Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

बालाजी माहात्म्य - भाग २

ब्रह्माण्ड पुराणातील वर्णन

एकदा नारदमुनी प्रभुच्या दर्शनाकरिता नारायणगिरी पर्वतावर गेले. तेथे नारदानी भक्तिभावनेने विणागान केले. ते पाहून देवाने विचारले “ हे नारदा ! भूलोकांमध्ये मला रहाण्यायोग्य एखादी चांगली जागा असल्यास सांग ” नारदमुनी म्हणाले “ देवा ! तू सर्वव्यापी सर्वज्ञ आहेस. तुला सर्वकाही माहीत आहे तरी सुद्धा तू मला विचारतो आहेस म्हणून मी सांगतो भूलोकात भारतात. दाक्षिणेकडे स्वर्णमुखी नदी आहे तिच्या आसपास सर्व प्रजा सत्यवादी व आत्माभिमानी आहे. तोच प्रदेश तुला निवासास योग्य होईल. ”
श्री विष्णूकडून आज्ञा मिळताच आदिशेष त्या पवित्र स्थळी जाऊन उभा राहिला. आदिशेषाचे डोके म्हणजेच तिरुपति पर्वत बनले व त्याचे शरीर नृसिंहमूर्ती जेथे तो उभा होता तो प्रदेश अहोबिल व शेपटी श्रीशैल झाली.
ह्या पर्वताला चारही युगात वेगवेगळी नांवे मिळाली. प्रत्येक नांवाला स्वतःहाचे असे निराळे वैशिष्ट्य आहे. त्रेतायुगामध्ये गरुडाद्रि किंवा क्रिडादि नावांनी प्रसिद्धि झाला.
गरुडाद्रि अथवा क्रिडाद्रि:- प्राचीनकाळी जेव्हां मोठा प्रळय झाला तेव्हां सारी पृथ्वी समुद्रामध्ये बुडून गेली हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक युगांती जेव्हा जेव्हां प्रळय होतो. तेव्हां तेंव्हां सृष्टीचा नाश होतो. त्यानंतर पुन्हां देव सृष्टीची रचना करतो आणी कृतयुग, त्रेतायुग द्वापरयुग आणी कलीयुगाची पुनरावृत्ती होते. पुन्हां सुख, दुःख, धर्म इत्यादींची व्यवस्था होते अशी ह्या युगांची पुनरावृत्ती अनेक वेळा झाली.
एकदा हिरण्याक्ष नावाच्या राक्षसाने पृथ्वीला पळवून समुद्राच्या तळाला नेले व तेथेच दडवून ठेवले तेव्हां. श्री भगवान विष्णूने श्वेतवराहरुप धारण करुन समुद्रात प्रवेश केला व हिरण्याक्ष बरोबर युद्ध करुन त्याचा संहार केला व पृथ्वीचा उद्धार केला.
ब्रह्मदेवांना पुनरपी चराचर सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा दिली त्यावेळेस सर्व देव देवता व ऋषीगण सर्व आकाशात प्रकट झाले त्यांनी पुष्पवृष्टी केली ऋषींच्या व गणांच्या व देवांच्या सुरम्य स्तोस्त्र पाठाने आसमंत दुमदूमले विष्णूने आपले आपले उग्ररुप सोडून सौम्य रुप धारण केले.
