Get it on Google Play
Download on the App Store

पुनर्रचना 26

केवळ ध्येये थोर ठेवून भागत नाही. त्या ध्येयांना प्रत्यक्ष सृष्टीत आणण्यासाठी साधनेही हवी. काही तरी एखादे नवीन कामचलाऊ तंत्रही निर्मायला हवे. बहुजनसमाजाला शिक्षण देण्यासाठी म्हणून राष्ट्रसंघ किंवा केलॉग-करार अशा गोष्टी उपयोगाच्या असतात. परंतु राष्ट्रसंघाविषयी खोल गेलेला असा संशय सर्वांच्या मनात आहे. जगात आज जी स्थिती आहे तीच कायम ठेवण्यासाठी निर्माण केलेले एक साधन म्हणजे हा राष्ट्रसंघ. राष्ट्रसंघ म्हणजे दोस्त राष्ट्रांच्या हातातील एक बाहुले! सर्व राष्ट्रांच्या संरक्षण व स्वातंत्र्य देण्यासाठी हा संघ अवतरला आहे, असे कोणाला फारसे वाटतच नाही. आणि केलॉग-कराराचे महत्त्वही नष्ट झाल्यासारखेच आहे. कारण ज्याने या कराराला जन्म दिला, तो म्हणाला, ‘स्वसंरक्षणार्थ शेवटी युद्धाशिवाय गत्यंतर आहे की नाही हे ठरविण्यास ते ते राष्ट्रच अंती अधिक समर्थ असणार.’ जगात केवळ न्याय्य असे युद्ध कधी असूच शकत नाही. राष्ट्राराष्ट्रांतील प्रश्न सोडविण्याचे साधन म्हणून अतःपर युद्ध स्वीकारु नये. युद्धाचा मार्ग सोडूनच द्यावा. युद्ध हा खरा उपाय नव्हे. स्वसंरक्षणार्थ म्हणूनही अंगिकारल्या युद्धाचे समर्थन आपण करु नये. स्वसंरक्षण म्हटले म्हणजे कोठून तरी धोका येणे शक्य आहे हेही आले, तो धोका टाळण्यासाठी अमुक एक प्रदेश जिंकून घेणे अवश्य आहे हेही आले मग स्वसंरक्षणाच्या नावाखाली होणारी दुस-यावची स्वारीही समर्थनीयच ठरायची!  जेथे सारेच अंधुक आहे, तेथे प्रकाश व अंधार यांत फऱक कोठे काढणार ? आणि हिंसेवर प्रतिहिंसा ठेवलेलीच असल्यामुळे सत्याला विजयी होण्यास वेळच नसतो. जोपर्यंत राष्ट्रे स्वतःच्या भोवताली फिरत राहणार तोपर्यंत सदैव विग्रह राहणार, युद्धे राहणार! प्रत्येकाला नवीन बाजरपेठा हव्या. त्या धुंडताना एकमेकांच्या गाठी पडायच्याच व शेवटी युद्धाची ठिणगीही पडायची! परंतु कलागती विवेकाने शांतवू या. शक्तीने प्रश्न सोडवू पाहणे माणसास शोभत नाही. सर्वांना बंधनकारक असे जागतिक कायदेशास्त्र निर्मु या. सर्व जगाचे असे एक सर्वश्रेष्ठ न्यायमंदिर स्थापू या. तेथील निकाल सर्वजण मानतील असे करु या. त्या निकालाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस नेमू या. परंतु जोपर्यंत मोठी राष्ट्रे थोडेही सोडावयास तयार नाहीत, आपल्या साम्राज्यसत्तेला जराही धक्का लावू द्यावयास तयार नाहीत, तोपर्यंत आशा नाही. जोपर्यंत साम्राज्य-सरकारे आपापली साम्राज्ये तलवारीने सांभाळण्यासाठी सदैव उभी आहेत, तोपर्यंत हे राष्ट्रसंघ, केलॉग-करार म्हणजे केवळ थट्टा आहे, केवळ वंचना आहे.

जगात शांतता स्थापण्यासाठी एकच साधन आहे. ते म्हणजे धर्मयुक्त ध्येयवाद. हेच खरे राजकीय साधन. या साधनातच आशा आहे. ‘हे आमचे कर्तव्य, हे आमचे हक्क,’ ही भाषा जोपर्यंत आहे, तोपर्यंत परस्परविरोधी हितसंबंधांचा मेळ घालता येणार नाही. तह व मुत्सद्यांची परस्पर समझौता करणारी कारस्थाने, यांनी प्रक्षोभ क्षणभर शांत होईल. परंतु पुन्हा भडका उडेल. उसळलेल्या व पेटलेल्या भावना तहांनी तात्पुरत्या शमतात, परंतु कायमच्या विझत नसतात. मानवजातीविषयी प्रेम सर्वांच्या हृदयात भरेल तरच आशेस आधार आहे. ते प्रेम जगात भरु दे. असे धर्मात्मे, महात्मे आज हवे आहेत की जे सर्व जगाच्या सुधारणेची वाट न पाहता पृथ्वीवर एक ‘कुटुंब-वसुधैवकुटुम्बकम्’ हे तत्त्व जरुरी पडली तर स्वतःच्या आत्मसमर्पणानेही सिद्ध करतील; असे महात्मे व वीर पाहिजे आहेत, की जे म्हणतील, ‘आम्हाला फळाची आशा नाही, प्रयत्न करणे एवढेच आमचे काम. कोणी सुधारतील या आशेने आम्ही कर्मप्रवृत्त होत नसतो;  आम्हाला राहवत नाही म्हणूनच आम्ही उद्योग आरंभितो.’

संस्कृतीचे भवितव्य

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
'कल्की'च्या निमित्ताने 1 'कल्की'च्या निमित्ताने 2 'कल्की'च्या निमित्ताने 3 'कल्की'च्या निमित्ताने 4 प्रास्ताविक 1 प्रास्ताविक 2 प्रास्ताविक 3 प्रास्ताविक 4 सर्वत्र नकार 1 सर्वत्र नकार 2 सर्वत्र नकार 3 सर्वत्र नकार 4 सर्वत्र नकार 5 सर्वत्र नकार 6 सर्वत्र नकार 7 सर्वत्र नकार 8 सर्वत्र नकार 9 सर्वत्र नकार 10 सर्वत्र नकार 11 सर्वत्र नकार 12 सर्वत्र नकार 13 सर्वत्र नकार 14 प्रश्न 1 प्रश्न 2 प्रश्न 3 प्रश्न 4 प्रश्न 5 प्रश्न 6 प्रश्न 7 प्रश्न 8 प्रश्न 9 प्रश्न 10 पुनर्रचना 1 पुनर्रचना 2 पुनर्रचना 3 पुनर्रचना 4 पुनर्रचना 5 पुनर्रचना 6 पुनर्रचना 7 पुनर्रचना 8 पुनर्रचना 9 पुनर्रचना 10 पुनर्रचना 11 पुनर्रचना 12 पुनर्रचना 13 पुनर्रचना 14 पुनर्रचना 15 पुनर्रचना 16 पुनर्रचना 17 पुनर्रचना 18 पुनर्रचना 19 पुनर्रचना 20 पुनर्रचना 21 पुनर्रचना 22 पुनर्रचना 23 पुनर्रचना 24 पुनर्रचना 25 पुनर्रचना 26