Get it on Google Play
Download on the App Store

इस्लामी संस्कृति 70

दुस-या दिवशीं मुहंमद आपल्या अनुयायांसह दुपारची प्रार्थना करीत होते. आणि त्या वेळेस कैद्यांचे कांहीं प्रतिनिधि आले व म्हणाले, 'आमची मुहंमदांस प्रार्थना आहे कीं, त्यांनीं आपल्या अनुयायांजवळ आमच्याविषयीं रदबदली करावी. मुसलमान अनुयायांसहि आमची प्रार्थना कीं त्यांनीं पैगंबरांस दया करण्यास सांगावें.'

त्या प्रतिनिधीस मुहंमद एकदम म्हणाले, 'माझ्या वांटयास आलेले कैदी मी परत करतों. तसेंच अबदुल मुत्तलिबांच्या घराण्यांतील मंडळींच्या वांटणीस आलेले कैदी मी परत करतों.'

ती प्रार्थनेची पवित्र वेळ होती. मुहंमदांनीं आपल्या घराण्यांतील मंडळींच्या वांटयास आलेले कैदी मुक्त करतांच इतरांसहि स्फूर्ति आली. प्रत्येकजण म्हणू लागला, 'माझ्या वांटणीचे कैदी मी देतों.' आणि सारे कैदी मुक्त झाले. स्त्रिया, मुलें गुलाम होण्याऐवजीं मुक्त झालीं ! मुहंमदांनीं सक्ति केली नाहीं. स्वत:च्या उदाहरणानें ते शिकवीत होते. सहा हजार माणसें त्या वेळेस मुक्त झालीं !

या करुणेनें, या अपरंपार औदार्यानें बेदुइन विरघळले. ते सारे मित्र बनले. लढाईनें जें झालें नाहीं तें त्या निरपेक्ष करुणेनें झालें. त्या सर्वांनीं नवधर्म घेतला.

लुटींतील भाग मक्केंतील ज्यांनीं नवधर्म घेतला होता त्यांना मुहंमद जरा अधिक देत. नवीन झाडाला अधिक पाणी घालावें लागतें, त्याची अधिक काळी. परंतु मदिनेंतील अन्सार यामुळें जरा नाखुष होत. त्यांना हा पक्षपात वाटे. 'वास्तविक निराधार मुहंमदांस मदिनेनें आधार दिला म्हणून अन्सार असें आम्हांला नांवहि पडलें. परंतु मुहंमदांचा मक्केवरच लोभ !' अन्सार नाखूष आहेत ही गोष्ट मुहंमदांच्या कानांवर गेली. त्यांनीं सर्वांना जमा केलें व म्हटलें, 'अन्सार बंधूंनों, तुमचें बोलणें माझ्या कानांवर आलें आहे. तुमच्या मदिना शहरांत मी आलों त्या वेळेस तुम्ही अज्ञानांत होतां. ईश्वरानें तुम्हांस योग्य दिशा दाखविली. तुम्ही कष्ट भोगीत होतां. प्रभूनें तुम्हांस सुखी केलें. तुमचीं आपसांत वैरें होतीं. परंतु तीं गेलीं. आणि तुमचीं हृदयें बंधु-प्रेमानें भरुन आलीं. खरें आहे कीं नाहीं सांगा.'

"होय पैगंबर. तुम्ही म्हणतां हें खरें आहे. पैगंबरांची ही कृपा आहे. त्यांची ही उदारता आहे.' ते म्हणाले.
"कां, असें कां म्हणतां ? असें कां बरें उत्तर देतां ? असें उत्तर देण्याऐवजीं तुम्ही असें म्हटलें पाहिजे होतें, 'आमच्या नगरींत तूं एक उपटसुंभ आलास. परंतु आम्ही तुझ्यावर श्रध्दा ठेविली. निराधार, अगतिक असा तूं आलास. आम्ही तुला आधार दिला. दरिद्री व परित्यक्त असा तूं आलास. आम्ही तुला घर दिलें. अशान्त व दु:खी कष्टी असा आलास. आम्ही सांत्वन केलें.' असें कां नाहीं म्हणत ? अरे अन्सारांनो, तुम्ही असें म्हटलेंत तर त्यांत का कांहीं गैर आहे, वावगें आहे ? तें खरेंच आहे. मीहि साक्ष दिली असती कीं, तुमचें हें म्हणणें खरें आहे. परंतु असें उत्तर न देतां तुम्ही मघांचें उत्तर दिलें. हें पहा, अन्सार मित्रांनो, ऐहिक वस्तूंसाठीं हृदयांत आसक्ति कशाला ? ऐहिक वस्तूंसाठीं हृदयें अशान्त नका होऊं देऊं. उंट, गुरेंढोरें, शेळया, मेंढया मिळूं देत दुस-यांना. तुमच्याबरोबर मदिनेंत मी येणार आहें. तुम्हांला मी पाहिजे का शेळयामेंढया ? ज्या परमेश्वराच्या हातीं माझें जीवन आहे त्याची शपथ घेऊन मी सांगतों कीं, मी तुम्हांला कधींहि सोडणार नाहीं. सारें जग एका बाजूला गेलें व अन्सार दुस-या बाजूला गेले तरी मी अन्सारांच्या बाजूनें उभा राहीन. प्रभूची तुमच्यावर मेहेरबानगी असो. तुम्हांला, तुमच्या पुत्रपौत्रांना त्याचा आशीर्वाद असो. प्रभु तुम्हांला सदैव सुखांत ठेवो.'

