Get it on Google Play
Download on the App Store

पुनर्रचना 11

जो आपल्याप्रमाणे ग्रह-पूर्वग्रह करुन घेणार नाही, तो मूर्ख, दुष्ट व अडाणी! एखादी व्यक्ती अमुक एक मत का पत्करते याचा उलगडा तेव्हा होईल, जेव्हा त्या व्यक्तीचा स्वभाव, तिच्या भोवतालची परिस्थिती, त्या व्यक्तीचे शिक्षण, त्या व्यक्तीच्या जीवनाची पार्श्वभूमी वगैरे आपण समजून घेऊ. दुस-याचा दृष्टीकोण आपण नीट समजून घेतला तर त्याच्यावर आपण रागावणार नाही, त्याला त्याच्या मताविषयी क्षमा करु, एवढेच नव्हे तर, त्याच्याविषयी आपण सदभाव धरु, त्याची अधिक किंमत कुरु आणि अशा करण्याने आपण त्याचे मन जिंकून घेऊन अधिक वरच्या दर्जाचा अविऱोध निर्माण करु, अधिक उच्च प्रकारचा मेळ घालू शकू, ऐक्य निर्मू शकू. हिंदूंच्या पुराणात रावण व हिरण्यकश्यपू केवळ पापमूर्ती असे मानले आहे. परंतु त्यांनाही शेवटी सदगती मिळते. त्यांनाही मोक्ष मिळवून घेण्याची पात्रता आहे. रावण व हिरण्यकश्यपू स्वतःच्या पुरुषार्थाच्या व पराक्रमाच्या कल्पनांप्रमाणे वागतात; ते स्वतःशी असत्यरुप होत नाहीत.जे श्रेयस्कर असे त्यांना वाटले, त्याच्या पाठीमागे ते उत्कटपणे लागले. त्यांच्या जीवनात तीव्रता व उत्कटता आहे. तिची दिशा निराळी होती एवढेच. रावण वरुन जरी लोखंडासारखा कठीण दिसला, सीतेचे हरण करण्यात त्याची जरी प्रक्षुब्ध वासना दिसली, रामाला जिंकण्यासाठी जरी तो धडपडत असला, तरी त्याच्या या सर्व हालचालींत मधूनमधून होणा-या हळुवार प्रतिक्रिया, मधुन मधुन स्फुरणारी क्षणिक उदात्तता दिसून आल्याशिवाय राहत नाही. सीतेच्या व्यक्तित्वाविषयी त्याला फार आदर वाटतो. तो रामाचा भयंकर शत्रू आहे, हाडवैरी आहे, ही गोष्ट खरी; परंतु दुखावलेल्या मनातूनच न शमणारा संताप जन्मत असतो. गाढ्या वैराच्याच पाठीमागे तीव्र वेदना असते. मानवजातीचे काही विशेष नमुने असतात. काही काही मोठ्या विवक्षित वृत्तीची माणसे असतात, त्यांचे स्वरुप समजून घेणे सोपे नसते आणि ज्यांचे जीवन समजून घेण्याची उत्सुकता आपण दर्शवलेली नसते, अशांबरोबर आपण श्रेष्ठ आहो या गर्वाने फुगून कधी वागू नये. जीवनाची सर्जनशक्ती अनंत रुपांनी प्रकट होते. त्यातील प्रत्येक रुपात अपूर्वाई असते. क्रियेच्या प्रत्येक प्रकारात सत् व असत् दोन्ही असतात. कोणतीही गोष्ट असो, ती जशी चांगली तशी वाईटही करता येते.

