Get it on Google Play
Download on the App Store

जन्म, बाळपण व शिक्षण 7

याच पुणें शहरांत इंग्रजांचे वकील हातरुमाल बांधून पेशव्यासमोर सविनय जाऊन उभे रहात; याच पुण्यांतील प्रतापी वीरांनी अटकेपर्यंत अंमल बसविला; याच पुण्यांतून हिंदुस्थानची सूत्रें खेळविली जात. परंतु काळाचा महिमा अतर्क्य! सातहजार मैलांवरचे गोरे लोक येथें येऊन आम्हांस गुलाम करून राहिले आहेत; त्यांनी स्थापन केलेल्या शाळाकॉलेजांतून त्यांनी लिहिलेली पुस्तकें पढत आहोंत ! आमचे लोक त्या रणरंगधीर पूर्वजांची पूज्य दिव्य स्मृतिही विसरुन गेले व त्यांस लुटारु, दरवडेखोर, खुनी, लबाड असली शेलकी विशेषणें पाश्चात्यांनी दिलेली खरी मानूं लागले ! हरहर ! काय आमची दुर्दशा ! समरचमत्कार जरी सद्य:कालांत शक्य नसलें, घोडयावर अढळमांड ठोकून समशेर लटकावून व भाले सरसावून पुन्हा दिगंत झेंडा मिरवितां येणें सद्य:स्थितीत शक्य नसलें, तरी ज्यांनी ती महनीय कामगिरी केली, त्यांस आम्ही दूषणें दिलेली ऐकावी व त्यांचीच स्वत: री ओढावी इतका आमचा अध:पात कशानें झाला ? अशाप्रकारचे शेंकडो कल्लोळ उडविणारे विचार राजवाडे यांच्या हृदयसमुद्रांत उसळत असत. याच क्षेत्री हिंडता फिरतां त्यांस शहाजी, शिवाजी, रामदास, बाजी यांची स्मृति जळजळीत स्फुरली असेल. येथेंच बसतां उठतां आपलें वैभव त्यांच्या कल्पना दृष्टीस दिसलें असेल व तें दिव्य वैभव, तें यशोगान पुनरपि गावयाचें असें त्यांनी ठरविलें असेल !

राजवाडे कॉलेजांत राहिले त्यामुळें शरीर कणखर बनलें; बुध्दि प्रगल्भ, कुशाग्र व अनेक विषयावगाहिनी बनली. १८८४ च्या शेवटी कोणत्याच परीक्षेस न बसतां ते कॉलेज सोडून गेले. पुढें १८८८ मध्यें बाहेरचा विद्यार्थी म्हणून पहिल्या बी.ए.च्या परीक्षेस ते गेले व पास झाले. ह्या परीक्षेचा सर्व अभ्यास २०।२५ दिवसांतच त्यांनी केला. पुढें १८८९ मध्यें भावे यांच्या शाळेंत ते वनस्पतिशास्त्र शिकवीत होते. एक वर्षभर हें काम करुन पुनरपि १८९० मध्यें ते डेक्कन कॉलेजमध्यें रहावयास गेले. इतिहास हा विषय ऐच्छिक घेऊन ते परीक्षेस बसणार होते. हा विषय शिकविणारा कोणी शिक्षकच तेथें नसल्यामुळें वर्गांत जाण्याची अजिबात जरुर राहिली नव्हती. राजवाडे लिहितात “निव्वळ कॉलेजातील खोलीचा, हवेचा व जवळील नदीचा उपयोग करून घेण्याकरितां मी ८० रुपये फी भरली. कॉलेजांत राहून तनु दुरुस्ती करावी, हा माझा तेथें राहण्यांत उद्देश होत.” १८८९ च्या डिसेंबर महिन्यापासून ते १८९० च्या आक्टोबरपर्यंत तेथेंच यथेच्छ राहिले. नंतर एक महिनाभर परीक्षेचा अभ्यास नीट कसोशीनें करण्याकरितां ते पुण्यापासून बारा कोसांवर वडगांव म्हणून एक खेडें आहे तेथें जाऊन राहिले. १८९० च्या जानेवारी महिन्यांत ते बी.ए.ची परीक्षा पास झाले. राजवाडे लिहितात 'मॅट्रिकपासून बी.ए.पर्यंत मी कधी नापास झालों नाही; १८८४ साली प्रथम मी डेक्कन कॉलेजांत गेलों, त्यावेळी दर दोन दोन महिन्यांनी एक एक परीक्षा जर घेतली असती, तर ह्या तिन्ही परीक्षा पहिल्या सहामाहीतच मी पास झालों असतों. परंतु सहा टर्मा, सहामाही व उपान्त्य परीक्षा व मुंबईच्या फे-या, अशा नानाप्रकारच्या खुळांत सापडल्यामुळें १८८४ पासून १८९० पर्यंत मला व्यर्थ रखडत रहावें लागलें. ह्या रखडण्यांत इतके मात्र झालें की, माझ्या मनाला जें योग्य वाटलें तेंच मी केलें; आणि कॉलेजांतील खुळसर शिस्तीला बळी न पडतां मन व मेंदू यांना शैथिल्य व शीण येऊं न देतां, जगांत जास्त उत्साहानें काम करण्यास मी सिध्द झालों.”

१८९० मध्यें परीक्षा बी.ए.ची झाली. मनानें व शरीरानें कर्तबगारी करावयास तयार झालेला हा वीर आता हळूहळू आपल्या उद्दिष्ट ध्येयाकडे कसा गेला हें आतां पाहूं.

इतिहासाचार्य राजवाडे

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
सदिच्छेचे सामर्थ्य 1 जन्म, बाळपण व शिक्षण 1 जन्म, बाळपण व शिक्षण 2 जन्म, बाळपण व शिक्षण 3 जन्म, बाळपण व शिक्षण 4 जन्म, बाळपण व शिक्षण 5 जन्म, बाळपण व शिक्षण 6 जन्म, बाळपण व शिक्षण 7 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 1 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 2 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 3 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 4 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 5 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 6 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 7 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 8 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 9 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 10 भाषाविषयक कामगिरी 1 भाषाविषयक कामगिरी 2 भाषाविषयक कामगिरी 3 समाजशास्त्रविषयक व इतर निबंध 1 समाजशास्त्रविषयक व इतर निबंध 2 समाजशास्त्रविषयक व इतर निबंध 3 राजवाडे यांचें लिहिणें-त्याचें स्वरुप-गुणदोष 1 राजवाडे यांचें लिहिणें-त्याचें स्वरुप-गुणदोष 2 राजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 1 राजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 2 राजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 3 राजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 4 राजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 5 राजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 6 राजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 7 स्वभावाशीं परिचय 1 स्वभावाशीं परिचय 2 स्वभावाशीं परिचय 3 स्वभावाशीं परिचय 4 स्वभावाशीं परिचय 5 स्वभावाशीं परिचय 6 स्वभावाशीं परिचय 7 स्वभावाशीं परिचय 8 अंत व उपसंहार 1 अंत व उपसंहार 2 अंत व उपसंहार 3 अंत व उपसंहार 4 अंत व उपसंहार 5 अंत व उपसंहार 6 अध्याय अठरावा