पैगंबरांची वाणी ऐकून अन्सार रडले. त्यांच्या दाढीवरुन अश्रुधारा घळघळल्या. ते सारे एका आवाजानें म्हणाले, 'पैगंबर, आमच्या वांटयानें आम्ही खूष आहोंत.' आणि ते सुखी व समाधानी झाले. या प्रसंगानंतर लौकरच मुहंमद अन्सारांसह मदिनेस परत गेले.

इस्लामी संस्कृति

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
इस्लामी संस्कृति 1 इस्लामी संस्कृति 2 इस्लामी संस्कृति 3 इस्लामी संस्कृति 4 इस्लामी संस्कृति 5 इस्लामी संस्कृति 6 इस्लामी संस्कृति 7 इस्लामी संस्कृति 8 इस्लामी संस्कृति 9 इस्लामी संस्कृति 10 इस्लामी संस्कृति 11 इस्लामी संस्कृति 12 इस्लामी संस्कृति 13 इस्लामी संस्कृति 14 इस्लामी संस्कृति 15 इस्लामी संस्कृति 16 इस्लामी संस्कृति 17 इस्लामी संस्कृति 18 इस्लामी संस्कृति 19 इस्लामी संस्कृति 20 इस्लामी संस्कृति 21 इस्लामी संस्कृति 22 इस्लामी संस्कृति 23 इस्लामी संस्कृति 24 इस्लामी संस्कृति 25 इस्लामी संस्कृति 26 इस्लामी संस्कृति 27 इस्लामी संस्कृति 28 इस्लामी संस्कृति 29 इस्लामी संस्कृति 30 इस्लामी संस्कृति 31 इस्लामी संस्कृति 32 इस्लामी संस्कृति 33 इस्लामी संस्कृति 34 इस्लामी संस्कृति 35 इस्लामी संस्कृति 36 इस्लामी संस्कृति 37 इस्लामी संस्कृति 38 इस्लामी संस्कृति 39 इस्लामी संस्कृति 40 इस्लामी संस्कृति 41 इस्लामी संस्कृति 42 इस्लामी संस्कृति 43 इस्लामी संस्कृति 44 इस्लामी संस्कृति 45 इस्लामी संस्कृति 46 इस्लामी संस्कृति 47 इस्लामी संस्कृति 48 इस्लामी संस्कृति 49 इस्लामी संस्कृति 50 इस्लामी संस्कृति 51 इस्लामी संस्कृति 52 इस्लामी संस्कृति 53 इस्लामी संस्कृति 54 इस्लामी संस्कृति 55 इस्लामी संस्कृति 56 इस्लामी संस्कृति 57 इस्लामी संस्कृति 58 इस्लामी संस्कृति 59 इस्लामी संस्कृति 60 इस्लामी संस्कृति 61 इस्लामी संस्कृति 62 इस्लामी संस्कृति 63 इस्लामी संस्कृति 64 इस्लामी संस्कृति 65 इस्लामी संस्कृति 66 इस्लामी संस्कृति 67 इस्लामी संस्कृति 68 इस्लामी संस्कृति 69 इस्लामी संस्कृति 70 इस्लामी संस्कृति 71 इस्लामी संस्कृति 72 इस्लामी संस्कृति 73 इस्लामी संस्कृति 74 इस्लामी संस्कृति 75 इस्लामी संस्कृति 76 इस्लामी संस्कृति 77 इस्लामी संस्कृति 78 इस्लामी संस्कृति 79 इस्लामी संस्कृति 80 इस्लामी संस्कृति 81 इस्लामी संस्कृति 82 इस्लामी संस्कृति 83 इस्लामी संस्कृति 84 इस्लामी संस्कृति 85 इस्लामी संस्कृति 86 इस्लामी संस्कृति 87 इस्लामी संस्कृति 88