Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

बालाजी माहात्म्य - भाग ८

तोंडमानाचे पूर्वजन्मवृत्त

श्रीनिवासाच्या सांगण्याप्रमाणे भवन निर्मितीचे कामास प्रारंभ झाल्यानंतर एके दिवशी राजा तोंडमानाने त्यांना विनंती केली की मी आपणांसाठी ही तीर्थे कोणत्या जन्मी कशी बनविली, पूर्वजन्मी मी कोण होतो, कोणत्या जातीमध्ये माझा जन्म झाला होता, ते सर्व मला कृपा करुन सांगावे तेव्हां श्रीनिवासांनी राजा तोंडमानाला त्याचा पूर्व जन्मवृत्तांत सांगण्यास सुरवात केली. ते म्हणाले “ प्राचीन काळी कृष्णावतारची कथा श्रवण करुन वैखानस नावांच्या एका ऋषीने प्रत्यक्ष श्रीकृष्णाचे दर्शन व्हावे म्हणून कठोर तपश्चर्या केली. भगवान संतुष्ट झाले व त्यानी त्यास गोपालचे स्वरुपात दर्शन दिले. भक्तवत्सल श्रीकृष्णाचे दर्शन झाल्याबरोबर वैखानसाने त्यांची खूप स्तुतिस्त्रोत्रें गायिली व भगवंताना प्रणाम करुन “ आपण कृष्ण रुपी भगवंताचीच आराधना करणार ” असे म्हणू लागला.
तेव्हां भगवंतानी त्यास सांगितले की तू कृष्णरुपी भगवानांची आराधना करु नकोस. तुझी आराधना श्रीनिवास रुपासच योग्य आहे. तेवढ्यासाठी तू शेषाचलावर जा.
तेथे एका वारुळात श्रीनिवास वास्तव्य करतात. त्यांची पूजा अर्चा करा वाटेत रंगदास नावाच्या एका शूद्राची भेट होईल तो तुला सर्व प्रकाराची मदत करील. भगवंताच्या सांगण्याप्रमाणे वैखानस ऋषी वेंकटाचलावर आले. रंगदासाची व त्याची भेट झाली. रंगदासाचे बरोबर जाऊन त्यांनी वारुळाचा शोध घेऊन श्रीनिवासांना हुडकून काढले.
वैखानस ऋषी श्रीनिवासांचीं पूजा-अर्चा करुन आराधना करु लागले. रंगदास त्यांना फुले आणून देई. रंगदासाने फूलबागेचे संवर्धन करण्यासाठी एक विहीर खणली व मग फूलांचा भरपूर पुरवठा होऊ लागला. एके दिवशी कुंडल नावाचा एक गंधर्व आपल्या स्त्रियां सह स्वामी पुष्करणी मध्ये जलक्रीडा करीत असल्याचे दृश्य रंगदासास दिसले. मोहवश होऊन रंगदास त्यांचेकडे पहातच राहिला. सहाजिकच देवाच्या पुजेसाठी फूले नेऊन देण्यास विलंब झाल:  व त्या कारणाने वैखानस ऋषी त्याचेवर रागावले. आपल्या अपराधाबद्दल रंगदासाला खूपच पश्चाताप झाला. व तो स्वस्थ उभा राहिला. पश्चाताप दग्ध रंगदासास शंखचक्रधारी श्रीनिवास म्हणाले, “ हे रंगदासा, माझ्या मायेने तुला गंधर्वाच्या जलक्रीडेचा मोह पडला खरा पण आता तुला खरोखरीच पश्चाताप झालेला दिसतो. तरी आता तू सर्व पापापासून मुक्त करणार्‍या स्वामी पुष्करिणी तीर्थात स्नान करुन तेथेच आपल्या अशुद्ध शरीराचा त्याग कर. पुढच्या जन्मी सुधर्म्याचा पुत्र तोंडमान या नावाने तुला जन्म प्राप्त होईल तू तोंडदेशाचा राजा होशील व माझाही भक्त म्हणून तुझी ख्याती होईल. तेव्हां तू आताच शरीरत्याग कर भगवंताचे हे बोलणे ऐकून रंगदासाने तत्काळ शरीरत्याग केला. तोंच “ रंगदास तू आता आकाशराजाचा धाकटा भाऊ तोंडमान होय, पूर्वजन्मी तू विहीर खणली होतीस. आता या माझ्या निवासासाठी भवन निर्माण कर. ” असा वर मिळाला.
राजा तोडमानला असा वर प्राप्त झाल्यानंतर तो पुन्हां शुकमहर्षीकडे गेला. त्यांची त्याने यथासांग पूजा केली व पद्मसरोवरचे महात्म्य सांगण्याविषयी प्रार्थना केली. तेव्हां शुकमुनी म्हणाले, “ प्राचीनकाळी दुर्वास ऋषीच्यां शापामुळे विष्णु भगवान देवलोकांतून पृथ्वीवर या स्थानी उतरले. तेव्हां कमलाक्षी श्रीरमादेवीनी या सुवर्णकमलपूर्ण सरोवराकाठी अनंत काळ वास्तव्य करुन दीर्घ तपश्चर्या केली. कालांतराने इंद्रादि देवतांना अदृश्य झालेले भगवंत व श्रीलक्ष्मी यांचे दर्शन झाले.
