Get it on Google Play
Download on the App Store

ईश्वरचंद्र विद्यासागर 33

शेवटी विधवा पुनर्विवाह कलम तर मंजूर झाले. सरकारने त्यासाठी नवीन कायदा केला. ज्या वेळेस हे बिल पास झाले, त्या वेळेस जी भाषणे झाली ती फार मनोरंजक आहेत. ती माहिती मोठी मौजेची आहे. जे. पी. ग्रँट यांनी हे बिल सर्व सभासदांपुढे मांडले. त्यांचे भाषण फार सुंदर व समर्पक होते. विद्यासागरांच्या श्रमांचे त्यांनी गोडवे गाइले व असे श्रम फुकट जाऊ देणे म्हणजे एक प्रकारचे पातकच असे ते म्हणाले.

रघुनंदन जो बंगाली लोकांस धर्मशास्त्र सांगणारा, त्याच्या पूर्वीच्या व्यवस्थेचे स्वरूप सांगून हा कायदा पास होणे किती जरूर आहे याचे ग्रँटसाहेबांनी विवेचन केले. ते म्हणतात, ‘If he knew certainly that but one little girl would be saved from the horrors of Brahmacharya by the passing of this Act, he would pass it for her sake, if he believed, as firmly as he believed the contrary, that the Act would be wholly a dead letter if he would pass it for the sake of the English name.’

(एकाही मुलीस ब्रह्मचर्याच्या अघोरपणापासून व तीव्र यातनांपासून मला मुक्त करण्याचे श्रेय मिळाले, तरी मी हा कायदा पास करण्यास तयार आहे. जरी हा कायदा निरुपयोगी राहील, तरी इंग्लिश लोकांनी मनाचा उदारपणा दाखविला हे दर्शविण्यासाठी तरी हा मंजूर करणे इष्ट व आवश्यक आहे.)

विद्यासागरांच्या धुरीणत्वाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली आता विधवा पुनर्विवाह होऊ लागले. पहिला विवाह, एका कुलीन व बाळबोध घराण्यातील ब्राह्मण युवा व एक १० वर्षांची बालविधवा यांचा झाला. विद्यासागर आता तनमनधन एक करून या चळवळीत पडले. लोकांत ही चळवळ दृढमूल जेणेकरून होईल, त्या गोष्टींचा त्यांस ध्यास लागला. त्यांचे जीवनतत्त्व एकच होऊन राहिले; एकमेव ध्येय डोळ्यांस दिसू लागले, त्यांच्या मनास रिझवू लागले. ते म्हणजे विधवांची विपन्नावस्था दूर करणे. ज्यांनी पुनर्विवाह केले त्या कुटुंबांस जर बहिष्कृत करण्यात आले, तर त्यांस त्रास व क्लेश होऊ नयेत, एतदर्थ विद्यासागर पैसे वगैरे पुरवीत; व या नूतन परिणीत जोडप्यास सर्व सोयरेधायर्‍यांस, स्नेहीसंबंधी लोकांस मिष्टान्नांचे भोजन देण्यास सांगत. या योगे स्नेही वगैरे संतुष्ट होऊन त्यांची मने थोडीफार कमी कलुषित होत. कधी कधी अशा प्रकारे नवीन विवाहबद्ध झालेल्या दांपत्यास घरादारास मुकावे लागे; त्यांस घरी थारासुद्धा मिळत नसे. अशांचा तर भार सर्वस्वी विद्यासागर यांच्यावर पडे.

या सर्व गोष्टींसाठी पुष्कळ पैशाची जरूर होती. विद्यासागर यांनी ‘विधवा पुनर्विवाहनिधी’ स्थापन केला. प्रथम प्रथम या निधीस पुष्कळ श्रीमंत लोक मासिक वर्गणी पाठवीत. परंतु कालक्रमाने हा इतर जनांचा उत्साह ओसरला; दिलेली वर्गणीची वचने अपुरी राहू लागली; शब्द सुके व कोरडे राहिले. ‘वचने किं दरिद्रता’ या म्हणण्याप्रमाणे शाब्दिक व तोंडदेखली सहानुभूती भरपूर, परंतु खरे साहाय्य मिळेनासे झाले. या श्रीमंतांच्या व इतर लोकांच्या वचनांवर विसंबून विद्यासागर यांनी किती तरी कर्ज काढले होते. आणि हे कर्ज आता फेडावयाचे कसे? वचन देणारे विसरले; ज्याप्रमाणे पूर्वी यंगसाहेबांनी फसविले, त्याप्रमाणे आता ईश्वरचंद्रांस त्यांच्याच देशबांधवांनी फशी पाडले.