त्यानंतर श्वेतवराहरुपी भगवंतानी दुष्टांच्या निर्दालना साठी व सज्जनांच्या रक्षणासाठी म्हणून व लोक कल्याणार्थ व त्यांची धर्मपत्नी पृथ्वीच्या रक्षणासाठी म्हणून याच पृथ्वीवर काही काळ वास्तव्य करण्याचे ठरविले. काही काळ पृथ्वीवर वास्तव्य करण्याचे योजिल्यानंतर भगवतांनी आपले वाहन जो गरुड त्यास अत्यंत अदभुत असा क्रिडापर्वत आणण्यासाठी वैकुंठास पाठविले. गरुड परमधाम वैकुंठाप्रत पोहोचला व त्यांने नाना गोष्टीनी अत्यंत सुशोभित असलेला अल्हादायक अश्या झप्यांनी युक्त असलेला अनेक मुक्त महात्मे तःपसाधना करीत आहेत असा शेषनागाच्या आकाराचा महापुण्यदायक मोक्षदायक नावांचा क्रिडापर्वत आणला. याच पर्वतावर स्वामी पुष्करणीच्या पश्चिम तिरावर भूदेवी सह वास्तव्य करु लागले म्हणून राक्षस उग्ररुपात भक्तगण सौम्यरुपात व करुणारुपात दिसतात गरुडांनी उचलून आणल्यामूळेच ह्या पर्वताला गरुडाद्रि असे म्हणतात.
वृषभद्रि:- त्रेतायुगात याच पर्वताचे नांव गरुडाद्रि असे होते तेच नाव कृतयुगात वृषभाद्रि म्हणून म्हणु लागले. ह्या पर्वतावर वृषभासुरनावांचा राक्षस नित्य तिन्ही त्रिकाळ देवाची आराधना करीत असे. तिर्थात स्नान करुन शालिग्रामाची पूजा करी पूजेच्या शेवटी देवास पुष्प समर्पण करावयाचे म्हणून आपल्याच हाताने शिरच्छेद करुन घेऊन ते शिरकमळ देवास अर्पण करीत असे अनेक वर्ष चालू होते. राक्षस लोकांची पूजापद्धति अश्या तर्‍हेचीच होती. भगवान पण रोज त्याचे शिरकमळ घेत होते शेवटी एके दिवशी भगवान श्री नारायण ह्यांचे समोर प्रकट झाले व त्यांनी विचारले “ तुला काय पाहिजे? ”
वृषभासुर एक ज्ञानी होता त्यांनी प्रत्यक्ष श्री विष्णुंचे दर्शन घेतले होते. म्हणून त्यांनी सांगीतले स्वामी मला कशाचीही कमतरता नाही. परंतु एकच कारण आहे माझ्या बरोबरीने लढणारा कोणी नाही तरी आपणा बरोबर युद्ध करावे एवढी एकच ( इच्छा ) याचना आपणांकड मी करीत आहे, भगवंतानी तथास्तु म्हणताच वृषभासुर व श्रीनिवास याच्यामध्ये युद्धास प्रारंभ झाला. अखेरीस भगवतांनी आपले धारधार [ तेजस्वी ] सुदर्शनचक्र सोडले तेव्हां वृषभासुरास आपला अन्त जवळ आला आहे कळले व त्यानी भगवंताकडे वर याचना केली की. माझ्या मरणानंतर माझ्याच नावांने हा पर्वत ओळखला जावा भगवतांनी तसे आश्वासन दिल्यावर वृषभासुराचा वध झाला. तो वैकुंठाप्रत गेला तेव्हां पासून या पर्वताला वृषभाद्रि असे नांव पडले
अंजनाद्रि:- द्वापरयुगात ह्याच पर्वताचे नांव अंजनाद्रि झाले. पूर्वीच्या काळी केसरी नावांचा राक्षस होता. त्याने देवाची कठीण अशी तपश्चर्या केली कित्येक वर्षे अशी तपश्चर्या केल्यानंतर प्रत्यक्ष भगवंतानी दर्शन दिले व विचारले तुला काय पाहिजे केसरीने प्रत्यक्षआपल्या समोर प्रकट झालेल्या भगवंताची स्तुती स्तोत्रे गाऊन सांगितले ‘‘ हे देवाधिदेवा ! देवदेवतांच्या मूळे आमचा राक्षसवंश नाश होत आहे. खूपशक्तिशाली राक्षसांचा सुद्धा देवांच्या समोह टिकाव रहात नाही. तरी मला असा मुलगा दे की कोण त्याही कारणांनी कुठल्याही वस्तूनी त्याला मरण येणार नाही मुला असा वर दे? ”
देवानी केसरीला सांगीतले:- हे भक्ता ! तुझं इच्छा आहे तर तसे फळ तुला मिळेल. तुज्या मुसीच्या गर्भात एक मुल जन्म घेईल ते चिरंजीवि राहिल हे सांगून देव अदृश्य झाले.
