Get it on Google Play
Download on the App Store

ईश्वरचंद्र विद्यासागर 36

मित्र, स्नेही-संबंधी, सरकार, सर्वांच्या बाबतीत आता निराशा झाली होती. या सुमारास ईश्वरचंद्रांचा एकुलता एक मुलगा ‘नारायण विद्यारत्‍न’ हा पुनर्विवाह करण्यास तयार झाला. निराशेतही विद्यासागर यांस आशा आली. दुःखातही त्यांच्या सुकून गेलेल्या मनोवृत्ती-वल्लीस सुखाचे पल्लव फुटले. त्यांनी आपल्या मुलास उत्तेजन दिले. परंतु आता सख्खे भाऊ विरोध करावयास व दुःख द्यावयास आले. ईश्वरचंद्रांचा पाठचा भाऊ हा न्यायाधीश-पंडित होता. त्यांस चांगला पगार मिळे. दुसरा एक धाकटा भाऊ होता. त्यांचे नाव शंभुचंद्र न्यायरत्‍न. या सर्व भावांस विद्यासागरांनी शिकविले; लहानाचे मोठे केले; जगात अन्नास लाविले. विद्यासागरांच्या हातांनी वाढलेली ही झाडे शीतल छाया देण्याऐवजी, मार्गात काटे पसरणारी निपजली. विद्यासागरांचे दुर्दैव दुसरे काय? प्रथम या शंभुचंद्रांनी या पुनर्विवाहास जोराचा पाठिंबा दिला. प्रथम उत्तेजन देणारा भाऊ, प्रत्यक्ष विवाह आता उद्या होणार असे पाहताच उलटला. ‘आपणास आपले इतर गणगोत, आप्त बहिष्कृत करू पाहत आहेत, तर आपण हा नियोजित विवाह घडवून आणू नये. मोठ्या भावाचे असेच मत आहे,’ वगैरे ईश्वरचंद्रांस त्याने लिहिले. हा शंभुचंद्र दुतोंड्या होता. ईश्वरचंद्रांस तोंडावर वानील, तर तिकडे न्यायाधीश भावाजवळ ईश्वरचंद्रांस निंदील. असले दुधारी बाण फार वाईट. आत एक वर एक असे करणारे दुष्ट लोक फार भयंकर. शंभुचंद्राने अशा प्रकारे भीती घातली आणि आयत्या वेळी समारंभावर विरजण घालण्याचा प्रयत्‍न केला, तरी अशाने निश्चित कर्मापासून परावृत्त होणारे विद्यासागर नव्हते. त्यांनी धीर सोडला नाही, पुत्राचा पुनर्विवाह तर केला. मेजवानी वगैरे दिली. त्या वेळेस मग शंभुचंद्र म्हणतात, आपण कसोटीस उतरलात. आपल्या धैर्याची परीक्षा पाहण्यासाठी मी पत्र लिहिले; नाही तर मला तसे करावयाची तादृश जरूर नव्हती. मोठा भाऊ विरोधी असला, तरी माझे मन पहिल्यापासून ह्या विवाहास अनुकूल होते.’ वाहवारे भल्या गृहस्था! विद्यासागरांच्या धैर्यमेरूची परीक्षा पाहणारा कोण, तर तू घुंगुरडे, क्षुद्र जंतु, दुर्बल जीव! सूर्याची तेजःपरीक्षा खद्योताने पाहण्यापरी हे हास्यास्पद होते. विद्यासागरांनी आपल्या भावास लिहिलेल्या उत्तरात त्यांचा धीर आपणास दिसतो. ‘या चळवळीमुळे मी सारखा खड्ड्यात येतो आहे; संकटात पडतो आहे. परंतु या ध्येयार्थ प्राणांवर पाणी सोडण्यासही मी तयार आहे हे लक्षात धरा.’ खरा वीर पुरुष! अशाच थोर पुरुषांकडून ईश्वराचे वैभव जगास आविर्भूत झालेले दिसून येते.

