Get it on Google Play
Download on the App Store

पुनर्रचना 6

मनुष्य परिस्थितीचा गुलाम नाही, ईश्वराच्या हातातील बाहुले नाही. परिपूर्णतेकडे जाणारी विश्ववृत्ती मनुष्यात जागृत अशी असते. विश्वाचा स्वभावच परिपूर्णतेकडे जाण्याचा आहे. परंतु हा स्वभाव मानवात आंधळा न राहता डोळस होतो. तिर्यग्योनीत प्रगती घडते; परंतु मानव ती घडवितो. मनुष्य पुरुषार्थपूर्वक, प्रयत्नपूर्वक प्रगतीकडे पावले रोवीत जातो. मनुष्येतर सृष्टीत अजाणता फेरफार होतात, मानवी व्यवहारात जाणीवपूर्वक हेतू असतो. मी आज असा आहे, परंतु मी तसा होऊ शकेन, अशा प्रकारची धडपड आणि या धडपडीमुळे वाटणारी अस्वस्थता ही मानवातच दिसून येतात. इतर प्राण्यांत व मनुष्यांत जर कोणता फरक असेल तर तो हा, की मनुष्य जीवनाचा कायदा शोधू पाहत असतो, प्रगतीचे तत्त्व शोधू पाहत असतो.

आपण स्वतःला बदलू तर आपण जग बदलू. स्वतःला सुधारुनच आपण जग सुधारु शकू. स्वतःला सुधारणे हा सुधारणेचा पाया आहे असे जे म्हटले जाते ते अक्षरशः खरे नाही. नवीन संस्कृतीची उभारणी दैवावर सोपविण्याची जरुरी नाही. आपणही काही काम करु शकू. पुष्कळ करावयाचे आहे. किती तरी बाबतीत हे जग अपूर्ण आहे. किती तरी ठिकाणी बांधकाम करायचे आहे. प्रगती झपाट्याने करायची की मुंगीच्या पावलाने करायची हे आपणावर आहे. उत्क्रांतीची शिकवण स्पष्ट आहे. काही ठराविक कार्यक्रमानूसार जीवन जात नसते. प्रगतीची ती ती इच्छित शिखरे जीवन कधी गाठू शकत नाही. जीवनाची नदी कधी सरळ जाते, कधी वाकडी जाते. कधी उथळ असते, कधी गंभीर असते. कधी ती नदी वाळवंटात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते. जीवन कधी इकडे जाते, कधी तिकडे. कधी प्रगती खुंटते व पुन्हा पूर्वपदावर गाडी येते. निसर्गाच्या कामात हिशेबीपणा नाही. पुन्हा पुन्हा तेच तेच प्रयोग करावे लागतात. भूतकालीन इतिहास सांगतो की, जरा जर चुकीचा मार्ग घेतला गेला, तर एकदम अदृश्यच व्हावे लागेल, जगातून नष्ट व्हावे लागेल. आपणापैकी प्रत्येकाला अधिक चांगले जग निर्मिण्याच्या प्रयत्नात भाग घेता य़ेईल. प्रत्येकाला काही तरी करता येईल. विश्वाचा हेतू जर आपण लक्षात घेऊ व त्याच्याशी एकरुप होऊ तर हे करता येईल. प्रत्येक व्यक्तीत काही तरी अपूर्वता असते. प्रत्येकाचे विशिष्ट गुणधर्म असतात. प्रत्येकाला जगाच्या कल्याणात काही विशेष भर घालता येईल. ती शक्यता सर्वांच्या ठायी आहे. स्वतःचा स्वधर्म ओळखणे हे सर्व परिपूर्णतेचे सार आहे. मी काय करु शकेन, मला काय होता येईल, माझे ईश्वरी देणे कोणते म्हणजेच स्वतःच्या विकासाचे सूत्र हाती येणे. जीवनाचा शांतपणे व स्थिरपणे विचार करुन जीवनातील आपले स्थान आपण शोधू शकतो. जीवनाचा अर्थात सर्वांगीण विचार केला पाहिजे. प्रत्येक मनुष्य म्हणजे काही विवक्षित गुणांचा व घटनांचा गोळा असतो. प्रत्येकाच्या जीवनातील मध्यबिंदू निरनिराळा असेल. कोणाचा खाली, कोणाचा वर. त्या मध्यबिंदूवर आपले चरित्र अवलंबून असते. मनुष्य उथळ स्वभावाचा आहे की गंभीर वृत्तीचा आहे, हे त्याच्या जीवनातील मध्यबिंदूवरुन दिसून येते. कितीही चुका झाल्या, तरी पण मध्यबिंदू जर काळजीपूर्वक घेतलेला असेल, तर आधार आहे; आपल्या सर्व जीवनात एकसूत्रीपणा आहे. त्या मध्यबिंदूशी सा-या अंतर्बाह्य क्रिया संबद्ध हव्या. जीवनातील एकसूत्रीपणा देणारा हा जो मध्यबिंदू तो आपण शोधून काढला पाहिजे, म्हणजे विश्वातील आपले विशिष्ट स्थान आपणास कळेल. मग आपली भूमिका नीट पार पाडण्यास लागणारा उत्साह आपणास मिळेल. ती भूमिका मग लहान असो वा अति कष्टाची, दगदगीची असो. यासाठी शांतपणे चिंतन व मनन करण्याची, एकाग्र करणा-या एकांताची आवश्यकता असते. त्यामुळे जीवनात मेळ येतो.

संस्कृतीचे भवितव्य

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
'कल्की'च्या निमित्ताने 1 'कल्की'च्या निमित्ताने 2 'कल्की'च्या निमित्ताने 3 'कल्की'च्या निमित्ताने 4 प्रास्ताविक 1 प्रास्ताविक 2 प्रास्ताविक 3 प्रास्ताविक 4 सर्वत्र नकार 1 सर्वत्र नकार 2 सर्वत्र नकार 3 सर्वत्र नकार 4 सर्वत्र नकार 5 सर्वत्र नकार 6 सर्वत्र नकार 7 सर्वत्र नकार 8 सर्वत्र नकार 9 सर्वत्र नकार 10 सर्वत्र नकार 11 सर्वत्र नकार 12 सर्वत्र नकार 13 सर्वत्र नकार 14 प्रश्न 1 प्रश्न 2 प्रश्न 3 प्रश्न 4 प्रश्न 5 प्रश्न 6 प्रश्न 7 प्रश्न 8 प्रश्न 9 प्रश्न 10 पुनर्रचना 1 पुनर्रचना 2 पुनर्रचना 3 पुनर्रचना 4 पुनर्रचना 5 पुनर्रचना 6 पुनर्रचना 7 पुनर्रचना 8 पुनर्रचना 9 पुनर्रचना 10 पुनर्रचना 11 पुनर्रचना 12 पुनर्रचना 13 पुनर्रचना 14 पुनर्रचना 15 पुनर्रचना 16 पुनर्रचना 17 पुनर्रचना 18 पुनर्रचना 19 पुनर्रचना 20 पुनर्रचना 21 पुनर्रचना 22 पुनर्रचना 23 पुनर्रचना 24 पुनर्रचना 25 पुनर्रचना 26