Get it on Google Play
Download on the App Store

चिटुकल्या गोष्टी 2

लाडकूची गोष्ट
एका गावात एक मुलगा होता. त्याचे आईबाप लहानपणीच वारले. मावशीने त्याचा सांभाळ केला. 'माय मरो, मावशी जगो' म्हणच आहे. मावशीलाही कोणी नव्हते. भाच्यावर तिचा सारा जीव. भाच्याचे नाव लाडकू. लाडकू दिवसभर हिंडे; फिरे. काम ना धाम. संध्याकाळी घरीही वेळेवर यायचा नाही. मावशी म्हणायची, ''वेळेवर येत जा रे घरी.'' लाडकू लौकर का येता आले नाही याच्या रोज नवीन सबबी सांगायचा. आणि मावशीचा राग शांत व्हायचा.

एके दिवशी रात्रीचे दहा वाजले तरी लाडकूचा पत्ता नाही. मावशी दारात उभी होती. रागाने म्हणाली, ''त्याला आज घरातच घेत नाही.''

इतक्यात धांपा टाकीत कावराबावरा झालेला लाडकू आला. त्याच्या तोंडातून जणू शब्द फुटेना. मावशीने विचारले,

''काय झाले लाडकू? असा का?''

''काय सांगू? मरणाची वेळ आली होती मावशी. खरेच सांगतो.''

''काय झाले? आत ये बाळ.''

घरात येऊन भाचा म्हणाला, ''लौकर घरी येण्यासाठी म्हणून निघालो. परंतु त्या जंगलातून वाघ आला. मी पटकन् झाडावर चढलो. वाघ झाडाच्या मुळाशी बसलेला. खाली कसा उतरणार मी? आणि मावशी, मला एकीची घाई झाली. मी वरूनच मग एकी करू लागलो. तो काय आश्चर्य? ती धार धरून वाघ वर येऊ लागला मावशी. मी घाबरलो. एकदम एकी बंद झाली. परंतु धार थांबल्यामुळे वाघ धपकन् खाली पडला. आणि दगडावर आपटल्यामुळे मेला. मी हळूच खाली उतरलो. न जाणों असली धुगधुगी तर पाठोपाठ यायचा म्हणून पळत आलो. मावशी, खरेच लौकर येणार होतो घरी. उशीर झाला म्हणून रागवू नकोस.''

मावशीची हसता हसता मुरकुंडी वळली व म्हणाली, ''लाडकू, लबाड आहेस हो तू. आज तुला घरात घेणार नव्हते. बरे, चल जेवायला.''

मेंग चियांग व इतर गोष्टी

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
मेंग चियांग 1 मेंग चियांग 2 मेंग चियांग 3 मेंग चियांग 4 मेंग चियांग 5 आशा आणि समीर 1 आशा आणि समीर 2 आशा आणि समीर 3 आशा आणि समीर 4 देवाचे हेतु 1 देवाचे हेतु 2 देवाचे हेतु 3 देवाचे हेतु 4 देवाचे हेतु 5 * शहाणा झालेला राजपुत्र 1 * शहाणा झालेला राजपुत्र 2 * शहाणा झालेला राजपुत्र 3 * शहाणा झालेला राजपुत्र 4 * शहाणा झालेला राजपुत्र 5 * शहाणा झालेला राजपुत्र 6 अद्भूत खानावळवाला 1 अद्भूत खानावळवाला 2 अद्भूत खानावळवाला 3 आत्म्याची हाक 1 आत्म्याची हाक 2 आत्म्याची हाक 3 नवी दृष्टी 1 नवी दृष्टी 2 नवी दृष्टी 3 नवी दृष्टी 4 नवी दृष्टी 5 अखेरची मूर्ति 1 अखेरची मूर्ति 2 अखेरची मूर्ति 3 अखेरची मूर्ति 4 अखेरची मूर्ति 5 कुटुंबाचा आधार 1 कुटुंबाचा आधार 2 कुटुंबाचा आधार 3 अधिक थोर देणगी 1 अधिक थोर देणगी 2 अधिक थोर देणगी 3 मोठी गोष्ट 1 मोठी गोष्ट 2 मोठी गोष्ट 3 मोठी गोष्ट 4 खंडित आत्मा 1 खंडित आत्मा 2 खंडित आत्मा 3 खंडित आत्मा 4 चिटुकल्या गोष्टी 1 चिटुकल्या गोष्टी 2 चिटुकल्या गोष्टी 3 चिटुकल्या गोष्टी 4 चिटुकल्या गोष्टी 5 चिटुकल्या गोष्टी 6 चिटुकल्या गोष्टी 7 चिटुकल्या गोष्टी 8