केसरी अत्यन्त आनंदानी दिवस घालवू लागला. एका शुभ समयी त्याची बायको प्रसूत होऊन त्याला एक मुलगी झाली देवाच्या कृपेनी मुलगी झाली म्हणून तिचे नांव “ अंजना ” ठेवण्यात आले, पुढे ती विद्येत कलेत पारंगत होऊ लागली. यथा समयी अंजनाला एका वानर राजानी पाहिले व तिच्याशी विवाह करण्याचे ठरविले केसरीला हे ऐकून आनंद झाला त्यानी दोघाचा विवाह लावून दिला. व देवानी दिलेल्या वराची आठवण काढून आपल्या नातवाच्या चाहूली कडे लक्ष ठेऊन दिवस घालवू लागला.
अंजनाचे लग्न होऊन बरीच वर्षे उलटून गेली. पण मुलबाळ झाले नाही ती अत्यंत दुःखी काटी झाली
त्याच सुमारास एकदा धर्मदेवता किरण रुपात तिच्या जवळ आली आणी बोलली- ‘ तु तित्त्पति पर्वतावर देवाची आराधना, तपस्या कर तुला मुल होईल ” हे बोलून देवता अंतर्धान पावली.
अशा तर्‍हेने अंजना तिरुपति पर्वतावर आकाशगंगा नावांच्या पुण्यतिर्थावर येऊन राहू लागली. आकाशगंगेत स्नान करुन तेथेच शिवाची तपश्चर्या करु लागली.
बारा वर्षे अन्नपाण्यांवाचून तपस्या करणार्‍या अजनाला पाहून वायुदेवाला तिची दया आली. वायुदेवाने वीर्यानी भरलेले एक फळ अंजनाला खाण्यास दिले. ते फळ खाल्ल्या नंतर अंजनादेवी गर्भवती झाली. व तिने हनुमंतास जन्म दिला.
ती आपल्या तपश्चर्येचे फळ वान रुपी मुलगा पाहून आश्चर्यचकीत झाली. त्या आश्चर्यात मग्न असता आपल्या भूकेल्या मुलाकडे तिचे लक्ष नव्हते तेव्हांच सूर्योदय होत होता. व सूर्य हेच फळ समजून हनुमंताने उडी मारली व तेथे पोहोचला. ते पाहून सर्व देव देवता इंद्राच्याकडे रक्षणासाठी धावले ते पाहून ब्रह्मदेवांनी त्याला शिक्षा केली व त्या बेशुद्धावस्थेत असलेल्या हनुमंताला त्याने अजनाच्या जवळ आणून ठेवले.
ते पाहून अंजनाला खूप दुःख झाले. तिने रडत विचारले ज्याला जन्मा अगोदरच अमर असा वर मिळाला त्याला जन्मतःहाच तुम्ही मारुन टाकलेत नां? त्यांनी तुमच्यांशी काय वैर केले तुम्ही अत्यंत निर्दय आहात.
ब्रह्म, ईश्वर व इतर सर्व देवलोक अंजनाच्या जवळ आले. ब्रह्मदेवांनी आपल्या हातांनी मुलाला उचलून घेतले. व महान वीर व सर्यगुण संपन्न असा वर देऊन त्याला शिवाच्या अंशानी वायुदेवाच्या द्वारे झालेला या मुलाचे आंजनेय असे नामकरण करुन सर्व देवदेवता अंतर्धान पावले.
अंजनाच्या तपश्चर्याच्या कारणमुळे ह्या स्थानाला अंजनाद्रि असे नांव पडले.
वेंकटाद्रि:- कलियुगात तिरुपति पर्वताची दोन नांवे पडली. एक वेंकटाद्रि व वेंकटाचल. वेंकट ह्या शब्दाचा अर्थ आहे. पापनाश ह्याचा विस्तृत सारांश ब्रह्मांडपुराणात आहे.