ईश्वराच्या या जगात केवळ दुष्ट असे काही नाही. अमिश्र असत् या संसारात नाहीच. म्हणून जेव्हा आपणास वाईटाचा विरोध होतो तेव्हा रागावू नये. असे रागावणे वाईट आहे. आपली वृत्ती जे जे विरोध होतील ते सर्व शांतपणे सहन करुन धैर्याने पुढे जाण्याची असावी. त्या विरोधाचाही  स्वीकार करावा. प्रेमाचा आत्मा दुस-याला समजून घेण्यात आहे, दुस-याविषयीही संपूर्ण सहानुभूती दाखविण्यात आहे. अशा निर्मल व उदार प्रेमाने जगातील दुष्टतेचा आपण धैर्याने स्वीकार केला पाहीजे. असे करण्यात आपण दया दाखवितो किंवा मोठी क्षनावृत्ती दाखवितो असे समजण्याचे बिलकुल कारण नाही. आपण केवळ न्याय दाखविला असे म्हणता येईल. निरपेक्ष न्यायाची वृत्ती ही दया किंवा क्षमा यांच्याहूनही थोर आहे. मनुष्य जसा आहे तसा पत्करुन त्याच्यावर प्रेम करणे, त्याचा दुबळेपणा व त्याची शक्ती दोन्ही समजून घेणे, जग ज्याला अपराध किंवा पाप म्हणते, ते करायला मुळचा सत्प्रवृत्तीचा असा हा मानव का प्रवृत्त झाला ते समजून घेणे, म्हणजेच खरोखर न्याय. नंदनवनात ईव्हने अँडमला मोहात पाडले, त्याचे परिणाम पुढे अत्यंत दुःखद असे झाले; परंतु त्या ईव्हहून आपण नैतिकदृष्ट्या अधिक श्रेष्ट आहो असे म्हणण्याचे धारिष्ट्य आपल्यापैकी कोणी तरी करील का? आपण जर त्या काळात व त्या परिस्थितीत असतो, तर आपण निराळ्यात-हेने वागलो असतो असे कोणास तरी वाटते का? जगातील दुष्टांतल्या दुष्टासही स्वीकारणे, हाच एक अशक्य वाटणा-या सहकार्याचा पाया होऊ शकेल. शत्रूवर विश्वास टाकणे हाच त्याच्याशी वागण्याचा उत्तम मार्ग. जो खरोखर आध्यात्मिक वृत्तीचा पुरुष आहे त्याला ना भय, ना क्रोध.

संस्कृतीचे भवितव्य

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
'कल्की'च्या निमित्ताने 1 'कल्की'च्या निमित्ताने 2 'कल्की'च्या निमित्ताने 3 'कल्की'च्या निमित्ताने 4 प्रास्ताविक 1 प्रास्ताविक 2 प्रास्ताविक 3 प्रास्ताविक 4 सर्वत्र नकार 1 सर्वत्र नकार 2 सर्वत्र नकार 3 सर्वत्र नकार 4 सर्वत्र नकार 5 सर्वत्र नकार 6 सर्वत्र नकार 7 सर्वत्र नकार 8 सर्वत्र नकार 9 सर्वत्र नकार 10 सर्वत्र नकार 11 सर्वत्र नकार 12 सर्वत्र नकार 13 सर्वत्र नकार 14 प्रश्न 1 प्रश्न 2 प्रश्न 3 प्रश्न 4 प्रश्न 5 प्रश्न 6 प्रश्न 7 प्रश्न 8 प्रश्न 9 प्रश्न 10 पुनर्रचना 1 पुनर्रचना 2 पुनर्रचना 3 पुनर्रचना 4 पुनर्रचना 5 पुनर्रचना 6 पुनर्रचना 7 पुनर्रचना 8 पुनर्रचना 9 पुनर्रचना 10 पुनर्रचना 11 पुनर्रचना 12 पुनर्रचना 13 पुनर्रचना 14 पुनर्रचना 15 पुनर्रचना 16 पुनर्रचना 17 पुनर्रचना 18 पुनर्रचना 19 पुनर्रचना 20 पुनर्रचना 21 पुनर्रचना 22 पुनर्रचना 23 पुनर्रचना 24 पुनर्रचना 25 पुनर्रचना 26