विद्यासागर यांची चळवळ यशस्वी झाली नाही. एकदा बंगाली वृत्तपत्रात सुरेंद्रनाथ यांनी विधवेशी विवाह करण्यास तयार अशा तरुणांची नावे मागितली होती. त्यावरून १७० तरुणांनी नावे कळविली. यात शास्त्री-पंडितही होते. परंतु यावरून ही चळवळ फार दृढमूल झाली असे समजता येत नाही. आयत्या वेळी पुष्कळ लोक हातपाय गाळतात. पुनः एक विद्यासागरांचा अवतार झाला पाहिजे. एकेक सुधारणा नावारूपास येण्यास त्या त्या सुधारणेसाठी सर्वस्व वाहणार्‍या लोकांचे शतशः अवतार होतील तेव्हा हा सुस्त हिंदुस्थान हलू लागेल, एरवी नाही. कोणत्याही सुधारणा हळूहळू होतात. निसर्गाचे काम आतून चालले असते, ते अदृश्य असते, हे सर्व खरे, तरी पण कार्यकर्ता या गोगलगायीगतीने उदासीन होतो यात संशय नाही. ईश्वरचंद्र यांस प्रथम विश्वास वाटे की, या शास्त्रीमंडळींस शास्त्राधारे पुनर्विवाह पटवून दिला म्हणजे काम होईल. शास्त्रांवर हिंदुमात्राची भक्ती आहे, शास्त्रात सांगितलेली कोणतीही गोष्ट हिंदुमात्र करावयास तयार होईल, असा त्यांचा प्रथम समज होता. म्हणून त्यांनी शास्त्रसागर धुंडाळला व मोती जनतेस सादर केली. परंतु समज चुकीचा ठरला. शास्त्राचे अनुयायी नसून हिंदू हे रूढीचे अनुयायी आहेत हे कठोर व भीषण सत्य विद्यासागरांस कळून आले. उद्वेगाच्या भरात विद्यासागर उद्‍गारले, ‘हे भारतवर्षातील स्त्रियांनो, असे काय पूर्वजन्मी तुम्ही पातक केले होते की, तुम्हांस या भारतभूमीत जन्म घ्यावा लागला? मला तर काही समजत नाही.’ पुन्हा एकदा ते अशाच खिन्नकारक प्रसंगी म्हणाले, ‘हे रूढीदेवते, तू धन्य आहेस. तू आपल्या भक्तास पूर्णपणे वश करून ठेविले आहेस. या लोकांची जीवने सर्वस्वी तुझ्या हाती आहेत; दास्याच्या जड शृंखलांनी तू त्यांस आपले कायमचे गुलाम केले आहेस. तू धन्य आहेस.’

ईश्वरचंद्र विद्यासागर

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
ईश्वरचंद्र विद्यासागर 1 ईश्वरचंद्र विद्यासागर 2 ईश्वरचंद्र विद्यासागर 3 ईश्वरचंद्र विद्यासागर 4 ईश्वरचंद्र विद्यासागर 5 ईश्वरचंद्र विद्यासागर 6 ईश्वरचंद्र विद्यासागर 7 ईश्वरचंद्र विद्यासागर 8 ईश्वरचंद्र विद्यासागर 9 ईश्वरचंद्र विद्यासागर 10 ईश्वरचंद्र विद्यासागर 11 ईश्वरचंद्र विद्यासागर 12 ईश्वरचंद्र विद्यासागर 13 ईश्वरचंद्र विद्यासागर 14 ईश्वरचंद्र विद्यासागर 15 ईश्वरचंद्र विद्यासागर 16 ईश्वरचंद्र विद्यासागर 17 ईश्वरचंद्र विद्यासागर 18 ईश्वरचंद्र विद्यासागर 19 ईश्वरचंद्र विद्यासागर 20 ईश्वरचंद्र विद्यासागर 21 ईश्वरचंद्र विद्यासागर 22 ईश्वरचंद्र विद्यासागर 23 ईश्वरचंद्र विद्यासागर 24 ईश्वरचंद्र विद्यासागर 25 ईश्वरचंद्र विद्यासागर 26 ईश्वरचंद्र विद्यासागर 27 ईश्वरचंद्र विद्यासागर 28 ईश्वरचंद्र विद्यासागर 29 ईश्वरचंद्र विद्यासागर 30 ईश्वरचंद्र विद्यासागर 31 ईश्वरचंद्र विद्यासागर 32 ईश्वरचंद्र विद्यासागर 33 ईश्वरचंद्र विद्यासागर 34 ईश्वरचंद्र विद्यासागर 35 ईश्वरचंद्र विद्यासागर 36 ईश्वरचंद्र विद्यासागर 37 ईश्वरचंद्र विद्यासागर 38 ईश्वरचंद्र विद्यासागर 39 ईश्वरचंद्र विद्यासागर 40 ईश्वरचंद्र विद्यासागर 41 ईश्वरचंद्र विद्यासागर 42 ईश्वरचंद्र विद्यासागर 43 ईश्वरचंद्र विद्यासागर 44 ईश्वरचंद्र विद्यासागर 45 ईश्वरचंद्र विद्यासागर 46 ईश्वरचंद्र विद्यासागर 47 ईश्वरचंद्र विद्यासागर 48 ईश्वरचंद्र विद्यासागर 49 ईश्वरचंद्र विद्यासागर 50 ईश्वरचंद्र विद्यासागर 51 ईश्वरचंद्र विद्यासागर 52 ईश्वरचंद्र विद्यासागर 53 ईश्वरचंद्र विद्यासागर 54 ईश्वरचंद्र विद्यासागर 55 ईश्वरचंद्र विद्यासागर 56 ईश्वरचंद्र विद्यासागर 57 ईश्वरचंद्र विद्यासागर 58 ईश्वरचंद्र विद्यासागर 59 ईश्वरचंद्र विद्यासागर 60 ईश्वरचंद्र विद्यासागर 61 ईश्वरचंद्र विद्यासागर 62 ईश्वरचंद्र विद्यासागर 63 ईश्वरचंद्र विद्यासागर 64 ईश्वरचंद्र विद्यासागर 65 ईश्वरचंद्र विद्यासागर 66 ईश्वरचंद्र विद्यासागर 67 ईश्वरचंद्र विद्यासागर 68 ईश्वरचंद्र विद्यासागर 69 ईश्वरचंद्र विद्यासागर 70