श्रीशैल ह्या ठिकाणी पश्चिमेकडे चंदनपुर नावाचा गांवी पुरंधर नावाचा एक ब्राह्मण रहात होता. त्याला त्याच्या पूर्व पुण्याईने माधव नावांचा मुलगा झाला. त्याला वेद, वेदांग सकल विद्या विभूषित बनवून त्याने पांड्य देशाचा कन्या चंद्रलेखा हिच्याशी त्याच्या विवाह करुन दिला.
चंद्रलेखा पतीची हरसेवा करुन त्याला संतुष्ट ठेवणारी होती. एके दिवशी भर दिवसाच चंद्रलेखेकडे संभोगाची इच्छा व्यक्त करुन एवढे आचार विचार सोडून तो कामातूर झाला. परंतु चंद्रलेखेने त्यास उत्तेजन दिले नाही.
एक दिवस माधव नंदनवनाच्या आसपास हिंडत असता. त्याला एक स्त्री तलावात नहात असताना दिसली त्यांनी तिच्याशी प्रणयरत होण्याचे ठरविले.
माधव तिच्या जवळ जाऊ लागला तेव्हां त्या स्त्रीने घाबरुन जाऊन सांगितले ‘ हे मुनिश्रेष्ठा, ब्राह्मणा, मी चंडाल अत्यंज स्त्री आहे. आपण मजजवळ येऊ नका व्यभीचार करणे व मद्य मांस खाणे हे आमचे कार्य आहे. आपण वेदवेदांगी पुरुष आपली दृष्टीस सूद्धा पडू नये इतकी मी पापीष्ट दुराचारी स्त्री मी आहे. तरी माधवने तिचे काही एक न ऐकता. तिला धरले व तिच्याशी संभोग केला.
अश्या तर्‍हेने मान-मर्यादा, विधा, घर-दार, आईवडिल, भावंड प्रिय पत्नी, सर्वांना सोडून देउन त्या चांडाल स्त्री कडे सर्व धन-दौलत टाकून तिच्याकडेच राहू लागला व मद्य सेवन व मांस भक्षण करु लागला. व महापाप ओढवन काळ कंठून राहु लागला.
काही वर्षानी कुंतला नावांच्या त्याच्या स्त्रीचे निधन झाले. अनेक पापांच्या मुळे माधव कुष्टरोगी बनला. न खाता-पिता तो इकडे तिकडे हिंडू लागला त्यास सुमारास तिरुपतिला जाणार्‍या व पापनाशन मध्ये स्नान करण्याकरिता जाणार्‍या काही यात्रेकरुना माधवने पाहिले. व त्याचेच अनुकरण करुन गोविंदाचा नामोच्चारण करीत व कपिलतीर्थात स्नान करुन माधव सुध्दा तिरुपति पर्वत चढू लागला.
पर्वतावर चढता चढता त्याचे सारे शरिर जळू लागले. व त्यात त्याने केलेली पापे जळू लागली. व त्याचे पापमुक्त शरिर शांत होऊ लागले. व तेजमय होऊ लागले सर्व देवगण पुष्पाचा वर्षाव करु लागले पर्वतावर तपश्चर्या करणारे सर्व ऋषि मुनी आश्चर्य चकित होऊन पाहू लागले. माधवनी आपला पूर्ववृत्तांत सर्व लोकांना सांगितला. माधवाच्या सार्‍या पापाचा नाश करणारा पर्वत म्हणून यांस वेंकटाद्रि म्हणू लागले. पुष्कळ वर्षे त्यांनी तपश्चर्या केली व शेवटी त्याला मोक्षप्राप्ति मिळाली.
नारायणाद्रि:- तिरुपति पर्वताचे आणखी एक नांव आहे नारायणाद्रि नारायण ऋषीनी अनेक वर्षे तपश्चर्या केली. शेवटी ब्रह्मदेवांनी स्वतः येऊन दर्शन देऊन विचारले आहे मी संतुष्ट झाली. आपणास कोणता वर पाहिजे नारायण मुनीनी सांगितले मला वेंकटेश्वराचे दर्शन होईल असा वर हवा.