तेव्हां इंद्रादि देवतांनी त्यांना प्रणाम करुन त्यांची स्तूतीस्तोत्रे गायिली. त्यांच्या स्तोत्रांनी प्रसन्न होऊन श्रीरमादेवी तेथे प्रत्यक्ष अवतरली व म्हणाली की आपल्या शत्रूचा निःपात करुन तुम्ही सर्वजण आपपल्या गावी जा, संसारात स्थानभ्रष्ट झालेले जे कोणी असतील त्यांनी ह्या स्तुतीस्तोत्राचा पाठ केला तर ते पुन्हा स्वस्थान प्राप्त करुन घेतील.
हे स्तोत्र म्हणून जे कोणी अखंड बिल्वपत्राने माझी पूजा करतील त्यांना धर्म, अर्ध काम व मोक्ष प्राप्त होतील.
या पद्मसरोवरात जे कोणी माझे स्तोत्र म्हणून स्नान करतील त्यांना दीर्घायुषी विद्यासंपन्न व धनवान असे तेजस्वी पुत्र होऊन ते अनेक सुखोपयोग भोगतील व अंती ते मोक्षप्रत जातील. श्रीविष्णु भगवानांचे सह श्री लक्ष्मीदेवीनी असे वरदान दिल्यानंतर ते उभयता गरुडावर आरुढ होऊन वैकुंठास गेले.
शुकमुनी राजा तोंडमानास म्हणाले. “ हे पद्मसरोवर सर्व पापांचा नाश करणारे असून जीवनात त्याचे स्मरण कीर्तन केल्याने त्यात स्नान केल्यास मनुष्य धनवान होतो. आता तू सुद्धा त्यात स्नान करुन आपल्या पित्याकडे जा. ” शुकमुनीच्या सांगण्याप्रमाणे तोंडमान राजाने पद्म सरोवरात स्नान केले व तो आपल्या राजधानीस परतला.
आपल्या प्रजेचे रक्षण करण्यात समर्थ, पराक्रमी व सुशील अशा राजकुमारास पाहून राजासपण परमसंतोष झाला व मग त्याने आपण स्वतःच त्यास सिंहासनावर बसविले व तपश्चर्येसाठी तो वनात गेला.
राजा तोंडमान राज्य करीत असताना श्रीभगवान वराहरुप धारण करुन दररोज भाताचे पीक खात असत. शेतीची रखवाली करणार्‍या निषादास वराहाची पाऊले शेतात उमटलेली दिसत पण प्रत्यक्ष वराह मात्र दिसत नसे. म्हणून त्याने धनुष्यबाण हाती घेऊन सारी रात्र शेतीची रखवाली करण्यास प्रारंभ केला. एके रात्री अशीच रखवाली करीत असतांना एक अत्यंत तेजस्वी असा श्वेतवर्णी वराह शेतात चरत असल्याचे त्याच्या दृष्टोप्रत्तीस पडले. निषादाने त्यास घाबरण्यासाठी मोठ्याने गर्जना केली तसा तो श्वेतवराह शेताबाहेर पळू लागला.
रात्रभर पाठलाग करता करता एकाएकी तो वराह वारुळात शिरला. क्रुद्ध निषादाने ते वारुळ खाणून काढले. वराह त्या वारुळा बाहेर पडला. पण निषाद मात्र मूर्च्छित होऊन पडला.
आपल्या मूर्च्छित पित्याची ही अवस्था पाहून त्याच्या मुलाने वराहरुपी भगवानाची स्तुती केली. तेव्हां भगवान संतुष्ट झाले. मग म्हणाले “ मी वराह देव असून या वारुळातच वास्तव्य करीन असतो. राजाला सांगून माझी याच स्थानी प्रतिष्ठा कर. कपिला गाईच्या दुधाने हे वारुळ स्वच्छ धुवून काढ. त्याच्या दगडाखाली असलेली भगवान वराहाची मूर्ती वर काढ. तिची विधिवत पूजा करुन अभिषेक कर. ” एवढे बोलून भगवंतानी निषादास शुद्धीवर आणले. व अंतर्धान पावले. निषाद शुद्धीवर आल्या नंतर त्याच्या मुलाने त्यास हे सर्व कथन करुन सांगितले तेव्हां त्यास फार आश्चर्य वाटले व मग ती सारी हकीकत राजा तोंडमानासासांगण्यासाठी तो त्याच्या कडे गेला.
निषादवसूचे राजधानीत आगमन झालेले पाहून राजा तोंडमानास खूप आनंद झाला. व त्यांने त्यास त्याच्या येण्याचे कारण विचारले. तेव्हां निषादवसूने श्वेत वराहाची सारी हकीकत सांगीतली व त्याच्या प्राणप्रतिष्ठेपणे संबंधी भगवंताचा आदेश पण निवेदन केला. ती हकीकत ऐकून तोंडमान राजा आनंदित व प्रसन्न पण झाला त्यांनी ताबडतोब आपल्या मंत्रिगणासमवेत वेंकटाद्रीवर जाण्याचे ठरविले.