Get it on Google Play
Download on the App Store

कुमारांकडून अपेक्षा 15

आजपर्यंत जगाला वाङ्मयानेच वाढविले, वळण दिले, आनंद दिला, माणुसकी दिली. वाङमयानेच सहृदयता, उदारता, बंधुता, पुरुषार्थ, पावित्र्य, प्रेम, न्याय ही दिली आहेत. भारतीयांची मनोरचना पहा. विचार, आचार पहा. कोणी त्यांना रंगरूप दिले ?  रामायणाने, महाभारताने, कबीराच्या गाण्यांनी, तुलसीरामायणाने, गोपीचंदाच्या गीतांनी, मीराबाईच्या मधुर भजनांनी, ज्ञानेशांच्या ओवीने, तुकोबांच्या अभंगाने, वामन श्लोकाने, मोरोपंती आर्येने, रामदासांच्या वाणीने, शाहीरांच्या रसवंतीने, बायकांच्या कहाण्यांनी अशा सर्व वाङमयाने भारतीय जीवनाला रंग दिला आहे. प्राचीनांनी त्यांच्या कालानुसार ध्येये दिली, विचार दिले. आजच्या युगधर्माला अनुरूप अशी गाणी, गोष्टी, विचार तुम्ही द्या. तुमची जबाबदारी मोठी आहे. तुम्ही जी गीते लिहाल, ज्या गोष्टी रचाल, जी नाटके लिहाल, निबंध लिहाल, त्यातून जनतेच्या मनोबुध्दीला वळण मिळेल. लिहिलेला वा बोललेला प्रत्येक शब्द म्हणजे पेरणी आहे. वेडेवाकडे लिहू नका, तुमचा होईल खेळ, राष्ट्राचा जाईल प्राण. म्हणून सादीने म्हटले आहे, ' पांढ-यावर काळे करण्यापूर्वी शंभरदा विचार कर.' अमृत नसेल देता येत, दूध द्या. तेही न जमले तर निर्मळ जीवन द्या. परंतु दारु नको. जीवनात विनोद, हास्य यांना महत्वाचे स्थान आहे. परंतु सा-या जीवनाचे हसे नका करू. विनोदही दोषांतून, चुकीतून दाखवा. इंदुबिंदूंच्या कुरूपतेतून निर्माण होणारा विनोद नको. खेडवळांची भाषा नाटकात वापरून त्यांच्या भाषेची थट्टा करणारा विनोद नको. असो. मी तुम्हाला काय सांगू, किती सांगू ?  उपदेश करायला मी उभा नाही. तुमचा प्रेमळ भाऊ म्हणून मी बोलत आहे. मन मोकळे करून बोलत आहे. महाराष्ट्राचा कायापालट करा. लोकांना वाङ्मय द्या. ते वाचण्यासाठी त्यांना साक्षर करा. क्रांती करा. मराठी वाङमय पहिल्या प्रतीचे करण्याची प्रतिज्ञा करा. मी साधे सरळ लिहिले, त्यात कला नाही. पाल्हाळ असेल. परंतु मी अपाय करणारे सहसा लिहिले नाही. महाराष्ट्रातील हजारो मुलेबाळे, स्त्रिया, शेतकरी, कामकरी त्याने आनंदले आहेत. सातारा जिल्ह्यातील भूमिगत कार्यकर्ते अज्ञातवासात माझी पुस्तके पुस्तके वाचीत. ते रडके नाही झाले. मी नव विचार, उदार भावना दिल्या आहेत. शनिमहात्म्याचे धर्म मी दिले नाहीत. टीका करणारे टीका करोत. माझे लिहिणे पै किंमतीचे ठरवोत. परंतु त्या पै किंमतीच्या लिखाणाचाही खूप उपयोग होऊन राहीला आहे हे महाराष्ट्रभर हिंडणा-या मला माहीत आहे. भूक लागली असता हिरेही फेकावेसे वाटतात आणि पै किंमतीचे डाळमुरमुरेही पृथ्वीमोलाचे वाटतात.

परंतु माझ्यातील दोष तुम्ही टाळा. संयम, कला, शास्त्रीय दृष्टी, अभ्यास ही अधिक आणा. तुम्ही मोठे व्हा. मराठी सरस्वतीचे अलंकार व्हा. परंतु तुमच्या कलेचे दैवत जनताजनार्दन असो. लोकमान्यांनी गीतारहस्य 'श्रीशाय जनतात्मने' अर्पण केले. जनतारूपी परमात्म्यासाठी त्यांचे ज्ञान होते. कलासुध्दा कशाचे तरी प्रतीक असते. कला कलातीत वस्तूकडे नेते. सायंकाळचे रंग अनंत भावनांची प्रतीके असतात. सायंकाळच्या छाया पाहताच रवींद्रनाथांना मृत्यू आठवे. सारी सृष्टीच प्रतीकात्मक आहे. म्हणून तुमची साहित्यिक कलाही कशाची तरी प्रतीकच असणार. हे प्रतीक जनता असो, तिचे सर्वांगीण स्वातंत्र्य असो.

माझ्याजवळ सांगायला अधिक नाही, साध्या गोष्टी मी सांगितल्या. कलेचा उहापोह, आनंदमीमांसा, निर्विकल्प, सविकल्प समाध्या, यांत मी कधी बुडया मारल्या नाहीत. आणि ज्याचा अनुभव नाही ते सहसा मी बोलत नाही. तुम्ही मला हट्टाने येथे आणले. माझ्या-जवळचे प्रेमाने नि आपुलकीने मी देत आहे. ते घ्या. पराक्रमी, पुरुषार्थ-शाली व्हा. मराठी सारस्वत सामर्थ्यशाली, सर्वकष करा. मराठी साहित्याचा विजय असो. महाराष्ट्राचा, भारताचा भविष्यकाळ उज्ज्वल बनवणारे ते होवो. तुमच्या प्रेमाचा मी ऋणी आहें. कुमारांचा विजय असो. जय हिंद !

मराठी कुमार साहित्य संमेलन, सोलापूर

अध्यक्षीय भाषण : डिसें. १९४६

उमाळा

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
चार गोष्टी 2 सर्वांना नम्र प्रार्थना 1 सर्वांना नम्र प्रार्थना 2 जीवनाची आशा 1 जीवनाची आशा 2 जीवनाची आशा 3 या राष्ट्राचे कसे व्हायचे? 1 या राष्ट्राचे कसे व्हायचे? 2 या राष्ट्राचे कसे व्हायचे? 3 संयम नि सहानुभूती 1 संयम नि सहानुभूती 2 संयम नि सहानुभूती 3 संयम नि सहानुभूती 4 गांधीजींचे दशावतार 1 गांधीजींचे दशावतार 2 गांधीजींचे दशावतार 3 गांधीजींचे दशावतार 4 गांधीजींचे दशावतार 5 गांधीजींचे दशावतार 6 कुमारांकडून अपेक्षा 1 कुमारांकडून अपेक्षा 2 कुमारांकडून अपेक्षा 3 कुमारांकडून अपेक्षा 4 कुमारांकडून अपेक्षा 5 कुमारांकडून अपेक्षा 6 कुमारांकडून अपेक्षा 7 कुमारांकडून अपेक्षा 8 कुमारांकडून अपेक्षा 9 कुमारांकडून अपेक्षा 10 कुमारांकडून अपेक्षा 11 कुमारांकडून अपेक्षा 12 कुमारांकडून अपेक्षा 13 कुमारांकडून अपेक्षा 14 कुमारांकडून अपेक्षा 15