ब्रह्मदेवांनी त्याना तिरुपति पर्वतावर जाऊन वेंकटेश्वराची तपश्चर्या करायला सांगीतली व ते अदृश्य झाले. पुढे नारायण ऋषीनी पुण्यतीर्थात स्नान करुन तपश्चर्या करावयास सुरवात केली.
भगवान विष्णुनी येऊन त्याना दर्शन दिले व त्यांना मोक्ष प्राप्त झाला. अश्या तर्‍हेने त्या पर्वताला नारायणाद्रि हे नांव पडले
शेहाचल:- वेंकटाचल पर्वताचेच दुसरे नांव आहे शेषाचल. आदिशेषाच्या अंशमुळेच त्याला शेषाचल हे नांव पडले.
एकदा शेषाला खूप गर्व चढला. त्यांने विचार केला. “ मीच फक्त विष्णूच्या जवळ राहू शकती भगमान विष्णुच्या विश्रांती करीता छत रुपी त्वांना थंडवा देण्याकरिता सुखाकरीता मीच त्याच्या जवळ राहू शकतो. व तो विचार करु लागला माझ्या सारखा पुरुष कोणी नाही त्याचा गर्वभंग करण्याकरीता विष्णुनी एक उपाय योजला.
एक दिवस वायुदेव श्री विष्णुच्या दर्शना करीता आले. परंतु त्यावेळेस श्रीविष्णु श्री लक्ष्मीच्या महालात होते. हातात सुवर्णदंड घेऊन श्रीशेष पहार करीता होता. श्रीशेषाने त्यांना दारावार अडविले.
वायुदेवाने श्रींशेषा कडे उपहासपूर्वक पहात विचारले मला अडविणारा तु कोण? तु अडवित्याच्या आधीच मी तेथे पोहोचलेला आहे. प्रत्येक प्राणी मंत्राच्या मी श्वास आहे. जेथे भगवान आहेत तेथे मी आहेस माझ्या शिवाय कोणालाही जगणे अशक्य आहे. माझ्या शिवाय कोणी जगू शकत नाही. मी स्वामीच्या दर्शनांसाठी म्हणून आलो आहे. आणि दर्शन घेतल्या शिवाय परत जात नाही. तु तुझे शास्त्र सांभाळून रहा कारण मी दर्शन न घेता परतत नाही.
हे ऐकून श्री शेष खूप नाराज होऊन म्हणाले:- अरेरे ! जर तुम्ही तुम्हांला स्वतःहाला जरी देव म्हणुन घ्यायला लागलात तरी मी ऐकणार नाही आणि खरोखरच तुम्ही जर इतके महान व शक्तीशाली असाल तर मी तुमच्या पाया पडण्यासही नायर होईन. परंतु आता तुमची इच्छा असो नसो मी तुम्हाला जाऊ देणार नाही.
श्री शेषांचे हे गर्वयुक्त बोलणे ऐकून वायुदेव क्रोधीत झाले. परंतु त्यांनी स्वतःहालाच सांभाळुन उत्तर दिले. मुलांनी आपल्या वडिलांच्या पाया पडणे म्हणजे कोणतीही अपमानीत गोष्ट नाही. परंतु सेवकाचे असे वागणे खचितच दडास कारण होऊ शकते.
तेवढ्यात श्री भगवान तेथे येऊन म्हणाले कोणतीही गोष्ट केवळ बोलल्याने होत नसते काहीतरी कृती करुन दाखवली पाहिजे. माझ्या सारखा बलवान कोणी नाही. पराक्रमी नाही, म्हणजे अगदी चुकीचे आहे. श्री भगवान वायुदेवास म्हणाले या शेषा बरोबर उगीच वादविवाद कशास करीत असतोस परंतु श्री शेषास राहवले नाही.
