दोघांनीं आपलें ब्रह्मचर्यव्रत कायम ठेवलें होतें. पिप्फलीचे आईबाप निवर्तझाल्यावर त्यानें गृहत्याग केला व तो बुद्धाचा शिष्य झाला.
भद्रा कपिलानीनेंहि त्याच्या मागोमाग भिक्षुणीसंघात प्रवेश १केला. (१- ही गोष्ट बुद्धघोषाचार्यकृत मनोरथपूरणी (अंगुत्तरनिकायट्ठकथा) नामक ग्रंथांतून घेतली. त्रिपिटकांत ही सांपडत नाहीं.) पुढें अर्हत्पद प्राप्त झाल्यावर भद्रेनें ह्मटलें आहे:-

दिस्वा आनदीनवं लोके उभो पब्बजिता मयं।
त्यम्हि खीणासवा दन्ता सीतीभूताम्ह निब्बुता।।


ह्या प्रपंचांत दोष दिसून आल्यावरून आह्मी उभयतांनीं प्रव्रज्या घेतली. आता आह्मी दांत झालों आहों, शांत झालों आहों, आमच्या वासनेचा क्षय झाला आहे, आह्मी निर्वाणाप्रत पोंचलो आहों।
(थेरीगाथा चतुक्कनिपात)

बुद्ध भगवंतांच्या परिनिर्वाणाच्या ७ व्या दिवसीं महाकाश्यप पांचशें भिक्षूं सहवर्तमान पावाहून कुसिनाराला जाण्यास निघाले होते. वाटेंत एका आजीवक पंथाच्या परिव्राजकाकडून बुद्धनिधनाची वार्ता त्यांस समजली. हें वर्तामान ऐकून ज्यांना अद्यापि अर्हत्पदाचा लाभ झाला नव्हता, ते भिक्षू अत्यंत शोकाकुल झाले. महाकश्यप त्यांनां ह्मणालेः- “सखे हो, शोक करूं नका. ‘सगळ्या प्रिय वस्तूंपासून आह्मांस कधीं ना कधीं पृथक् व्हावें लागणार’ असें भगवंतांनीं सांगितलें नाहीं काय? जें उत्पन्न झालें, तें नष्ट होणार नाहीं, असें कधींहि घडणार नाहीं.”

बुद्ध व बुद्धधर्म

धर्मानंद कोसंबी
Chapters
बुद्ध व बुद्धधर्म 1 बुद्ध व बुद्धधर्म 2 बुद्ध 1 बुद्ध 2 बुद्ध 3 बुद्ध 4 बुद्ध 5 बुद्ध 6 बुद्ध 7 बुद्ध 8 बुद्ध 9 बुद्ध 10 बुद्ध 11 बुद्ध 12 बुद्ध 13 धर्म 1 धर्म 2 धर्म 3 धर्म 4 धर्म 5 धर्म 6 धर्म 7 धर्म 8 धर्म 9 धर्म 10 धर्म 11 धर्म 12 धर्म 13 धर्म 14 धर्म 15 धर्म 16 संघ भाग १ला 1 संघ भाग १ला 2 संघ भाग १ला 3 संघ भाग १ला 4 संघ भाग १ला 5 संघ भाग १ला 6 संघ भाग १ला 7 संघ भाग १ला 8 संघ भाग १ला 9 संघ भाग १ला 10 संघ भाग १ला 11 संघ भाग १ला 12 संघ भाग १ला 13 संघ भाग २ रा 1 संघ भाग २ रा 2 संघ भाग २ रा 3 संघ भाग २ रा 4 संघ भाग २ रा 5 संघ भाग २ रा 6 परिशिष्ट १ 1 परिशिष्ट १ 2 परिशिष्ट १ 3 परिशिष्ट १ 4 परिशिष्ट २ 1 परिशिष्ट २ 2 परिशिष्ट ३ 1 परिशिष्ट ३ 2 परिशिष्ट ३ 3 परिशिष्ट ४ 1 परिशिष्ट ४ 2