ईश्वरचंद्र विद्यासागर

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
ईश्वरचंद्र विद्यासागर 1 ईश्वरचंद्र विद्यासागर 2 ईश्वरचंद्र विद्यासागर 3 ईश्वरचंद्र विद्यासागर 4 ईश्वरचंद्र विद्यासागर 5 ईश्वरचंद्र विद्यासागर 6 ईश्वरचंद्र विद्यासागर 7 ईश्वरचंद्र विद्यासागर 8 ईश्वरचंद्र विद्यासागर 9 ईश्वरचंद्र विद्यासागर 10 ईश्वरचंद्र विद्यासागर 11 ईश्वरचंद्र विद्यासागर 12 ईश्वरचंद्र विद्यासागर 13 ईश्वरचंद्र विद्यासागर 14 ईश्वरचंद्र विद्यासागर 15 ईश्वरचंद्र विद्यासागर 16 ईश्वरचंद्र विद्यासागर 17 ईश्वरचंद्र विद्यासागर 18 ईश्वरचंद्र विद्यासागर 19 ईश्वरचंद्र विद्यासागर 20 ईश्वरचंद्र विद्यासागर 21 ईश्वरचंद्र विद्यासागर 22 ईश्वरचंद्र विद्यासागर 23 ईश्वरचंद्र विद्यासागर 24 ईश्वरचंद्र विद्यासागर 25 ईश्वरचंद्र विद्यासागर 26 ईश्वरचंद्र विद्यासागर 27 ईश्वरचंद्र विद्यासागर 28 ईश्वरचंद्र विद्यासागर 29 ईश्वरचंद्र विद्यासागर 30 ईश्वरचंद्र विद्यासागर 31 ईश्वरचंद्र विद्यासागर 32 ईश्वरचंद्र विद्यासागर 33 ईश्वरचंद्र विद्यासागर 34 ईश्वरचंद्र विद्यासागर 35 ईश्वरचंद्र विद्यासागर 36 ईश्वरचंद्र विद्यासागर 37 ईश्वरचंद्र विद्यासागर 38 ईश्वरचंद्र विद्यासागर 39 ईश्वरचंद्र विद्यासागर 40 ईश्वरचंद्र विद्यासागर 41 ईश्वरचंद्र विद्यासागर 42 ईश्वरचंद्र विद्यासागर 43 ईश्वरचंद्र विद्यासागर 44 ईश्वरचंद्र विद्यासागर 45 ईश्वरचंद्र विद्यासागर 46 ईश्वरचंद्र विद्यासागर 47 ईश्वरचंद्र विद्यासागर 48 ईश्वरचंद्र विद्यासागर 49 ईश्वरचंद्र विद्यासागर 50 ईश्वरचंद्र विद्यासागर 51 ईश्वरचंद्र विद्यासागर 52 ईश्वरचंद्र विद्यासागर 53 ईश्वरचंद्र विद्यासागर 54 ईश्वरचंद्र विद्यासागर 55 ईश्वरचंद्र विद्यासागर 56 ईश्वरचंद्र विद्यासागर 57 ईश्वरचंद्र विद्यासागर 58 ईश्वरचंद्र विद्यासागर 59 ईश्वरचंद्र विद्यासागर 60 ईश्वरचंद्र विद्यासागर 61 ईश्वरचंद्र विद्यासागर 62 ईश्वरचंद्र विद्यासागर 63 ईश्वरचंद्र विद्यासागर 64 ईश्वरचंद्र विद्यासागर 65 ईश्वरचंद्र विद्यासागर 66 ईश्वरचंद्र विद्यासागर 67 ईश्वरचंद्र विद्यासागर 68 ईश्वरचंद्र विद्यासागर 69 ईश्वरचंद्र विद्यासागर 70