श्री शेषांनी मीच तुमच्यापेक्षां पराक्रमी शुर वगैरे बोलून दाखवीले वायुदेवाला हसणे पुरे झाले. वायुदेवांनी श्रीशेषाला केवळ बोलण्याने पुरुषार्थ सिद्ध होत नाही काहीतरी कृती करुन दाखविली पाहिजे वगैरे वगैरे गोष्टी सांगीतल्या. परंतु श्रीशेष काहीच ऐकून घ्यावयास तयार होईनात.
काय तुम्ही विसरलात मी तुमच्या हातुन सुटलो म्हणुन ? “ तुम्ही मला सोडून दिलेत?  परंतु पहा. कोण कोणांस सोडते ते व वायुदेव लढण्यास पुढे सरसांवला तेवढ्यात श्री भगवान तेथे येऊन पोहोचले त्यांनी त्याचे भांडण ऐकून घेतले व एक परिक्षा त्याच्या पुढे ठेवली. त्यांनी सांगीतले येथून उत्तरेस असलेल्या सुमेरु पर्वताच्या आनंद नांवाचा एकपर्वतपुत्र आहे तु आपल्या शरिररुपी दोराने त्या पर्वतास विळखा घालून ठेव तशा अवस्थेत जर वायुने त्यास हलविले तर तो तुझ्यापेक्षा आधिक बलबान ठरेल नाहीतर तू त्याचेपेक्षा बलवान मानला जाशील.
भगवंताचे हे बोलणे ऐकून श्रीशेषाने आपले शरिर विशालकाय केले व त्याचा विळखा आनंद पर्वतास घातला वायुदेवाने तो पर्वत उखडण्या जंगजंग प्रयत्न केला पण पर्वत काही हलला नाही. श्री भगवंताना माहित होते दोघेही बलशाली आहेत. परंतु नारदांनी आस उपाय केला. तो देवाचा हेतू ओळखून नागराजाने आपल्या हजार फण्या पैकी एक फण्या थोडा ढिला केला. त्याबरोबर वायु वाचा संपर्काने शेषासहा तो पर्वत उखळोला गेला. व अंतरिक्षातून जाऊन दूर दक्षिणेकडे जाऊ लागला. आपल्या पुत्रावर अढवलेली ही आपत्ती पाहून मेरु पर्वताकडे वायुदेवाची प्रार्थना करुन आपल्या मुलांस वाचीवण्याची विनंती केली. तेव्हां वायुदेवानी शेषासहित त्या पर्वताला सुवर्णमुखी नदीवर ठेवले.
असा हा आनंदचल पर्वत शेषाच्या अंशापासून निर्माण झाला असुन भगवंताच्या निवासासाठी तो प्रकट झालेला आहे. शेष व तुम्ही याच्यामध्ये वांदग माजले. तेव्हां मायावी विष्णूनी तुला मोहीत करुन आनंद पर्वत या नदिच्या तिरावर आणुन ठेवला म्हणून शेषावरुन निर्माण झाला म्हणून त्यास शेषाचल असे नामाभिधान प्राप्त झाले.
भगवंताचा परमप्रिय भक्त शेष प्रार्थना करुन त्याला प्रसन्न करुन घेणे हेच तुमचे उचित कर्म आहे. असे देवदेवतांनी वायुदेवास सांगीतले तेव्हां वायुचा पण मद नष्ट झाला. तेव्हां माझ्या अज्ञानामुळे माझे हातून हा अपराध घडला असे सांगुत वायुदेवाने शेषाकडे क्षमायाचना केली.
अश्या तर्‍हेन वैकुंटाचाच एक भाग व देवांच्या लिलांनी युक्त अश्या ह्या ठिकाणी तिरुपति पर्वत आहे. अश्या तर्‍हेने श्रीनिवास ह्याचे इथुनच चरित्रवर्णन सुरु होते. श्रीनिवासानी कलियुगात आपले स्थिरनिवास स्थान तिरुपति केले आहे. पुराण ग्रंथाच्या करुन तेहतीस करोड देव देवता व ऋषीमुनी ह्या पर्वतावर निवास करुन होते.