Get it on Google Play
Download on the App Store

स्वभावाशीं परिचय 4

एकदां ते इंदूरला गेले होते. ते ज्या खोलींत लिहावयास बसत, त्या खोलीच्या शेजारच्या खोलीत एक शॉर्ट हँड टाइपरायटिंगचा क्लास असे. तेथें पुष्कळ मोठयानें बोलणें, चालणें होई. आपणांस फार त्रास होत असेल, आपल्या लिहिण्या वाचण्यांत व्यत्यय येत असेल, परंतु माफ करा, असें त्यांस म्हटल्याबरोबर राजवाडे म्हणाले 'त्यांत त्रास कसचा- मला बिलकूल त्रास वगैरे होत नाही. मुलें काय व माकडें काय सारखीच. त्यांच्या गोंगाटानें आपलीं डोकी नाहीशी होतां कामा नये. तुम्ही आम्ही डोक्यानें मजबूत असलें पाहिजे म्हणजे झालें.' ते बहुधा सकाळच्या वेळी महत्वाचें वाचन करीत; दुपारी १२ ते ३ पर्यंत किरकोळ सटर फटर वाचीत. सकाळी जें वाचलें असेल, त्यावर ते दोनप्रहरी व सायंकाळी मनन करावयाचे. कधी कधी डोक्यांत एखादा विचार येऊन ते सारखे मननच करीत बसलेले दिसावयाचे. एकदां   क-हाडास असतां ते असेच कांही गंभीर विचारांत नेहमी मग्न व गढलेले असत. ते ज्या स्नेह्याकडे उतरले होते त्या स्नेह्यानें विचारलें 'अलीकडे सर्व वेळ आळशासारखाच आपण दवडता एकूण; तुमचें वाचन वगैरे कांहीच हल्ली नाही.' त्यावर राजवाडे म्हणाले 'अरे आतां पाहशील एकदां लिहावयास लागले म्हणजे कसें लिहिन तें.' त्यांची ती शांति समुद्राच्या शांतीप्रमाणें असे. समुद्राची शांती हें भावी वादळाचें जसें चिन्ह समजतात, तसें राजवाडयांची शांती म्हणजे नवीन क्रांतिकारक विचारांनी वादळ उठविण्याची ती खूण होती. पोटांत, मेंदूंत त्यांच्या विचारांचें थैमान, धुडगूस चालूच असे व या आंतरिक मंथनापासून कांही तरी सिध्दांतरुपी नवनीत ते जनता जनार्दनाला अर्पण करीत.

राजवाडे यांना चातुर्वर्ण्यची उपयुक्तता पठत असावी. समर्थ रामदास स्वामीनीं सबगोलंकार दूर करून चातुर्वर्ण्याची घडी पुन्हां बसविण्याचा प्रयत्न केला. समर्थांना 'एकंकार गजावरि पंचानन' असें म्हटलेलें आहे. सब गोलंकाररुपी गजाचा संहार करणारे समर्थ हे पंचानन होते. संत मंडळीनी समत्वाचा प्रसार केला परंतु चातुर्वर्ण्याविरुध्द त्यांची शिकवणूक नव्हती; त्यांस एवढेंच शिकवावयाचें होतें की प्रत्येक वर्णानें वर्णाश्रमानुरुप कर्मे करावी परंतु आपण वरिष्ठ इतर कनिष्ठ ही वृत्ति सोडून द्यावी. वर्णांनी एकमेकांचा तिरस्कार करूं नये. समाजाच्या हितासाठी एकमेकांनी त्याग वृत्ति स्वीकारुन आपापली कर्मे करावीत. राजवाडे राजवाडे याच मताचे होते. ते म्हणत 'मी ब्राम्हण आहें, म्हणून मी नि:स्पृह वृत्तीनें व निर्धनतेनें राहून ज्ञानार्जनांत आयुष्य दवडीत आहे. माझें हें प्राप्त कर्तव्यच आहे. पैशांचा संचय करणें हें माणें काम नव्हें. हांजी हांजी करणें हा ब्राम्हण धर्म नाही. मी वाणी झालों असतों तर वाण्याचें दुकान चालविलें असतें; मी व्यापार उदीम केला असता.' या उक्तीत राजवाडयांच्या आयुष्याचें सार आहे. राजवाडे रहात होते राहात होते त्याप्रमाणें नि:स्पृह, निर्धन परंतु ज्ञानधन व मानधन असे वैराग्यवृत्तीचे ब्राम्हण आपणांत किती आहेत ? सर्व ब्राम्हण जवळ जवळ शूद्रच झाले आहेत असें म्हटलें तर वास्तविक कोणास राग न येता लाज वाटली पाहिजे.

स्वार्थत्यागाच्या वायफळ गप्पा राजवाडे यांस खपत नसत. स्वार्थत्याग कार्यकर, प्रभावशाली पाहिजे. ज्या स्वार्थत्यागाचा उपयोग नाही त्या स्वार्थत्यागाची कांही अदृष्ट किंमत असली तरी प्रत्यक्षाच्या दृष्टीनें तो स्वार्थत्याग अनाठायी आहे. निरनिराळया शिक्षण संस्थांतील लोक कमी पगारावर कामें करितात व आपण स्वार्थत्यागी आहोंत असें त्यांस वाटतें; परंतु राजवाडे म्हणत 'कमी पगार घेतां, परंतु करतां काय ? नोकरशाहीचा गाडा सुरळीतपणें चालविणारे गुलामच निर्माण करितो की नाही ? असे हमाल तयार करण्यासाठी केलेला स्वार्थत्याग म्हणजे राष्ट्रद्रोह आहे. कारण राष्ट्राची कुचंबणा करणारें जें परकी सरकार, त्याला एकप्रकारें साहाय्यच तुम्ही असे लोक निर्माण करून करतां. असला स्वार्थत्याग अनाठायी आहे. चांगला लठ्ठ पगार घेत जा.

इतिहासाचार्य राजवाडे

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
सदिच्छेचे सामर्थ्य 1 जन्म, बाळपण व शिक्षण 1 जन्म, बाळपण व शिक्षण 2 जन्म, बाळपण व शिक्षण 3 जन्म, बाळपण व शिक्षण 4 जन्म, बाळपण व शिक्षण 5 जन्म, बाळपण व शिक्षण 6 जन्म, बाळपण व शिक्षण 7 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 1 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 2 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 3 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 4 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 5 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 6 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 7 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 8 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 9 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 10 भाषाविषयक कामगिरी 1 भाषाविषयक कामगिरी 2 भाषाविषयक कामगिरी 3 समाजशास्त्रविषयक व इतर निबंध 1 समाजशास्त्रविषयक व इतर निबंध 2 समाजशास्त्रविषयक व इतर निबंध 3 राजवाडे यांचें लिहिणें-त्याचें स्वरुप-गुणदोष 1 राजवाडे यांचें लिहिणें-त्याचें स्वरुप-गुणदोष 2 राजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 1 राजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 2 राजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 3 राजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 4 राजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 5 राजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 6 राजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 7 स्वभावाशीं परिचय 1 स्वभावाशीं परिचय 2 स्वभावाशीं परिचय 3 स्वभावाशीं परिचय 4 स्वभावाशीं परिचय 5 स्वभावाशीं परिचय 6 स्वभावाशीं परिचय 7 स्वभावाशीं परिचय 8 अंत व उपसंहार 1 अंत व उपसंहार 2 अंत व उपसंहार 3 अंत व उपसंहार 4 अंत व उपसंहार 5 अंत व उपसंहार 6 अध्याय अठरावा