Get it on Google Play
Download on the App Store

स्वभावाशीं परिचय 8

परंतु ही भीति केवळ आपल्या चुकीमुळें आपण जीवितास वगैरे मुकूं नये अशा स्वरुपाची असावी. नाहीतर ते व्यक्तीस किंवा समाजास भीत नसत. सरकारवरही त्यांचा विश्वास नसे व सरकारसंबंधी सडेतोड उद्गार त्यांनी काढले आहेत. म्हणजे ही भीति केवळ भ्याडपणाची नव्हती. भ्याडपणा, ताटाखालचे मांजर होण्याची जी दीन व दुबळी वृत्ति ती ही नव्हती. ती त्यांच्या स्वभावाशी विसंगतच असली पाहिजे. प्रत्येक व्यक्ति तडफदार, तेजस्वी व नि:स्पृह बनावी अशी तर त्यांची जन्मशिकवणुक आहे. विद्यार्थी व तरुण लोक यांनी नामर्द व लुसलुशीत वृत्तीचे न होतां रणमर्द जवानमर्द व्हावे असें त्यांस खरोखर वाटे. गाणें बजावणें, नाच, कोमळ व नाजुक वाद्यें यांचा त्यांस तिटकारा येई. त्यामुळें वृत्ति बा का होतात असें त्यांस वाटे. विश्ववृत्ताच्या १९०७ सप्टेंबरच्या अंकांत ते लिहितात 'क्कईक्कई, किणकिण, गुइंगुइं वगैरे नरम आवाज उत्पन्न करणारी सतार, दंतवाद्य, गितार वगैरे भिकार वाद्यें खुद्द भीमसेनालाहि बृहन्नडा बनवतील; मग सामान्य पोलीस, शिपाई व खडर्येघाशे यांना त्यांनी साक्षात् स्त्रैणपणा आणला तर त्यांत नवल नाही. बायकी आवाज काढणारे जे जनानखां व फुटक्या मडक्यासारख्या थालिपीठया व रेक्या आवाज काढणारे जे लंबकंठाशास्त्री या दोघांनांही प्रजा बिघडविण्याची सक्त मनाई असावी. नाकांतून गाणा-या पारशी नाटक कंपन्या व ताणावर ताणा घेणा-या मराठी नाटक कंपन्या संस्थानांत बिलकूल शिरकूं देऊं नये. ह्यांच्या ऐवजीं पवाडे म्हणणारे शाहीर, एकतारीवर भजन करणारे महार, गंभीर वीण्यावर व मर्दानी डफावर आलापणारे लावणीकार, ह्यांचा परामर्ष कदाचित् प्रजेला जास्त हितकर होईल. सगळयांत रणभेरी, रणतंबुर रणझांज वगैरे हत्यारें प्रजेकडून ऐकिविल्यास वं: योजविल्यास, तिच्यांत मर्दानी बाणा उसळेल. रडकी गाणी व किरटी वाद्यें वाजविण्यास किंवा भिकार नाटकें पाहण्यास जेथील प्रजेला मुबलक वेळ आहे, तेथील प्रजा खुळी, परतंत्र, जनानी व झिंगलेली आहे असें खुशाल समजावे' अशा प्रकारची तेजस्वी वृत्ति तरुणांत निर्माण व्हावी म्हणून गीतवाद्येंही बंद करुं म्हणणारा पुरुष स्वत: भ्याडवृत्तीचा कसा असेल ? भीतीपेक्षां संशय त्यांच्या मनांत असें वाटतें. कांही असो. ही भ्याडवृत्ति दुस-याच कांहीतरी प्रकारची, म्हणजे उगीचच्या उगीच आततायीपणानें जीव धोक्यांत येऊं नये अशा तऱ्हेची असावी. कारण जगलें तर सर्व कामगिरी होणार आहे. महाभारतांत विश्वामित्र चांडालास म्हणतो 'जीवन्धर्ममपाप्नुयात्' आधी जिवंत राहूं दे आणि मग परोपकार धर्म, करूं दे. व्यर्थ आततायीपणानें जिवावर बेतूं नये म्हणून राजवाडे खबरदारी घेत असावेत. तो नामर्दी भित्रेपणा होता असें वाटत नाही.

राजवाडे हे वृत्तीनें साशक असत. मनुष्याच्या बोलण्या-चालण्याचा त्यांना विश्वास वाटत नसे. मनुष्याच्या हेतूंबद्दल पुष्कळ वेळां ते विपर्यस्त बोलत. मोर्ले साहेबांनी जें म्हटलें आहे 'It is not always safe to suppose the lowest motives to be the truest." दुस-यांचे हेतु नेहमीच अशुध्द समजणें हें चांगलें नाही. परंतु राजवाडे हे जगाकडे चांगल्या दृष्टीने पहात नसत. कदाचित् जगाचा कटु अनुभव आला त्याचा हा परिणाम असेल. त्यांचा हा स्वभावविशेष दर्शविणा-या गोष्टी प्रसिध्द झाल्या आहेत. परंतु त्या गोष्टीचा मी उल्लेख करीत नाही. त्यांच्या स्वभावांत जनतेविषयी साशंकता होती खरी. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर पुढें पुढें कोणत्याही चळवळीत भाग घेत नसत व म्हणत 'माझा या देशांतील लोकांच्या शब्दांवर विश्वास नाही. 'तसेंच राजवाडे यांचें झालें असेल.

वरील एकंदर लिहिण्यावरुन राजवाडे यांच्या स्वभावाची अल्पस्वरूप शतांशाने तरी कल्पना वाचकांस होईल असें वाटतें.

इतिहासाचार्य राजवाडे

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
सदिच्छेचे सामर्थ्य 1 जन्म, बाळपण व शिक्षण 1 जन्म, बाळपण व शिक्षण 2 जन्म, बाळपण व शिक्षण 3 जन्म, बाळपण व शिक्षण 4 जन्म, बाळपण व शिक्षण 5 जन्म, बाळपण व शिक्षण 6 जन्म, बाळपण व शिक्षण 7 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 1 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 2 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 3 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 4 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 5 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 6 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 7 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 8 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 9 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 10 भाषाविषयक कामगिरी 1 भाषाविषयक कामगिरी 2 भाषाविषयक कामगिरी 3 समाजशास्त्रविषयक व इतर निबंध 1 समाजशास्त्रविषयक व इतर निबंध 2 समाजशास्त्रविषयक व इतर निबंध 3 राजवाडे यांचें लिहिणें-त्याचें स्वरुप-गुणदोष 1 राजवाडे यांचें लिहिणें-त्याचें स्वरुप-गुणदोष 2 राजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 1 राजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 2 राजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 3 राजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 4 राजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 5 राजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 6 राजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 7 स्वभावाशीं परिचय 1 स्वभावाशीं परिचय 2 स्वभावाशीं परिचय 3 स्वभावाशीं परिचय 4 स्वभावाशीं परिचय 5 स्वभावाशीं परिचय 6 स्वभावाशीं परिचय 7 स्वभावाशीं परिचय 8 अंत व उपसंहार 1 अंत व उपसंहार 2 अंत व उपसंहार 3 अंत व उपसंहार 4 अंत व उपसंहार 5 अंत व उपसंहार 6 अध्याय अठरावा