Get it on Google Play
Download on the App Store

पुनर्रचना 15

कौटुंबिक जीवन
मानवी जीवनाची विविध रुपे आहेतः शारीरिक, मानसिक, भावनात्मक, कलात्मक, नैतिक, आध्यात्मिक. किती तरी प्रकार! हे सारे प्रकार पवित्र आहेत. कारण दिव्यतर जीवनाकडे जाण्याची ती साधने आहेत. देहाची वा आंतरमनाची कशाचीही उपेक्षा करु नका. देहाला जपा, प्राण्यांची काळजी घ्या. आपण विशाल जीवन हे ध्येय करु या, जीवनाच्या पैलूपैलूला पूर्णत्व देऊ या. कोणत्याही अंगाची उपेक्षा नको. सर्वांगीण वाढ, सर्वांगीण विकास. त्या त्या बाबतीतील जी परमोच्च स्थिती ती ती प्राप्त करुन घेऊ या. लैंगिक वृत्तीचाही स्वीकार करु या. विवाहसंस्थेच्या साह्याने या आपल्या विकारात्मक वृत्तीमधूनच अधिक उच्च असे जीवन उभारु या. कोणत्याही इच्छेला बळी पडणे म्हणजे अव्यवस्थितपणा व गोंधळ माजविणे होय. लहरीला शरण जाण्याने आपण जीवनाला कोणताच आकार देऊ इच्छित नाही, जीवनाला महत्त्वच देत नाही, असे होईल.

दोन जीवांचे लग्न लागते. रतिक्रिया म्हणजे एक प्रतीक आहे, चिन्ह आहे. आंतरिक ऐक्याची ती बाहेरची खूण. ते बाह्य शरीरमीलन मनोमिलनाचे निदर्शक आहे. ती मनोमय सुभगता, प्रसन्नता व एकता त्या बाह्य क्रियेने प्रतीत होते. असे असेल तरच ते खरे लग्न. प्रेमाची वेल चढण्यासाठी समान ध्येयाची सुंदरशी कमान हवी. त्या ध्येयाच्या कमानीखाली दोघांचे जीवन वाढेल. त्या ध्येयासाठी दोगे आपली जीवने अर्पितील. पती-पत्नी एकमेकांचा स्वीकार करुन परस्परांनी खरोखरचे नाते निर्मिण्यासाठी सहकार्याने प्रयत्न केला पाहिजे. ज्या ज्या अडचणी येतील, त्यांच्या परिहारार्थ उभयतांनी झटले पाहिजे. दोघांनी सहनशीलता दाखविली पाहिजे; अधीर होता कामा नये. संयम, क्षमा, उदारता, दया या गुणांनी संपन्न असे उभयतांनी असले पाहिजे. दोघांनी सावध व दक्ष असावे. अशा रीतीने ती वागतील तरच संसार सुंदर होईल. विवेकाने व विचाराने विकारांना जरी सौम्य करण्यात आले, तरी या कामात संपूर्ण सिद्धी कधीच मिळत नसते. अगदी चांगले उदाहरण घेतले तरीही आपणास असेच म्हणावे लागेल की, विचाराचे डोळस जीवन जगण्याचा सतत प्रयत्न करणारा प्राणी म्हणजे मानव. ‘मनुष्य म्हणजे विचारात्मक प्राणी’ असे म्हणण्याऐवजी वैचारिक ‘जीवनाकडे जाण्यासाठी धडपड करणारा प्राणी’ असे म्हणणेच अधिक युक्त होईल. विवाहाचा जो प्रकार आहे तो आनंदमयही आहे व दुःखमयही आहे. विवाह म्हणजे सदैव मधुचंद्र अशी भ्रामक कल्पना घेणारी जोडपी, सुखाला जरा अडथळा येताच हे वैवाहिक बंधन नको असे म्हणू लागतात व  काडीमोड करुन घेतात. पुष्कळसे काडीमोड पती-पत्नी परस्परांशी एकनिष्ठ नव्हती किंवा संभोगसुखात काही चुका झाल्या, म्हणून होतात असे नाही. परस्परांचे स्वभाव जुळत नाहीत, परस्परांच्या आवडीनिवडी निरनिराळ्या असतात, यामुळेच बरेचसे घटस्फोट होत असतात. लग्नसंस्था दोन जीवांच्या विकासार्थ आहे ही गोष्ट जर आपण मान्य केली, तर मग कितीही अडचणी येवोत वा विघ्ने येवोत, त्यातून पलीकडे जाण्यासाठी दोन्ही जीवांनी झटणे हेच कर्तव्य ठरते. येणारी प्रत्येक अडचण म्हणजे पुढे जाऊ पाहणा-या त्या दोन जीवांना आव्हान असते. त्या अडचणींना शरण जाऊन काडीमोड करुन घ्यावयाचा, की त्या अडचणी जिंकून दोघांनी अधिक उत्साहाने पुढे जावयाचे ?

संस्कृतीचे भवितव्य

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
'कल्की'च्या निमित्ताने 1 'कल्की'च्या निमित्ताने 2 'कल्की'च्या निमित्ताने 3 'कल्की'च्या निमित्ताने 4 प्रास्ताविक 1 प्रास्ताविक 2 प्रास्ताविक 3 प्रास्ताविक 4 सर्वत्र नकार 1 सर्वत्र नकार 2 सर्वत्र नकार 3 सर्वत्र नकार 4 सर्वत्र नकार 5 सर्वत्र नकार 6 सर्वत्र नकार 7 सर्वत्र नकार 8 सर्वत्र नकार 9 सर्वत्र नकार 10 सर्वत्र नकार 11 सर्वत्र नकार 12 सर्वत्र नकार 13 सर्वत्र नकार 14 प्रश्न 1 प्रश्न 2 प्रश्न 3 प्रश्न 4 प्रश्न 5 प्रश्न 6 प्रश्न 7 प्रश्न 8 प्रश्न 9 प्रश्न 10 पुनर्रचना 1 पुनर्रचना 2 पुनर्रचना 3 पुनर्रचना 4 पुनर्रचना 5 पुनर्रचना 6 पुनर्रचना 7 पुनर्रचना 8 पुनर्रचना 9 पुनर्रचना 10 पुनर्रचना 11 पुनर्रचना 12 पुनर्रचना 13 पुनर्रचना 14 पुनर्रचना 15 पुनर्रचना 16 पुनर्रचना 17 पुनर्रचना 18 पुनर्रचना 19 पुनर्रचना 20 पुनर्रचना 21 पुनर्रचना 22 पुनर्रचना 23 पुनर्रचना 24 पुनर्रचना 25 पुनर्रचना 26