Get it on Google Play
Download on the App Store

ध्रुव बाळ 2

व्याध म्हणाला, “एकदा गेल्यावर तू मरायला पुन्हा कशाला येशील ?”
मृग म्हणाला, ‘मी सत्यव्रत आहे.” व्याध म्हणाला, “जा ; तुम्हा चतुष्पादांची सत्यनिष्ठा पाहू दे.” मृग गेला. त्याच्या घरची मंडळी चिंतातूर होती. पिले चारा खात ना. त्याची पत्नी केविलवाणी दशदिशांकडे पाहात होती. वृद्ध मायबापे अश्रू ढाळीत होती. इतक्यात मृग दिसला.
“बाळ, का उशीर ? आमच्यावर का रागावलास ?” मायबापांनी विचारले. मृगाने सारा प्रसंग सांगितला.
तो म्हणालाः “तुम्हांला शेवटचं भेटून घ्यायला मी आलो आहे. आता जाऊ दे.”
सारी म्हणाली ; “आम्ही येतो. आम्हाला मरु दे.”
सारा कळप निघाला. व्याध वाट पाहात होता.
“मी आलो ; मार.” मृग म्हणाला.
“आम्हांला मार.” मुले म्हणाली.
“आम्हांला मार.” वृद्ध मायबापे म्हणाली.
“आम्हा सर्वांनाच मार.” हरणी म्हणाली. मृगाची सत्यनिष्ठा आणि त्या सर्वांचे अन्योन्य प्रेम पाहून तो व्याध विरघळला.
“जा. मी कुणालाच मारत नाही !” तो बोलला.

सत्यनिष्ठ मृग-कुटुंबाचे आकाशात ते तारे झाले. प्राणदान करणारा तो व्याधही तेजस्वी तारा झाला. सुंदर रुपक-कथा ! ययाती-शर्मिष्ठा यांचे असेच काव्य आहे. शर्मिष्ठेच्या ता-याला इंग्रजीत “आरामखुर्चीतील रमणी” असे नाव आहे. आणि जवळच पाठीमागे इंग्रजी “वाय्” अक्षराच्या आकाराचा ययातीचा तारा आहे. जणू दोघे प्रेमालाप करीत आहेत. परस्परांचा वियोग परस्परांचा क्षणभर सहन होत नाही. ययाती-शर्मिष्ठांचे प्रेम आदर्श मानले जाते. सासरी जाणा-या शकुंतलेला कुलपती कण्व म्हणतो, “ययातीरिव शर्मिष्ठा भर्तुर्बहुमता भव- ययातीची शर्मिष्ठा जशी आवडती ; तशी तू दुष्यंताची हो.”

अगस्तीच्या ता-याची अशीच गोष्ट. अगस्तीचा तारा भाद्रपदअखेर दिसू लागतो, आणखी वैशाखअखेर तो दिसेनासा होतो. उत्तर गोलार्धात तो अधिक दिसतो; दक्षिण गोलार्धात गेल्यावर दिसत नाही. ता-यावरुन, त्याचा अस्तोदयावरुन कथा निर्माण झाली. तो दिसू लागला म्हणजे समुद्र शांत होतो, तो अस्तास गेला म्हणजे पावसाळा सुरु होतो, समुद्र खवळतो. अगस्ती ऋषी, समुद्र प्राशन करणारा अगस्ती ऋषी, वसाहती वसवणारा, सात समुद्र हिंडणारा म्हणून प्रसिद्धच आहे. त्याचे नाव त्या ता-याला दिले. अशा या ता-यांभोवती गुंफलेल्या गोष्टी आहेत. प्राचीन पूर्वज आकाशप्रेमी नि प्रतिभावान होते.